Sunday, September 9, 2012

टेन्शन मोजण्याचे यंत्र

टेन्शन मोजण्याचे यंत्र
डॉ. नितीन पाटणकर

बी.पी. मोजताना हवेचा दाब किती गतीने वाढवला जातो आणि कमी केला जातो यावरही अचूकता अवलंबून असते. हवेचा दाब जर खूप कमी गतीने वाढवला तर खालचे किंवा डायास्टॉलिक प्रेशर आहे त्यापेक्षा जास्त दाखवले जाऊन उगाच औषधांच्या डोसमध्ये बदल केला जाऊ शकतो.
एका मित्राची गोष्ट. एका रात्री त्याला फोन आला- ‘डॉक्टर र्अजटली या. मी सिस्टर बोलत्येय, सीव्हिअर हार्टफेल्युअरची केस आहे.’ हे ऐकून त्याने हॉस्पिटलमध्ये फोन केला, ‘आयसीयूमध्ये बेड रिझर्व केला आणि दिल्या पत्त्यावर पोहोचला. तिथे रडणारी आणि लुडबुडणारी गर्दी हटवीत जेव्हा रुग्णापाशी पोचला तेव्हा बघतो तर एक तरुण मुलगा गादीवर गडबडा लोळतोय. तोंडाला ढेकूण मारण्याच्या औषधाचा वास. त्याने अ‍ॅम्ब्युलन्स मागवली. पेशंटला प्रथमोपचार चालू केले. त्याने मग विचारले की, मला फोन करणाऱ्या सिस्टर कुठे आहेत? एक ताई पुढे आल्या. त्यांचे पुढचे संवाद असे झाले- ‘‘अहो ही टिक ट्वेन्टीची केस आहे, तुम्ही कुठच्या हॉस्पिटलमध्ये आहात?’’ त्यावर ती म्हणते, ‘‘अहो मी टीचर आहे.’’
‘‘फोनवर तुम्ही म्हणालात ना की मी सिस्टर बोलतेय?’’
‘‘अहो, मी या पेशंटची सिस्टर.’’
‘‘म्हणजे तुम्ही नर्स नाही?’’
‘‘नाही.’’
‘‘मग सीव्हिअर हार्टफेल्युअरची केस आहे हे कोणी सांगितले तुम्हाला?’’
‘‘मलाच माहीत आहे की ते. अहो समोरच्या चाळीतील सुमित्रा, तिचं आणि त्याचं झालं लव. मग काही दिवसांनी तिने दिला याला डिच्चू. मी म्हटलं त्याला, अरे एक गेली तर सौ येतील. पण हा वेडा. घेतलं ढेकणाचं औषध.’’
माझ्या मित्राला स्वत:ही हे औषध थोडंसं घ्यावं असं वाटून गेलं.
असे शब्दांनी घायाळ होण्याचे प्रसंग डॉक्टरच्या आयुष्यात अनेकदा येतात. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘मुलाने अमेरिकेवरून टेन्शन मोजण्याचे यंत्र पाठविले आहे. तुम्ही घरी वापरून बघा आणि सांगा की इंडियन कंडिशनमध्ये पण ते बरोबर काम करते की नाही ते.’’
आता आमच्या घरात इंडियनच कशाला, अगदी महाराष्ट्रीय मुंबईकर जिवंत टेन्शन वीस वर्षांपूर्वी मी देवाब्राह्मणांना साक्षी ठेवून घेऊन आलो होतो हे खरे आहे, पण ते मोजण्याचे यंत्र? मी विचारात पडलो. त्यातून हे यंत्र घरी नेले की काय होईल या विचाराने अजूनच टेन्शन आले. मग उलगडा झाला. या गृहस्थांना उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन आहे. त्यासाठी मुलाने बीपी मोजण्याचे मशीन पाठवले आहे. त्याचे झाले टेन्शन मोजण्याचे यंत्र.
पूर्वी पारा असलेली यंत्रे असत. नंतर िस्प्रग असलेली यंत्रे आली आणि आता डिजिटल ऑटोमॅटिक यंत्रे आली. अजूनही या यंत्रांची अचूकता मधूनमधून तपासून पाहावीच लागते. याची सुरुवात मजेशीर होते. नवीन मशीन घरी आले की एकदा सगळ्यांचे बी.पी. बघून होते. बहुतेकांचे बी.पी. नॉर्मल असते. त्यातले आजी किंवा आजोबा यांचे बी.पी. जास्त असते. मग उत्साहाने रोज त्यांचे बी.पी. बघितले जाऊ लागते. कधीकधी तर पाहुणे आले की त्यांच्यासमोर त्या आजी आजोबांना गिनिपिग बनवले जाते. कधीतरी ते कुरकुरतात. आजकाल आजी-आजोबांना सुना-मुला-नातवंडासमोर काही बोलायची सोय नसते (पुढे आजारपणात काळजी आम्हीच घेणार ना, मग एवढं करायला काय हरकत आहे? हे वाक्य सतत सोबतीला असल्याने). मग ते बिचारे आता पुरे, हात दुखायला लागला.. असे सांगून बघतात. हे सांगताक्षणी मोर्चा दुसऱ्या हाताकडे वळतो.
मग सगळ्यांच्या लक्षात येते की दोन्ही हाताच्या प्रेशरमध्ये फरक आहे. मग हे मशीन घेऊन डॉक्टरकडे जाणे होते. खरेतर डाव्या आणि उजव्या हाताच्या प्रेशरमध्ये फरक असतोच. ज्याला वरचे प्रेशर किंवा सिस्टॉलिक प्रेशर म्हणतात त्यात डाव्या-उजव्या हातात वीस मी.मी.पेक्षा कमी फरक असेल आणि खालचे किंवा डायास्टॉलिक प्रेशर म्हणतात त्यात दहा मी.मी.पेक्षा कमी फरक असेल तर ते नॉर्मल असते. यापेक्षा जास्त फरक असेल तर मात्र मशीन आणि माणूस दोघांनाही डॉक्टरकडे घेऊन जाण्याची गरज असते. एका हाताला रक्तपुरवठा कमी होत असल्याचे लक्षण आहे हे.
बी.पी. मोजण्यात सर्वात जास्त चुका होतात त्या हाताभोवती बांधायच्या पट्टय़ाच्या आकारामुळे. यंत्र कुठचेही असो, त्यात बी.पी. कफ (या कफचा आणि सध्या साथ चालू आहे त्या कफचा किंवा आयुर्वेदातील कफाचा संबंध नाही) असतोच. बी.पी. कफ म्हणजे कापडी पट्टा नव्हे. या कापडी पट्टय़ाच्या आत एक रबरची पिशवी असते. त्यात हवा भरून बी.पी. मोजले जाते. तर या रबरी कफचा आकार बी.पी. मशीनची अचूकता ठरवतो. अण्णांचा पट्टा वापरून जर पवारांचं टेन्शन मोजले तर आहे त्यापेक्षा खूपच जास्त टेन्शन दिसेल. म्हणून हा कफ कसा असावा याबद्दल काही ठोकताळे आहेत. या कफची रुंदी ही दंडाच्या परिघाच्या (circumference) च्या ८०% तरी असावा लागतो. या कफची लांबी किंवा उंचीही खांदा ते कोपर या अंतराच्या २/३ तरी असावी; तरच बी.पी. योग्य रीतीने मोजता येते. बऱ्याच डॉक्टरांकडेदेखील असे वेगवेगळे कफ नसतात. एकवचनी, एकबाणी रामाप्रमाणे हे एककफी असतात.
त्याचप्रमाणे बी.पी. मोजताना हवेचा दाब किती गतीने वाढवला जातो आणि कमी केला जातो यावरही अचूकता अवलंबून असते. हवेचा दाब जर खूप कमी गतीने वाढवला तर खालचे किंवा डायास्टॉलिक प्रेशर आहे त्यापेक्षा जास्ती दाखवले जाऊन उगाच औषधांच्या डोसमध्ये बदल केला जाऊ शकतो. तसेच हवेचा दाब कमी करताना जर उसासा टाकल्याप्रमाणे भसकन कमी केला तर वरचे प्रेशर किंवा सिस्टॉलिक प्रेशर आहे त्यापेक्षा खूप कमी दिसते आणि डायास्टॉलिक प्रेशर आहे त्यापेक्षा खूप जास्त दिसते. याउलट जर हा दाब अतिसंथगतीने कमी केला तर याच्या उलटा परिणाम दिसू शकतो. म्हणूनच नाडीचे ठोके चाचपीत दाब वाढवीत जाणे आणि कमी करताना अंदाजे प्रत्येक नाडीच्या ठोक्यागणिक २ मिमी इतका दाब कमी करणे हे अचूकता वाढविण्याचे साधन आहे.
अचूकता कशी आणावी आणि असावी हे एकदा कळले की मग खुशाल टेन्शन मोजण्याचे यंत्र घरी आणायला हरकत नाही. त्यामुळे टेन्शन आणि हायपरटेन्शन दोन्ही कमी होतील.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive