Saturday, June 18, 2011

सायकल ते मर्सिडिझ...... प्रवास.... एका मराठी माणसाचा !!!



cr11.jpg
घामेजलेला चेहरा; दाढीचे खुंट वाढलेले. चेहऱ्यावर अगतिक भाव. हातात मोठी बॅग; त्यामध्ये अस्ताव्यस्त पसरलेले कागद.. वेळी-अवेळी घरी/ऑफीसमध्ये डोकावणारा.. सारखी भुणभुण लावणारा; तुमच्या मागे कुटुंब वाऱ्यावर पडू शकतं, अशी भीती दाखवणारा.. असे अनेक समज-गैरसमज एलआयसी एजंटबद्दल आहेत. बऱ्याच वेळेस आपण देखील नातेवाईक किंवा मित्र असलेल्या एलआयसी एजंटची कटकट नको म्हणून एखादी पॉलिसी काढतो. परंतु हे सर्व प्रवाद माहिती असूनदेखील स्वेच्छेने याच व्यवसायात प्रवेश करून आज भारतातील शंभर आघाडीच्या एलआयसी एजंटांमध्ये गणले जाणारे सुनील सोहोनींना भेटल्यावर मात्र हे सर्व समज-गैरसमज दूर होतात.

साठीच्या जवळपास पोहोचलेले सुनील सोहोनी.. एक आकर्षक व्यक्तिमत्त्व.. हसतमुख.. बोलघेवडे.  पुण्याहून मुंबईत आल्याने निवासाची सोय नसताना कधीकाळी रस्त्याच्या कडेला तर, कधी दुकानाच्या फळकुटावर झोपलेले.. वेटर म्हणून काम करून आयुष्याची सुरुवात करणारे व नंतर आपल्या चांगुलपणाच्या शिदोरीवर इन्स्पेक्टर प्रधानांच्या शिफारशीमुळे 'हॉलिडे इन'मध्ये स्टिवर्ड म्हणून नोकरी करणारे. सोहोनी म्हणजे अजब रसायन.

सोहोनी सांगतात, रेस्टॉरण्टमध्ये स्टिवर्ड म्हणून काम करीत असताना नीटनेटके राहणे, चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवणे, प्रसन्नपणे बोलणे या गोष्टींची सवय लागली. इंग्रजीचा सराव झाला.  याच संस्कारांचा माझ्या आजच्या व्यवसायासाठी खूप उपयोग झाला. प्रत्येक घटना, गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवीत असते यावर सोहोनींचा विश्वास आहे. ते सांगतात, एरवी आपण चित्रपट संगीत, नाटक यांचा विरंगुळा म्हणून पाहत असतो. परंतु माझ्या बाबतीत मात्र त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'The Pursuit of Happiness' या चित्रपटाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. हॉटेल हॉलिडे इनमध्ये त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या एका कंपनीचे वरिष्ठ अधिकारी एस. टी. वेलू यांची ओळख झाली. त्यांना माझ्यामध्ये उत्तम सेल्समन दडल्याचे जाणवले आणि त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये येण्यास सांगितले. येथेच माझ्यातील विक्रेत्याला भरपूर वाव मिळाला.

वेलूसाहेबांनी त्यांच्या परिचित असलेल्या एलआयसी अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. व त्यानंतर मी 'पार्ट टाइम' म्हणून एलआयसी एजंट म्हणून काम सुरू केले. पहिल्याच वर्षी सुमारे १३ लाखांचा व्यवसाय केला व चौथ्या वर्षी सुमारे पन्नास लाखांचा व्यवसाय केला व नंतर मी पूर्ण वेळ एलआयसीचा एजंट म्हणून काम करू लागलो. सोहोनी सांगतात, वेलूसाहेबांनी मला या व्यवसायात येण्यास प्रवृत्त केले त्यांचा एक कोटी रुपयांचा विमा मी काढला व त्यासाठी माझ्या स्वत:च्या मारुती कारमधून त्यांना एलआयसीच्या ऑफीसमध्ये नेल्याचे सांगतात. सुमारे तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी सायकलवरून क्लाएंटला भेटायला जाणारे सोहोनी आज मात्र स्वत:ची 'मर्सिडिज बेंझ' घेऊन जातात.

गेली काही वर्षे सोहोनी कॉर्पोरेट, व्यावसायिक यांना आपले लक्ष्य करीत आहेत. सोहोनी सांगतात, खरे तर या कॉर्पोरेट बॉसेसना आपण पॉलिसी विकू शकतो; परंतु त्यांच्यापर्यंत कुणीही जाण्याचा प्रयत्न करीत नाही. म्हणूनच मी प्रयत्न करतोय आणि यशस्वीदेखील होत आहे. यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये असलेल्या विक्रेत्याकडे आत्मविश्वास हवा. तुम्हाला व्यवसायाची संपूर्ण माहिती हवी, त्यांच्या शंकांचे निरसन करता येणे आवश्यक आहे. इतक्या वर्षांचा अनुभव असलेल्या सुनील सोहोनींचा फंडा अगदी स्पष्ट आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वत:ला ओळखा.. आणि मगच जग तुम्हाला ओळखेल. सतत वाचन, चिंतन करा.. यामुळे तुमच्या समोर येणाऱ्या प्रश्नांना तुम्ही उत्तरे शोधू शकाल.

तुम्ही इतके यशस्वी कसे झालात यावर सोहोनी म्हणाले, मी कधीही व्यवसाय मिळविण्यासाठी कुणाकडेही जात नाही.. समोरच्याशी मित्रत्वाने वागा, संबंध निर्माण करा, त्यानंतर समोरची व्यक्ती आपणहून तुम्हाला सांगते की, मलादेखील पॉलिसी काढायची आहे. पुढे नंतर तेच आपणाला व्यवसाय देतात.

आपण गेल्या वर्षी बॉलिवूडमधील एका बडय़ा अभिनेत्याचा ३५ कोटी रुपयांचा विमा काढला यावर सोहोनी म्हणाले, त्यासाठी मला सुमारे चार वर्षे लागली. एकही पैसा व्यवसाय न मिळता मी संबंध, मैत्री जोपासली आणि चार वर्षांच्या संबंधामुळे मला ही ३५ कोटींची पॉलिसी मिळाली. सुनील सोहोनी सांगतात, पॉलिसी मिळविणे हे अत्यंत सोपे आहे; परंतु खरी कसोटी ही पॉलिसी मिळविल्यावर सुरू होते. यासाठी आम्ही आमच्या क्लाएंटचा पर्सनल डाटा तयार केला आहे. लग्नाचे वाढदिवस. जन्मदिवस, पत्नी/पतीचा वाढदिवस, तसेच मुलांचे वाढदिवस या दिवशी आवर्जून फोन अथवा ग्रीटिंग्ज पाठवतो. तसेच पॉलिसीची मुदत संपली की त्यांचे पैसे वेळेवर मिळतील. याकडे जाणीवपूर्वक नजर ठेवतो. यामुळे पुढील व्यवसाय सुकर होतो व आपले व्यावसायिक आणि व्यक्तिगत संबंध दृढ राहतात.

सुनील सोहोनी सांगतात, 'मिलियन डॉलर राऊंड टेबल' या क्लबचा मानद सदस्य झाल्यानंतर मी १९९९ साली 'कोर्ट ऑफ दी टेबल' (COT) चा मानद सदस्य झालो. या क्लबचा मानद सदस्यत्व मिळविणारा मी मुंबई विभाग तीनचा प्रथम एजण्ट ठरलो. यानंतर सतत पाच वर्षे  मी 'कोर्ट ऑफ दी टेबल' या क्लबचा मानद सदस्य राहिलो आणि २००३ मध्ये TOT म्हणजे टॉप ऑफ दी टेबल या अतिशय मानाच्या क्लबचा मानद सदस्य म्हणून मान्यता पावलो.

यश मिळविणे कठीण असेल तर मिळविलेले यश टिकविणे सर्वात कठीण गोष्ट आहे; परंतु सुनील सोहोनी ते आव्हान लिलया पेलतात. TOT म्हणजेच 'टेबल ऑफ दी टॉप' या क्लबच्या मानद सदस्यत्व मिळविल्यानंतर २००८ या एकाच वर्षांत सुनील सोहोनी दोन वेळेस तर २००९ मध्ये तीन वेळेस या मानद सदस्यत्वाची मर्यादा पार केली आहे. ळडळ म्हणजेच टेबल ऑफ दि टॉप. यासाठी पहिल्या वर्षांचे कमिशन सुमारे ४५ लाख इतके असावे लागते. सोहोनींच्या उत्तम व्यावसायिक रहस्य जाणून घेण्यासाठी आणि या व्यवसायात नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी अमेरिकेतील इन्शुरन्स कंपन्या त्यांना मानद व्याख्याता म्हणून आमंत्रित करतात. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या खासगी क्षेत्रातील व्यावसायिक इन्शुरन्स कंपन्यांनी प्रवेश केला आहे, त्यांची मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी होत असलेला खर्च पाहता सरकारी पठडीतील 'एलआयसी'सारख्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण होत असेल यावर सोहोनी म्हणाले, सुरुवातीच्या काळात थोडेसे जड जाते; परंतु 'एलआयसी'ला सुमारे चाळीस वर्षांचा रिपेमेंटचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. तोच आमचा  'USP' आहे आणि त्यावर भर दिला की, सर्व सोपं जातं.

आपल्यासारख्या मातब्बर एजंटांना स्वत:च्या बाजूला वळवून घेण्याचे प्रयत्न झाले असतीलच यावर सोहोनी म्हणाले, अर्थातच परंतु विश्वास आणि निष्ठा यावर अचल श्रद्धा असेल तर कोणीही आपणास अंकित करू शकत नाही. सोहोनींची दुसरी पिढीही याच व्यवसायात करिअर करीत आहे.  कॉर्पोरेट क्षेत्रातील बडय़ा असामींना आपले क्लाएंट बनविण्याची मनीषा बाळगणाऱ्या सोहोनींचे पुढील लक्ष  सेलिबेट्री आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती असून आज ना उद्या त्यांना आपले क्लाएंट करण्याचा पक्का मनसुबा बाळगून आहेत.

सुनील सोहोनींच्या गोरेगाव येथील १२ व्या मजल्यावरील आलिशान घराच्या गॅलरीतून मुंबईची फिल्मसिटी दिसते. सुनील सोहोनींचे क्लाएंटस् अक्षरश: नजरेच्या टप्प्यात आले असून एक दिवस संपूर्ण बॉलिवूडच सोहोनी कुटुंबीयांचे क्लाएंट असतील याची खात्री पटते. कधी काळी सामान्य एजंट असलेले सोहोनी आज मात्र 'एलआयसी'चे 'ब्रँड' झालेले दिसतात.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive