Sunday, June 6, 2010

पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते. यास प्रतबंध होण्याच्या दृष्टीने ...

आरोग्याचे तंत्र घरोघरी !


आयुर्वेदाच्या इतिहासात एक गोष्ट आहे. जीवक नावाचे एक तरुण वैद्य आपल्या गुरुंकडे आयुर्वेद शिकत होते. ते अतिशय बुद्धिमान होते, गुरुंनी शिकवलेले त्यांना चटकन समजत असे कायमचे लक्षातही राहत असे. या पद्धतीने सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस त्यानी गुरुला विचारले की माझे शिक्षण पूर्ण झाले आहे का नाही हे कसे समजावे? यावर गुरुंनी उत्तर दिले की बागेत काम करण्याची खुरपणी घेऊन चारही दिशांनी प्रवास कर जे औषधी नाही असे द्रव्य घेऊन ये.

जीवक निघाले, काही दिवसांनी परत येऊन म्हणाले, आचार्य मी चारही दिशांना खूप फिरलो पण मला औषधी नाही असे काहीच सापडले नाही. यावर गुरु म्हणाले, तुझे शिक्षण पूर्ण झाले. पुढे हेच वैद्य राजवैद्य झाले.

 

ही गोष्ट इथे सांगण्याचे कारण म्हणजे आपल्याही घरात, आसपास असणाऱ्या सर्व नैसर्गिक गोष्टींमधे काही ना काही औषधी गुण असतात. यांची योग्य योजना करता आली तर ते घरगुती उपचारच होत. सध्याचे दिवस आहेत उन्हाळ्याचे. उष्णतेने शरीरातील पित्तदोष वाढणे स्वाभाविक असते. अशावेळी करता येण्यासारखे घरगुती उपचार याप्रमाणे होत.

 

उन्हाळ्यात पाणी पिऊनही समाधान होत नाही, ओठ, घसा कोरडे पडतात, हातापायाच्या तळव्यांची आग होते, अशावेळी साधारण एक लिटर पाण्यात दोन सुके अंजीर, मुठभर मनुका आणि दोन चमचे धने घालून हे सर्व मिश्रण रात्रभर माठात ठेवावे. सकाळी रवीने घुसळून, गाळून पुन्हा माठात ठेवावे. दिवसभरात हे पाणी थोडे थोडे प्यायल्यास ऊन्हाळ्याचे त्रास कमी होतात. ऊन्हाळ्यामधे थकल्यासारखे वाटते तेही कमी होते.

 

उन्हाळ्यामधे द्राक्षे मिळतात. द्राक्षांचा रस हा उन्हाळ्यातील ऊष्णता कमी करण्यासाठी उत्कृष्ट असतो. द्राक्षाच्या रसात चिमुटभर जीरेपुड आणि चिमुटभर बडिशेपेची पूड टाकुन प्यायले असता उन्हाळ्यातील उष्णतेमुळे क्षीण झालेला रसधातु पुन्हा टवटवीत होतो. द्राक्षे वार्याने थंड असल्याने अंगाचा दाह, मूत्राचा दाह वगैरे लक्षणे कमी होतात.

 

बऱ्याच व्यक्तींना उन्हाळ्यात डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे वगैरे त्रास होतात. संगणकावर वा प्रखर प्रकाशात काम करणाऱ्यांना तर उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवणे उत्तम असते. शुद्ध गुलाबपाण्याच्या किंवा तापवलेल्या कच्च्या, थंड किंवा तापवून गाळून घेतलेल्या दुधाच्या घड्या ठेवण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो.

 

* उन्हाळ्यात लहान मुलांना तसेच त्वचा असणाऱ्यांना घामोळे येताना दिसते, यावर खरबूजाचा गर लावण्याचा उपयोग होतो.

 

* उष्णता वाढल्याने तळपायांची जळजळ होत असल्यास दुधीचा कच्चा कीस बांधून ठेवण्याचा तसेच दूर्वांच्या लॉनवर अनवाणी चालण्याचा उपयोग होतो.

 

* उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्यक्ष उन्हात जाण्याचे टाळणेच हितकर असते. पण उन्हात जावे लागलेच तर उन्हाचा त्वचेवर परिणाम होऊ नये, त्वचा काळवंडू नये यासाठी चेहरा, हात वगैरे उन्हाचा संपर्क आलेल्या ठिकाणी घरचे ताजे लोणी चोळणे उत्तम असते.

 

* उन्हाळ्यात लघवी करताना आग होणे, लघवीचा रंग गडद होणे वगैरे लक्षणे असल्यास कपभर दुधात अर्धा चमचा चंदनाचे गंध चवीनुसार खडीसाखर मिसळून घेतल्यास लघवीला साफ होऊन बरे वाटते.

 

* उष्णता बाधू नये म्हणून उन्हाळ्यात शीतल द्रव्याची उटणी लावावीत असे आयुर्वेदात सुचविले आहे. अनंतमूळ, वाळा, चंदन, ज्येष्ठमध वगैरे शीतल, सुगंधी वर्णात हितकर द्रव्यांचे चूर्ण मुगाच्या डाळीचे पीठ यापासून तयार केलेल्या उटणे लावून स्नान करणे उन्हाळ्यात उत्तम होय.

 

उन्हाळ्यानंतर येतो पावसाळा, म्हणजे आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा काळ. पावसाळ्यात अग्नी मंद होत असल्याने पचन खालावते, वात वाढतो, त्यामुळे शरीरशक्ती कमी होत असते. शिवाय पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या गोष्टी लक्षात घेता पावसाळा सुरू झाला की त्रास होण्यापूर्वीच काही घरगुती उपचार करणे इष्ट असते.

 

* गवती चहा, आले, तुळशी, दालचिनी यांच्यासह उकळलेल्या पाण्यात चवीनुसार साखर टाकून पावसाळ्यात रोज एकदा घेणे चांगले असते. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतबंध होतो पचनशक्ती चांगली राहण्यास मदत मिळते.

 

* ओवा, तीळ, ज्येष्ठमध, सैंधव वगैरे द्रव्यांपासून बनविलेली सुुपारीपावसाळ्यात जेवणानंतर खाणे हितावह असते, याने पचनाला मदत होते.

 

* पावसाळ्यात पुदिना हे सुद्धा मोठे घरगुती औषध आहे. जेवणात पुदिन्याची ताजी पाने, काळी द्राक्षे, जिरे, हिंग, सैंधव, मिरी यापासून बनविलेली चटणी खाण्याचा उपयोग होतो. याने तोंडाला रुची येते, शिवाय पचनास मदत मिळते.

 

* दुपारच्या जेवणानंतर किसलेले आले पुदिन्याचा रस टाकून ताक घेण्यानेही पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. विशेषतः जुलाब, आव वगैरे त्रासांना प्रतबंध होतो.

 

* पावसाळ्यात वातदोष वाढतो. वात वाढला की त्यापाठोपाठ दुखणेआलेच. संधिवात, आमवात वगैरे दुखणे असणाऱ्यांना याचा अनुभव येतोच. अशा व्यक्तींनी इतरांनीही पावसाळ्यात सुंठ-गूळ-तूप यापासून बनविलेली लहान सुपारीच्या आकाराची गोळी घेणे चांगले असते. याने वातदोष नियंत्रित होण्याबरोबर पचनालाही मदत मिळते.

 

* पावसाळ्यात भूक लागत नसली, पोट जड वाटत असले, गॅसेस अडकून राहिले आहेत असे वाटत असले तर लिंबू आल्याच्या रसाच्या मिश्रणात थोडी जिरे पूड सैंधव टाकून तयार केलेले चाटण थोडे थोडे चाटणे उत्तम असते.

 

* हिंग्वाष्टक नावाचे चूर्ण पावसाळ्यात उत्तम होय. त्रास असो वा नसो, प्रकृतीनुसार पाव ते अर्धा चमचा चूर्ण थोडेसे तूप भाताच्या पहिल्या घासाबरोबर घेण्याने भूक लागायला मदत होते, अन्न व्यवस्थित पचते.

 

* पावसाळ्यात तेल लावून गरम पाण्याने स्नान करणे हितावह असते. वातशामक द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल वापरणे अधिक हितावह असते.

 

* जंत होऊ नयेत झालेले जंत नष्ट व्हावेत यासाठी उपाययोजना करणे एरवीही चांगले असते. पावसाळ्यात मात्र याकडे विशेषतः द्यावे लागते. त्यादृष्टीने महिन्यातून आठ दिवस सकाळी चमचाभर वावडिंगाचे चूर्ण मधासह घेणे चांगले असते. कढीलिंबाची ताजी पाने वाटून केलेली गोळी अधून मधून घेण्याचाही उपयोग होतो.

 

* पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. यास प्रतबंध होण्याच्या दृष्टीने घर, ऑफिस, दवाखाने वगैरे सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे धूप करणें उत्तम असते. यासाठी कडुनिंबाची पाने, वावडिंग, कापूर, ऊद वगैरे द्रव्यांचे मिश्रण वा तयार 'संतुलन प्युरिफायर धूप' वापरता येतो.

 

पावसाळ्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी येणाऱ्या शरद ऋतूत पुन्हा एकदा पित्त वाढत असते किंबहुना पित्ताचा प्रकोप ह्याच काळात होत असल्याने उन्हाळ्यात घ्यायची काळजी पुन्हा या दिवसात घेणे आरोग्यरक्षणासाठी चांगले असते.

 

तसे पाहता हिवाळा हा आरोग्यदायक काळ असतो. या दिवसात अग्नी प्रज्वलित होतो, शरीरशक्ती आपोआपच वाढते. थंडीचा त्रास होऊ नये निसर्गतः वाढणाऱ्या शरीरशक्तीला घरगुती उपायांची जोड मिळून ताकद कमवून ठेवता यावी यासाठी निश्चित प्रयत्न करता येतात.

 

* हिवाळ्यात नियमित अभ्यंग करणे उत्तम असते. यामुळे थंडीचे निवारण होते शरीरशक्ती वाढायला मदत होते.

 

* थंडीमुळे त्वचा कोरडी होण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी अगोदर अंगाला तेल लावून नंतर अगरू, जटामांसी, केशर, वगैरे द्रव्यांनी युक् "सॅन मसाज पावडर'सारख्या उटण्याने स्नान करण्याने हिवाळ्यात उत्तम असते.

 

* थंडीमुळे सर्दी, खोकला होऊ नये, तसेच शरीरात कफदोष साठू नये यासाठी हिवाळ्यात नेहमीच्या चहात गवती चहा टाकणे चांगले असते.

 

* हिवाळ्यात जेवणानंतर त्रयोदशी विडा म्हणजे शास्त्रोक् पद्धतीने बनविलेला विडा खाण्याचाही उपयोग होतो. याने अतिरिक् कफदोष कमी होऊन पचन चांगले होते.

 

* हिवाळ्यात बदामाची खीर खाणे चांगले असते. रात्री चार बदाम भिजत घालावेत, सकाळी साले काढून बारीक वाटावेत दुधात कालवून थोडे आटवावे. यात खडीसाखर थोडे तूप टाकून तयार झालेली खीर सकाळी खावी.

 

* डिंकाचे लाडू, कोहळेपाक, गव्हाची खीर आदी धातुपोषक पदार्थांचा आहारात समावेश करणेही हिवाळ्यात हितकर असते.

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive