Sunday, September 9, 2012

प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवं असं एक पुस्तक म्हणजे, ‘एक होता काव्‍‌र्हर’.

सहृदय द्रष्टा
संकलन : अनिरुद्ध अभ्यंकर

सारं जपा. वेळप्रसंगी त्याचा उपयोग होतो. या डॉ. काव्‍‌र्हर यांच्या बजावण्यामुळे अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर शेती उत्पादन झालं होतं. ते वाया जाऊ नये म्हणून अन्नधान्य टिकवण्याच्या सुलभ पद्धती त्यांनी शोधून काढल्या. भावी पिढय़ांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवं असं एक पुस्तक म्हणजे, ‘एक होता काव्‍‌र्हर’.
अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्यापुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून काव्‍‌र्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा स्वीकार करायचा. या जगात टाकाऊ असे काहीच नाही. सारं जपा. वेळप्रसंगी त्याचा उपयोग होतो. या डॉ. काव्‍‌र्हर यांच्या बजावण्यामुळे अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर शेती उत्पादन झालं होतं. ते वाया जाऊ नये म्हणून अन्नधान्य टिकवण्याच्या सुलभ पद्धती त्यांनी शोधून काढल्या. भावी पिढय़ांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवं असं एक पुस्तक म्हणजे, ‘एक होता काव्‍‌र्हर’. वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या या चरित्रातलाच हा संपादित भाग-
मी जॉर्ज डब्ल्यू. काव्‍‌र्हर, स्वत: उभारलेले ‘काव्‍‌र्हर प्रतिष्ठान’ माझ्या जवळच्या मिळकतीसह (तेहेतीस हजार डॉलर्स) तस्कीगी संस्थेला अर्पण करत आहे, -वृत्तपत्रातली ही बातमी साऱ्या जगाला अवाक् करून गेली.
चार तपं अविरत परिश्रम घेतल्याच्या खुणा आता त्यांच्या शरीरावर स्पष्टच दिसत होत्या. कर्टीस शक्यतो त्यांना एकटे राहू देत नसे. ऑस्टिन कर्टीसने बरीच धावपळ करून एक योजना आखली. डॉ. काव्‍‌र्हर यांच्या गेल्या पन्नास वर्षांतील कार्याचं दर्शन भावी पिढय़ांना घडावं, म्हणून ‘काव्‍‌र्हर संग्रहालय’ उभारण्याच्या कामी तो लागला. भुईमूग, रताळी, रानगवत, टाकाऊ वस्तू, कंदमुळं, हस्तकला, झालरी (लेसेस), विणकाम, इत्यादी अनेक विषयांवरील त्यांच्या कृती तिथे हारीने मांडल्या गेल्या. तशीच त्यांची चित्रं. अलाबामाची माती व आपल्या हाताची बोटं एवढय़ा साधनांनी उत्कृष्ट चित्रं कशी साकारता येतात, हे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यासाठी तयार केलेल्या कलाकृती तिथे मांडल्या गेल्या. विज्ञान शाखेत निग्रो मुलांनी कितीही हुशारी दाखवली तरी स्वत:च्या उत्कर्षांसाठी त्यांना त्या अभ्यासाचा उपयोग करता येत नसे. पदवी घेऊन बाहेर पडलेल्या निग्रो केमिस्टला सौंदर्यप्रसाधनं किंवा फारतर एखाद-दुसरं पेटंट औषध तयार करण्यापलीकडे अन्य काही बनवण्यास वाव नसे. व्यावसायिक प्रयोगशाळांतून ‘निग्रोना मज्जाव’ अशा अलिखित पाटय़ा. काही ठिकाणी तर कायद्याने बंदी. अशा परिस्थितीत मोठय़ा कष्टाने आत्मसात केलेले ज्ञान त्यांना खऱ्या अर्थाने वापरून पाहता येत नसे. त्यामुळे साहजिकच, पुढे निरु पयोगी ठरणाऱ्या या विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला. हा फार मोठा धोका होता. हुशार मुलांची बुद्धी वाया जाणार होती. डॉ. काव्‍‌र्हरनी इलाज शोधला. काव्‍‌र्हर प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले.
हे प्रतिष्ठान उभारण्याचं त्यांचं स्वप्न साकार करण्यात अनेकांचा हातभार लागला. जवळजवळ दोन लाख डॉलर्स किमतीची वास्तू उभी राहिली. हजारो संशोधकांना, विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळाला. विज्ञान विषयात गती असणाऱ्या मुलांना प्रगत अभ्यासक्रमात प्रयोगशाळेची उणीव भासू नये म्हणून आपल्या आयुष्यभराची साठवण खर्च करून त्यांनी हे प्रतिष्ठान उभारले. उजाड माळावर फुलबाग फुलवल्याबद्दल, आपले हात केवळ निर्मितीसाठी वापरल्याबद्दल, डॉ. वॉशिंग्टन यांना दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याबद्दल त्यांना संस्थेने जे काही मानधन दिले होते, तेही त्यांनी संस्थेला साभार परत केलं. कारण ते जाणून होते, काळाच्या उदरात त्यांनी उत्तम बी पेरलं होतं. डोळस कष्टांच्या खतपाण्याने अंकुरलेल्या कार्याने मूळ धरले होते. नवीन धुमारे फुटत होते. लवकरच फळं लागणार होती. त्यांच्या द्रष्टेपणाचं, कार्यरत वृत्तीचं कौतुक करणारा, त्यांच्या लोकोत्तर समाजसेवेचं गुणगान करणारा जेव्हा त्यांचे आभार मानू लागे तेव्हा ते विनयाने म्हणत, ‘‘माझी नाही तर आणखी कोणाची नियुक्ती या कामी देवाने करून आपलं काम करवून घेतलं असतंच. त्याने माझी निवड केली यात माझी प्रशंसा करण्याजोगं काय आहे?’’ खरंच, अशा गुणी माणसाची नियुक्ती करून देवाने स्वत:चे देवपण राखलं होतं.
[साभार : एक होता काव्‍‌र्हर- वीणा गवाणकर;
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे]

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive