Sunday, June 26, 2011

मी पाहते विठ्ठलात ब्रह्मांड!


मी पाहते विठ्ठलात ब्रह्मांड!
प्रदीप कुलकर्णी (pradeep.r.kulkarni@gmail.com)

ज्ञानेश्‍वर महाराज-तुकाराम महाराज या दोन शब्दांनी त्यांच्या मनात कुतूहल जागवलं. कोण आहेत हे दोघं, या प्रश्‍नाचा मागोवा घेत त्या प्रथम पोचल्या आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमात. तिथं त्या सर्वोदयी बनल्या. ज्ञानोबा-तुकोबांशी त्यांची प्राथमिक ओळख तिथंच झाली. ही ओळख घनदाट व्हावी, याची आस त्यांना लागली नि त्यांचे पाय आपसूकच पंढरीच्या वारीकडं वळले. जपानच्या युरिको इकिनोया यांची ही गाथा...कशी दिसते त्यांना ही पंढरीची वारी? 

त्यांची आणि भारताची; विशेषतः महाराष्ट्राची, ओळख होऊन, आता झालीत बरीच वर्षं. जवळपास 35 तरी. दूर अतिपूर्वेकडील देशात राहणाऱ्या त्यांना पूर्वेकडील या भारतात खेचून आणलं ते दोन शब्दांनी. ज्ञानोबा आणि तुकोबा! हे दोन शब्द त्यांना अगदी पहिल्यांदा भेटले ते त्यांच्याच देशात. जपानमध्ये! गीताप्रवचनाच्या भाषांतरात. हे दोन शब्द म्हणजे नेमकं आहे तरी काय, याचा शोध घेत त्या पोचल्या भारतात. महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील विदर्भात आणि विदर्भामधील वर्ध्यातील पवनार आश्रमात. आचार्य विनोबा भावे यांच्या या आश्रमात त्यांची "ज्ञानोबा-तुकोबां'शी प्राथमिक ओळख झाली नि पुढं ती घनदाट व्हावी म्हणून त्या पंढरपूरच्या आषाढी वारीत आल्या...ते साल होतं 1981. आता "त्या वारीच्या आणि वारी त्यांची', असं होऊन गेलंय. त्यांचं नाव आहे युरिको इकिनोया! एरवी मुक्काम ः पवनार आश्रम, वर्धा. विनोबांच्या समग्र साहित्याच्या अभ्यासात त्या गढून गेल्या आहेत. आदी शंकराचार्यांचं तत्त्वज्ञानही त्यांना खूप आवडतं. महात्मा गांधींच्या विचारांचाही त्यांना अभ्यास करायचा आहे...भारतीय अभिजात संगीतात त्यांचे आवडते राग आहेत मालकंस नि केदार...! आता भारत हाच त्यांचा देश आहे...भारताचं कायमस्वरूपी नागरिकत्व मिळावं, यासाठी अलीकडंच त्यांनी सरकारदरबारी अर्जही करून ठेवलाय...

विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा....या चार भरभक्कम खांबांवरच इकिनोया यांच्या जगण्याची "इमारत फळा आली' आहे!
अगदी परवा, म्हणजे ज्ञानोबांच्या पालखीचं आळंदीहून पुण्याकडं प्रस्थान होण्याच्या दोन दिवस आधी, इकिनोया यांची आळंदीतच भेट घेतली.
"मुलाखत द्याल का?', विचारल्यावर संकोचून त्या म्हणाल्या, "मुलाखत म्हटलं की ती गंभीर वगैरे होणार आणि वारीबद्दल गंभीर होऊन सांगण्यासारखं माझ्याकडं तसं काहीही नाही. वारी हा माझ्या परमानंदाचा, ब्रह्मानंदाचा आणि अखंड समाधानाचा विषय आहे. गेल्या 31 वर्षांचा हा सारा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. वाटलंच तर आपण गप्पा मारू या.त्यातून तुम्हाला जे मिळेल, ते मिळेल.'
म्हटलं, "चालेल.'

इकिनोया हिंदी अस्खलित बोलतात. अधूनमधून छोटी छोटी मराठी वाक्‍यंही पेरतात. नामस्मरण, पारायण, स्मरणशक्ती, शिस्त, समाधिस्थ, निष्ठा या शब्दांचं उच्चारण अगदी शुद्ध!

आळंदीतील देवीदास धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर 50 मध्ये दुपारी पोचलो. पांढऱ्याशुभ्र साडीतील लहानखुऱ्या चणीच्या इकिनोयांनी भारतीय पद्धतीनं दोन्ही हात जोडून स्मितहास्यानं स्वागत केलं. गळ्यात तुळशीच्या दोन माळा, कपाळावर कुंकवाचा छोटासा टिळा...



खोलीत उजव्या हाताच्या मांडणीवर ज्ञानेश्‍वरी, तुकारामगाथा, समग्र विनोबा आणि इतरही अनेक धार्मिक ग्रंथ...मांडणीच्या एका कप्प्यात विठ्ठल-रखुमाईच्या पितळी मूर्ती, ज्ञानोबांच्या चित्राचा काळा-पांढरा फोटो, तुकोबांच्या चित्राचा रंगीत फोटो, विनोबांचा छोटेखानी फोटो...आणखीही इतर देव-देवतांचे फोटो, एक ताम्रकलश...समोरच्या टी पॉयवर संत कबीरांच्या दोह्यांचा संग्रह....जवळच एका कागदी खोक्‍यात वेगवेगळ्या प्रकारची बरीच छोटी-मोठी औषधं...कुण्या मराठमोळ्या भागवतभक्ताचीच ही खोली आहे की काय जणू, असा सारा थाट! नाही म्हणायला अत्याधुनिकतेची काही पावलंही त्या खोलीत होती. छोट्याशा दिवाणावर लॅपटॉप होता, मोबाईल होता. शिवाय, विनोबांच्या समग्र साहित्याचा अकरावा खंडही...इकिनोया खोलीत नसताना तिथं कुणी गेलं असतं तर, ही खोली कुण्या विदेशी व्यक्तीची आहे, हे सांगूनही पटलं नसतं. आता इकिनोया स्वतःच तिथं उपस्थित असल्यानं विश्‍वास ठेवावाच लागत होता...! खोलीत प्रवेश केला तेव्हा विनोबांच्याच समग्र साहित्याचा अकरावा खंड त्या वाचत होत्या. तुकोबांचे अभंगांत काहीतरी शोधत होत्या...

मुलाखतीऐवजी गप्पाच मारायच्या असल्यानं थेट गप्पाच सुरू केल्या...पहिला प्रश्‍न अगदी नावालाच विचारला..."महाराष्ट्रात अशी काही वारी असते हे तुम्हाला कळलं तरी कसं...?'

साठीच्या आत-बाहेर असलेल्या इकिनोयांचा चेहरा उजळला नि अस्खलित हिंदीत त्या सांगू लागल्या... ""आचार्य विनोबांच्या गीताप्रवचनांचं जपानी भाषांतर जपानमध्येच माझ्या वाचनात आलं. त्यात ज्ञानेश्‍वर महाराज-तुकाराम महाराज हे दोन शब्द मला वारंवार आढळले आणि त्या शब्दांनीच मला महाराष्ट्रात खेचून आणलं. विनोबांच्या सगळ्याच साहित्याचा, सर्वोदय चळवळीचा, त्या विचारांचा मला अभ्यास करायचा होता. त्यासाठी मी 1976 साली केवळ दोनच महिन्यांसाठी पवनार आश्रमात आले होते. मात्र, केवळ दोन महिन्यांत या साहित्याची साधी ओळखही होणार नाही, हे मला लवकरच कळून चुकलं. मी मग महाराष्ट्रात तीन वर्षं राहायचं ठरवलं. विनोबांच्या "गीताई'च्या प्रचारासाठी वारीच्या काळात त्यांचे शिष्यगण आळंदीत जात असत. त्यातीलच काही शिष्यांनी एका वर्षी, म्हणजे 1981 साली, मला आणि माझ्याबरोबरच्या पाच-सहाजणींनाही प्रचारासाठी वारीत येण्याविषयी सुचवलं आणि मी पंढरीच्या वारीत गेले. तीच माझी पहिली वारी. पुढची सलग 30 वर्षं मग मी वारीला जातच राहिले. ही सगळी वर्षं मी पायी वारी केली. याच वर्षी प्रकृती कुरकुरू लागल्यानं मला मनासारखी वारी करता येणार नाही. पहिल्या वेळी माझ्याबरोबरच्या ज्या सहकारी होत्या, त्यांनी मला सांगितलं की, "वारीच्या परिसरात खूप घाण-दुर्गंधी आहे, तेव्हा पुढच्या वर्षी आम्ही काही वारीत येणार नाही.' काहीक्षण मलाही वाटलं की, पुढच्या वर्षी आपणही येऊ नये...पण तरीही दुसऱ्या वर्षी माझे पाय आपसूकच वारीकडं वळले...आणि मी वारीत येत राहिले ती आजतागायत...पहिली बारा वर्षे तर मी संपूर्ण चतुर्मासात पंढरपूरलाच मुक्कामी असे. आषाढी वारीच्या वेळी तिकडं गेले की, थेट कार्तिकी वारीनंतरच परतायचं. तिथं धुंडामहाराज देगलूकर यांचं खूप प्रेम मला मिळालं. वारीशिवाय मी हिमालयातही अनेक वर्षे जात-येत राहिले. तिथं मी काही महिने राहत असे. हिमालयात अगदी आत, गाढ एकांतात मी जाऊन बसत असे. ध्यान करत असे. तिथं मला निर्गुण-निराकार ईश्‍वराचा अनुभव आला आणि वारीत मी सगुण-साकार ईश्‍वराचा अनुभव घेतला. हे दोन्ही एकच आहेत, असं माझं मत अनुभवान्ती बनलं.''

""वारीत चालतानाचा अनुभव शब्दांत वर्णन करण्यासारखा नाही. तो परमानंदाचाच अनुभव आहे. भोवतालचे असंख्य वारकरी तुकोबांचे अभंग म्हणत आहेत...मीही त्यांच्यासोबत गुणगुणत आहे...गुणगुणता गुणगुणताच माझी समाधी लागत आहे...हा अनुभव मी कितीतरी वेळा घेतला. वारकऱ्यांची भजनं ऐकतानाचा मला होणारा आनंद काय सांगावा? दरवर्षी पंढरपूरची वारी पायी करण्याचं बळ हेच लोक मला देत असतात...तुकोबांचे अभंग साध्यासुध्या लोकांसाठी आहेत, व्यापक आहेत; तर ज्ञानेश्‍वरी ही तशी सहजासहजी उमजून येणारी नव्हे. ती समजून घ्यायला वेळ लागतो. त्यासाठी आजवर मी ज्ञानेश्‍वरीची 108 पारायणं केली. तुकोबांची गाथाही मी 20 ते 25 वेळा वाचली. ही पारायणं मी आळंदी, देहू, पवनार इथं केली. अनेकदा तर विनोबांच्या समाधीच्या ठिकाणी जायचं नि तुकोबांची गाथा उघडून त्यात हरवून जायचं, असं मी कितीदा तरी केलं आहे. तो आनंद काही वेगळाच. चालत चालत वारी करून एकदा पंढरपूरला पोचल्यावर विठ्ठलाच्या पायी माथा टेकवला की मला पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन होतं! दरवेळी असाच अनुभव पंढरपुरात मला येतो,'' इकिनोयांच्या सांगण्यातून "सावळे परब्रह्म'च जणू त्या छोट्याशा खोलीत अवतरलं...

सलग 30 वर्षं पंढरीची वारी करताना "तेव्हाची वारी नि आत्ताची वारी', अशी तुलना साहजिकच कुणाच्याही मनात येईल. तशी ती इकिनोया यांच्याही मनात येते. आत्तापर्यंत भाविक-भाबड्या असलेल्या इकिनोया या वेळी मात्र एकदम परखड बनतात... ""पहिल्यापेक्षा वारीतील भाविकांची-वारकऱ्यांची संख्या आता 20-30 पटींनी तरी वाढली असावी; पण वारी आता पहिल्यासारखी राहिली नाही. पूर्वी निष्ठा होती. शिस्त होती वारीत. आता ती राहिली नाही. पूर्वी अभंग गाइले जात असताना सगळे तल्लीन होऊन ते अभंग ऐकत असत. आता तसं होत नाही. एकीकडं अभंग गाइला जात असताना, त्याच वेळी वारकरी आपापसांत गप्पा मारत असतात... भक्तीचा आनंद आता पूर्वीसारखा राहिलेला नाही...'' इकिनोया यांची ही खंत आपल्यालाही विचारात टाकते!

इकिनोया यांच्या खोलीत छोट्या टी पॉयवर औषधांचं खोकं होतं. त्यांच्या बिघडलेल्या शारीरिक प्रकृतीसाठीची ती तजवीज होती...मात्र, त्यांचं मन अगदी खणखणीत आहे...अगदी 1981 साली होतं तसंच...कारण त्यांच्या मनाचं औषध आहे विठ्ठल!

वारीतील बेशिस्तीच्या "आजारा'चा उल्लेख इकिनोया यांनी अगदी कळकळीनं केला...याही "आजारा'वर आज ना उद्या पंढरीच्या त्या "सावळ्या परब्रह्मा'चं औषध नक्कीच लागू पडेल, असा विश्‍वास इकिनोया यांना आहे...!

http://puputupu.blogspot.com/
------------------------

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive