Sunday, November 6, 2011

सेतू माधवराव पगडींनी सहासष्ट ग्रंथांची निर्मिती करून सुमारे बावीस हजार पृष्ठसंख्येइतके अक्षरधन जमा केले आहे.

पगडींचा प्रचंड शब्दसेतू! (विश्‍वास पाटील)
विश्‍वास पाटील (author@esakal.com)

सेतू माधवराव पगडींनी सहासष्ट ग्रंथांची निर्मिती करून सुमारे बावीस हजार पृष्ठसंख्येइतके अक्षरधन जमा केले आहे. "बचेंगे तो और भी लिखेंगे' या बाण्याने हा तपस्वी वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षापर्यंत लिहीतच राहिला. मराठ्यांच्या स्फूर्तिदायी इतिहासाचे साक्षेपी संशोधन आणि लेखन अनेक उर्दू-फारसी काव्य व इतिहासग्रंथांची उत्तम भाषांतरे, अनेक जिल्ह्यांच्या गॅझेटिअरचे संपादन, अशा दीर्घोद्योगाचे त्यांनी डोंगर उभे केले. पगडींच्या शताब्दीच्या निमित्ताने हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने त्यांच्या समग्र वाङ्‌मयाचे आठ बलदंड खंड प्रकाशित केले आहेत. महाराष्ट्रानेही या अमूल्य ठेव्याचे घराघरांत जतन करून ठेवायला हवे. .....सांगताहेत कादंबरीकार विश्‍वास पाटील

संभाजीराजांच्या निर्घृण हत्येनंतर काही वर्षांनी औरंगजेबाने पुणे शहरात प्रवेश केला, तेव्हा त्याने पुण्याचे नाव बदलून ते मुहियाबाद असे ठेवले, तर खेडचे नामांतर मसुदाबाद, अकलूजचे असदनगर आणि नाशिकचे नामकरण गुलशनाबाद असे केले होते. औरंगजेबाच्या महाआक्रमणाविरोधात संभाजी आणि महाराणी ताराबाईंच्या झेंड्याखाली मराठे एक होऊन झुंजले नसते अन्‌ दुर्दैवाने औरंगजेबाची कपटी दक्षिणनीती आणि त्याचे असहिष्णू धोरण यशस्वी झाले असते तर आज दक्षिण भारताचे रूपांतर इराण आणि इराकसारख्या राष्ट्रांत निश्‍चितच झाले असते. मराठी संस्कृती लोप पावली असतीच आणि मराठी भाषाही गोंडवनातल्या एखाद्या पहाडी भाषेसारखी विस्मृतीच्या वळचणीला जाऊन बसली असती.

मराठी अस्मितेचे उच्चाटन करण्यासाठी बाराव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंत दिल्लीपतींनी जंग जंग पछाडले. त्या दिल्लीश्‍वरांशी मराठ्यांनी सातत्याने सात शतके केलेला निकराचा मुकाबला आणि परचक्राविरोधी पेटवलेला संघर्षाचा भडाग्नी म्हणजेच या मातीचा गौरवी इतिहास आहे! मराठवाड्याच्या मातीत जन्मलेले सेतू माधवराव पगडी यांनी सलग साठ वर्षे आपली तेजस्वी लेखणी एखाद्या पट्टीच्या तलवारबाजासारखी गाजवली. आपल्या लेखणी, वाणी, उक्ती आणि कृतीतून शिवरायांच्या आदर्श तत्त्वांचा सातत्याने शोध घेतला. एकूण सहासष्ट मराठी-इंग्रजी ग्रंथांची निर्मिती केली. क्राऊन साइजमध्ये हिशेब मांडायचा तर पगडींनी सुमारे बावीस ते पंचवीस हजार पृष्ठांचे अक्षरधन निर्माण केले आहे.

महाराष्ट्राचा संशोधनात्मक इतिहास, उर्दू काव्य आणि फारसी महाकाव्यांची भाषांतरे, अव्वल इंग्रजीत लिहिलेले शिवचरित्र, मराठवाड्याचा इतिहास असे अनेक विषयांनी आणि समृद्ध आशयाने भरलेले सेतू माधवराव पगडींच्या वाङ्‌मयाचे अष्टखंडात्मक साहित्य गेल्या वर्षी प्रकाशित करण्यात आले. अशा कष्टप्रद, जिकिरीच्या आणि तरीही अभिमानी कार्याच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातील मंडळी पुढे सरसावली नाहीत. मात्र हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेच्या जागृत मंडळींनी पुढाकार घेऊन ही अत्यंत मोलाची कामगिरी बिनचूक पार पाडली आहे. मात्र दुर्दैवाने या अमूल्य ग्रंथनिर्मितीकडे शासनासह इथली विद्यापीठे, महाविद्यालये, वृत्तपत्रे आणि सामान्य वाचकांनीही दुर्लक्ष केले आहे. ऊठसूट आपल्या इतिहासातील महापुरुषांच्या नावे पताका नाचवणाऱ्या उत्साही वीरांनी, तसेच पुरोगामी समाजसुधारकांच्या तसबिरींना हार घालणाऱ्या समाजधुरीणांनीही या प्रकल्पाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. ही बाब अत्यंत नामुष्कीची असून, ती महाराष्ट्रधर्माला शोभा देणारी नव्हे. सेतू माधवरावांना पंचाऐंशी वर्षांचे आयुष्य लाभले. पैकी आपल्या आयुष्याची सलग साठ-सत्तर वर्षे त्यांनी सातत्याने वाचन, लेखन आणि संशोधनाच्या दीर्घोद्योगासाठी सार्थकी लावली. विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकात वि. का. राजवाडे आणि रियासतकार सरदेसाई यांनी असा प्रचंड उद्योग करून ठेवला होता, तर 1950 नंतर सेतू माधवरावांसारखा असा प्रचंड संशोधन आणि ग्रंथलेखनाचा शब्दसेतू क्वचितच कोणी उभारला असावा. हे अविरत लेखन सेवाभावी वृत्तीने, स्वयंभाषेच्या अभिमानातून आणि स्वयंप्रेरणेतून घडले आहे. ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवून किंवा राज्यसभेवर वर्णी लागावी, अशा काही नियोजनबद्ध, अंतःस्थ हेतूतून घडलेले नाही. त्यामुळेच ते धवल आहे.

आजकाल एखाददुसऱ्या पुस्तकाच्या यशाने अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हायचेच दिवस अधिक झाले आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर आठ-दहा भाषा आत्मसात करणे, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे गॅझेटियर्स संपादित करणे, संपूर्ण गालीब, दाग, जीके आणि इक्‍बाल अशा उत्तमोत्तम उर्दू कवींच्या काव्यांचा मराठीत सुबोध अनुवाद करणे, गोंडी-कोलामसारख्या बोलीभाषांचे व्याकरण आणि शब्दकोश तयार करणे आणि सुमारे सत्तर ग्रंथांची निर्मिती, ही कामे एकांड्या शिलेदाराची असूच शकत नाहीत. त्यासाठी सेतू माधवरावांसारख्या शब्दसरदाराच्याच ऐतिहासिक कामगिरीची जरुरी भासते.

पगडीसाहेबांचे जीवन म्हणजे "आमच्यापुढे आदर्श नाहीत' अशी खोटी कोल्हेकुई करणाऱ्या तरुणांसाठी कर्तृत्वाचा प्रेरणादायी शिलालेख ठरावा. पहिल्या खंडात त्यांचे "जीवनसेतू' नावाचे आत्मचरित्र येते. 27 ऑगस्ट 1910 ला निलंगा, जिल्हा उस्मानाबाद (आजचा लातूर) येथे त्यांचा जन्म झाला. पगडींचे मूळचे घराणे विजापूरचे. प्राथमिक शिक्षण गुलबर्ग्यात झाले. हैदराबादेत निजाम कॉलेजातील आपले शिक्षण त्यांना घरच्या गरिबीमुळे अर्धवट सोडावे लागले; पण अंतरीची उच्च शिक्षणाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी गुपचूप त्या काळी बनारसला पलायन केले. तेथे अन्नछत्रात भोजन करत 1930 मध्ये ते बी.ए.च्या परीक्षेत पहिल्या वर्गात पहिले आले. पुढे हैदराबाद राज्यात तहसीलदार, औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि राज्यपुनर्रचनेनंतर मुंबईत मंत्रालयात उपसचिव, साहित्य संस्कृती मंडळाचे सलग आठ वर्षे सचिव अशी भरघोस कामगिरी या कर्मयोग्याने पार पाडली आहे. 1969 मध्ये निवृत्त झाल्यावर चार वर्षांच्या मेहनतीने त्यांनी इंग्रजी शिवचरित्र लेखनाचीही कामगिरी पार पाडली आहे.

पगडीसाहेबांच्या मते, अठरावे शतक हे मराठी माणसाच्या यशाचे आणि अस्मितेचे होते. तेव्हा भारताचे नेतृत्व मराठ्यांनी केले होते. ते भाग्य भारतातील कोणत्याही अन्य राजाला वा तिथल्या लोकांना लाभले नव्हते. पगडी वाङ्‌मयाचे गलेलठ्ठ दुसरे आणि तिसरे खंड याच अठराव्या शतकावर आधारलेले आहेत. तो काळ मराठ्यांच्या धामधुमीचा, अतुल पराक्रमाचा आणि यशस्वी गिरिशिखरांचा होता. 1700 मध्ये कृष्णाजी सावंताने प्रथम आपली घोडी नर्मदापार दामटली. 1706 मध्ये धनाजी जाधवाने गुजरातमध्ये रतनपूरची लढाई जिंकली आणि दिल्लीकर मोगलांना दूर पिटाळून लावले. 1731 मध्ये मराठ्यांनी बुंदेलखंड पादाक्रांत केला, तर 1751 मध्ये ओरिसामध्ये जाऊन जरीपटका नाचवला. बघता बघता दूर, गंगा-यमुनेपार नैनिताल आणि अलमोड्यांच्या रानात मराठ्यांची बेदरकार घोडी घुसली.

11 एप्रिल 1758 हा मराठ्यांच्या इतिहासातील एक महन्मंगल शुभदिन आहे. आजची पाकिस्तानची राजधानी असलेल्या लाहोर शहरात मराठ्यांची एक लाख फौज घुसली. ऐन चैत्रमासात पेशवे आणि होळकरांच्या फौजांनी लाहोरात विजयाची दसरा-दिवाळी साजरी केली. त्याचदरम्यान मराठ्यांनी अफगाण अहमदशहा अब्दालीला ठणकावून सांगितले, "इकडे पंजाबात कुठे घुसू पाहता? तुमची सीमा सिंधू नदीच्या पल्याड आहे.' याच प्राणतत्त्वासाठी एक लाख मराठा पानिपताच्या महासंग्रामात पावन झाला. 1784 मध्ये महादजी शिंद्यांनी दिल्ली काबीज केली. 1784 पासून ते 1803 पर्यंत म्हणजे सलग एकोणीस वर्षे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा झेंडा मोठ्या डौलाने फडकत राहिला होता. त्यानंतर राजकीय यशाच्या इतक्‍या उत्तुंग उंचीपर्यंत मराठे कधीही पोचू शकलेले नाहीत.

तिसऱ्या खंडात आठ मूळ साधनग्रंथांचा अनुवाद करून सेतू माधवरावांनी आमच्या इतिहासावर मोठे उपकार केले आहेत. ईश्‍वरदास नागर हा औरंगजेब दरबारी आठ वर्षे कारकुनी करत होता. त्याने लिहिलेला "फत्तुहाते आलमगिरी' हा पारसी ग्रंथ, तसेच "खुतुते शिवाजी' या लंडनच्या एशियाटिक सोसायटीतील मूळ फारसी हस्तलिखिताचे भाषांतर पगडींनी मराठीत आणले आहे. औरंगजेबाने जेव्हा समस्त हिंदू धर्मीयांवर जीझिया कर बसवला तेव्हा शिवाजीराजांनी त्याला लिहिलेल्या सडेतोड पत्राचा या ग्रंथात समावेश आहे. दक्षिणेच्या मोहिमेवर असताना मिर्झाराजा जयसिंगाने आपल्या धन्याला औरंगजेबाला लिहिलेली महत्त्वपूर्ण पत्रे या खंडात आहेतच. शिवाय औरंगजेबाच्या सोबत दक्षिणेत मोहिमेवर असलेल्या खाफीखानाने जो ग्रंथ लिहिला आहे तोही लक्षणीय आहे. त्यात संभाजीराजे आणि ताराबाईंच्या कालखंडाचे दर्शन घडते. खाफीखानाने आपल्या ग्रंथात मराठ्यांच्या नावे इरसाल शिव्या मोजल्या आहेत. मात्र त्या शिव्यांच्या पोटातूनही मराठ्यांच्या अजोड पराक्रमाबद्दल त्याने नकळत गायिलेल्या शाब्बासकीच्या ओव्याही त्याला लपवता आलेल्या नाहीत. मोगलांच्या दीर्घकाळ सेवेत असणाऱ्या भीमसेन सक्‍सेना याने "तारीखे दिल्कुशा' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आपल्या औरंगाबादेच्या मुक्कामात त्याने छत्रपती शिवरायांना प्रत्यक्ष पाहिले होते. बहाद्दूर गडावर संभाजीराजांची बेछूट निर्भर्त्सना करणारी जी दुर्दैवी धिंड निघाली होती, त्या घटनेचाही तो प्रत्यक्ष साक्षीदार होता. कैलास पर्वतासारख्या उंच असणाऱ्या रायगडाच्या शंभुराजाचे ते अनन्वित हाल पाहून मोगली इतिहासकारांच्या पोटातसुद्धा कसे ढवळून आले होत,ह्हिी वर्णने मुळातूनच वाचायला हवीत.

या खंडात मोगल दरबारातील अस्सल बातमीपत्रांचा, तसेच औरंगजेबाच्या अनेक आज्ञापत्रांचा (ऑफिशियल ऑर्डर्स) समावेश आहेच. शिवाय साकी मुस्तैदखानाचा "मासिरे आलमगिरी' हा ग्रंथ म्हणजे तत्कालीन दक्षिणेची आबोहवा रेखाटणारे उत्तम लेखन आहे. दिल्लीकर औरंगजेब बादशहाला दक्षिणेतल्या निसर्गानेही कसे भंडावून सोडले होते! विशाळगड, मलकापूर भागात पडलेला प्रचंड पाऊस, त्याने औरंगजेब पातशहाची उडवलेली दाणादाण... त्या प्रचंड पर्जन्यधारेत बादशहाची फौज आणि तंबू- सामान भिजून लिबलिबीत झाले होते. औरंगजेबाच्या परिवाराला पावसात कसाबसा उभे राहण्यापुरता आडोसा मिळाला होता. चिखल इतका भयंकर होता, की मोठाले हत्ती त्यामध्ये गाढवाप्रमाणे रुतून पडले होते. बेलगाम सुटलेल्या वारूसारखा धो-धो पाऊस वाहत होता. राजगड परिसराचे सुंदर वर्णन करताना हे मोगली इतिहासकार लिहितात, की इकडची राने निबिड आणि दिुरास्पद. इकडच्या डोंगरांच्या, दऱ्याखोऱ्यांतून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरवू शकत नाही. इथल्या गिरिकंदरात फक्त पर्जन्यालाच वाट मिळू शकते.

मराठ्यांच्या इतिहासातील अनेक रहस्यमय घटनांचा पगडी साक्षेपी मागोवा घेतात. आग्र्याला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवराय सटकले; पण त्यांच्या परतीचा मार्ग कोणता होता? वाराणसीहून बुंदेलखंडाजवळच्या बघेलखंडातून म्हणजेच आजच्या रिवा जिल्ह्याच्या परिसरातून ते दक्षिणेत आले असावेत, असे पगडी अनुमान काढतात. शिवरायांचे जन्मस्थळ म्हणजे शिवनेरी. आमच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट आणणारे शिवाजीराजे इथे जन्मले खरे; पण शिवकाळात ही पवित्र भूमी दुर्दैवाने कायमच परक्‍यांच्या ताब्यात होती. ती 1757 मध्ये खूप उशिरा मराठ्यांच्या ताब्यात आली. संभाजी राजांच्या द्वितीय पत्नी दुर्गादेवी या पुढे हयातभर औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्या रुस्तुमराव जाधवांच्या कन्या असल्याचे अनुमान पगडी काढतात. रियासतकारांनी चुकीने येसूबाईंनाच औरंगजेबाच्या छावणीत नेले आहे आणि पुढे पुरुषी वेष परिधान करून त्यांची सुटकाही घडवली आहे. पण ते पूर्ण असत्य आहे. ताराबाईकालीन कागदपत्रांत अरजोजी यादवाचे स्पष्ट पत्र आहे. औरंगजेबाच्या तळावर आपण मातुःश्री दुर्गादेवींना भेटल्याचा त्यात स्पष्ट उल्लेख आहे. शिवकाळात उदगीर, परांडा यासारखी नगरे कशी होती; रामशेजचा किल्ला, चंद्रपूर आणि बागलाणाचा निसर्गरम्य प्रदेश, अशा अनेक ठाण्यांचा आणि ठिकाणांचा पगडी अनेक स्वतंत्र लेख लिहून विस्तृत वेध घेतात. एकूणच, पगडी वाङ्‌मयाचा दुसरा आणि तिसरा खंड प्रत्येक मराठी माणसाने ज्ञानेश्‍वरी आणि तुकारामगाथेच्या बरोबरीने देव्हाऱ्यावर ठेवावेत, पुनःपुन्हा वाचावेत, अशा मोलाचे आहेत.

मराठवाड्याची माती, रामदासांचे नेमके योगदान, स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठवाड्यातील क्रांतिकारकांची बंडे, उठाव यांचा लेखाजोखाही त्यांनी उत्तम रीतीने मांडला आहे. स्वतः जिल्हाधिकारी या नात्याने काम केलेल्या औरंगाबाद शहरावर "मराठवाड्याची मनोरमा' नावाचा सुंदर लेखही लिहिला आहे. एकूणच पगडीसाहेबांचे सर्वच खंड प्रेरक आणि दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. काही वर्षांपूर्वी पगडीसाहेबांनी "लोकराज्य'च्या अंकात संभाजीराजांवर एक छोटेखानी पण उत्तम लेख लिहिला होता. तो वाचून तेव्हाच संभाजी कादंबरीचे बीजारोपण माझ्या मनात झाले होते, ही वस्तुस्थिती आहे. अर्थात लेखनाचा विस्तार पुढे बऱ्याच कालांतराने झाला.

अशा तपस्वी संशोधकास इतिहासप्रेमी आणि राष्ट्राभिमानी खंद्या साहित्यिकास भेटायचा मी दोन-तीन वेळा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने थोडक्‍यात चुकामुकीचेच प्रसंग घडले. मात्र सुदैवाने मी माझ्या विद्यार्थिदशेत पगडीसाहेबांची मराठ्यांच्या इतिहासावरची काही व्याख्याने ऐकलेली आहेत. साधी, सोपी, मधाळ आणि गोष्टीवेल्हाळ अशी त्यांची चित्रमय शैली. ते सहज श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडायचे. त्यांची शरीरयष्टीही एखाद्या पुराणपुरुषासारखी धट्टीकट्टी होती. त्यामुळे त्यांचे व्याख्यान ऐकताना शिवकाळातला शिवरायांचा एखादा सहकारीच काळाच्या पोटातून पुढे चालून आला आहे, आपल्या मराठमातीची महती गातो आहे, असा रसिक श्रोत्यांना भास व्हायचा.

अखंड संशोधन आणि सातत्यपूर्ण लेखन हा जणू सेतू माधवरावांचा श्‍वास आणि उच्छ्वास होता. "बचेंगे तो और भी लिखेंगे' या बाण्याने वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांचा भाग्यदायी हात अखंड लिहिता राहिला. शेवटी आपल्या शरीरातील श्‍वासाबरोबरच त्यांनी लेखणी बाजूला ठेवली. पगडीसाहेब आपल्या इष्टमित्रांना अभिमानाने सांगत असत, ""मरेंगे हम किताबोंपर, वरक होंगे कफन अपना.'' (आम्ही ग्रंथासाठी आमच्या प्राणांचे मोल देऊ, पुस्तकांची पाने म्हणजेच आमचे कफन.) सेतू माधवराव हे निष्कलंक चारित्र्याचे, साध्या राहणीचे आणि प्रेमळ स्वभावाचे सद्‌गृहस्थ होते. हा भला गृहस्थ मायमराठीचा निस्सीम भक्त होता. अष्टखंडांच्या प्रकाशनावेळी त्यांचे चिरंजीव अरुणकुमार यांनी आपल्या पित्याची एक वेधक आठवण सांगितली. साठ-पासष्ट वर्षांपूर्वी पगडी हैदराबाद संस्थानात नोकरी करायचे. दूर कचेरीत सायकलरिक्षाने जायचे. तेव्हा पगार आजच्यासारखे भरघोस नव्हते. पंचवीस तारखेला चिरंजीव अरुण यांनी सायन्स विषयासाठी वडिलांकडे काही रसायने मागितली. मातुःश्रींकडूनही वशिला लावला. सेतू माधवरावांनी परिस्थिती नसतानाही मुलाचा हट्ट पुरवला. पण तेवढ्या पैशाची बचत करण्यासाठी पुढे आठवडाभर ते दूरवरचे अंतर तुडवत आपल्या कार्यालयात पायी चालत जात होते.

हैदराबादेतील मराठीप्रेमी मंडळी मोठ्या कष्टाने मराठी साहित्य परिषद चालवीत आहेत. मध्ये तेलगू देसमच्या वावटळीत या परिषदेच्या अस्तित्वावरच गंडांतर आले होते. तरी चिकाटीने त्यांनी मराठीच्या संवर्धनाचे व संगोपनाचे काम नेटाने चालवले आहे. सेतू माधवरावांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांनी आपसांत पैसे जमा करून, पदरमोड करून, कर्जे उभारून सुमारे चाळीस लाख रुपयांचा खर्च केला. लाटकरांकडून उत्तम छपाई करून घेतली. या अष्टखंडाच्या प्रकाशनाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. त्यांनी दहा लाखांचा चेक महाराष्ट्र शासनामार्फत दिला आणि आणखी दहा लाख द्यावयाचे जाहीर केले; मात्र ते मुख्यमंत्रिपदावरून दूर झाले आणि जाहीर केलेले धन संस्थेला आतापर्यंत पोचलेले नाही. त्याचप्रमाणे मराठी वाचकांनी व अन्य संस्थांनीही या प्रकल्पाकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केले आहे. आज दूरवाहिन्यांपासून ते प्रत्येक गावातील मंडळांपर्यंत दर आठवड्याला कोणाला तरी "महाराष्ट्राचा गौरव' आणि "महाराष्ट्राची शान' ठरवण्याची बालिशगिरी सुरू आहे. टी.आर.पी.च्या फंदासाठी चालविलेल्या छंदामध्ये सेतू माधवरावांसारखे महाराष्ट्राचे खरेखुरे गौरव बाजूलाच राहतात. मराठीइतकेच सेतू माधवांचे कानडीवरही प्रभुत्व होते. त्यांनी आपला शब्दसंसार कानडीत थाटला असता तर? अन्‌ इतके प्रचंड मूलगामी लेखन तिकडे केले असते तर? आजवर म्हैसूर आणि बंगळुरातून त्यांच्या हत्तीवरून कित्येकदा मिरवणुका निघाल्या असत्या! या अमूल्य अशा आठ खंडांची किंमत दहा हजार रुपये आहे. या मातीतून उद्या खऱ्याखुऱ्या मूर्ती घडवायच्या असतील तर असे स्फूर्तिदायी वाङ्‌मय प्रत्येक अभिमानी मराठी माणसाच्या घरात असायलाच हवे. मी स्वतः हे खंड खरेदी केलेले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक वाङ्‌मयप्रेमी आणि इतिहासप्रेमी वाचकांनी, तसेच प्रत्येक महाविद्यालय, शाळा व संस्थांनी ते खरेदी करणे हे आपले कर्तव्यच मानायला हवे.

संपर्कासाठी पत्ता पुढीलप्रमाणे आहे ः डॉ. विद्या देवधर, कार्यवाह, मराठी साहित्य परिषद (आं. प्र.), इसामिया बाजार, हैदराबाद 500 027. फोन ः 040 - 24657063 शिवाय वहरपरपक्षरूर्ज्ञीश्रज्ञरीपळ5ऽसारळश्र.लो या अमूल्य अष्टखंडाच्या निर्मितीच्या संपादनाची कामगिरी पार पाडल्याबद्दल डॉ. डी. बी. देगलूरकर, प्रा. द. पं. जोशी, डॉ. उषा जोशी, डॉ. विद्या देवधर, प्रा. धनंजय कुलकर्णी, डॉ. राजा दीक्षित, प्रा. निशिकांत ठकार आणि प्रा. अब्दुस सत्तार दळवी ही मंडळी अभिनंदनास पात्र आहेत. छत्रपती शिवरायांच्या कार्याचे नेमके आकलन, मराठ्यांचे औरंगजेबाविरुद्धचे स्वातंत्र्ययुद्ध, पानिपतावरचा महापराक्रम, अठराव्या शतकात मराठ्यांनी हिंदुस्थानभर नाचवलेला जरीपटका, तंजावरचे आमच्या इतिहासातील सांस्कृतिक योगदान, आंध्रातील काकतिय राजे, इक्‍बाल, मीर, दागसारखे उर्दू महाकवी, फिरदोशीसारखे फारसी महाकवी, कोलामी आणि गोंडी भाषेचे व्याकरण, सूफी संप्रदाय अशा इतिहास, वाङ्‌मय आणि भाषांच्या शाखा-उपशाखांचा वेध घ्यायचा असेल तर सेतू माधवरावांच्या या अतुलनीय शब्दसेतूला टाळून पुढे जाता येणार नाही.

भारताचे राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद खुलताबादच्या भेटीवर आले होते. तेव्हा त्यांना सेतू माधवराव आपल्या अस्खलित उर्दूमध्ये एक तासभर सूफी संप्रदायाची महत्ता ऐकवत होते. त्यांच्या ज्ञानाने भारावून गेलेल्या राजेंद्रबाबूंनी "द मोस्ट लर्नेड मॅन' अशा गौरवी शब्दांत सेतू माधवांची पाठ थोपटली होती. "शहानामा' या फारसी महाकाव्याचे इथे सेतू माधवांनी भाषांतर केले आहे. त्या महाकाव्याचा कर्ता फिर्दोसिनी लिहितो, की "आज उभे असलेले हे उत्तुंग राजवाडे एक दिवस उन्हाच्या झळांनी करपून जातील, पावसाने नष्ट पावतील; पण मी निर्मिलेला काव्यप्रासाद पावसाच्या प्रपातातून आणि तुफानी वादळाच्या तडाख्यातूनही सुरक्षित राहतील.' खऱ्या संशोधनाची आणि वाङ्‌मयाची महता अशीच अमूल्य आणि अमर असते. आज रुपयाचे झालेले अवमूल्यन, मित्रांसोबत बऱ्यापैकी हॉटेलात घेतलेली भोजने यांच्या मानाने दहा हजार रुपयांची किंमत ती काय! मात्र आमच्या इतिहासाचा, साहित्य आणि संस्कृतीचा पगडींनी महाराष्ट्राला दिलेला हा अनमोल ठेवा प्रत्येकाने स्वतःजवळ ठेवायलाच हवा, असा बावनकशी आहे. त्यात फिर्दोसिनीने कथन केलेल्या मांगल्याचाही निश्‍चित सूर आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive