भारताने चुमार पोस्ट सोडली
भारत-चीन सीमेवर २१ दिवसांपासून असलेला तणाव दूर करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने चीनच्या हट्टापुढे गुडघे टेकले. लष्कराचा विरोध असूनही सरकारी आदेशामुळे भारतीय संरक्षण दलाने चुमार येथील बंकर तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनने भारताच्या हद्दीत दौलत बेग ओल्डी क्षेत्रात १९ किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी करुन लष्करी चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते. भारतीय लष्कराने चिनी घुसखोरीला तीव्र विरोध केला. मात्र सरकारी आदेश नसल्यामुळे तणाव दूर करण्यासाठी शस्त्रांऐवजी ध्वज बैठकीचा (फ्लॅग मिटिंग) पर्याय स्वीकारण्यात आला. ध्वज बैठका आणि दोन्ही देशांच्या उच्चपदस्थांनी पडद्यामागे केलेली चर्चा यातून तोडगा निघाला. चीनच्या सैनिकांनी डीबीओ क्षेत्रात केलेले बांधकाम स्वतः नष्ट करायचे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मागे स्वतःच्या हद्दीत परत जायचे, त्याबदल्यात भारताने चुमार येथील स्वतःचे बंकर तोडून टाकायचे तसेच दोन्ही देशांनी १५ एप्रिल रोजी असलेली लष्करी स्थिती कायम राखायची असा निर्णय झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने चिनी सैन्याच्या आक्रमक हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठीच चुमार येथे बंकर बांधायचे काम सुरू केले होते. मात्र चीनने आक्रमक हालचाली करुन भारतावर दबाव आणला आणि चुमार येथील काम बंद पाडले आहे.
केंद्र सरकारने हा निर्णय चीनच्या दबावाखाली घेतला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र सरकारी अधिकारी चीनपुढे गुडघे टेकल्याचा आरोप फेटाळत आहेत. आम्ही तणाव दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचे काही निर्णय घेतले आहेत, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment