ड्रीमलायनर एअर इंडियाच्या सेवेत दाखल
प्रशस्त, आरामदायी, अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे ड्रीमलायनर विमान एअर इंडियाच्या ताफ्यात शनिवारी दाखल झाले. येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे आगमन झाले. एअर इंडियाचे अध्यक्ष रोहित नंदन यांच्यासह नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी विमानाच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलेल्या एअर इंडियाला ड्रीमलायनरच्या आगमनामुळे मोठा हातभार लागणार आहे. बोइंग कंपनीकडे सहा वर्षांपूर्वी २७ ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर नोंदवण्यात आली होती. त्यातील पहिल्या विमानाचे शनिवारी आगमन झाले. बोइंग कंपनीच्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कारखान्यातून येथे येण्यासाठी विमानाला १५ तास लागले. कॅप्टन ए. एस. सोमण यांनी या विमानाचे सारथ्य केले. विमानाचे येथील धावपट्टीवर आगमन झाल्यानंतर पाण्याचे फवारे मारून त्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पूजा करून विमानाला हारपुष्प वाहण्यात आले. ड्रीमलायनरची आसनक्षमता २५६ इतकी असून त्यात १८ सीट्स बिझनेस वर्गाची असतील. तर उरलेली इकॉनॉमी वर्गाची असतील. यात उच्च प्रतीचे साहित्य वापरण्यात आले असून प्रवाशांसाठी फ्लॅट स्क्रीनचे एलसीडी लावण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment