Sunday, September 9, 2012

बदफैली

बदफैली
हिमांशू चौधरी

ऑनलाइन लग्न ठरवून दिनेश चांगलाच खूश होता. त्याच्या बायकोच्या समांतर आयुष्याबद्दल तो पूर्णत: अनभिज्ञ होता. त्याची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली नसती तर...
तो माझा कॉलेजातला मित्र. नामसाधम्र्यामुळे गैरसमज नको म्हणून त्याचं नाव दिनेश असं संबोधू. दिनेशची आणि माझी अनेक र्वष गाठ नव्हती. मात्र हल्ली फेसबुकमुळे जुने संपर्कापासून दूर गेलेले मित्रही पुन्हा भेटतात. दिनेशही असाच ऑनलाइन भेटला. पुन्हा जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. मग वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडींची देवाणघेवाण झाली. त्यात कळलं की, दिनेश लग्न करतोय. तसा तो लग्नाच्या वयासाठी थोराड होता. बरेच दिवस बिचारा रखडला होता. कधी पसंती न जमल्यामुळे तर कधी कुंडली न जुळल्यामुळे त्याचं लग्न जमत नव्हतं. अखेरीस ऑनलाइन वेबसाइटवर खटपट करून त्याला हवी तशी, कुंडलीतले योग्य गुण जमून येऊन, अनुरूप मुलगी मिळाली आणि त्याचं शुभमंगल जुळून आलं होतं.
दरम्यानच्या काळात आम्हीही ऑनलाइन बोलत होतोच. त्याने ऑनलाइनच लग्नाचं आमंत्रण दिलं. हल्ली हे बरं असतं. वेळेची, खर्चाची आणि परिश्रमांचीही बचत होते.
मी लग्नाला येईन, असं प्रॉमिस देऊनही कामात व्यग्र राहिल्यामुळे लग्नाला जाऊ शकलो नाही. ऑनलाइनच त्याला शुभेच्छा देऊन ऑनलाइनच न येऊ शकल्याबद्दल माफीही मागितली.
दिनेश एक दिवस अचानक रस्त्यात भेटला नसता तर हे सगळं असं ऑनलाइनच राहिलं असतं. पण नियतीला ते मंजूर नसावं. रस्त्यावरून चालतानाच पाठीवर थाप पडली. ती दिनेशची होती. लग्नाला गेलो नाही म्हणून तो चांगलाच नाराज होता. मी पुन्हा प्रत्यक्ष माफी मागितली.
मग आम्ही कुठे तरी बसून गप्पा मारण्यासाठी आम्ही कॉफी प्यायचं ठरवलं. जवळच्याच एका कॉफी हाऊसमध्ये जाऊन बसलो. प्रत्यक्ष भेटीत औपचारिकता गळून पडते. तोही मोकळेपणाने बोलू लागला. लग्नानंतर खूश दिसत होता. लग्नाला तीन महिने झाले होते, मात्र नवरा-बायकोंचं छान पटलेलं दिसत होतं.
‘‘मग कशी वाटली तुझी वहिनी?’’ दिनेशने मिश्कीलपणे विचारलं. ‘‘मी ऑनलाइन काही फोटो पाठवले होते.’’
खरं तर मीही ऑनलाइन फोटो पाहिले होते, पण लग्नाचे ते टिपिकल फोटो होते. त्यात हल्ली मेकओव्हर आणि शालूत सगळ्या चि.सौ.कां. सारख्याच दिसतात. तरीही तोंडदेखलं छान म्हणालो.
लगेच दिनेश ताडकन चमकून म्हणाला, ‘‘अरे काय योगायोग आहे बघ. माझ्याकडे आत्ता बॅगेत आमच्या हनिमूनचे फोटो आहेत.’’
त्याने लगेच हनिमूनचा छोटा अल्बम काढला आणि तो कौतुकाने त्यांच्या गोव्याच्या हनिमूनचे फोटो दाखवू लागला. आता त्यांचे फोटो टिपिकल लग्नाच्या पोशाखातले नव्हते. ते हनिमूनचे अनौपचारिक फोटो होते. तो फोटो दाखवत असताना मी त्याच्या बायकोच्या क्लोजअप फोटोने चमकलो. तो चेहरा मी कुठे तरी पाहिला होता. माझ्या डिटेक्टिव्हगिरीत मेंदूने कुठे तरी त्या चेहऱ्याची नोंद घेतली होती. मात्र कुठे ते नक्की आठवत नव्हतं. पण मनाशी जे खटकलं ते मी चेहऱ्यावर आणू दिलं नाही.
मी पुन्हा त्याला शुभेच्छा दिल्या. वहिनी कुठे कामाला आहेत विचारलं. कंपनीचं नाव आणि एरियाचं नाव आवर्जून विचारून घेतलं. मग कॉफी संपल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
मात्र मेंदूतला भुंगा त्या चेहऱ्याचा संदर्भ आठवत राहिला. माझं इंटय़ूशन सांगत होतं की कुठे तरी पाणी मुरतंय. माझा संशय शांत करण्यासाठी अखेरीस मी दिनेशच्या बायकोच्या कंपनीचा पत्ता शोधून काढला. दोन-तीन दिवस तिच्यावर पाळत ठेवली.
मी तिच्यासमोरूनही जाऊ शकत होतो. कारण ती मला ओळखत नव्हती. मी लग्नालाही गेलो नव्हतो.
पाळत ठेवल्याने काही वेगळं हाती गवसत नव्हतं. ऑफिस सुटल्यावर ती सरळ घरी जात होती. उगाच काही तरी संशयाचा किडा डोक्यात वळवळतोय, असं समजून मी तिचा नाद सोडणारच होतो, तितक्यात एका शनिवारी वेगळी गोष्ट घडली.
ती दुपारी ऑफिसमधून निघाली, पण घरच्या वाटेकडे गेलीच नाही. ती एका रेस्टॉरण्टच्या बाहेर जाऊन उभी राहिली. बहुधा तिथे ती कुणाची तरी वाट बघत होती. थोडय़ा वेळाने एक तरुण मुलगा तिथे आला. त्या दोघांची देहबोली थोडी जास्त जवळिकीची होती. ते दोघे त्या रेस्टॉरण्टमध्ये शिरले तेव्हा मी त्यांचे फोटो काढले. माझा संशय पक्का झाला. अशाच एका पाळतीच्या वेळी एका बगिच्यात मी तिला एका तरुणाबरोबर पाहिल्याचं आठवलं. माझं इंटय़ूशन खरं ठरलं होतं तर.
ते दोघे रेस्टॉरण्टच्या बाहेर आले आणि त्यांनी टॅक्सी पकडली. मी लगेच त्यांचा पाठलाग सुरू केला. ते उपनगरातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये गेले. तिच्या चारित्र्याबाबतचा माझा अंदाज खरा ठरला. काही तासांनी ती दोघं बाहेर आली. ती ट्रेन पकडून घरी निघून गेली.
आता हे सगळं दिनेशला सांगणं आवश्यक होतं. मात्र कसं सांगायचं हा प्रश्नच होता. पण आमच्या पेशात असं सत्य सांगण्याची वेळ बऱ्याचदा येते आणि ते थेट सांगितलेलंच बरं असतं, असं अनुभवातून आम्ही शिकलेलो असतो. रात्री मी फोनवर दिनेशशी बोलून घेतलं आणि त्याला दुसऱ्या दिवशी भेटायला सांगितलं.
दिनेश थोडा दडपणातच पण तातडीने दुसऱ्या दिवशी मला भेटला. मी फार काही न बोलता काढलेले फोटो त्याला दाखवले. तो हडबडलाच. काय बोलायचं हेच त्याला कळेना.
त्याला सांगितलं, तू आता शांतच राहा. मी बघतो काय ते. आपण अजून दोन-तीन शनिवारी ती काय करते त्यावर पाळत ठेवू. तू मात्र तुला काही कळलंय असं दाखवू नकोस. नेहमीसारखाच नॉर्मल राहा.
येणाऱ्या शनिवारी पुन्हा आम्ही तिच्या ऑफिसमध्ये पाळत ठेवली. तिने घरी सांगितले होते की, शनिवारी ऑफिस पूर्ण दिवस असते. पण ऑफिस अर्धा दिवसच होते. ती दुपारी बाहेर पडली आणि घरी न येता मागच्या शनिवारच्याच रेस्टॉरण्टजवळ आली. पण या वेळी तिला भेटायला आलेला मुलगा वेगळाच होता. माझ्यासाठीही तो धक्काच होता. ते दोघे त्याच गेस्ट हाऊसमध्ये गेले आणि दोन-तीन तासांनी ते बाहेर आले. नंतर नेहमीप्रमाणे रेल्वेने ती आपल्या घरी निघून गेली.
संध्याकाळी दिनेशचा फोन आला. मी त्याला घडलेली पूर्ण गोष्ट सांगितली. तो चांगलाच चिडला होता. पण काय करावं हे त्याला कळत नव्हतं. त्याचा राग प्रथम शांत केला. मी त्याला समजावलं. रागाच्या भरात काही तरी करू नकोस. आपण ह्यातून योग्य प्रकारे मार्ग काढू. तू काहीही बोलू नकोस. नॉर्मल आहेस असं दाखवायचा प्रयत्न कर.
नशिबाने दिनेशने ऐकलं आणि तो योग्य प्रकारे वागत होता. त्याने सांगितलं की, ती घरी गेल्यावर काहीच काम न करता झोपत असे. त्याला बहाणे सांगायची की, ऑफिसमध्ये पुष्कळ काम असतं. डोकं दुखतंय, असं सांगून न जेवता झोपत असे. अर्थात ती बाहेरून रेस्टॉरण्टमधून पोट भरून जेवून येत होती.
आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं होतं. पुढच्या शनिवारसाठी मी माझी पूर्ण टीम तयार केली. ज्या गेस्ट हाऊसमध्ये ती जात होती त्या ठिकाणच्या पोलिसांची भेट घेऊन त्यांची मदत मागितली.
तो शनिवार उजाडला. माझी अर्धी टीम गेस्ट हाऊसजवळ होती आणि मी तिच्या ऑफिसजवळ. ती नेहमीसारखी लवकर निघाली. रेस्टॉरण्टमध्ये पोटभर नाश्ता करून ती पहिल्या शनिवारी भेटलेल्या मुलाबरोबर गेस्ट हाऊसमध्ये गेली. मी लगेच माझ्या दिनेशला त्याच्या वडिलांबरोबर गेस्ट हाऊसजवळ बोलावले. ते आल्यावर स्थानिक पोलिसांना घेऊन आम्ही गेस्ट हाऊसवर गेलो. मात्र सोबत हॉटेलच्या नोकराला घेऊन गेलो. नोकराला दरवाजा ठोठावायला सांगितलं. आतील मुलाने दरवाजा उघडल्यावर महिला पोलीस आणि आम्ही माझ्या दिनेशबरोबर धडक आत गेलो.
ती नको त्या अवस्थेत होती. माझ्या सहकाऱ्यांनी ताबडतोब त्यांचे फोटो काढले. पोलिसांनी तिथेच रेड हॅण्डेड अवस्थेत पंचनामा केला होता. मग सारी वरात पोलीस स्टेशनला गेली. पुढे कोर्टात घटस्फोटाच्या केसमध्ये फारसं काम उरलंच नव्हतं. त्याच्या बायकोच्या चारित्र्याचे सर्व पुरावे तयार होते. माझ्या मित्राला लगेच घटस्फोट मिळाला आणि त्यांच्या भवितव्यातल्या भयसूचक आणि घातक वळणांना पूर्णविराम मिळाला.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive