Thursday, August 11, 2011

मराठी पोरांचं इंग्लिश 'लई भारी'!

मराठी पोरांचं इंग्लिश 'लई भारी'!

इंग्रजी ही ज्यांच्या गावची भाषा आहे, मातृभाषा आहे, अशा विद्यार्थ्यांपेक्षा भारतातल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी सरस असल्याची आकडेवारी समोर आली आहे. उत्तम इंग्रजी लिहिण्यात, फाडफाड इंग्रजी बोलण्यात आणि अस्खलित वाचण्यात कोकणी आणि मल्याळी मुलांचा पहिला नंबर असल्याचं प्रमाणपत्र एका नामवंत संस्थेनं दिलंय. त्यामुळे मराठी मुलांच्या इंग्लिश स्पीकिंगची थट्टा करणा-या विद्वानांची बोलती बंद होणार आहे.

भारतीय विद्यार्थ्यांचं सायन्स आणि गणित काबिले तारीफ असल्याचं अवघ्या जगानं मान्य केलंय. पण आता, अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणा-या भारतीय मुलांनी आपलं इंग्रजीवरचं प्रभुत्त्वही दाखवून दिलंय. अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश मिळवताना, टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज ए फॉरेन लँग्वेज, अर्थात टोफेलमध्ये मिळालेले गुण महत्त्वाचे ठरतात. अगदी इंग्लंडमधील, मातृभाषा इंग्रजी असलेल्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा द्यावी लागते. त्यात भारतीय विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत ' इंग्रजां ' नाही मागे टाकलंय. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून ही परीक्षा देणारी मुलं त्यात आघाडीवर आहेत.

ही परीक्षा घेणा-या एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसने केलेल्या पाहणीत ही अभिमानास्पद माहिती उघडकीस आली आहे. २००५-०६ पासून टोफेलतर्फे इंटरनेटवरून ही परीक्षा घेतली जाते. यंदाच्या निकालात कोकणी विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यातही क्रमवारी लावायची झाल्यास मराठी विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होत असून कन्नड, हिंदी आणि गुजराथी भाषकांचा टक्काही चांगला आहे. गेल्या काही वर्षांत गुजराथी मुलांनी केलेली प्रगती विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

अनेक भारतीयांना, त्यांच्या मातृभाषेइतकीच इंग्रजी जवळची वाटते, हेच या यशाचं गमक असावं, असं भाषातज्ज्ञ पेगी मोहन यांना वाटतं. इंग्रजीची लोकप्रियता आता ग्रामीण भागातही वाढतेय. अगदी छोट्या शाळांमध्येही ही भाषा शिकवली जाते. त्यामुळे येत्या काळात भारतीय विद्यार्थी इंग्रजीतही नंबर वन होतील, अशी आशा आहे.

दरम्यान, लंडनमध्ये इंग्लिश भाषा शिकवण्याचा अनुभव असलेले आदिल जस्सावाला यांना मात्र हे निष्कर्ष धक्कादायक वाटतात. कदाचित भारतीय मुले, या परीक्षेची तयारी, क्लासमध्ये वगैरे जाऊन करत असतील. कारण परदेशात जाणरी भारतीय मुले इंग्लिशमध्ये कच्ची असतात अशीही आकडेवारी आढळते, याकडे ते लक्ष वेधतात. परंतु, एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसनं दिलेली आकडेवारी भारतासाठी नक्कीच गर्वाची गोष्ट आहे.


More Here

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive