Friday, September 28, 2012

प्राचीन मूर्तिशास्त्र व विविध गणेशरूपे

प्राचीन मूर्तिशास्त्र व विविध गणेशरूपे  

मूर्तिशास्त्रानुसार गणेशरूप मोठे आव्हानात्मक व मोहविणारे असे आहे. साधारणतः गणेश पुराण व स्कंद पुराणातील वर्णनाप्रमाणे त्याचे रूप (मूर्ती) व चित्र असते. अर्थात, गुप्तेतर काळात गणेश प्रतिमांची संख्या व प्रकार वाढले. पाषाण, माती (मृत्तिका) याचबरोबर रुईचे (मंदार) खोड, चंदनाची मूर्ती, पोवळे, यासह मध्ययुगात हस्तिदंती, काष्ठशिल्प, आदींसह आधुनिक युगात पारदर्शक काचेच्या मूर्ती, फायबर, प्लास्टिक, तांदळावर कोरलेला आदी अनेक प्रकारात गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. यासाठी आपण सर्व गणेशभक्तांनी चित्रकार, मूर्तिकार, कलेच्या व मूर्तिकलेच्या विद्यार्थ्यांनी पुण्याच्या सारसबागेतील (तळ्यातला गणपती) गणेश मंदिरामागील 'गणेश दर्शन संग्रहालयाला' जरूर भेट द्यावी. तेथे श्रीगणेशाची शेकडो रूपे आपणास पाहावयास मिळतील.


स्कंद पुराणात (काशी खंड) वानर, सिंह व हत्ती अशा त्रिमुख व पंचमुख विनायकाचा उल्लेख आहे. याच पुराणातील माहेश्‍वर खंडात गणेशमूर्तीचे राजस, सात्त्विक, तामस असे वर्गीकरण येते. पाच तोंडे, दहा हात असलेला गणपती सात्त्विक व चार हातांचा, सोनेरी रंग असलेला राजस आणि निळ्या रंगाचा तामस वृत्तीचा गणेश आहे.

याचप्रमाणे गणेश पुराणात बाल गणपतीचे वर्णन आहे. चार युगांचे चार गणपती यात दिले आहेत. ते पुढीलप्रमाणे :

1) कृतयुगातील गणेश 'विनायक' आहे. तो दशभुजा व सिंहारूढ असतो.

2) त्रेतायुगातील गणेश 'मयुरेश्‍वर' असून, तो सहा भुजांचा मयूरारूढ (मोर) आहे.

3) द्वापार युगातील गजानन चतुर्भुज असून, मूषक (उंदीर) हे त्याचे वाहन आहे.

4) कलियुगातील धूम्रकेतू नामक गणेश मात्र द्विभुज असून, अश्‍व (घोडा) हे त्याचे वाहन आहे.

मध्ययुगाच्या प्रारंभीच्या काळातील ज्ञानेश्‍वरीत संत ज्ञानेश्‍वरांनी सुरवातीलाच गणपतीची वंदना केली आहे. पल्लव, चोल काळातील अनेक गणेशशिल्पे मिळतात.

सातव्या, आठव्या शतकातील थोडक्‍यात गणेशाचे प्रकार पाहूयात :

1) नृत्य गणेश : ब्रह्मपुराणात याचे वर्णन असून, आपल्या नृत्याने गणेशाने शिव-पार्वतीला प्रसन्न करून डोक्‍यावरील चंद्र व इतर आभूषणे व सर्व गणांचे आधिपत्य मिळविले होते. त्रिभंग (गुडघा, कंबर, खांदा- मानेत वाकलेली) अवस्था तोल, लय हे याचे वैशिष्ट्य. पायात घुंगरू व हाती वाद्येही असतात.

2) शक्ती गणेश : थोड्याच (क्वचितच) या मूर्ती (मथुरेत) आहेत. आपल्या शक्तीला (देव) आलिंगन मुद्रेत मांडीवर घेऊन बसलेला या मूर्तीत दिसतो. झाशी (उत्तर प्रदेश) राणी महालात या मूर्ती आहेत. शक्ती (देवीचा) पाय सिंहाच्या पाठीवर ठेवलेला आहे. पुन्हा येथे सिंह हे शक्ती, राजसत्ता याचे प्रतीक आहे.

3) पंचविनायक (गणेश) : स्कंदपुराणातील गजविनायकाचे हे रूप आहे. ओळीने पाच गणपती (शिलापट्टीवर) आहेत. त्यातील एक हत्तीरूपातील (गज) आहे.

4) महागणपती, पंचमुख गणेश : नेपाळी कलेत ही मूर्ती मिळते. पाच सोंडी आणि दहा हात, हे महागणपतीचे लक्षण. चार बाजूंची गजमुखे व त्यावर अजून एक मुख, हे ढोबळ रूप. काशीतील धुंडिराज गल्लीतील बंगालच्या राणी भवानी मंदिरात ही प्रतिमा आहे. ही मूर्ती बरीच आधुनिक आहे.

5) यक्षविनायक : पाच मुखे, पाच दात (सुळे लांब- एकदंत), मधल्या सोंडेच्या दातावर तीन बारीक हत्ती कोरलेले आहेत.

6) राक्षसारूढ गणपती : पंचशुण्डा (सोंड), दशभुजा (बाहू- हात) गणपतीचाच हा प्रकार असून, तो द्विमुखी राक्षसाच्या खांद्यावर बसला आहे. दिल्लीच्या विमल सेठ यांच्या संग्रहात हे दुर्मिळ काष्ठशिल्प आहे.

7) हेरंब गणपती : सिंहावर बसलेला अभय (आशीर्वाद) मुद्रेतील हा गणपती आहे. मुशीगंज (बांगलादेश) येथे तो मिळाला आहे.

याशिवाय बाल गणपती, देवीच्या पायाखाली गजानन वा हस्तिमुख (गजमुख) पुरुष, उच्छिष्ठ गणपती, लक्ष्मी गणपती, ऊर्ध्व गणपती, पिंगल गणपती, भक्ती गणपती असे प्रकार आढळतात.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive