ओबामाची मुंबई सहल
मिशेल ओबामा थोडी वैतागलीच होती. सगळं पॅकिंग एकटीनेच करायचं म्हणजे काय? नवर्याची काडीची मदत नाही. अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यापासून त्याला वाटतंय आपण कोण झालो आणि कोण नाही. स्वत:ला अशोक चव्हाण समजतो. स्वत:चे शर्ट व टायदेखील स्वत: बघायचे नाहीत म्हणजे काय?
'गरम कपडे भरपूर घेऊन ठेव हं.' 'उगीच इंटरेस्ट दाखवत बराकराव म्हणाले, 'माझे लोकरीचे मोजे विसरू नकोस. मुंबईत लागतील.'
'मुंबईत?' मिशेल ओरडली. 'मुंबईतील हवा भट्टीसारखी आहे. लोकरीचे सोडा, नुसते मोजेही तुम्हाला घालता येणार नाहीत. टाय वगैरे विसरा. मलमलचा झब्बा व पायजमा हेच कपडे तुम्हाला सर्वत्र घालावे लागतील. 'ताज'मध्ये तर माझं ऐका, हाफपॅण्टवर उघडेच बसत जा. आपले सिक्युरिटीवाले सोडून कोण बघायला बसलंय?'
'सिसावाला झब्बा घे. मोबाईल व सुटे पैसे ठेवायला बरे पडेल.'
'सुटे पैसे म्हणजे चार आण्याचं नाणं घेऊ नका. ते नुसतंच अस्तित्वात आहे. चालत नाही. दहा पैशांचं नाणं तर मागेच गेलं.'
'कुठे गेलं?'
'ते तुमच्या सी.आय.ए.ला शोधून काढायला सांगा.'
'सी.आय.ए.ला इतर महत्त्वाचे बरेच उद्योग आहेत. सध्या सासू ही कुटुंबात मोडते की नाही या गहन प्रश्नाची उकल करण्यात ते गढलेत.' ओबामा मलमलचा झब्बा मापाचा आहे की नाही ते बघत म्हणाला.
'हे काय नवीन?'
'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितलंय की त्यांच्या व्याख्येनुसार सासू ही कुटुंबात मोडत नाही.'
'म्हणजे माझी आई ही आपल्या कुटुंबाचा हिस्सा नाही?'
'आहे गं.' ओबामा प्रेमळपणे म्हणाला, 'पण उद्या आपल्या 'व्हाइट हाऊस'मधील एखादी खोली तिला देण्यात आली आणि त्याबद्दल विरोधकांनी माझ्याविरुद्ध प्रचाराची राळ उडवली तर मी अशोकरावांनी घालून दिलेला पायंडा गिरवणार. एरवी तुझी आई मला माझ्या आईसारखीच आहे.'
'तुम्ही उद्धवसाहेबांना भेटणार की राजसाहेबांना?'
'नारायण राणेंना. त्यासाठीच मी मराठी शिकत होतो.'
'भेटल्यासरशी कोट कसा घालायचा तेही शिकून घ्या. बावळटासारखं टाय घालणं सोडून द्या. कणकवलीत लोकप्रिय व्हाल.'
'बिल क्लिंटन हिंदुस्थानात गाजला होता. त्याच्यापासून वागण्याच्या पद्धती शिकायला हव्यात.' ओबामा टाय चाचपत म्हणाला.
तो 'व्हाइट हाऊस'मधल्या प्रकरणातही गाजला होता. त्याच्या त्या वागण्याच्या पद्धती शिकून घेतल्या नाहीत म्हणजे मिळवली' मिशेल फणकार्याने म्हणाली.
'मी सुरेश कलमाडींना भेटावे अशी हिंदुस्थान सरकारची इच्छा दिसली.
'कोण आहेत ते गृहस्थ?'
'नो आयडिया पण त्यांच्या दाढीविषयी खूप ऐकायला मिळालं. ही सीम्स टु बी अ व्हेरी फोकसड् मॅन. दाढी वाढविण्यावर व तिची निगा राखण्यावर त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केलंय. आपल्याला अशा माणसांची गरज आहे, पण हिंदुस्थान त्यांची सेवा उपलब्ध करून देईल असे वाटत नाही.'
'मला शबाना आझमीला भेटायचं होतं, पण 'व्हिजीट टू झोपडपट्टी' असं कार्यक्रम पत्रिकेत लिहिलेलं नसल्याने ती कुठे भेटू शकेल हेच समजत नाही.' मिशेल विषादाने म्हणाली, 'त्यातून तिचा नवरा कम्युनिस्ट आहे म्हणे.'
'हिंदुस्थानातले कम्युनिस्ट म्हणजे पाणी घालून पातळ केलेले वरण. सिनेमा लायनीतले कम्युनिस्ट म्हणजे आपल्या बुशसारखे जोकर्स. ही माणसं महेश भटला 'इंटेलेक्चुअल' म्हणतात. आता बोल.'
'मला कळलं की हिंदुस्थानात फार गरिबी आहे.' मिशेल म्हणाली, 'माणसं जमिनीवर बसून हाताने जेवतात.'
'मी सगळी व्यवस्था केली आहे.' ओबामा म्हणाला, 'आपल्याला हाताने जेवता येत नाही हे त्यांना माहित्येय. म्हणून मला मनमोहन सिंगजी व तुला सोनियाजी भरवणार आहेत. एक घास काऊचा, एक घास चिऊचा असं म्हणत जेवायला घालायची त्यांची पद्धत आहे.
'पण त्याचा अर्थ काय?'
'मला तरी काय माहीत? जेवण हवं असेल तर रीतीभाती पाळाव्या लागतील.'
'जेवल्यावर हात धुतात म्हणे?'
'ते आपल्यासाठी नाही. मनमोहनजी व सोनियाजी हात धुतील.' ओबामा हात पॅण्टच्या खिशात घालून म्हणाला.
'दिवाळी म्हणून आपल्याला काय करावं लागेल?' मिशेलने विचारले.
'तू एखादी साडी विकत घे. व्यापार पेठेत घेतलीस तर स्वस्त पडेल. मी सोनियाजींना भाऊबीज घालीन.'
'किती?'
'जास्त नाही, दोन-पाच लाख डॉलर्स घालीन. इट्स अ टोकन गेस्चर, यू सी.'
'आपली सुरक्षा व्यवस्था भयंकर आहे म्हणतात. आपल्याला कोणापासून धोका आहे?' मिशेलने काळजीच्या सुरात विचारले.
'आपल्याला कसलाही धोका नाही. पण त्यांच्या आपसातल्या मारामार्यात आपल्याला चुकून दुखापत होण्याची त्यांना भीती वाटते. आपण आहोत तेवढे तीन दिवस मारामार्या स्थगित ठेवण्याची सूचना मी केली, पण ते म्हणाले की शक्य नाही. तेरड्याचा रंग तीन दिवस, आमच्या मारामार्या कायमच्याच आहेत.'
'मग तुम्ही काय म्हणालात?'
'जय हिंद!'
शिरीष कणेकर
No comments:
Post a Comment