Sunday, September 9, 2012

स्टाइल स्टेटमेंट - Style statement

स्टाइल स्टेटमेंट
प्राची साटम

कालानुरूप दागिने आणि स्त्रिया या दोहोंमध्ये मूलभूत फरक होत राहिले. स्त्रियांसमवेत दागिन्यांच्या क्षेत्रातही वेळोवेळी क्रांती घडत गेली. किंबहुना अजूनही घडत आहे. या बदलाच्या प्रक्रियेमुळेच स्त्रियांसाठी दागिन्यांचे बहुविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. अशाच पर्यायांपैकी आजघडीला झपाटय़ाने विस्तारलेला एक पर्याय म्हणजे ‘इमिटेशन ज्वेलरी’ अर्थात नकली किंवा खोटे दागिने. गमतीची बाब म्हणजे, हे दागिने नकली असले तरी आज त्यांची चलती असली दागिन्यांपेक्षाही जास्त आहे.
काळ वेगाने पुढे सरकतोय. जग झपाटय़ाने बदलत चालले आहे आणि या बदलाचा वेग इतका की आजची नवीन गोष्ट लगेच उद्या जुनी म्हणून गणली जाते आहे. पण काळाच्या या ओघात काही गोष्टी अशाही आहेत ज्या अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. अशाच काही दुर्मीळ गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे बाईला असणारी दागिन्यांची, आभूषणांची आवड. अगदी अश्मयुगापासून ते आजच्या अल्ट्रामॉडर्न युगापर्यंत ही आवड टिकून आहे. मात्र कालानुरूप दागिने आणि स्त्रियांची आवड या दोहोंमध्ये फरक होत राहिले. स्त्रियांसमवेत दागिन्यांच्या क्षेत्रातही वेळोवेळी क्रांती घडत गेली. किंबहुना अजूनही घडत आहे. या बदलाच्या प्रक्रियेमुळेच स्त्रियांसाठी दागिन्यांचे बहुविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. अशाच पर्यायांपैकी आजघडीला झपाटय़ाने विस्तारलेला एक पर्याय म्हणजे ‘इमिटेशन ज्वेलरी’ अर्थात नकली किंवा खोटे दागिने. गमतीची बाब म्हणजे, हे दागिने नकली असले तरी आज त्यांची चलती असली दागिन्यांपेक्षाही जास्त आहे.
इमिटेशन ज्वेलरी वापरण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच जम बसवत आहे. मुळात इमिटेशन ज्वेलरी हा काही नव्याने उदयास आलेला प्रकार नव्हे. जवळपास ३००-३५० वर्षांपूर्वीपासून अशा प्रकारचे दागिने वापरले जात आहेत आणि आता तर दिवसेंदिवस त्यांचे महत्त्व वाढतच चालले आहे. महाविद्यालयीन तरुणींपासून वर्किंग वूमन आणि अगदी गृहिणींपर्यत सर्वचजणी या अलंकारांचा सर्रास वापर करताना दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे खडे तसेच इतर शोभेच्या गोष्टी इमिटेशन ज्वेलरीला आकर्षक बनवतात. हे दागिने मोठय़ा प्रमाणात वापरण्याची कारणे तशी बरीच आहेत. एकतर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीत हे दागिने मिळतात. याहूनही जास्त महत्त्वाचे कारण म्हणजे, इमिटेशन ज्वेलरीमध्ये असणारे वैविध्य. या प्रकारच्या दागिन्यांमध्ये निवडण्यासाठी बरेच 'पर्याय असतात. याउलट, सोन्याच्या दागिन्यांमध्ये तितकीशी निवड मिळत नाही. आजच्या स्त्रिया या घराच्या चार भिंतीत अडकून राहणाऱ्या नाहीत, मग भले ती गृहिणी का असेना. त्यामुळे बाहेर पडताना आपण एक छान लूक कॅरी करावा अशी प्रत्येकीचीच मनीषा असते. स्त्रियांच्या या इच्छेचे समाधान करण्यामध्ये इमिटेशन ज्वेलरी मोलाची भूमिका बजावते. आज कपाटातल्या प्रत्येक साडीला, प्रत्येक ड्रेसला मॅचिंग, सूट होईल अशी ज्वेलरी बाळगणे इमिटेशन या प्रकारामुळेच शक्य झाले आहे. सोन्याचे वाढते भाव तर इमिटेशन ज्वेलरीच्या पथ्यावरच पडले आहेत. सोने हाताबाहेर जायला लागल्याचे लक्षात येताच लोकांनी आता इमिटेशन ज्वेलरीला आपलेसे करायला सुरुवात केली आहे. याचा वापर वाढण्याचे सामाजिक कारण म्हणायला गेले तर ते म्हणजे आजूबाजूला दिवसेंदिवस वाढणारी असुरक्षितता. बऱ्याचदा चाळिशी-पन्नाशीच्या स्त्रिया हे कारण मनाशी ठेवून इमिटेशन ज्वेलरी स्वत:कडे बाळगून असतात. त्यामुळे समारंभाला जाताना छान मॅचिंगही घालता येते आणि या दागिन्यांमागे असणारा धोकाही सोन्याच्या तुलनेत केव्हाही कमीच असतो. पण खऱ्या अर्थाने जर कोणी इमिटेशन ज्वेलरीला प्रसिद्धीच्या झोतात आणले असेल तर ते म्हणजे आपल्या चित्रपटांनी आणि दूरचित्रवाणीने. असं म्हणतात की प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा असतात. निदान इमिटेशन ज्वेलरीच्या बाबतीत तरी हे वाक्य तंतोतंत खरे आहे. इमिटेशन ज्वेलरीमधील वेगवेगळ्या ट्रेंड्सची, प्रकारांची ओळख लोकांना या चंदेरी दुनियेमार्फतच होत असते. किंबहुना, बऱ्याचदा हेच चित्रपट आणि मालिका या क्षेत्रातील 'ट्रेंडसेटर' ठरतात. जोधा-अकबर, देवदाससारखे ऐतिहासिक चित्रपट ही याचीच उदाहरणे.
इमिटेशन ज्वेलरी किंवा फॅशन ज्वेलरी हे आजघडीला झपाटय़ाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. भारतातही या क्षेत्राला बऱ्यापैकी मागणी आहे. भारतात राजकोट, इंदोर, मुंबई, दिल्ली इत्यादी शहरांमध्ये हा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर केला जातो. सध्या मुंबई हे भारतातील इमिटेशन ज्वेलरी व्यवसायाचे प्रमुख आणि महत्त्वाचे केंद्र बनले आहे. मुंबईतून बराचसा माल हा भारतातील इतर शहरांमध्ये आणि भारताबाहेरही निर्यात केला जातो. इमिटेशन ज्वेलरीमधील जवळपास प्रत्येक प्रकार आपल्याला मुंबईच्या बाजारात पाहायला मिळेल. १० रुपयांपासून ते अगदी ५० हजारांपर्यंतची दागिन्यांची रेलचेल येथे दिसून येते. स्टोन्स, बीड्स, मोती, लाख, प्लास्टिक, तांबे, ब्राँझसारख्या धातूंपासून हे दागिने बनविले जातात. तरुणींमध्ये सध्या ऑक्सिडाइज्ड मेटल आणि मोठय़ा स्टोन्सच्या डिझाइन्सची चलती आहे. अशा प्रकारचे नेकलेस आणि कानातले एक मस्त एथनिक लूक देतात जेणेकरून ही ज्वेलरी रोजच्या आयुष्यातही वापरू शकतो. थोडासा स्टायलिश, ट्रेंडी लूक ही ज्वेलरी मिळवून देते. अगदी १० ते २०० रुपयांपर्यंत अशा प्रकारचे कानातले आणि माळा मुंबईत सहज उपलब्ध होतील. तसंच क्रिस्टल, स्टोन्स यांपासून बनविलेले दागिनेसुद्धा स्त्रियांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. वापरायला हलके आणि नानाविध डिझाइन्समध्ये उपलब्ध असल्याने त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. समारंभासाठी फक्त सोन्याचे आणि हिऱ्याचेच दागिने घालण्याचे दिवस आता गेले. त्यांची जागा घेऊ शकतील असे एकापेक्षा एक तोतया दागिने बाजारात उपलब्ध आहेत आणि तेही अगदी कमी दरात. पोलकी, पटवा, कुंदन यांसारख्या भारतीय प्रकारांनासुद्धा इमिटेशन ज्वेलरीमध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे. इमिटेशन ज्वेलरी ही केवळ मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे हा गैरसमज आता दूर झाला आहे. कारण उच्चवर्गीय, श्रीमंत लोकही या ज्वेलरीचा सर्रास वापर करताना दिसतात. त्यामुळे मोठमोठे सोनारही दुकानात इमिटेशन ज्वेलरी ठेवतात. यामध्ये सध्या ट्रेंड सुरू आहे तो सी.झेड.(क्युबिक झिरकोनिया)स्टोन्सचा. अल्पदर, टिकाऊपणा आणि अगदी हुबेहूब हिऱ्यासारख्या दिसण्याच्या त्याच्या या गुणधर्मामुळे तो लोकप्रिय होत आहे. खऱ्या हिऱ्याच्या दागिन्यांपेक्षा कितीतरी पटीने कमी दरात त्याचे दागिने मिळतात.
तसं बघायला गेलं तर या फॅशन ज्वेलरीचे आंतरराष्ट्रीय मार्केट तब्बल १६.३ बिलियन यू.एस. डॉलर इतके आहे, पण भारताचा यातील वाटा जवळपास १ टक्क्याहूनही कमी आहे. मुंबईत खरेतर या व्यवसायातील एखादा मोठा कारखाना वगैरे काही नाही. मुंबईत धारावी, मालाड, कांदिवली परिसरातील निम्न आर्थिक स्तरातील लोक हा व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी हा कुटिरोद्योग किंवा लघुद्योग स्वरूपातील रोजगार असतो. त्यांनी तयार केलेला माल मग व्यापारी, विक्रेता, सोनार मोठय़ा प्रमाणावर खरेदी करतात आणि तिथून हा माल सर्वत्र पोहोचवला जातो. अनेक व्यापारी तर भारताबाहेर अमेरिका, आखाती देश, कॅनडा, युरोप येथेही माल पाठवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताबाहेर या दागिन्यांना मोठी मागणी आहे. यात दागिने बनविणाऱ्या कारागीरांना मात्र फार कमी मोबदला मिळतो आणि जवळपास ५० टक्क्यांपर्यंतचा नफा हा विक्रेता अथवा व्यापाऱ्याला मिळतो. मोठमोठे सोनार मात्र ज्वेलरी डिझायनर्सना नोकरीवर ठेवतात आणि त्यांच्याकडून विशिष्ट प्रकारच्या ज्वेलरी डिझाइन करून घेतल्या जातात. मुंबईतली दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेली भुलेश्वर आणि झवेरी बाजार ही ठिकाणं इमिटेशन ज्वेलरीसाठीसुद्धा ओळखली जातात. त्याशिवाय घाटकोपर, ठाणे, मालाड ते बोरिवली पट्टा इमिटेशन ज्वेलरीसाठी प्रसिद्ध आहे.
या इमिटेशन ज्वेलरीची एक वेगळी बाजू बघायची झाली तर ती म्हणजे अशा प्रकारची ज्वेलरी शिकण्याचे वाढलेले फॅड. ‘आमची सून घरच्या घरी इमिटेशन ज्वेलरी बनवते हो..’ असं सासूने सांगितल्यावर समोरच्याच्याही भुवया कौतुकाने वर उंचावतात आणि सुनेला आपण बनवलेल्या दागिन्यांसाठी एक गिऱ्हाईकही मिळून जाते. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या बायकांना बऱ्याचदा अशा घरच्याघरी इमिटेशन ज्वेलरी बनवून त्या विकणाऱ्या स्त्रियांचा अनुभव आलाच असेल. इमिटेशन ज्वेलरी शिकविण्याचे बरेच वर्गही सध्या अस्तित्वात आहेत. अशा प्रकारे घरच्याघरी हे दागिने बनविणाऱ्या व्यक्तीकडे हल्ली कमीपणाचे लक्षण म्हणून न बघता त्या व्यक्तीच्या अ‍ॅस्थेटिक सेन्सचे (सौंदर्य दृष्टीचे) कौतुकच मध्यम तसेच उच्चवर्गीय घरांमध्ये होताना दिसते.
थोडक्यात काय, तर इमिटेशन ज्वेलरी हे सध्या भारतात आपले हातपाय पसरवू पाहणारे एक क्षेत्र आहे. भविष्यातील एक ताकदीचे क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे पाहण्यास हरकत नाही. काहींच्या मते, इमिटेशन ज्वेलरी म्हणजे ‘दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे.’ पण सध्याची परिस्थिती बघता ‘दुधापेक्षा ताकानेच तहान पटकन शमवली जातेय’ असे म्हणायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive