Sunday, September 9, 2012

बँक अधिकारी होण्यासाठी..

बँक अधिकारीपदासाठी होणाऱ्या परीक्षांचे स्वरूप आणि त्यासाठीची तयारी याबाबत मार्गदर्शनपर लेख-
स्पर्धा परीक्षांची तयारी करणे, अभ्यासात सातत्य राखणे, योग्य पद्धतीने अभ्यास करणे याचे महत्त्व आतापर्यंत नोकरीच्या जाहिराती पाहणाऱ्या उमेदवारांना कळाले असणारच. आता ज्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होते, त्यात आयबीपीएस उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्यास आवाहन केलेले असते. म्हणजेच बँकेत नोकरी मिळवायची म्हणजे (१९ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये) आयबीपीएस उत्तीर्ण उमेदवारच अर्ज करू शकतात, हे आज अनेकांना ठाऊक झालंय.
बऱ्याचदा या प्रक्रियेची (सामायिक लेखी परीक्षा) म्हणजेत बँकेत अधिकारी होण्यासाठी असलेल्या संधींची पुरेशी माहिती नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आणि आता तर आयबीपीएस उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना १९ राष्ट्रीयीकृत बँकांखेरीज आयडीबीआय बँकेतही अर्ज करण्याची संधी प्राप्त झाली आहे. म्हणजेच असे म्हणता येईल की, त्यांच्या करिअरच्या कक्षा रुंदावू लागल्या आहेत. नोकरीची नवनवीन दालने वाढत आहेत, खुली होत आहेत. नवी शास्त्र, (अर्थशास्त्र, गुंतवणुकीचे विविध पर्याय) नव्या गरजा (घरासाठी, व्यवसायाची कर्ज, तसेच इतर गरजा) यामुळे नवे रोजगार उपलब्ध होत आहेत.
कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत (स्टेट बँक, आरबीआय, नाबार्ड सोडून) प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून काम करण्यासाठी आयबीपीएस परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.
प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मोठय़ा प्रमाणावर भरतीप्रक्रिया सुरू आहे. वर्षांतून दोनदा, साधारणपणे मे-जून आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्या बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून मुलाखतीसाठी अर्ज करता येतो. त्यानंतर त्यातून अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते. म्हणजेच एकूण १९ राष्ट्रीयीकृत बँकांची एकत्रित परीक्षा  व त्यानंतर प्रत्येक बँक आपणास हवा असलेला उमेदवार निवडण्यासाठी मुलाखत घेणार. अशा प्रकारे उमेदवारांना, तसेच बँकेला दोघांनाही संधीचा लाभ. यातून बँकांना उत्तम उमेदवार निवडता येतो इच्छुक उमेदवारांना तब्बल १९ बँकांमध्ये मुलाखत देण्याची संधी मिळते.
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ (ऑब्जेटिव्ह) व वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) अशा दोन स्वरूपात घेतली जाते. ऑब्जेटिव्ह परीक्षेत रिझिनग (तर्कशक्ती), इंग्रजी, सामान्य ज्ञान, जनरल अवेअरनेस (सामान्य ज्ञान विशेषत: बँकिंग क्षेत्राशी निगडित), संगणक ज्ञान हे पाच विषय असून चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात. डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये निबंध, सारांश लेखन व पत्रलेखन, तसेच कल्पनाशक्तीवर आधारित प्रश्न विचारले जातात. जे विद्यार्थी ऑब्जेटिव्ह परीक्षेत पात्र ठरतील, त्यांचाच डिस्क्रिप्टिव्ह पेपर तपासण्यात येतो.
स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँक, नाबार्ड तसेच खाजगी बँकांतर्फे होणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेसाठी हाच अभ्यासक्रम असून फक्त या परीक्षांना बसण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदवी (६०%) अशी आहे.
या परीक्षांमध्ये असणाऱ्या पाचही विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. (चार विषयांत सर्वच्या सर्व गुण, मात्र जर पाचव्या विषयांत
अनुत्तीर्ण असेल तर त्या उमेदवारास मुलाखतीसाठी अपात्र ठरविले जाते.)
बँकेत अधिकारी होण्यासाठी या परीक्षा म्हणजे राजमार्ग आहे. खडतर असला तरी याच मार्गावरून तुम्हाला तुमच्या करिअरची योग्य दिशा मिळेल.
प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी असणारा अभ्यासक्रम हा लिपिक पदासाठी असणाऱ्या अभ्यासक्रमासारखाच असला तरी त्याची काठिण्य पातळी उच्च असते.
क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड : ५० गुणांसाठी ५० प्रश्न या घटकात विचारले जातात. यात संख्या व संख्याप्रणाली, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, शतमान-शेकडेवारी, नफा-तोटा, संभाव्यता, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, काळ-काम व वेग, अंतर-वेग व वेळ, मिश्रणावरील उदाहरणांचा समावेश केलेला असतो.
हे प्रश्न वेळखाऊ असतात. त्यासाठी शॉर्टकट पद्धत अवलंबिल्यास हे प्रश्न जलद सोडविता येतात. परंतु मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय शॉर्टकट पद्धत अवलंबिणे शक्य नाही. दररोज किमान ५० उदाहरणे सोडविण्याचा सराव करणे हा या घटकाच्या अभ्यासासाठी सर्वात यशस्वी प्रयोग आहे. प्रथम अचूकता साधा व त्यानंतर जलद उदाहरणे सोडविण्याचा प्रयत्न करा. गणितातील सर्व सूत्रे व्यवस्थित अभ्यासा. १ ते ३० पर्यंतचे वर्ग तसेच घन लक्षात असावेत. त्यांचा उपयोग सरावासाठी उदाहरणे सोडविताना करावा, जेणेकरून ते कायमचे लक्षात राहतील. शॉर्टकट पद्धतीच्या अवलंबनाने उदाहरणे जलद सुटतील व जास्तीत जास्त उदाहरणे सोडवू शकाल.
इंग्रजी : या घटकावरील प्रश्न हे मुख्यत्वे व्याकरणावर आधारित आहेत. यात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यातील चूक ओळखणे, चुकीची स्पेलिंग शोधणे अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
बुद्धिमापन चाचणी : या घटकात शाब्दिक, अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी असे दोन विभाग पडतात. यात संख्यामालिका, वर्णमालिका, समान संबंध, दिशाविषयक प्रश्न, नाते-संबंध, वेन-आकृत्या, सांकेतिक भाषा, इनपुट-आऊटपुट अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
सामान्य ज्ञान : यात मुख्यत्वे बॅकिंग क्षेत्राशी निगडित सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. यात SLR म्हणजे काय? CRR चे विस्तारित रूप सांगा. अशा बँकिंग व अर्थशास्त्राशी निगडित संकल्पनांवर प्रश्न विचारले जातात.
संगणक ज्ञान : संगणक ज्ञान ही आता मूलभूत गोष्ट झालेली आहे. त्याच्याशिवाय सगळ्यांचे काम अडेल असा हा अनिवार्य घटक झालेला आहे. यात संगणकाविषयीचे ज्ञान तपासणारे प्रश्न विचारले जातात.
अशा प्रकारचा हा परीक्षेचा अभ्यासक्रम असून अशा घटकांनी तयार होणारी प्रश्नपत्रिका आपणास सोडविता येईल का? आपला पेपर योग्य वेळेत सोडवून होईल का? प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर आपणास किती गुण मिळतात याबद्दल आडाखा बांधून जे प्रश्न चुकले असतील त्यांची योग्य उत्तरे शोधून नंतर त्यांची उजळणी करा. यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांशी बोलून अभ्यासाची दिशा ठरवा. अभ्यासाला अजूनही नीटशी सुरुवात केली नसेल तरीही घाबरून न जाता आहे त्या वेळेचा सदुपयोग करा व लागा कामाला; म्हणजेच येणाऱ्या वर्षांत आपण असाल ‘बँक अधिकारी.’ 

- संजय मोरे

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive