एकदा
श्री केविनला म्हणाला.. वर्तमान नाराज झाला म्हणून सहजच भूतकाळात डोकावलो,
बरं वाटलं अन् मजाही वाटली. यावर केविन म्हणाला, असं म्हणण्यापेक्षा हे का
नाही म्हणत की, भूतकाळात डोकावलो, रमलो म्हणून वर्तमानाचं भान राहिलं नाही
अन् वर्तमान रुसला.. श्रीला केविनच्या या तर्काचं आश्चर्य वाटलं. केविन
पुढे म्हणाला, काळ काळ असतो तो रुसेल कसा? नाराज कसा होईल? काळाला भावना
कशा असतील? खरं तर भावना या मनुष्यप्राण्याची जागीरदारी आहे. आपल्या
मनासारखं नाही घडलं की काळ रुसला असं वाटतं, खरं आहे, सुधा गेली तेव्हा
श्री नखशिखांत रुसला होता, स्वतवरच. अंतर्बा भिजला होता, धो धो पावसांत
भिजल्याप्रमाणे.
गेल्या कैक वर्षांत पावसांत मनमुराद भिजलो नाही.
कॉलेजमध्ये असताना अन् नंतरही जून महिन्याची किती वाट पाहायचो, पावसासाठी.
पावसाळा सुरूझाला की, अघोषित कार्यक्रम ठरलेला असायचा, जवळ जवळ सगळे
शुक्रवार किंवा शनिवार रात्री दहाच्या सुमारास बबनकडे भेटणं. शेवटच्या
कर्जत लोकलपर्यंत किंवा पुणा पँसेजपर्यंत जितके आले असतील तितक्यांनी
निघायचं. दोन कपडे, काही खाण्याचे जिन्नस आणि श्रीचा याशिका एसएलआर
सॅकमध्ये कोंबायचं. कर्जत, लोणावळावरून वाट फुटेल तिथपर्यंत पायी चालत
राहायचं. कर्जतला उतरलं की स्टेशनच्या मागच्या स्टँडवर जागा अडवायला
लगबगीनं जायचं. थोडय़ाच वेळात परदेशीकाका यायचा पोहे आणि चहाची ऑर्डर
घ्यायला. लोणावळ्याला उतरलं की चालत बाहेर एसटी स्टँडवर यायचं अन् उसळीला
फोडणी द्यायची वाट पाहात बाहेर बसायचं. खाल्लं, चहा झाला की निघाले, किती
ट्रेक्स, किती विनाकारण पावसात भटकणं, कितीजण यायचे, नाही यायचे, पण श्री
मात्र ठाम असायचा. कैक वेळा शेवटच्या ट्रेनपर्यंत कुणीच आलं नाही तर एकटाच
जाऊन आलेला. नाही म्हणायला विकी, बोक्या, सुशांत नेहमीचे असायचेच. एक मात्र
ठरवून घेतलेलं दादरहून निघून दादरला पुन्हा पोहोचेपर्यंत नो अल्कोहोल..
अन् हे व्रतासारखं त्या आठ-दहा वर्षांत पूर्ण पाळलेलं.. अनंत आठवणींचं
मोहोळ उठलेलं. किती कविता, किती गझला ट्रेक्समध्ये सुचल्या. किती मित्रांची
ट्रेक दरम्यान खरी ओळख झाली. किती जणांचे मुखवटे गळले अन् किती जणांवर
नव्याने चिकटले. एका शुक्रवारी सगळे बबनकडे चहा पीत होते. सॅक बबनच्या
टेबलाखाली. इतक्यात अभ्या आला. हाफ पँट, टी शर्ट, पायात स्लीपर्स अन् हातात
भाजीवाला देतो तसली कॅरी बॅग. कॅरी बॅगेत एक अंतर्वस्त्र, एक साधा पंचा
अन् ब्रश दोन दिवसांच्या ट्रेकसाठी. अभ्या असा आलेला. अभ्याचे बाबा
वैज्ञानिक अन् अभ्याही आपल्या मार्गाने जावा असं वाटणारे. अभ्याने ठरवून
बारावीत अभ्यास केला नाही. कमी मार्क्स मिळाल्यावर घरी आगपाखड झाली. पण
अभ्याने आर्ट्सला अॅडमिशन घेतली. आर्कीओलॉजीचा वेडा अभ्या. घरी न सांगता,
खाली जाऊन येतो म्हणून ट्रेकला येणारा, तर मिल्या ट्रेकला कधीतरी येणारा,
पण येताना दोन दिवसांच्या ट्रेकसाठी आठ आठ जोड कपडे, नाईट सूटसह आणणारा.
एकदा कधीतरी पाच-सहा जणं होते. कर्जतला ट्रॅकवरून चालत
कधी खाली उतरले, उल्हासच्या प्रवाहातून वर जाण्याचा प्रयत्न करीत चालत
राहिले. रात्र व्हायला आली. सॅकमध्ये खाण्याचं काहीच शिल्लक नाही, जवळपास
मनुष्यवस्ती नाही अन् पोटात आगडोंब उसळलेला. रात्री कधीतरी डोंगरावरील एका
शेतातील खोपटांत पोहोचले. चूल होती, सरपण होतं, पण खायला काहीच नाही.
श्रीने हातातील टॉर्चने काही पाला खुरडून आणला. खोपटातील चूल पेटवली.
तिथल्याच मातीच्या भांडय़ात पाणी घालून पाला शिजवला. श्री सगळ्यांना धीर देत
खा खा म्हणत होता. मी पाला बघून आणलाय. कुणी कुणी हाताने जे शिजलं होतं ते
ओरपायला सुरुवात केली. खाऊन झाल्यावर श्री म्हणाला, सकाळी उठलो तर पाला
खाण्यालायक होता म्हणायचा नाही तर किमान भरल्यापोटी मेलो असं म्हणून डोळे
मिटू. सकाळी खोपटाच्या मालकानेच उठवलं. त्याच्याकडची भाकरी खाऊन निघालो.
एकदा रात्रीचा मुक्काम आंध्रालेक जवळील गावात. डाळ, तांदूळ, भाजी, पातेली
मिल्या असल्यामुळे सगळ्या जिन्नस होत्या. गावातील मंदिरात मुक्काम. बाब्या
अन् विक्या चुलीवर लागलेले अन् उरलेले निवांत गाणी म्हणत पहुडलेले. एक एक
करीत बरेच गावकरी जमले. जेवायच्या वेळेस पांगले. जेवायला बसणार इतक्यात
गावचा सरपंच भाजी-भाकरी घेऊन आला. अन् जेवल्यावर घरी भजनाला या म्हणत
दुरूनच घर दाखवून निघून गेला. चला गावचं भजन ऐकू म्हणून सरपंचाच्या घरात
शिरलो. शंभरएक माणसांचा गोतावळा जमलेला. हे गेल्यावर सरपंचाने श्रीच्या अन्
सुशांतच्या गळ्यांत हार घालून प्रास्ताविक केलं. मुंबईहून भजनी मंडळी आलीय
म्हणून. सगळ्यांची पंचाईत, पण श्रीनं, सुशांत अन् विकीने नेलं निभावून.
आठ-दहा आठवतील ती भजनं म्हटली. निघताना सरपंचाने गूळ, नारळ अन् एकवीस रुपये
देऊ केले. मंदिरात पोहोचले तर सहा-सात गोधडय़ा कुणीतरी आणून टाकल्या.
जाताना सकाळी सरपंचांनी न्याहारीला बोलावलंय म्हटलं..
 आज
रात्र झाल्यापासून का मन सारखं सारखं भूतकाळात जातयं? वर्तमान आपल्यावर
नाराज आहे की काय? केविनचे शब्द पुन्हा कानावर पडत राहिले. काळाला भावना
नसतात..
बऱ्याचदा एक दिवसाच्या मुक्कामाला गेलेले, पण मन
भरलं नाही म्हणून चार-पाच दिवस राहून आलेले. असंच एकदा भीमाशंकरचा मुक्काम
दोन दिवसांनी वाढला. मग आधीच्या ट्रेकने धास्तावलेला अभ्या उद्या पहाटेच
निघू म्हणाला. आधीच्या ट्रेकला म्हणाला. आधीच्या ट्रेकला बहिणीला सांगून
अभ्या निघाला रविवारी येईन म्हणून, पोचला बुधवारी.. बाबांनी हरवला म्हणून
पोलिसांत तक्रार दिलेली. पहाटेच निघाले. श्री अन् बाब्या पहिली बस पकडायची
म्हणून सुसाट. खाली गावाच्या अलीकडल्या ओढय़ापर्यंत पोचले तर पहिल्या बसने
आलेले ट्रेकर्स दिसू लागले. बस जाणार म्हणून बाब्या चडफडायला लागला, पण
बाकीचे अजून मागे असल्यामुळे ओढय़ात पाय सोडून बसले. एक हौशानवशाचा ग्रुप
आला, गावाला जातो तसल्या बॅग, सुटकेस, म्युझिक सिस्टम घेऊन त्याच ग्रुपमधले
दोघेजणं यांच्या जवळच ओढय़ात पाय सोडून बसले. एक चाळीस पंचेचाळिशीच्या
बऱ्यापकी पोट सुटलेला, तर दुसरा पंचविशीतला. नाव, गाव विचारून झालं. श्रीनं
कुतूहलानं विचारले, नेहमी येता का? तर तरुण म्हणाला वर्षांतून एकदा.. मग
एवढय़ा बॅग्ज, सूटकेस, म्युझिक सिस्टम? नाचतो, धम्माल करतो. एवढय़ात पोट पुढे
आलेल्याने त्याच्या बॅगेतून ओल्ड मंकची बाटली अन् स्टीलचा ग्लास काढला.
कटकट करीत झाकण उघडलं. ग्लास ओढय़ातील स्वच्छ पाण्याने भरला अन् वरून
ग्लासामध्ये त्याचा लार्ज ओतला. तरुणानेही त्याचं अनुकरण केलं, दोघांनी
चीअर्स करून ग्लास तोंडाला लावला. श्री अस्वस्थ. त्या गृहस्थांना म्हणाला,
अजून तीन-एक तास वर चढायचंय. आताच सुरू झालांत तर वर कसे पोहचाल? तो
माणूसपण आम्ही असेच एन्जॉय करतो म्हणत पिऊ लागला. मग दोघांनीही याला ऑफर
केली. श्री नाही म्हणाला. दारूला नाही म्हणता म्हणता शब्दाला वाढला. हा अशा
ठिकाणी दारू पिऊन चढू नका म्हणत तर ते दोघं आपलं काही वाकडं होत नाही,
यातच खरी धमाल आहे वगरे.. सांगत होते. त्यांच्या बोलण्याचा शेवट.. जालिम
तुने पी ही नहीं.. सारखा काही तरी झाला. श्रीने हात पुढे करून बाटली
मागितली. त्यांनी ती जिंकल्याच्या आविर्भावात लगबगीने बाटली पुढे केली. बूच
उघडलं अन् सरळ घशात ओतली, पीत राहिला. ते दोघेही खुळ्यासारखे पाहात होते.
श्रीनं बाटली बाब्याकडे सरकवली. बाब्या याच्या वरताण. त्याने तोंडाला बाटली
लावली अन् संपवूनच त्या तरुणाच्या हातात दिली. आता त्यांचे चेहरे
पाहण्यासारखे झालेले. २-४ मिनिटं तोंडातून शब्दच फुटेना. आपआपला पेग संपवून
निघाले, पण पूर्ण उतरल्यासारखे. ते दोघेही पुढे जात होते. त्यांच्या
आपआपसातील भांडणाचे भकार-मकार यांच्या कानावर पडत होते. दादरला
पोहोचेपर्यंत तोच विषय, बाब्या अन् हा मात्र तर्र्र्र्र.. आज रात्र
झाल्यापासून सगळं पाठचं का आठवतयं? का मन सारखं सारखं भूतकाळात जातयं? का
मन भूतकाळांत रमू पाहतंय? वर्तमान आपल्यावर नाराज आहे की काय? क्षणभर मनात
शंकेची पाल चुकचुकली, पण केविनचे शब्द पुन्हा कानावर पडत राहिले. काळाला
भावना नसतात. भावना माणूस नावाच्या प्राण्याची जागीरदारी आहे. भावना
माणसाला असतात. आपल्यानुसार तो ठरवतो, काळ हसला, फसला की रुसला ते.. |
|
No comments:
Post a Comment