Thursday, August 4, 2011

'मराठी बाणा'नं जिंकली अमेरिकी मराठी मनं'




'मराठी बाणा'नं जिंकली अमेरिकी मराठी मनं'



मेरिकेचा व्हिसा मिळेल का नाही हे वर बसलेल्या देवालाही सांगता येणार नाही, अशा परिस्थितीत काळजीपूर्वक केलेल्या नियोजनामुळं मराठी बाणाच्या सर्व कलाकारांचा व्हिसा हातात आला होता. अमेरिकेत जाऊन आपली कला सादर करण्याचं या कलाकारांचे स्वप्न साकार झालं होतं. 125 कलाकारांची भली मोठी पलटण हयात हॉटेलमध्ये उतरली होती. महिन्यापूर्वीच समुद्रमार्गे कार्यक्रमाचा संपूर्ण सेट शिकागोत दाखल झाल्याचं वृत्त होतं.

संध्याकाळचं जेवण उरकून सर्वजण "म्याकोर्मिक कन्व्हेन्शन सेंटर'च्या भव्य सभागृहात अगदी वेळेत स्थानापन्न झाले होते. सर्वांच्या मनात एक कुतूहल होतं. संगीत व नाट्यापलीकडील एका भव्य दिव्य कार्यक्रमाच्या तयारीत कार्यकर्ते मग्न होते. नेहमीच्या आदबशीर कलाकारांपेक्षा एक वेगळाच मराठी बाणा ते अशोक हांडे यांच्याबरोबर काम करताना अनुभवत होते. कार्यकर्ता कसा असावा, तर डोक्‍यावर बर्फ आणि तोंडात साखर असा. अशा कार्यकर्त्यांचाही भल्या मोठ्या सेटच्या नियोजनात कस लागत होता. 200 लाईट, भलं मोठं स्टेज, लांब आणि रुंद आणि तितकेच खोल. सुमारे 6 पडदे बसतील आणि लिफ्टच्या साह्यानं स्टेजचा पुढील भाग आपोआप वर येईल, अशी आधुनिक यंत्रणा. भारतातून आलेल्या पाहुण्यांसाठी एकूण हे सर्वच अजब होतं.

ठरल्या वेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीची घोषणा झाली आणि पडदा बाजूला झाला. काळोखाच्या पार्श्वभूमीवर, नांदीच्या संगीताबरोबर हळू हळू संपूर्ण स्टेज प्रकाशमान झाला आणि भव्य दिव्य रंगमंचाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विविध प्रकारची वाद्यं घेतलेल्या कलाकारांच्या अंगात वारं संचारलं. तेव्हढ्यात मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडे यांचा रंगमंचावर प्रवेश करते झाले. भारदस्त व्यक्तिमत्व, अगदी "मराठी बाणा'च्या निर्मितीला साजेसं.

काही वर्षांपूर्वीच "मंगल गाणी-दंगल गाणी', "आवाज की दुनिया' या कार्यक्रमांचे प्रयोग करण्यासाठी अमेरिकेचा दौरा केलेल्या अशोक हांडे यांचा उर नक्कीच भरून आलेला दिसत होता. सभागृह खचाखच भरलेलं. मराठी संस्कृतीचं खऱ्या अर्थानं पारंपारिक रुपात प्रदर्शन करण्यास ते सज्ज होते. भव्यता आणि संस्कृतीचा आत्मा याचा सुसंवाद आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन हा छुपा अजेंडा घेऊन ते रंगदेवतेच्या अभिवादनानं तयार असल्याची ग्वाही, रंगमंचावर वाढवलेल्या श्रीफळातून दिसत होती.

"गण-गवळण', "महालक्ष्मीचा गोंधळ', "जेजुरीचा खंडेराया' अशा विषयांना हात घालत, जत्रा, झिम्मा-फुगड्या, लेझीम, तमाशा अशा विविध लोकसंस्कृतीनं भारलेलं वातावरण प्रेक्षकांपुढं उभं राहात होतं. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होळी, दहीहंडीपासून ते चाळीतील बायकांचे पारंपरिक खेळ यांना उधाण आलं होतं. अशोक हांडे यांचे 120 सहकारी उपस्थितांना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक काळात घेऊन जाण्यात यशस्वी झाले होते. दिवाळी पहाटेच्या दिव्यांनी सारा रंगमंच उजळून गेला होता. "न भूतो न भविष्यति" अशी कलाकृती रंगमंचावर सादर होत होती. लिंगोबाचा डोंगर, बुरगुंडा, कोळी नृत्य, लग्नाची वरात, लावण्या आणि सर्वात शेवटी गोंधळ. जोगव्यात देवीचं रूप बघून प्रेक्षकगृहात अक्षरशः जल्लोष झाला.

उत्तर अमेरिकेत बऱ्याच वर्षांपासून स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांसाठी, सह्याद्रीच्या मराठी संस्कृतीचा रानमेवा "चौरंग'च्या कलाकारांनी चोहो दिशांना उधळत त्यांच्या स्मृती जागवल्या आणि मातृभूमीच्या आठवणींनी हळवंही केलं. इथल्या नवीन पिढीला आपली संस्कृती किती देदिप्यमान आहे याची जाणीवही करून दिली. आपण मराठी असल्याचा अभिमान नक्कीच त्यांच्यात जागृत झाला असेल.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive