Thursday, October 6, 2011

स्टीव्ह जॉब 1955-2011 Apple's Steve Jobs logged out

आयपॉड , आयफोन आणि आयपॅडच्या माध्यमातून जगात संगीत , मोबाइल आणि कॉम्प्युटर क्षेत्रात मोठी क्रांती घडविणारे ' अॅपल ' चे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून पोटाच्या कर्करोगाने आजारी असलेले जॉब्स आज पहाटे कायमचे ' लॉगआऊट ' झाले.

स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनामुळे आम्हाला अतिव दुःख झाले आहे. त्यांची सृजनशील प्रतिभा , नाविन्याचा ध्यास आणि अखंड ऊर्जा ही असंख्य शोधांसाठी कारणीभूत ठरली. त्यांच्या दूरदृष्टीचा लाभ जगभरातील असंख्य लोकांना झाला , अशा शब्दात अॅपल कंपनीच्या संचालक मंडळाने जॉब्स यांना श्रद्धांजली अर्पण केली. आयफोन , आयपॅड , आयक्लाउड यांची देणगी स्टीव्ह जॉब्स यांनी जगाला दिली.

२००४ सालापासून ते कर्करोगाशी लढा देत होते. २००९ साली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी त्यांनी कंपनीतून दीर्घकाळ आजारपणाची रजा घेतली होती. मात्र कर्करोगाचा त्रास वाढतच गेल्याने स्टीव्ह जॉब्स यांनी ऑगस्ट २०११ मध्ये अॅपलच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता. तंत्रज्ञान झार म्हणून ओळखले जाणारे जॉब्स यांनी आपली सूत्रे अॅपलचे विद्यमान मुख्य कार्यकारी टिम कूक यांच्याकडे सुपूर्द केली. आपला उत्तराधिकारी म्हणून कूक यांची निवडही त्यांनी स्वतःच केली होती. दोन दिवसांपूर्वीच स्टीव्ह जॉब्स यांच्या अनुपस्थितीत अॅपल कंपनीने आयफोन ४-एस या नव्या मोबाइल फोनचे लाँचिंग केले.

१९७६ साली सिलिकॉन व्हॅलीतील एका गॅरेजमध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या शाळकरी मित्रासोबत अॅपल कंपनीची स्थापना केली. मात्र ज्या कंपनीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली , त्याच कंपनीतून त्यांना १९८५ मध्ये बाहेर पडावे लागले. स्टीव्ह जॉब्स यांनी कंपनी सोडल्यानंतर अॅपलची घसरण सुरू झाली. त्यामुळे आपल्या या लाडक्या अपत्याला वाचवण्यासाठी १९९७ मध्ये स्टीव्ह जॉब्स पुन्हा अॅपलच्या सेवेत दाखल झाले. त्यानंतर मात्र या कंपनीने आजवर यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत केली. याचे श्रेय अर्थातच स्टीव्ह जॉब्स यांना जाते.

२००१ साली स्टीव्ह जॉब्स यांनी आयपॉड लाँच करून जगाला झपाटून टाकले. १००० गाणी तुमच्या खिशात अशा शब्दांत त्यांनी आयपॉडचे वर्णन केले होते. पांढरे इअरफोन आणि बोटांच्या सहाय्याने नियंत्रण अशा वैशिष्ट्याने सजलेल्या आयपॉडने संगीताच्या क्षेत्रात क्रांती घडवली. २००७ साली स्टीव्ह जॉब्स यांनी टच स्क्रीनवाला आयफोन लाँच करून जगाला वेडे करून टाकले. वर्षभरातच अॅपल अॅप स्टोअरची स्थापना त्यांनी केली. आणि २०१० साली आयपॅड या टच स्क्रीन टॅबलेट कॉम्प्युटरची निर्मिती करून जॉब्स यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवली.

स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५५ रोजी झाला. त्यांची आई जोन सिम्पसन त्यावेळी अविवाहित विद्यार्थिनी होती , तर अरबी वंशाचे वडिल अब्दुलफताह जंडाली हे सिरीयातून आलेले विद्यार्थी होते. त्यानंतर जोनने जंडाली यांच्याशी विवाह केला. मात्र त्याआधी तिने लहानग्या स्टीव्हला दत्तक दिले. अमेरिकेतील कालिफ भागात राहणा-या मध्यमवर्गीय क्लारा आणि पॉल जॉब्स दाम्पत्याने स्टीव्हला दत्तक घेतले. लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची त्यांना आवड निर्माण झाली. वयाच्या ११ व्या वर्षी नासाच्या अॅम्स संशोधन केंद्रात त्यांनी पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिला. आपले शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच ते हेवलेट-पॅकार्ड कंपनीत कामाला लागले. १९७२ साली त्यांनी पोर्टलँड येथील रीड कॉलेजमध्ये नाव नोंदवले , मात्र पहिल्या सहामाहीनंतरच त्यांनी कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून दिले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive