Sunday, September 9, 2012

जळगाव : सिटी ऑफ गोल्ड - Jalgaon City of Gold

जळगाव : सिटी ऑफ गोल्ड
अविनाश पाटील

सुवर्ण खरेदी-विक्री तसेच दागिने उत्पादनासाठी देशभरात ज्या अग्रगण्य बाजारपेठांनी आपली ओळख निर्माण केली आहे, त्यात जळगावचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. केळीबागांप्रमाणे ‘सुवर्णनगरी’ म्हणून जळगाव देशभरात लखलखते आहे.
जळगावच्या राजकीय क्षेत्राने ज्या गुणांना सतत अव्हेरण्याचे काम केले आहे, तो दर्जा, ती शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटीचा व्यवहार, यांना आत्मसात करण्याचे काम जळगावच्या सुवर्णसृष्टीने केले. या वैशिष्टय़ांच्या जोरावरच सुवर्ण खरेदी-विक्री तसेच दागिने उत्पादनासाठी देशभरात ज्या अग्रगण्य बाजारपेठांनी आपली ओळख निर्माण केली आहे, त्यात जळगावचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. केळीबागांप्रमाणे ‘सुवर्णनगरी’ म्हणून जळगाव देशभरात लखलखते आहे.
भव्यदिव्य दागिन्यांची दुकाने प्रत्येक महानगरामध्ये दिसत असली तरी खास करून ‘जळगावचे दागिने’ म्हटले की ग्राहक बिनदिक्कत विश्वास ठेवतो. यामागे फायद्यापेक्षा सचोटीला अधिक महत्त्व देण्याचा जळगावच्या दुकानदारांचा गुणधर्म कारणीभूत आहे. ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जळगावच्या बडय़ा सुवर्णपेढय़ांनी विशेष व्यवस्थाच केली आहे. पूर्वी सोन्याचे दागिने विविध कलाकुसरीमध्ये तयार करून घेतले जात असत. आता ही पद्धत जवळपास बंदच झाली असून त्याऐवजी कलाकुसरीच्या विविध दागिन्यांचा पटच या सुवर्णपेढय़ांमध्ये उघडला जातो. एकाच ठिकाणी शंभरपेक्षा अधिक प्रमाणातील कलाकुसर पाहावयास मिळत असल्याने ग्राहकही संतुष्ट होतात.
शहरातील रथगल्ली ते सुभाष चौक हा मध्यवर्ती भागातील संपूर्ण परिसर सराफ बाजार म्हणून ओळखला जातो. या परिसरातील सराफ दुकानांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. शहरातील अनेक सुवर्णपेढय़ांचा लौकिक सर्वदूर पसरला असला तरी आर. एल. ज्वेलर्स, आर. सी. बाफना, महावीर ज्वेलर्स या जुन्या सुवर्णपेढय़ांचा जळगावला सुवर्णनगरी बनविण्यात महत्त्वपूर्ण वाटा आहे. परंपरागत दुकानांचे रूपांतर आता ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार शोरूममध्ये होत असून सध्या शहरात अशी पाच शोरूम्स आहेत. तर तितकेच विस्तारीकरणाच्या मार्गावर आहेत. जळगावचे नाव देशभरात ‘सुवर्णनगरी’ म्हणून प्रसिद्ध होण्यात रामचंद लखीचंद ज्वेलर्स म्हणजेच ‘आर. एल. ज्वेल्स’ या पेढीचा सर्वाधिक वाटा. शहरातील सर्वात जुनी सुवर्णपेढी म्हणून व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांचा असलेला विश्वास या पेढीने आजही टिकविला आहे. १५८ वर्षांपूर्वी सराफ बाजारात सुरू झालेली ही पेढी आता अत्याधुनिक ‘सुवर्णमॉल’मध्ये स्थलांतरित झाली आहे. या पेढीतून घेतलेले सोने देशात कुठेही सहजपणे विकले जात असल्याने त्याच्या शुद्धतेवर उमटलेली ही मोहोरच. दागिन्यांमधील हजारो प्रकारची विविधता हे या रथचौकातील चारमजली पेढीचे आणखी एक वैशिष्टय़. तळमजल्यावर अंगठी, मंगळसूत्र, सोनसाखळी, टॉप्स, पहिल्या मजल्यावर बांगडय़ा, हिरे, नवरत्न या प्रत्येकासाठी वेगवेगळे विभाग आहेत. विविध राज्यांतील सांस्कृतिक व सामाजिक परंपरा लक्षात घेऊन दागिन्यांची घडणावळ या पेढीने केली आहे. त्यासाठी त्या त्या प्रदेशातील कारागिरांच्या पिढय़ान्पिढय़ा सांभाळण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे कुशल कारागिरांची या पेढीला कधीच वानवा जाणवली नाही. बदलत्या फॅशननुसार दागिन्यांमध्ये बदल करण्याची कलाही या पेढीने चांगलीच अवगत केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर येणारी दागिन्यांची कोणतीही नवीन फॅशन आर. एल. ज्वेलर्समध्ये पाहावयास मिळते. ‘आर एल १८५४’ या ‘ब्रॅण्ड’ने या पेढीचे दागिने प्रसिद्ध आहेत. सध्या या पेढीचा कारभार राजमल लखीचंद यांची सातवी पिढी पाहात आहे. १८५४ पासून पूर्वजांनी जपलेल्या पेढीचा दर्जा ‘जैसे थे’ ठेवण्यात या पेढीचे अध्यक्ष खा. ईश्वरलाल जैन यांनी जी दक्षता घेतली, तेच धोरण त्यांचे पुत्र आ. मनीष जैन यांनी पुढे सुरू ठेवले आहे. सचोटीचे पारदर्शक व्यवहार, अलंकारातील शुद्धता व विविधता, भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र, जळगावसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, सुरत, भंडारा, अहमदनगर, जालना या शहरांमध्ये पसरलेल्या शाखा, ‘जैनटेस्टर’ या यंत्राद्वारे प्रमाणित नवरत्न व हिरे, या गोष्टी आर. एल. सुवर्णपेढीला चार चाँद लावतात.
जळगाव या सुवर्णनगरीची शान म्हणून ओळखली जाणारी आणखी एक पेढी म्हणजे रतनलाल सी. बाफना अर्थात ‘स्वर्णतीर्थ’. राजस्थानातील गोपाळगढ येथून जळगावमध्ये आलेल्या बाफना यांनी प्रारंभीचे काही दिवस राजमल लखीचंद यांच्याकडे काम केल्यानंतर १९ मार्च १९७४ रोजी स्वत:ची पेढी सुरू केली. अल्पावधीतच ही पेढी ‘पारस महल’मध्ये स्थानापन्न झाली. कामधेनू, शुभमंगल, पंचरत्न, शुभलक्ष्मी ही या पेढीतील प्रमुख दालने होय. या पेढीचा स्वत:चा दागिने निर्मितीचा कारखाना आहे. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘कॅरटोमीटर’ची सुविधा असल्याने ग्राहकांची विश्वासार्हता वाढण्यास मदत होते. दूरवरून येणाऱ्या ग्राहकांच्या निवासाची व्यवस्था नयनतारा गेस्ट हाऊसमध्ये केली जाते. बाफना यांच्या शोरूममध्ये येणाऱ्या कोणत्याही ग्राहकास चहा, पाणी, कॉफी, लस्सी दिली जाते. ग्राहकांना अशी सेवा देणाऱ्या पेढय़ा असल्यामुळेच एकदा येथील सुवर्णपेढय़ांमधून दागिने खरेदी करणारा ग्राहक पुढे त्यांच्याशी कायमचा जोडला जातो. त्यामुळेच केवळ एक ग्रॅमचे सोने खरेदीसाठी शंभर किलोमीटरहून प्रवास करीत जळगावला येणारे अनेक ग्राहक आहेत.
दागिने तयार करताना त्यात करण्यात येणाऱ्या इतर मिश्रणाचे प्रमाण जळगावमध्ये अत्यंत कमी प्रमाणात असते. त्यामुळेच ते शुद्ध सोने म्हणून ओळखले जातात, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. याशिवाय जळगावमध्ये कारागिरांच्या मजुरीचे प्रमाण अधिक आहे. उदाहरणार्थ एक ग्रॅमच्या दागिन्यासाठी इतर शहरांमध्ये १०० रुपये मजुरी घेतली जात असेल तर जळगावमध्ये ती ३०० रुपयांपर्यंत जाते. जळगावच्या सुवर्णपेढय़ांमध्ये तयार होणाऱ्या दागिन्यांचा दर्जा उच्च असण्याचे हेही एक कारण असल्याचे मानले जाते. सुवर्णनगरी ही जळगावची ओळख जपण्यासाठी शहरातील शैक्षणिक संस्थाही धडपडू लागल्या आहेत. ‘ज्वेलरी डिझाईन’चे विविध अभ्यासक्रम शिकण्यासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटय़ूशन ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चने ज्वेलरी डिझाईन अभ्यासक्रमासाठी ४० जागा ठेवल्या आहेत.
दररोज कोटय़वधींची उलाढाल होणाऱ्या येथील सराफ बाजारात दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या सणासुदीच्या दिवसात उलाढालीचा आकडा थेट दुपटीपेक्षा अधिक जातो. या दिवसांमध्ये येथील जुन्या सुवर्णपेढय़ांमध्ये ग्राहकांना अक्षरश: ‘मेरा नंबर कब आयेगा ?’ म्हणून वाट पाहावी लागते. या अशा वैविध्यपूर्ण कारणांमुळेच जळगाव ‘सिटी ऑफ गोल्ड’ म्हणून ओळखले जाते.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive