Thursday, August 11, 2011

लग्नाआधी 'तसले' संबंध ?



लग्नाआधी 'तसले' संबंध ? 
तरुणांना स्वत:च्या पायावर उभं राहिल्यानंतर, चांगला पगार मिळून नोकरी कन्फर्म झाल्यानंतर आणि शक्य असेल तर स्वत:चं घर झाल्यानंतर लग्न करायचं असतं. तरुणींनाही स्वत:चं करीयर स्थिरस्थावर झाल्यानंतर लग्न करण्याची इच्छा असते अशावेळी लवकर लग्नाचा विचार कोणाचाच नसतो. पण नैसर्गिकपणे तरुण वयात निर्माण होणाऱ्या भावनांचं काय?



प्रिमॅरीटल सेक्स. या विषयाबद्दल आपल्याकडे बोलणं पूर्णपणे वर्ज आहे. हा नुसता विषय जरी काढला तरी आजुबाजूच्या लोकांच्या नजरा बदलतात. कसले चावट विषय बोलता आहात म्हणून वडीलधारे गप्प करतात. तर 'असल्या' विषयांवर उघडपणे बोलणं असभ्यपणाचं लक्षण मानणारे संस्कृतीरक्षक तर आपल्या आजुबाजूला असंख्य आहेत. पण या सगळयापलीकडे जाऊन लग्नाच्या आधी 'तसले' काहीतरी अनुभवण्याचं धाडस आणि प्रयोग करुन बघण्याकडे तरुण-तरुणींचा ओठा आहे हे सत्य नाकारुन चालणारच नाही. प्रेमात पडलेल्या जीवांना स्पर्शाची ओढ असतेच. पहिल्या वहिल्या चुंबनातला थरार प्रत्येकालाच अनुभवायचा असतो आणि तो ही लग्नाच्या आधी.
आजकाल करीयरचा अग्रक्रम लग्नाच्याही पुढे जाऊन बसला आहे. वीसाव्या नाहीतर बावीसाव्या वर्षी लग्न करायची फारशी कुणाची तयारी नसते. करीयर करायचं म्हणून लग्न टाळणाऱ्या अनेकांना 'त्या' भावनांचं करायचं काय हेच समजत नाही. त्यातून प्रेमाचे अंकूर फुटलेले असतील तर शारीरिक जवळीक साधलीच जाते. आणि अनेकदा एखाद्या बेसावध क्षणी तोल जातो. समाजाच्या दृष्टीने जे व्हायला नको ते घडतं. अर्थात याबद्दल कुणीच काहीच बोलत नाही. ना ते तरुण-तरुणी, ना त्यांचे पालक.  पण इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर पॉप्यूलेशन सायन्सेस, मुंबई यांच्या वतीने करण्यात आलेला युथ इन इंडिया : सिच्यूएशन ऍण्ड निडस् हा सर्वे मात्र निराळंच काहीतरी सांगतो आहे. या सर्वेक्षणात प्रिमॅरीटल सेक्सबद्दल तरुण-तरुणींशी उघड चर्चा करण्यात आली. याबद्दल त्यांना काय वाटतं ते जाणून घेतलं गेलं.
सोळावं वरीस धोक्याचं !
बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्ड बरोबर एकांतात वेळ घालवायला प्रत्येकालाच आवडतं. पण या सर्वेक्षणानुसार याची सुरुवात पंधरा वर्ष किंवा त्याही आधी सुरु होते. या एकांतातच मग अनेकदा शरीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न होतो. 'ऊर्जा' ने यापूर्वी सेक्स एज्यूकेशन या विषयावरील कव्हर स्टोरी पोस्ट केली होती. पंधरा वर्ष किंवा त्याआधी जर तरुण-तरुणींची शारीरिक जवळीक होत असेल तर सेक्स एज्यूकेशनची आवश्यकता आहे अथवा नाही हे कुणीही सांगू शकेल. 15 ते 24 वयोगटातील 49.6 टक्के तरुण तर 13.4 टक्के तरुणींचे लग्नाआधी शरीरसंबंध आलेले आहेत असं या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलेलं आहे. सगळयात महत्वाचं म्हणजे यात शहरी आणि ग्रामीण असा काही फारसा फरक नाही. 
काळजी घेतली होती का?
कॉन्ट्रासेप्टीव्हज् बद्दल तरुणाईला माहित असलं तरीही ते वापरण्याबद्दल जागरुकता पुरेशी आहे असं नाही. फक्त 38.8 टक्के तरुणांनी कॉन्ट्रासेप्टीव्हज् वापरल्याचं मान्य केलेलं आहे. यातही जोडप्यामधल्या तरुणानेच काय वापरायचं याचा निर्णय घेतलेला अढळून आलेला आहे. 21.4 टक्के तरुण हा निर्णय घेतात. जोडिदार तरुणी मात्र हा निर्णय घेत नाहीत असेच एकूण चित्र या सर्वेक्षणात दिसून आले. असे असले तरी 75.1 टक्के वेळा लग्नाच्या आधी शारिरीक संबंध ठेवण्याचा निर्णय हा एकटया तरुणाचा किंवा तरुणीचा असत नाही. तर ते दोघे एकत्रितपणे हा निर्णय घेतात. 15 ते 19 वयोगटातील 12.3 टक्के तरुणांनी आणि 2.8 टक्के तरुणींनी 'त्या' संबंधांचा अनुभव घेतलेला आहे. तर 20 ते 24 वयोगटातल्या 20.5 टक्के तरुणांनी आणि 2.5 टक्के तरुणी 'त्या' अनुभवातून गेल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात लग्नाआधी शारिरीक संबंध ठेवण्याचे प्रमाण तरुण-तरुणींमध्ये शहरीभागापेक्षा काहीसे जास्त आहे हेही इथे आवजून नोंदवावेसे वाटते. 
एचआयव्ही टेस्ट करायची की नाही?
लग्नापूर्वी एचआयव्ही टेस्ट करायची की नाही याबद्दल तरुण-तरुणींच नक्की काय मत आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण हल्ली लग्न झाल्यानंतर तो तरुण एचआयव्ही पॉझिटिव्ह निघाल्याच्या आणि तरुणामुळे त्याची बायको आणि झालेले मूलही एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्याच्या घटना सर्रास घडताना दिसायला लागल्या आहेत. तरुण तरुणींना मात्र एचआयव्ही टेस्ट करुन घेतलीच पाहिजे असं वाटतं ही गोष्ट खूपच स्वागतार्ह आहे. जवळपास 92.1 टक्के तरुणांना आणि 93.4 टक्के तरुणींना वाटतं की तरुणाने लग्ना आधी एचआयव्ही टेस्ट केली पाहिजे. तर 91.2 टक्के तरुणांना आणि 92.9 टक्के तरुणींना असं वाटतं की प्रत्येक तरुणीनेही लग्नापूर्वी एचआयव्ही टेस्ट करुन घेतली पाहिजे. पण प्रत्यक्षात एचआयव्ही टेस्ट करुन घेतलेल्यांची संख्या मात्र तरुणांमध्ये 5.5 टक्के आणि तरुणींमध्ये 9.6 टक्के एवढीच आहे.
प्रेमात पडणारा प्रत्येकच जण काही शारिरीक संबंधांपर्यंत जाईल असं नाही. पण हे प्रमाण वाढणारं आहे हेही विसरुन चालणार नाही. अशावेळी आय पिल खायची आणि मोकळं व्हायचं इतकं सगळं सोपं नसतं हेही कुणीतरी या तरुणाईला समजावून सांगितलं पाहिजे. कारण ही आकडेवारी अशा तरुणाईची आहे जे आपल्या जोडिदाराबरोबर प्रेमाच्या धाग्याने गुंफले गेलेले आहेत. हा काही वन नाईट स्टॅण्डचा मामला नाही. इथे शरीराबरोबर मनही गुंतलेलं असतं. म्हणूनच नातं तुटलं, फसलं तर मनावर निर्माण होणारे व्रण अधिक खोलवर असू शकतात.



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive