दैनिक सकाळ
01 Aug 2011 10:25,
(01 Aug 09:07 a.m.) लंडन: 'फेसबुक', 'ट्विटर' यांसारख्या 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळाच्या काळात तयार झालेली पिढी स्वतःच्या प्रतिमेत गुंतलेली, लक्ष केंद्रीत करण्यास अक्षम असलेली आणि लहान मुलांप्रमाणे स्वतःच्या जीवनावर इतरांचं काय म्हणणं आहे ते जाणण्यास आसुसलेली बनलेय, असं मत ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका ज्येष्ठ संशोधकाने व्यक्त केलं आहे. 'ऑक्सफर्ड'मध्ये फार्मकॉलॉजीचे प्राध्यापक असलेले बॅरॉनेस ग्रीनफिल्ड म्हणतात की, 'इंटरनेटवर वाढत असलेल्या 'मैत्री'मुळे (शिवाय संगणकावरच्या खेळांच्या प्रसारामुळे) मेंदूमध्ये काही बदल घडून येतात. त्यामुळे लक्ष केंद्रीत करण्यास कष्ट पडणे, स्वतःच्या ताबडतोब स्तुतीची गरज वाटणे, डोळे समोर ठेवून बोलण्यासारख्या अशाब्दिक संवादाची कमतरता अशा अडचणी समोर येत आहेत.' 'मला काळजी वाटते ती, ट्विटरवर सुरू असलेल्या घडामोडींच्या पोकळपणाची. दुसऱ्या एखाद्याच्या नाष्ट्याला कोणते पदार्थ होते या विषयी एखाद्याला रूची का वाटावी? हे सगळं बघितल्यावर मला लहान मूल डोळ्यांसमोर येतं; 'हे बघ आई, मी बघ काय करतोय', 'हे बघ आई, मी हे करतोय' असं सारखं म्हणायची सवय लहान मुलांना असते', असं रॉयल इन्स्टिट्यूशनच्या संशोधन विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले ग्रीनफिल्ड म्हणतात. ग्रीनफिल्ड म्हणतात, 'हे जवळजवळ असं होतं की, ही मंडळी व्यक्तिमत्त्वाच्या समस्येने ग्रासलेली आहेत. कुठलीतरी काळाची गुंगी त्यांना चढलेली असते. काही फेसबुक वापरणाऱ्यांना तर छोट्या स्तरावर 'सेलिब्रिटी' बनायची गरज असल्याचं दिसतं, कायम आपल्याला कोणीतरी पाहतंय, रोजच्यारोज आपल्यावर स्तुतीचा वर्षाव होतोय.' 'फेसबुकला आवश्यक गोष्टी ते करत बसतात कारण की, स्वतःला स्पष्ट करण्याचा त्यांच्या दृष्टीने एकच मार्ग असतो, लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे. खरंतर हे लोक एका खऱ्या नसलेल्याच जगात जगत असतात, या जगात केवळ दुसरे लोक तुमच्याविषयी काय मत व्यक्त करतात किंवा तुमच्यासंबंधीच्या गोष्टींवर 'क्लिक' करतात का यालाच महत्त्व असतं', असं स्पष्ट मत ग्रीनफिल्ड यांनी व्यक्त केलंय.
No comments:
Post a Comment