Monday, June 14, 2010

पोस्टातून परदेशांत इन्स्टंट पैसे पाठवता येणार!

पोस्टातून परदेशांत इन्स्टंट पैसे पाठवता येणार!

भारतीय टपाल खात्याने मनी ऑर्डर परदेशी सेवेचा विस्तार केल्यामुळे आता परदेशात पैसे पाठवण्याची किंवा तेथून आलेले पैसे स्वीकारण्याची पद्धत सोपी होणार आहे.

राज्यातील शंभर प्रमुख पोस्ट ऑफिसांमधून ही सेवा सुरू करण्यात आली असून ग्राहकांना स्थानिक पोस्ट ऑफिसात या सेवेचा लाभ घेता येईल. इन्स्टंट मनी ट्रान्सफर या नव्या सेवेमुळे अवघ्या काही मिनिटात पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

या सेवेबरोबर भारत सरकारची 'न्यू पेन्शन स्कीम'ची सुविधाही आता पोस्टात उपलब्ध झाली आहे. ग्राहकाभिमुख सेवा पुरविण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल खात्याने 'न्यू पेन्शन स्कीम' राज्यातील ६१ प्रमुख पोस्ट ऑफिसांमधून सुरू केली आहे. अठरा ते पंचावन्न वयोगटातील व्यक्ती या योजनेअंतर्गत पोस्टात पैसे गुंतवू शकतील. यासाठी आकर्षक गुंतवणूक योजना पोस्टाने आखल्या असून ग्राहकांना त्यांच्या कुवतीनुसार पेन्शन योजना निवडता येणार आहे.

जीपीओमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पोस्टाच्या नव्या योजनांची माहिती देण्यात आली. मनी ऑर्डर परदेशी सेवा आता विस्तारण्यात आली असून त्यायोगे शिक्षण, वैद्यकीय उपचार, परदेशातील प्रवास इत्यादीसाठी किंवा कुुटुंबियांच्या देखभालीसाठी पैसे पाठवता येणार आहेत. पन्नास हजारांपर्यंत रक्कम रोख स्वरूपात तर त्यावरील रकमेचा व्यवहार चेकद्वारे करण्यात येईल. या दोन सेवांबरोबरच इन्स्टंट मनी ऑर्डर (आयएमओ) ही वेब आधारित पैसे हस्तांतरणाची सेवाही पोस्टात सुरू झाली आहे. यामुळे पैसे हस्तांतरणाची क्रिया जलद गतीने, सुरक्षित पद्धतीने, कमी किचकट आणि अधिक विश्वासार्ह होणार आहे. कमीतकमी एक हजार आणि जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये आयएमओ सेवेद्वारा पाठवता येतील. आयएमओ सुविधा अत्यंत वाजवी किंमतीत उपलब्ध करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे प्रमुख पोस्ट मास्तर जनरल फैज-उर-रहेमान यांनी सांगितले. आयएमओ सेवा राज्यातल्या ३५०हून अधिक पोस्ट ऑफिसांमधून सुरू करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive