Tuesday, September 25, 2012

भारत - एक मार्केटींग कॉलनी

भारत - एक मार्केटींग कॉलनी

पुणे, बँगलोर, मुंबई, हैद्राबाद, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता किंवा भारतातील इतर कोणतेही प्रगत्-विकसनशील शहर. या शहरातील कोणत्याही भागातील कोणत्याही ईमारतीतील फ्लॅट. आणि या फ्लॅटमध्ये राहणारे कोणतेही मध्यमवर्गीय कुटुंब. आणि या कुटुंबातील तुमच्या आमच्यासारखी कोणतीही एक व्यक्ती. आपल्या सोयीसाठी या व्यक्तीला आपण "अ" हे नाव देउया. 
तर ही अ व्यक्ती सकाळी उठते ते तिच्या Nokia किंवा LG किंवा Samsung या व अशा कोणत्याही एका फोनच्या गजराने. मग दात घासायला जाते. Pepsodent किंवा colgate ने दात घासले जातात. Gillette किंवा Nivea किंवा Palmolive ने गुळगुळीत दाढी केली जाते. Dettol चे अँटीसेप्टीक लोशन लावुन अ महाशय अंघोळीची तयारी करतात.Lux किंवा Pears अंगावर घासून अ च्या दिवसाची सुरुवात होते. आरशामधील Saint Gobain च्या काचेमध्ये पाहुन अ ला बरे वाटते. मग कपाटातून Arrow चा शर्ट आणि Blackberry ची पँट बाहेर येते. कपडे घातल्यानंतर ब्रेकफास्ट साठी कॉफी असेल तर Nestle आणि  चहा असेल तर Unilever ( red label, brooke bond, Taj mahal हे सर्व हिंदुस्तान युनिलीवरचे ब्रँड्स आहेत !). सोबत Britania ब्रेड  आणि Cheese असते. Kellogs किंवा Maggi ही असते कधी कधी. 
अ महाशय ब्रेकफास्ट करुन NIke, Woodland, fila, addidas, Red tape, Puma, Reebok, Bata (Bata ही भारतीय कंपनी आहे असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे!) अशा ब्रँडस पैकी एखाद्या ब्रँडचे चकचकीत बूट घालुन मिस्टर अ तयार झाले. सकाळी मार्केटची खबरबात मिळवण्यासाठी Sony/ Samsung/LG चा LCD टीव्ही चालु करुन अ राव बसले आणि त्यांनी Bloomberg UTV, CNBC 18 , BBC किंवा तस्तम बिझनेस चॅनेल चालु केला. अ राव क्रीडाप्रेमी असतील तर ESPN किंवा Star sports आणि अ ही व्यक्ती महिला असेल तर Sony, star plus किंवा Colours असे चॅनेल्स चालु करेल. Tupperware चा डबा घेऊन आणि सोबत Dell/HP/Lenovo चा आपला लॅपटॉप घेउन मिस्टर अ खाली आले. आपली i10, i20, ford figo, Ford ikon, Chevorlet Beat किंवा तत्सम कार घेउन ऑफिसला रवाना झाले. 
एका मल्टीनॅशनल मध्ये काम करणारे अ राव आपल्या चेअरवर आले आणि पुढचे आठ-दहा तास त्यांनी स्वतःला Nokia/LG/Samsung/Sony/ericsson/HTC/Dell/HP/Lenovo/Apple/Microsoft/Google या सर्व कंपन्यांशी बांधून घेतले. संध्याकाळी भुक लागली तेव्हा जवळच्या Pizza hut किंवा Dominoz मधून पिझ्झा मागवला. सोबत Coke किंवा पेप्सी होतीच. रात्री घरी जाताना थकलेल्या कंटाळलेल्या अ रावांनी जाताना रस्त्यावर गाडी कडेला लावली. दुकानातून थंड Fosters च्या दोन बाटल्या घेतल्या आणि सोबत डोकेदुखीची Anacin गोळी घेऊन अ राव घराकडे परतले. घरी आल्यावर पुन्हा अ राव Sony/ Samsung/LG चा LCD टीव्ही चालु करुन बसले आणि त्यांनी स्वतःला Sony/Star plus/ ESPN/ Star sports/BBC/CNBC/HBO/AXN/M TV/V TV/(आणि रात्री अकरा नंतर F Tv !) या चॅनल्सच्या हवाली केले.
रात्री उशिराphillips चे दिवे मालवुन, LG/Hitachi/Samsung ची एसी लावुन अ राव शांत झोपी गेले. ते पुन्हा सकाळी Nokia/Samsung/LG च्या गजराने उठण्यासाठीच !
मित्रांनो लेखाचे शिर्षक आणि अ रावांच्या एका दिवसाची कथा वाचून एव्हाना हा लेख काय सांगू पाहतोय हे तुम्ही ओळखले असेलच. वरील उतारा वाचून ग्लोबलायझेशन म्हणजे काय (!) याची कल्पना आपल्याला आली असेलच. 


१९९१ नंतर भारताने खुल्या अर्थव्यवस्थेला (Open economy) आणि उदार आर्थिक धोरणाला (Leberilasation) ला हिरवा कंदील दाखवला. खरेतर गेल्या दोन दशकात भारताने कमालीची प्रगती केली आणि जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारत उदयास येत आहे ते यामु़ळेच. परदेशी कंपन्यांनी तेव्हापासून भारतात पाय रोवायला सुरुवात केली. रोजगार निर्मीती, परदेशी चलन, टेक्नॉलॉजी, टेलीकॉम आणि आयटी क्षेत्रात झालेली आपली प्रगती हे केवळ ग्लोबलायझेशन मुळे शक्य झाले. परंतु मित्रांनो या ग्लोबलायझेशनचे जसे फायदे आहेत तसेच दुरगामी (लगेच न दिसणारे) तोटेही आहेत. 


भारतामध्ये ८-१० वर्षांपुर्वी  सर्वाधिक प्रसिद्ध टीव्ही ब्रँड्स होते Videocon आणि Onida. आता Videocon आणि Onida टीव्हीच्या शर्यतीत कुठल्याकुठे फेकले गेले आहेत. LG, Samsung, Sony ने केव्हाच मार्केट काबीज केले. काही वर्षांपुर्वी अँबेसेडर, प्रीमीअर पद्मिनी या आघाडीच्या कार कंपन्या होत्या आता त्यांचे नामोनिशान देखिल उरलेले नाही. Ford, Nissan, Volks Wagon, Skoda, Hyundai, General Motors या परदेशी कंपन्यांनी भारतातील कार मार्केटचा चेहरा मोहरा बदलवुन टाकला.


ग्लोबलायझेशनमुळे भारतीय कंपन्या मागे पडत गेल्या हे सत्य आहे. भारतीय कंपन्यांचीही यात चूक आहे. आज मल्टीनॅशनल कंपन्या ग्राहकांना काय पाहिजे याबाबत सतर्क असतात. प्रीमीअर, अँबेसेडर किंवा मारुती ८०० हे मॉडेल्स कितीतरी वर्षे भारतात विकले जात होते. या मॉडेल्समध्ये काहीही बदल करावासा भारतीय कंपन्यांना वाटला नाही. उलट गाडी बुक केल्यानंतर ७-८ वर्षे ग्राहकांना वाट बघावी लागत असे. राहुल बजाज एकदा म्हणाले होते की माझी स्कूटर विकली जात नाही माझी स्कूटर खरेदी केली जाते. आज बजाजला मोटरसायकलची जाहिरातच नव्हे तर फायनान्स करुन मोटरसायकल विकावी लागते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. MTNL ची फोन सुविधा असो, Videocon चा टीव्ही असो, Mafatalaal चा कपडा असो, कर्सनभाई पटेलांची Nirma असो, दुरदर्शन , आकाशवाणी, Voltas चे फ्रिज, Sumeet चे मिक्सर आज बाजारात कोठेच दिसत नाहीत किंवा आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडताना दिसतात.


ग्लोबलायझेशन कडे एक ग्राहक म्हणून पाहल्यावर ते फायद्याचे आहे याबाबत दुमत नसावे. पण भारताचा एक सुजाण नागरीक म्हणून पाहिल्यावर लक्षात येईल की भारत ही या सर्व ब्रँड्सची एक कॉलनी आहे. एक मार्केटींग कॉलनी. बिटीशांनी जेव्हा भारतामध्ये आपली वसाहत स्थापली तेव्हा ती फक्त ब्रीटीशांची कॉलनी होती. ब्रीटीश आले होते व्यापार करायला. पण येथे आल्यावर त्यांच्या लक्षात आले की भारतामधील विपुल नैसर्गीक संपत्ती त्यांच्यासाठी एक resource (input) ठरु शकते . या resources वर कब्जा मिळवण्यासाठी राजकीय ताकद आपल्या मुठीत येणे आवश्यक आहे हे जाणून त्यांनी व्यापार बाजुला सारला आणि राज्य मिळवण्यावर भर दिला. आज २१ व्या शतकात परदेशी कंपन्या याच मार्गावर आहेत फक्त त्यांनी क्रम बदलला. या युगात आर्थिक ताकद मिळवली की राजकीय ताकद आपोआप मिळवता येईल हे या कंपन्यांनी जाणले आहे. आपली सुबत्ता ब्रिटीशांनी input म्हणून वापरली आणि या परदेशी कंपन्या त्यांचे output विकण्यासाठी आपली सुबत्ता वापरत आहेत एवढाच काय तो फरक.


गांधीजींनी सुरु केलेली स्वदेशी ची चळवळ ही फक्त तेव्हापुरता मर्यादित नव्हती तर आजच्या युगातही स्वदेशीची चळवळ किती समर्पक आहे हे यासंदर्भात विचार केल्यावर लक्षात येते. तुम्ही कदाचित म्हणाल की स्वदेशीचा पुरस्कार करणे आजच्या युगाततरी व्यवहारीकपणाचे लक्षण नाही. आणि ते बरोबरही आहे. मी देखिल येथे संपुर्ण स्वदेशीचा आग्रह करत नाही आहे. गांधीजींनी स्वदेशीची मोहीम हाती घेतली कारण आपल्याकडचा कापूस मँचेस्टर मधील मिल्समध्ये वापरला जायचा आणि तेथे तयार झालेला कपडा पुन्हा भारतातच विकला जायचा. आज किमान आपण वापरत असलेली बहुतांशी उत्पादने भारतामध्येच बनविली जात आहेत. त्यामुळे भारतीयांना रोजगार मिळत आहे. भारत देशाच्या उत्पन्नाला (GDP) यामुळेच हातभार लागत आहे. पण तरीदेखिल आपला बराचसा पैसा परदेशी कंपन्यांना आणि म्हणून परदेशात जात आहे याकडे डोळेझाक करुन चालणार नाही.

यालाच जोडून आणखीन एक मुद्दा माझ्या लक्षात येत आहे. तो असा - आज LG कंपनी भारतातील अग्रेसर अप्लायन्सेस कंपनी आहे. LG १९९७ मध्ये भारतात आली तेव्हा LG चे अध्यक्ष म्हंटले होते की "आम्ही आधी ब्रँड बनवतो आणि नंतर फॅक्टरी". हे वाक्य खुपच मार्मीक होतं. LG भारतातील कंपन्यांकडूनच आपली उत्पादने बनवून घेत असे (Contract manufacturing) आणि त्यावर LG चे लेबल लावून विकत असे. LG ने स्वतःचे प्रॉडक्शन चालू केले १९९९ साली नोईडामध्ये. मात्र तिथे फारसे प्रॉडक्शन झाल्याचे माझ्यातरी माहितीत नाही. २००५ साली रांजणगावमध्ये त्यांनी प्लांट चालु केला. ती त्यांची खरीखुरी प्रॉडक्शन कपॅसिटी होती. या काळामध्ये त्यांनी संपुर्ण बाजारपेठ काबीज केली. भारतीय कंपन्या मात्र Contract manufacturing मध्येच संतुष्ट राहिल्या. केवळ LG च नाही तर जवळजवळ सर्व मल्टीनॅशनल्सने हाच मार्ग वापरला. Levi's jeans भारतातील अरविंद मिल्स मध्ये बनविल्या जायच्या, Fiat च्या कार्स Premier कंपनी मध्ये बनविल्या जायच्या, Britannia चे चीज आणि Tropicana juice बारामतीमधील Dynamix dairy मध्ये बनवले जाते, pierre cardin  चे महागडे पेन Flair writing instrument आणि Parker चे पेन Luxer writing instruments या भारतीय कंपन्यांमध्ये बनविले जातात. एकाच ठीकाणी , एकाच उत्पादकाने बनविलेल्या उत्पादनाला बाजारात वेगवेगळी वागणूक मिळते ते केवळ "ब्रँड"मुळे. भारतीय कंपन्या चुकल्या ते इथेच. त्यांनी दीर्घकाळ टिकणारा ब्रँड बनविला नाही.


काही परदेशी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी हातमिळवणी केली. पण ते फक्त दाखवायचे दात होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Hero Honda. Honda हे नाव भारतीय बाजारपेठेत चांगलम मुरल्यावर आताHonda कंपनीला  Hero ची गरज राहिली नाही. त्यांनी स्वतःचा प्लँट भारतात चालू केला आणि येत्या काही महिन्यांत Hero आणि Honda पुर्णपणे वेगळे होतील. मला सांगा असे झाल्यावर तुम्ही Hero ची बाईक विकत घ्याल की Honda ची? आजपर्यंत जे पार्टनर होते ते उद्या स्पर्धक होणार. Hero group ने एवढे दिवस आपले स्वतंत्र स्थान बनवलंच नाही. Mahindra, Renult आणि Nissan हे आणखी एक उदाहरण. या तिघांनी मिळून Logan बाजारात आणली खरी. पण एकदा भारतीय बाजारपेठ माहिती झाल्यावर Mahindra ची काय गरज. Mahindra ला सोडचिठ्ठी देउन Nissan ने चेन्नई मध्ये आपला प्रकल्प चालू केला आणि पहिली कार Micra स्वतंत्रपणे भारतात आणली देखिल. 


इथेपर्यंत परीस्थीती फारशी गंभीर नव्हती. "संपुर्ण जगाची फॅक्टरी" म्हणून चीनचा उदय झाला आणि चित्र आणखी भयानक झाले. भारतामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन व्हायचं त्याच वस्तू आता चीनच्या बाजारात तयार होतात. त्यावर विविध देशी-परदेशी ब्रँड्सचं लेबल लागते आणि त्या वस्तू विकण्यासाठी भारतात आणल्या जातात. उत्पादनाचा पैसा चीनला मिळू लागला, मार्केटींगचा पैसा ब्रँड्सना मिळू लागला आणि भारताची यामधिल भूमिका केवळ एक बाजारपेठ म्हणून राहिली.


आज अनेक insurance कंपन्या भारतीय पार्टनर्ससोबत भारताच्या बाजारपेठेत उतरल्या आहेत. Bajaj Allianz, Birla Sun Life, HDFC Standard, ICICI prudential, ICICI Lombard, ING Vysya ही काही उदाहरणे. टेलिकॉम क्षेत्रात Vodafone Essar, Unitech-Norway telecom (Uninor), Tata Docomo ही काही उदाहरणे. तसेच Retail क्षेत्रात Tata Trent आणि लवकरच येउ घातलेले Bharati- Walmart ही आणखी काही उदाहरणे. भारतीय पार्टनर्स निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे या क्षेत्रांमध्ये भारत सरकारचा तसा नियमच आहे. भारतीय कंपन्यांना तग धरुन राहता यावे आणि त्याचसोबत मल्टीनॅशनल्स कडून शिकताही यावे म्हणून भारत सरकारने वापरलेला हा उपाय. पण नियम पैशाच्या बळावर मोडता, बदलता येतात आणि या कंपन्यांकडे तसे करण्याची ताकद आहे हे आपण सारे जाणतो.

जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ ही भारताची ताकद आहे आणि हीच भारताची कमजोरी देखिल आहे. ग्लोबलायझेशन आपण थांबवु शकणार नाही आणि तसा प्रयत्न करणे म्हणजे आपल्याच पायावर कुर्‍हाड मारण्यासारखे आहे हे ही तितकेच खरे. एक ग्राहक म्हणून याचे फायदे उपभोगताना , एक नागरीक म्हणून ग्लोबलायझेशनचे परीणाम आपण जाणून घेतले पाहिजेत आणि यावर आपापले उत्तर आपणच शोधले पाहिजे हा या लेखाचा मूळ उद्देश आहे. भारतीय ग्राहक तसा फार शहाणा आहे. एवढ्या insurance कंपन्यांचे एकापेक्षा एक सरस प्लान्स असताना देखिल आपण LIC वर विश्वास दाखवतो हे आपल्या शहाणपणाचे लक्षण आहे. बाहेर प्रचंड स्पर्धा आणि आतमध्ये प्रचंड ढिसाळ कारभार असून देखिल SBI (State Bank of India) भारतातील सर्वात मोठी बँक आहे हे भारतीय ग्राहकाच्या हुशारीचे उदाहरण आहे.


म्हणूनच टाटा, बिर्ला, रिलायन्स, भारती,मारुती या भारतीय कंपन्यांचा मला आदर वाटतो की अतीव स्पर्धेच्या काळातही या भारतीय कंपन्या ताठ मानेने उभ्या आहेत. या भारतीय कंपन्यांना एक ग्राहक या नात्याने मदत करणे हे माझे मला सापडलेले उत्तर आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive