Saturday, October 1, 2011

Pension Planner - Career Opportunity पेन्शन प्लॅनर , एक उत्तम करिअर संधी!

केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयासाठी नवीन पेन्शन योजना (न्यू पेन्शन सिस्टिम) म्हणजेच एन. पी. एस. सादर केली आहे. भारतात गेल्या साठ वर्षात प्रथमच प्रत्येक नागरिकाला उपलब्ध असणारी ही परिपूर्ण पेन्शन योजना आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात क्रांती करणारी ही एक अप्रतिम योजना आहे. पेन्शन हा शब्दच सर्वाच्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे. सरकारी नोकरीत निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन हे एक अनिवार आकर्षण असते. निवृत्तीनंतरचे जगणे सुसह्य बनवणारी पेन्शन ही आजपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचीच मिरासदारी होती. अर्थात या पेन्शनसाठी सरकार त्यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम दरमहा कापून घेत असे, मात्र जिवंत असेपर्यंत सरकारी पेन्शन ही एक निवृत्तीनंतरची आशादायक सोय होती.
केंद्र सरकारने पेन्शन फंड रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटीच्या माध्यमातून आता प्रत्येक भारतीय नागरिकासाठी नवीन पेन्शन योजना जाहीर केली आहे. संपूर्ण देशात ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शेतकरी, व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनीयर, कलाकार, मजूर, कारागीर, हातावर पोट भरणारे, असंघटित आणि घरेलू कामगार, नियमित उत्पन्न असणारे असे सर्व प्रकारचे नागरिक या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. पेन्शनसाठी नियमितपणे बचत करायची क्षमता आणि इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला ही योजना उपलब्ध आहे. नवीन पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी सभासदाचे वय १८ ते ५५ वर्षे असावे लागते. या योजनेसाठी अर्ज केल्यावर त्याची छाननी होऊन त्या सभासदाला प्रश्नण क्रमांक म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर दिला जातो. पॅन नंबरप्रमाणे हा प्रश्नण नंबर सभासदाबरोबर आयुष्यभर राहील आणि संपूर्ण भारतात कोठूनही त्याला आपले रिटायरमेंट अकाऊंट चालवता येईल. दरवर्षी सभासदाला आपल्या खात्यात किमान रु. सहा हजार फक्त इतकी रक्कम भरावी लागते. नवीन पेन्शन योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कलम ८० सीनुसार रु. १,००,००० पर्यंत करमुक्त आहे. या करमुक्त मर्यादेत इतर गुंतवणूक उदा. विमा हप्ता, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट रु. समाविष्ट आहेत.योजनेचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे यात पी. पी. एफ.प्रमाणे कमाल रक्कम गुंतवणुकीवर कोणतेही बंधन नाही.
नवीन पेंशन योजनेचे प्रश्नयोजक एन पी एस ट्रस्ट हे आहेत. या सर्व योजनेची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याकरिता सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग आणि रजिस्ट्रार म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ही सरकारी संस्था काम करणार आहे. या योजनेत जमा केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारी पेन्शन ही सभासदाच्या नावावर त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी शिल्लक असणाऱ्या फंड रकमेवर अवलंवून असणार आहे. यासाठी या योजनेत सामील होतानाचे वय, गुंतवणुकीसाठी निवडलेला ऑप्शन आणि साठाव्या वर्षी शिल्लक असणाऱ्या किती रकमेवर अ‍ॅन्युएटी घ्यायची या बाबी महत्त्वाच्या आहेत.
नवीन पेंशन योजनेत सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पेन्शन सल्लागार म्हणून उत्तम करिअर संधी आहे. प्रश्नण रिटायरमेंट अकाऊंट उघडण्यापासून ते नवीन पेन्शन योजनेत कशा प्रकारे सहभागी व्हायचे, गुंतवणूक कशी करायची, गुंतवणुकीचे व्यवस्थापन कसे करायचे, त्यातील अडीअडचणी कशा सोडवायच्या याबाबत पेन्शन सल्लागार र्सवकष मार्गदर्शन करू शकतो. ही योजना विकण्यासाठी कोणत्याही एजंट किंवा ब्रोकर अशी योजना केलेली नाही. या योजनेत विम्याप्रमाणे एजन्सी चॅनेल समाविष्ट केलेले नाही. सगळ्यात मुख्य म्हणजे ज्यांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल त्यांना स्वत:हून पी.ओ.पी.कडे संपर्क साधायचा असून, दरवर्षी स्वत:चे काँट्रिब्यूशन जमा करायचे आहे. निवृत्ती डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला ही योजना कार्यान्वित ठेवायची आहे.
पेन्शन सल्लागार म्हणून व्यवसाय करण्यासाठी यात खूप मोठी व्यवसायसंधी आहे. यासाठी पेन्शन अ‍ॅकॅडमीने पेन्शन मॅनेजमेंटवर एक विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. यात शास्त्रोक्त पद्धतीने पेन्शन सल्लागार म्हणून कसे काम करायचे, सभासदांना मार्गदर्शन करायचे आणि सेवा कशी द्यायची याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये किमान पदवी पास किंवा बारावी पास आणि किमान ३ वर्षाचा अनुभव यांना पेन्शन सल्लागार म्हणून काम करता येईल. यासाठी बेरोजगार तरुण-तरुणी, गृहिणी, निवृत्त विमा एजंट, सामाजिक कार्यकर्ते, इ. सर्वाना चांगली संधी आहे. महिला बचतगटही यात उत्तम काम करू शकातत. कॉलेजमधील विद्यार्थीसुद्धा पेन्शन सल्लागार म्हणून काम करू शकतात. या योजनेत प्रचंड स्कोप असून, यातील ग्राहक वर्ग खूप मोठा आणि विस्तृत आहे. तसेच प्रत्येक घरात कमावता पुरुष आणि त्याची पत्नी या दोघांसाठी नवीन पेन्शन योजनेत पेन्शन योजना सुरू करता येऊ शकेल. या क्षेत्राची सुरुवात आता होत आहे. जे लोक या वेळी पेंशन सल्लागार म्हणून पदार्पण करतील त्यांना खूप मोठे करिअर घडविता येईल.
निवृत्तीनंतरही सन्मानाने जगण्यासाठी नवीन पेन्शन योजना आता सर्वाना उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांपासून, मिळवत्या स्त्रिया, बचतगटातील महिला, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, मोलकरणी यांपासून हमाल, मजूर, कामगार, कारागीर, डॉक्टर्स, वकील, व्यापारी, विक्रेते, उद्योजक सर्वाना ही योजना उपलब्ध करून द्यायची आहे. सुखी आणि आत्मनिर्भर निवृत्ती हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पेन्शन फंडस् हे वैयक्तिक सुरक्षिततेचे एक उत्तम साधन आहे. वृद्धापकाळातील गरजांसाठी स्वत:च्या तरुणपणातच आर्थिक तरतूद करणे हे आजच्या घडीला अत्यंत आवश्यक बनले आहे. वैद्यकीय सुविधा आणि सुधारणा यामुळे आपल्या देशातील सरासरी आयुष्यमान वाढत आहे. येत्या वीस वर्षात तो ८५ वर्षे वयापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. अशा वेळी निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे बनले आहे. पेन्शन सल्लागारांना पुढील काळात प्रचंड मागणी असणार आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive