अवघा
महाराष्ट्र ज्या विघ्नहर्त्यांच्या आगमनाची वाट पाहात आहे त्याच्या
तयारीमध्ये राज्यातील सर्वच व्यापारीपेठा आणि बाजारपेठा गुंतल्या आहे. अनेक
छोटेमोठे उद्योग या काळात सुरू होतात. हंगामी स्वरूपाचे व्यवसायदेखील
गणेशोत्सवाच्या काळात सुरू होतात. अनेकांना रोजगार मिळतो. गणेशोत्सवातील
महत्त्वाचा भाग म्हणजे गणपतीची सजावट, भोवतीची आरास. घरातील गणपतीच्या
मूर्तीला शोभा आणते ते गणपतीचे मखर. थर्माकॉलचे हे मखर केवळ गणेशाच्या
मूर्तीला शोभाच आणत नाही तर अनेक कलाकारांना रोजगारदेखील मिळवून देते.
त्यासाठीची तयारी आता जोरात सुरू आहे.
साधारणपणे दिवाळीनंतर मखर बनवणाऱ्या कारागिरांचे काम
सुरू होते. मागच्या हंगामात कोणत्या डिझाइनना मागणी जास्त होती, त्यामध्ये
कोणते बदल करून नवीन प्रकारचे मखर बनवता येईल याचा विचार केला जातो.
त्याचप्रमाणे भारतातील प्राचीन मंदिरे, परदेशातील मंदिरे, सिद्धिविनायक
किंवा तिरुपती अशा प्रकारच्या प्रसिद्ध मंदिरांचे आकार बनवले जातात.
त्यामध्ये नक्षीकाम करून त्यांना अधिक आकर्षक बनवले जाते. ही सर्व मंदिरे
थर्माकॉलची बनवली जातात, कारण थर्माकॉल हाताळायला आणि टिकायला चांगला असतो.
त्याशिवाय त्यावर चांगले कोरीवकामदेखील करता येते. थर्माकॉलची मखरे फोल्ड
करून ठेवता येते. थर्माकॉलची प्रतवारी केलेली असते. ज्याप्रमाणे सोन्याची
प्रतवारी कॅरेटमध्ये केली जाते त्याप्रमाणे थर्माकॉलची प्रतवारी ही
डेंटलमध्ये केली जाते. १६ डेंटलचा थर्माकॉल हा चांगल्या प्रतीचा मानला
जातो. याच्या ३९ बाय १८ मीटर ब्लॉकची किंमत ही ८०० ते ९०० रुपये असते.
त्यानंतर १४ डेंटल असणाऱ्या थर्माकॉलच्या य़ाच मापाच्या ब्लॉकची किंमत ४००
ते ६०० रुपयांपर्यंत असते. १० आणि ११ डेंटलचे थर्माकॉल हे हलक्या प्रतीचे
असतात. त्यामुळे त्याचा फारसा वापर केला जात नाही. सहारा आणि बेल ग्रेल या
दोन नावाजलेल्या कंपन्या थर्माकॉल बनवतात. महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी
थर्माकॉल बनवण्याचे काम चालते. एकदा कलाकाराने डिझाइन नक्की केले की
त्याला योग्य त्या किमतीत बसवण्याचे काम चालू होते. एखादे डिझाइन खूप सुंदर
आहे, पण त्याची किंमत अधिक असेल तर सर्वसामान्य माणूस ते घेऊ शकणार नाही.
म्हणूनच डिझाइन तयार करताना ते वाजवी दरामध्ये बसवावे लागते. त्याच्या
किमतीवर त्याचा आकार, त्यावरील कोरीवकाम, रंग या सगळ्या गोष्टी अवलंबून
असतात. कमी किमतीत जास्त वैविध्य कसे देता येईल याचा डिझाइन निवडताना विचार
केला जातो.
या
वर्षी बाजारामध्ये मयूरासनाचे वेगवेगळे प्रकार आहेतच, त्याशिवाय
मंगलमूर्ती मंदिरे आणि बैठय़ा आणि छोटय़ा आकारातील मंदिरेदेखील पाहायला
मिळतात. ‘गोवा सीन’मधील मखर हे यंदा प्रथमच पाहायला मिळेल. हवेली पॅटर्न,
मेघडंबरी यांची डिझाइन्सदेखील आली आहेत. मखरांच्या किमती किमान आठशे
रुपयांपासून ते अकरा हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळतात.
मखर बनवण्यासाठीदेखील वेगवेगळे कारागीर असतात.
मखराच्या आतील भागाचे नक्षीकाम करण्यासाठी प्रामुख्याने हॅँड
कार्विग(थर्माकॉलवर हाताने केलेले कोरिवकाम किंवा नक्षीकाम) करावे लागते.
हे काम अतिशय नाजूक असते. त्यामुळे हे काम करणारे कारागीर वेगळे असतात.
लहान किंवा घरगुती स्तरावर काम करणारे कारागीर सगळी कामे स्वत:च करतात, पण
मोठय़ा ठिकाणी मात्र हँड कार्विगसाठी वेगळे कारागीर असतात. या कारागिरांचा
दरदेखील वेगळा असतो. त्यानंतर रंगकाम करणारे कारागीरदेखील काही ठिकाणी
वेगळे असतात. पूर्वी या कामात फक्त ब्रशचा वापर व्हायचा. आता यासाठी
पेंटिंग-स्प्रेचा वापर होत आहे. मखर बनवण्याच्या कामामध्ये संगणकाचा
वापरदेखील डिझाइन बनवण्यासाठी होतो.
यामागचे अर्थकारण पाहिले तर असे लक्षात येते की,
गणपतीच्या हंगामामध्ये किमान कौशल्य असणारा एक कारागीर केवळ गणपतीच्या
हंगामामध्ये तीस ते चाळीस हजार रुपये कमावतो आणि मुख्य कारागीर हा पन्नास
ते साठ हजार रुपये कमावतो. इतर वेळी हे कारागीर वेगवेगळी कामेदेखील घेत
असतात. मुंबईमध्ये असे अनेक कारागीर आपल्याला भेटतील, की गणपतीचा हंगाम हा
त्यांच्या दृष्टीने आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचा असतो. याबद्दल सांगताना मखर
बनवणारे कारागीर आणि विक्रेते व अक्षय डेकोरेटर्सचे अरुण दरेकर सांगतात,
‘‘गणपतीचा काळ हा आम्हाला केवळ आर्थिकदृष्टय़ाच महत्त्वाचा असतो असे नाही.
आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी मिळते. एखादे गिऱ्हाईक जेव्हा आमच्या
कलाकृतीकडे प्रसन्नपणे पाहाते त्या वेळी कृतार्थ झाल्यासारखे वाटते.
परमेश्वराची सेवा करण्याची ही संधी असते. महाराष्ट्रातील अनेक कारागिरांची
कुटुंबे या गणेशोत्सवावरच चालत असतात. वर्षभराच्या कामाची सुरुवात ही
गणपतीच्या हंगामामध्येच चालू होते आणि पुढे वाढत जाते. त्यामुळे एका
अर्थाने कारागीर आपल्या आर्थिक वर्षांची सुरुवातच गणेशोत्सवातून करतो. मग
पुढे दिवाळीमध्ये तो आकाशकंदील तयार करतो किंवा नवरात्रामध्ये सार्वजनिक
मंडळांना आरास करून देतो आणि त्यातून पैसे मिळवतो.’’
गणपतीच्या
सजावटीच्या वस्तूंमध्ये विविध प्रकारच्या माळा, विविध प्रकारचे दागिने
यांचा समावेश असतो. हार- दागिने करणाऱ्या कारागीर महिलांना गणपतीचा कालावधी
हा धनलाभाचा कालावधीच असतो. याचा काळात त्यांना काम आणि पैसे मिळतात. तसे
पाहता त्यांचे काम हे वर्षभर चालू असते, पण त्यांच्या कामाला मागणी येते ती
गणपती आणि नवरात्र या काळात. अनेक महिला बचतगट या कामात गुंतले आहेत.
सॅटिनच्या फुलांच्या माळा करणे, मोती आणि रुद्राक्ष यांच्या माळा करणे,
गणपतीचे मुकुट करणे अशी कामे या महिला आपल्या घरी करतात. माळा तसेच गणेश
सजावटीचे इतर साहित्य विकणारे घाऊक व्यापारी या महिला बचतगटांना माळा किंवा
इतर वस्तू करण्याचे साहित्य पुरवतात आणि त्यांच्याकडून या आरासीचे साहित्य
करून घेतात. हे माळा किंवा सजावटीचे इतर साहित्य बनवण्याचे अनुभव असणारी
महिला किमान दोनशे रुपये दिवसाला मिळवते, तर नवीन महिला किमान शंभर ते
दीडशे रुपये मिळवते. श्रावण ते दिवाळी असा या महिलांचा काम करण्याचा हंगाम
असतो. त्यांनी केलेल्या माळा किंवा इतर वस्तू या केवळ महाराष्ट्रातच नाही,
तर जर्मनी, दुबई, मस्कत, इंग्लंड या देशांमध्येदेखील जातात. आपल्या
कुटुंबाची काळजी घेत आणि घरी राहून या महिलांना हा चांगला रोजगार
गणेशोत्सवाच्या रूपाने मिळतो. यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे मोती, मणी
हे करण्याचे कारखानेदेखील भिवंडीमध्येच आहेत. गणेशोत्सवाच्या काळात याची
मागणी वाढते व या कारखान्यातील कामगारांनादेखील अधिक काम केल्यामुळे जादा
मजुरी मिळते.
आता
हा व्यवसाय केवळ स्थानिक बाजारपेठेपुरता राहिलेला नाही, तर तो ग्लोबल झाला
आहे. गणपतीच्या माळेमध्ये वापरली जाणारी सॅटिनची फुले, हार किंवा माळेची
रिबीन या सर्व गोष्टी चीनमधून येतात. त्या चायनामेड असतात. त्या इतक्या
स्वस्त असतात की या चायनामेड फुले आणि रिबिनीच्या वापरामुळे नफ्याचे प्रमाण
हे ४० टक्क्य़ांनी वाढते. चीनमधून आलेल्या वस्तू वापरण्यावर अधिक भर दिला
जातो.
या व्यवसायाची माहिती देताना भुलेश्वर येथील व्यापारी
मिरल शहा सांगतात की, ‘‘गेली चाळीस वर्षे आम्ही गणपतीच्या सजावटीच्या
साहित्यविक्रीचा व्यवसाय करत आहोत. आम्हाला यातून चांगला नफा मिळतो. आमचे
काम साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये सुरू होते. आम्ही गणपतीच्या गळ्यातील
माळा, मुकुट यांचे डिझाइन बनवतो. हे डिझाइन बनवताना लोकांनी मागच्या वर्षी
कोणत्या पॅटर्नला जास्त प्रतिसाद दिला होता आणि त्यामध्ये कोणते बदल
केल्याने लोकांना ते अधिक आवडतील याचा विचार केला जातो.
भिवंडी, बोरिवली या भागांतून आम्हाला लागणारा कच्चा
माल आम्ही घेतो, पण आता चायना मटेरियल स्वस्त आणि घरपोच मिळते, त्यामुळे
चायना मटेरियल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. आमचे काम हे पूर्णपणे
हस्तकौशल्याचे आहे. त्यामुळे अजूनपर्यंत या क्षेत्रात मॉलवाले आलेले नाहीत
आणि पुढेदेखील येऊ शकणार नाहीत.
आमच्याकडे अशा दोनशे महिला आहेत ज्यांना आम्ही माल
पुरवतो आणि त्या आम्हाला माळा करून देतात. बोरिवली परिसरामधील या महिला
आहेत. या महिलांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. यातून त्यांना फार पैसे
मिळतात असे नाही, पण दवाखाना, मुलांसाठी वह्य़ा-पुस्तकं यासाठी त्यांना
कोणाकडे उधारी मागावी लागत नाही, कारण या कामातून त्यांना त्यांच्या
हक्काचे पैसे मिळतात. ते अडीनडीला त्यांच्या उपयोगी पडतात.
गणेशोत्सवाच्या
काळात आणखी एक उद्योग मोठय़ा तेजीत चालू असतो, तो म्हणजे अत्तर आणि
अगरबत्ती करण्याचा. श्रावण महिना सुरू झाला की, आपल्याकडे धार्मिक कार्याना
सुरुवात होते. तसे पाहता आपल्याला लागणारी अगरबत्ती किंवा अत्तर पाहता
यातून कोणाला असे किती पैसे मिळणार, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो, पण
अगरबत्तीच्या व्यवसायाचा आकार प्रचंड मोठा आहे. यामध्ये अनेक हात राबत
असतात. तसेच त्यातून त्यांना चांगले पैसेदेखील मिळतात. अनेक कुटुंबे
याच्यावर आपला चरितार्थ चालवत असतात. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये
प्रामुख्याने हा व्यवसाय चालतो. अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारे आगर हे
लाकूड आणि हलमट्टी ही सुगंधी मसालामिश्रित माती ही कर्नाटकातील सागरा या
गावातून येते. तेथे आगराची झाडे मोठय़ा प्रमाणात आहेत. या गावातील बहुतांशी
लोक हे लाकूड गोळा करणे, हलमट्टी तयार करणे हेच काम करतात. त्यांना यातून
चांगले पैसे तर मिळतातच, पण वर्षभर रोजगारदेखील मिळतो. पूर्वी सागरा हे गाव
चंदनतस्करीसाठी प्रसिद्ध होतं. आता या गावातील लोकांना हक्काचा रोजगार
मिळाला आहे.
कर्नाटकातून अगरबत्तीला लागणारा कच्चा माल म्हणजे
आगराचे लाकूड आणि हलमट्टी मुंबईत येते. तिथून अगरबत्ती बनवणाऱ्या कंपन्या
आपापला माल आपल्या कारखान्यात नेतात. या कारखान्यांमध्ये दोन प्रकारचे
कामगार काम करत असतात. एक म्हणजे अगरबत्ती वळणारे आणि त्यानंतर त्यांचे
पॅकिंग करणारे, असे दोन प्रकारचे कामगार येथे काम करतात. खरं तर हे काम
वर्षभर चालणारे आहे, पण गणेशोत्सवाच्या काळात मात्र अगरबत्तीची मागणी
जवळपास दुप्पट होते. त्यामुळे अगरबत्ती तयार करणाऱ्या कारखानदारांना
अतिरिक्त कामगारदेखील घ्यावे लागतात. या काळात कामगारांच्या मजुरीतदेखील
वाढ होते. अगरबत्तीच्या व्यवसायाची सुरुवातच गणेशोत्सवापासून होते. या
काळात अगरबत्ती वळणाऱ्या कामगाराला दिवसाला तीनशे ते साडेतीनशे रुपये
मिळतात, तर पॅकिंग करणाऱ्या कामगाराला दोनशे ते अडीचशे रुपये मिळतात. या
कारखान्यांमध्ये प्रामुख्याने महिला कामगार काम करतात. म्हणजे
गणेशोत्सवाच्या काळात अत्तरे किंवा अगरबत्त्या यांची मागणी वाढते आणि सागरा
गावापासून ते मुंबईतल्या कारखान्यातील कामगारांपर्यंत सर्वानाच रोजगार
मिळतो. तसेच त्यांच्या मजुरीतही वाढ होते. याबद्दल बोलताना मनोहर अगरबत्ती
स्टोअर्सचे मालक व अगरबत्तीचे उत्पादक योगेश शेटे सांगतात, ‘‘आमच्या
व्यवसायाची सुरुवात ही गणेशोत्सवाने होते. त्यानंतर नवरात्र, मग दिवाळी असा
सीजन वाढत जातो. त्यामुळे गणेशोत्सवाला आमच्या दृष्टीने फार महत्त्व आहे.
या काळात आम्ही आमचे स्वत:चे अगरबत्तीचे नवीन प्रकार बाजारात आणतो. लोकांना
ते कसे वाटतात हे गणेशोत्सवाच्या काळात आम्हाला समजते. पुढे आम्ही नवरात्र
आणि दिवाळीला त्याचे उत्पादन वाढवतो. आमच्या मालाचे परीक्षण
करण्यासाठीदेखील आम्हाला गणेशोत्सव आवश्यक वाटतो. आमच्या कामगारांच्या
दृष्टीनेही हा उत्सव चांगला असतो, कारण या काळात त्यांच्या मासिक उत्पन्नात
नेहमीपेक्षा दुप्पट वाढ होत असते. एका अर्थाने बाप्पा आम्हा सर्वानाच
पावतो.’’
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे
सार्वजनिक गणेशोत्सवात पाहायला मिळणाऱ्या भव्य आणि आकर्षक गणेशमूर्ती तसेच
मंडळांनी उभे केलेले देखावे. आजकाल मंडळांचे बजेट वाढल्याने ते उत्तमोत्तम
देखावे साकारतात. त्यामध्ये भव्य मंदिरे, किल्ले, महाल यांच्या प्रतिकृती
साकारल्या जातात. या प्रतिकृती साकारणारे कलाकार, कारागीर, रंगारी या
सगळ्यांचे रोजगाराचे हे प्रमुख साधन आहे. हाच त्यांच्या कमाईचा सीजन आहे.
या साऱ्या टीमच्या कामाची सुरुवात होते ती गणेशोत्सवाच्या आधी दोन महिने.
सर्वप्रथम टीममधील कलाकार कोणती वास्तू उभी करायची ते ठरवतात. याची निवड
मंडळाच्या बजेटवरून करण्यात येते. ऐतिहासिक वास्तू साकारण्यासाठी सर्वाधिक
खर्च येतो. भव्य प्रतिकृती साकारणाऱ्या या टीममध्ये मजूर, सुतार, आर्ट
डायरेक्टर, टेथिस (शिलाईकाम करणारा), पेंटर, मेस्त्री यांचा समावेश असतो.
कामाच्या आकारावर यांची संख्या अवलंबून असते. याशिवाय माल आणून देणे, अवजड
मालाची ने-आण करणे यासाठी काही हेल्परदेखील असतात. त्यांच्या त्यांच्या
कामावरून त्यांचे वेतन ठरवले जाते. हेल्परचे वेतन हे दिवसाला किमान अडीचशे
रुपये इतके असते, तर सुतार किंवा पेंटर यांची मजुरी ही किमान पाचशे रुपये
इतकी असते. एखादी प्रतिकृती साकारायची असेल तर त्यासाठी लाकूड, पी.ओ.पी आणि
फायबर यांचा वापर केला जातो. या प्रतिकृतीसाठी लागणाऱ्या फळ्यादेखील
पुरवणारे कंत्राटदार असतात. ते एका फळीमागे पंधरा रुपये इतके भाडे घेतात.
त्यांनादेखील या उत्सवामुळे रोजगार मिळतो.
या टीममधील काही कलाकार दिवसाला नऊशे रुपयांपर्यंत
कमाई करतात. त्यांच्या कामातून ते भव्य आणि देखणी कलाकृती साकारतात.
गणेशोत्सव हा सण असा आहे की, जो या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो
आणि पैसेही!
प्रशांत विचारे हे गणेशोत्सवामध्ये अशा प्रतिकृती
साकारतात. ते सांगतात, ‘‘आजकाल मंडळांचे बजेट प्रचंड वाढले आहे. काही मंडळे
देखाव्यांवर कमीत कमी पाच लाख रुपये खर्च करतात, तर काही मंडळांचा हा आकडा
कोटींच्या घरात असतो. या भव्य प्रतिकृती साकारायच्या म्हणजे कामगार आणि
कलाकारदेखील खूप लागतात. या सर्वानादेखील हाच एक सीजन असा असतो की, या
काळात ते जास्त पैसे कमावतात. गणेशोत्सवाच्या काळातच आमच्यासाठी मार्केट
खुलं होतं. बाजारात तेजी जाणवायला लागते. गणेशोत्सव आर्थिकदृष्टय़ा चांगला
पार पडला की मग पुढे वर्षभर कामंदेखील चांगली मिळत जातात.’’
गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी आर्थिक उलाढाल होते
त्यामधून अनेकांच्या हाताला काम मिळतं, नव्यानव्या कलाकृती निर्माण होतात.
फुलवाले, मूर्तिकार, वाजंत्रीवाले, ढोल-ताशाची पथके, लाइटवाले अशा
सर्वाच्याच दृष्टीने हा उत्सव म्हणजे त्यांच्या आर्थिक वर्षांची सुरुवात
असते. या उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये
गौरी-गणपतीबरोबर लक्ष्मीदेखील येते, कारण शेवटी ‘जिथे राबती हात तेथे
हरी’.. |
|
No comments:
Post a Comment