Tuesday, May 14, 2013

गोष्ट भरपेट उपवासाची (मुक्तपीठ) Upvas

वर्षातून एकदाच महाशिवरात्री येते, तेव्हा जशी निर्जला एकादशी तशी निर्जला महाशिवरात्री करायची ठरवलं. सकाळी उठून वाढत्या वयाची मुलं, ह्यांना दिवसभर बाहेर राहावं लागत असल्यानं खिचडी, राजगिऱ्याचे लाडू, दही, वेफर्स सगळं व्यवस्थित करून दिलं. मग घरातील कामाला लागले अन्‌...
- नलिनी भालेराव

चला बाई उठावं आता. उद्या महाशिवरात्री आहे. थोडी तरी तयारी करायला हवी. आपल्यासाठी नाही, तरी पण मुलांसाठी चार पदार्थ करायला हवेत. वाढती वयं त्यांची त्यांना चार-पाच वेळा खायला लागतंच. काय करता! मग राजगिऱ्याच्या लाह्या फोडल्या. चांगल्या पिवळ्याधमक गुळाचा पाक करून लाडू केले. घरच्या झाडाचे नारळ काढले होते. दोन नारळाच्या वड्या केल्या. वरई निवडली. दाणे निवडून भाजले, जेवढे करता येईल तेवढे केले. बाकीचे उद्याच करावे म्हटले. एकटी तरी किती करणार? जीव अगदी मेटाकुटीला येतो; पण हे सारं करताना, मी मनात विचार केला, की वर्षातून एकदाच शिवरात्र येते. तेव्हा जशी निर्जला एकादशी करतात तस्साच उपास आपण या वर्षी शिवरात्रीला करायचा. नाही तरी मला मेलीला कुठं काय जास्ती लागतंय खायला!

दुसरा दिवस उजाडला. अगदी लक्षात ठेवलं, की आज आपली निर्जला शिवरात्र आहे. मुलांना, ह्यांना सकाळी खिचडी करून दिली. खिचडीबरोबर सायीचं दही, वेफर्स, राजगिऱ्याचे लाडू आणि दोन-दोन खोबऱ्याच्या वड्या दिल्या. म्हटलं दिवसभर कामानं थकतात. त्यात उपवास. त्यांना त्रास होऊ नये म्हणून हे सारं केलं. केळी, द्राक्षेही पुढं ठेवली. सर्व जण फराळ करून व डबे घेऊन कामाला गेले. घर कसं अगदी शांत शांत झालं. थोडा वेळ पेपर वाचला; पण मला कसंतरीच व्हायला लागलं. काही सुचेनाच. म्हटलं थोडा चहा करून घ्यायला काय हरकत आहे. तश्‍शीच उठले बाई आणि फक्त दीड कपच निरशा दुधाचा घट्ट चहा करून घेतला व राहिलेली कामे उरकायच्या कामी लागले. भांडी घासली, कपडे धुतले, सगळं घर आवरलं. आता म्हटले, शांतपणे देवाचे करावे. रोजचं वाचन आटोपलं. शिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत वाचलं. आरती वगैरे झाली. अन्‌ काय! मला गरगरायलाच लागलं. उठताही येईना. अंगात ताकदच राहिली नाही. तश्‍शीच उठले बाई. बशीभर खिचडी दोनच लाडू, मोजून नारळाच्या चारच वड्या खाल्ल्या आणि एक ग्लासभर दूध घेतलं. तेव्हा कुठं जरा बरं वाटलं! मुखशुद्धी म्हणून दोन केळी व वाडगाभर द्राक्षं घेतली. कशीतरी खाल्ली बघा! जातंय का काय या वयात.

संध्याकाळी सर्व जण आल्यावर बटाट्याचा चिवडा व रताळ्याचा कीस केला. येताना ह्यांनी सफरचंद, चिकूआणले होते. सर्वांनी त्याचा फडशा पाडला. मी मात्र उगीच नावाला बशीभर चिवडा व बशीभर कीस घेतला आणि ह्यांनी आग्रह केला म्हणून एक सफरचंद व तीन-चारच चिकू घेतले. सोसतंय की काय, आपल्याला पूर्वीसारखं म्हणून मी आपली स्वतःला फार जपून असते. बरं! टीव्हीवर बातम्या लागल्या, की त्या बघताना आमच्याकडं सर्वांनाच काहीतरी तोंडात टाकायला लागतं म्हणून मी टीपॉयवर तुपात तळलेला खजूर, खमंग भाजलेले दाणे ठेवले. बघता बघता सगळ्यांची तोंडं सुरू झाली. माझाही हात सवयीप्रमाणं तिकडं गेलाच; पण जास्त काही खाल्ले नाही. उगाच दहा-बारा खजुराच्या बिया व दोन मुठी दाणे खाल्ले, पोरांची बरोबरी कशी काय हो होणार? आता आपण म्हातारपणाकडं झुकलेलो आहोत. आपली भूक आता कमीच असणार की!

रात्री काही विशेष करायचं नाही, असं मी ठरवलं. नाहीतरी उपावासाला कमीच खायचे असतं. नाही तर तो उपवास कसला? फक्त अर्धा किलो वऱ्याचे तांदूळ केले, पातेलीभर दाण्याची आमटी केली. तोंडी लावायला बटाट्याची भाजी व दाण्याची चटणी केली. काकडीची कोशिंबीर केली. बटाट्याचे पापड व साबुदाण्याच्या पापड्या तळल्या, गोड लिंबाचं लोणचं काढलं. हो म्हटलं जास्त कशाला करायचं! रात्री शांत झोप यावी म्हणून हा सारा खटाटोप दुसरं काय! इतकी काळजी घेऊनही मला मध्यरात्री कसेतरीच व्हायला लागलं. जीव अगदी घाबराघुबरा झाला. म्हटलं आपल्याला उपवासच लागला बरं का! हे आपलं वय का आहे निर्जला शिवरात्र करण्याचं! तब्बेतीला जपायला हवं. उपवास खाऊन पिऊनच करायला पाहिजेत. असा विचार केला व नैवेद्याची वाटी भरून मोरावळा खाल्ला ग्लासभर लिंबाचं सरबत घेतलं. तेव्हा कुठं जरा शांत झोप आली. तरी बरं, माझं इतरांसारखं मुळ्‌ळीच नाही हं! एकादशी अन्‌ दुप्पट खाशी!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive