किल्ले रामगड आणि सदानंदगड
किल्ले रामगड आणि सदानंदगड
सिंधुदुर्ग हा कोकणामधील दक्षिणेकडील जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मुंबई-पणजी हा महामार्ग गोवेकडे जातो. या महामार्गाच्या पश्चिम अंगाला लहान लहान म्हणजे कमी उंचीच्या टेकडय़ा समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत. या लहान टेकडय़ामधे काही किल्ले विसावलेले आहेत. यातच रामगडचा लहान पण सुबक असा किल्ला आहे.
कणकवली हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई -पणजी महामार्गावर आहे. कणकवली पासून रामगडला जाणे सोयीचे आहे. रामगडला कणकवली तसेच कसालकडूनही जाता येते. एस.टी. बसेसची सोय आहे. रामगडच्या पायथ्याला वेले नावाचे गाव आहे. कणकवली ते बांदीवडे या गाडीरस्त्यावर बेले गाव आहे या वेले गावाजवळून गड नावाची नदी वहाते. या गड नदीच्या काठावर असलेल्या लहानशा टेकडीवर गर्द झाडीने घेरलेला रामगड किल्ला आहे.
समुद्रसपाटीपासून अवघा ५० मीटर उंचीचा हा किल्ला आहे. गावामधून दहा ते पंधरा मिनिटांमधे आपण रामगडावर पोहोचू शकतो. गावाला लागूनच जाणारी वाट आहे. या वाटेवर एक पाण्याची टाकी आहे. त्याच्या जवळून थोडे चढल्यावर गडाचा प्रवेशमार्ग आहे. हा प्रवेशमार्ग बुरुजांमधे लपलेला आहे. गोमुखी पद्धतीने बांधलेला हा प्रवेशमार्ग म्हणजे शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ आहे. शत्रु प्रवेशद्वाराला येवून भिडला तरी बाहेर आलेल्या बुरुजांवरुन त्याच्यावर मारा करता यावा अशी याची योजना असते.
उत्तम अवस्थेमधील प्रवेशद्वारातून आत आल्यावर पहारेकर्यांच्या देवडय़ा आपल्या दिसतात. पुर्वी पहार्यावर असणारे पहारेकरी येणार्या नवीन माणसाची ओळख पटवून आणि झाडाझडती घेतल्याशिवाय येथून पुढे सोडत नसत.
आता पहारेकरीही राहीले नाहीत आणि पहाण्याची गरज ही राहीली नसल्यामुळे रामगड पुर्णपणे बेसाऊ पडलेला पडलेला आहे. गडाचा या दरवाजाच्या माथ्यावर जाता येते. त्यासाठी पायर्यांचा मार्ग केलेला आहे. या दरवाजापासून काही अंतरावर दुसरा दरवाजा केलेला आहे. एकंदरीत एकाच तटबंदीत एवढय़ाजवळ असे दोन दरवाजे इतरत्र पहायला मिळत नाहीत.
रामगडाची तटबंदी काही ठिकाणी १५ ते २० फूट उंचीची आहे. काही ठिकाणी तिची पडझड झालेली दिसते. देखभाली अभावी तिची दुरावस्था झाल्याचे दिसते. या तटबंदीमधे जवळजवळ पंधरा बुरुजांची गुंफण केलेली आहे. या बुरुजांमुळे गडाची सरंक्षणसिद्धता वाढवलेली दिसून येते. पुर्वी या बुरुजांवर तोफा होत्या. गडावर तोफांचे गोळे आणि २१ तोफां असल्याची नोंद आहे. सध्या सात तोफा किल्ल्यात आहेत. या तोफा कोणी नेऊ नये म्हण्नू एका घराच्या जोत्यावर उभ्या करुन अर्धवट जमिनीमधे गाडून ठेवल्या आहेत. तोफा इकडे तिकडे हलवू नये म्हणून केलेली ही नामी शक्कल पाहून करणार्याचे कौतुकच वाटते.
रामगडाच्या एका बाजुने गडनदी वहाते. नदीच्या बाजुच्या तटबंदीमधे एक लहान दरवाजा केलेला आहे. या दरवाजाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पुर्वी याचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असणार कारण गडावर पाण्याची कसलीच सोय केलेली आढळत नाही. गडावरील पाण्याची गरज ही नदीतून वाहणार्या पाण्यावरच भागवली जात असावी असे दिसते.
रामगडाचा आवाका लहानच आहे. गडावरील घरांची जोती. वाडय़ाचे अवशेष, तटबंदी, बुरुज तसेच गणेश्मुर्ती तोफां इत्यादी पहाण्यासाठी तास दीड तासांचा अवधी पुरेसा आहे.
शिवकालीन बांधकामाची वैशिष्ठ जपणारा रामगड मात्र इतिहासाबद्दल मौन बाळगून आहे. रामगडाचा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकुन घेतल्याची नोंद आहे. इंग्रजांच्या सेनेचा कॅप्टन पिअससन हा रामगड जिंकण्यासाठी आला. त्याने ६ एप्रिल १८१८ मध्ये रामगड जिंकून घेतला.
रामगडाची ही छोटीशी पण आनंदाची भ्रमंती आटोपून आपण जवळच्या सदानंदगडाकडे निघतो. हो सदानंदगड नावाचा किल्ला रामगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावर आहे. १९८६ साला पर्यंत सदानंदगडाची माहिती कोणालाही नव्हती. आजही या दुर्लक्षीत किल्ल्याची माहिती अनेकांना नाही.
सदानंदगडाच्या परिसरातील गावांमधेसुद्धा किल्ला म्हणून तो डोंगर प्रसिद्ध नाही. रामगड मधून एक रस्ता शिरगावकडे जातो. या मार्गावर गोठणे, सांडवे, कुवळे अशी गावे लागतात या मार्गावर एस.टी. बसेस मर्यादीतच आहेत. स्वत:चे वाहन सोयीचे पडते.
कुवळेगावाच्या पुढे सदानंदगडाचा डोंगर आहे. पुर्णपणे झाडीने झाकल्यामुळे त्याचे गडपणही हरवून गेले आहे. सदानंदगडाच्या मार्गावर कातळात कोरलेल्या काही पायर्या आढळतात. गडाच्या प्रवेशद्वाराचे तुरळक अवशेष दिसतात. तटबंदी व इतर वास्तू कालौघात नष्ट झाल्याचे आढळते. सदानंदगडावर पाण्याच्या दोन विहीरी मात्र आहेत. त्यात दगडमाती पडल्याने त्याही बुजत चालल्या आहेत.
सदानंदगडावरुन साळशीकडे उतरता येते. या मार्गावर काही पायर्यांही केलेल्या आढळतात. सदानंदगडासारख्या उपेक्षीत किल्ल्याची भ्रमंती येथील निसर्गरम्य परिसरामुळे आपल्याला वेगळाच आनंद देवून जातो.
=======================================================================================
किल्ले रतनगड
सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे.
रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात.
भंडारदर्याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो.
भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसे विकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे.
मुंबई - आग्रा हा महामार्ग इगतपुरी कडून नाशिककडे जातो. या महामार्गावर इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर छोटी गाव आहे. छोटी ओलांडून पुढे गेल्यावर एक लहानशा खिंडीच्यापुढे उजवीकडे संगमनेरकडे गाडी वाट जाते. हीच वाट आपल्याला शेंडी गावात घेऊन जाते. या रस्त्यावर कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे वारी गाव लागते. बारीच्या पुढे बाकी गावापासून शेंडीला जाता येते. इगतपूरी ते शेंडी साधारण ३५ कि.मी अंतर आहे.
पुणे-नाशिक या राज्यमार्गावर संगमनेर हे तालुक्याचे गाव आहे. संगमनेरमधून अकोले-राजूर-शेंडी असाही गाडीरस्ता आहे. शेंडी पासून रतनगडाकडे जाता येते. भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फुगवटय़ाच्या कडेने गाडीरस्ता जातो. या मार्गाने फुगवटय़ाला पुर्ण वळसा मारता येतो. स्वत:चे वाहन असल्यास सोयीचे होऊ शकते. अथवा एस.टी.बसनेही पायथा गाठता येईल. मात्र अशा परिस्थितमध्ये किमान आठ ते दहा तास एवढा वेळ हाताशी असणे आवश्यक आहे.
भंडारदर्याच्या खोर्यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघरला शेंडीपासून एस.टी.ची सोय आहे. घाटघर साधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रद्रचा फाटा आहे. फाटय़ापासून चालत साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद गावातून रतनगडाकडे जाणारी पायवाट आहे. साम्रद गावामधून वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे. साम्रदमधून पाणी भरुन घ्यायला पाहीजे. पाणी व खाण्याचे पदार्थ तसेच वाटाडय़ाला घेवून रतनगडाकडे निघावे लागते.
साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्या लागतात. या कातळकोरीव पायर्यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत.
या अनामिक कारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देतच आपण गडफेरीला सुरवात करतो. संपूर्णगड फेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पावसाळ्यानंतर प्रचंड गवत वाढलेले असते. बर्याचदा ते डोक्यापेक्षाही उंच असते. त्यामुळे डिसेंबर नंतर गेल्यास या गवताचा फारसा त्रास होत नाही. रतनगडाच्या उत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. या नेढय़ातून भन्नाट वाहणार्या वार्याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. येथे खालच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे.
गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.
इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे.
याच्या थोडे पुढे प्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. ही जागा मुक्कामास योग्य आहे. येथून समोर भंडारदरा धरणाचा जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचे पठार उत्तम दिसते.
गडावर मुक्कामाचा बेत आणि नियोजन नसल्यास परतीचा प्रवास दुपारी ३ वाजे पुर्वी सुरु करावा म्हणजे अंधाराच्या आत खाली पोहोचता येते.
गणेश दरवाजातून शिडीच्या वाटेने खाली उतरावे लागते. या शिडय़ा अतिशय अवघड जागी बसवलेल्या आहेत. अतिशय धाडसाने व सावधानतेनेच हे दिव्य पार करावे लागते. कमकुवत मनाच्या लोकांना हे अवघड ठरु शकते. शिडय़ाउतरुन खालच्या पायवाटेने जंगलातून आपण दीड ते दोन तासामधे रतनवाडी मधे पोहोचतो.
रतनवाडीमधे एक अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. १० व्या ११ व्या शतकामधे झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर.
अमृतेश्वर मंदिराच्या नुसत्या दर्शनानेही आपला दिवसभराचा थकवा दूर होतो. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे आहेत ही रचना वैशिष्ठ पुर्ण आहे.
येथून साम्रद साधारण ७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी. आहे. दुसर्या रतनवाडीस येवून तेथून पुढे लाँच चालू असल्यास लाँच ने मुरशेत अथवा शेंडीला येवून आपली भ्रमंतीची सांगता करता येवू शकते.
=======================================================================================
किल्ले चंद्रगड
सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरही परिचित आहे. काही वर्षापूर्वी उन्हाळ्यात महाबळेश्वर येथे येणारे पर्यटक सध्या वर्षभर येथील निसर्गाच्या सानिध्यात येवू लागले आहेत.
महाबळेश्वरमधील निसर्ग, जंगल तसेच डोंगरदर्या या पर्यटकांना नेहेमीची भुरळ घालीत असतात. या भटकंती दरम्यान क्षेत्र महाबळेश्वर आणि ऑर्थर सीट या स्थळांना पर्यटक आवर्जुन भेट देतात.
महाबळेश्वर सातारा, पुणे तसेच मुंबईशी गाडी मार्गाने चांगलेच जोडले गेले आहे. एस.टी.बसेसचीही सेवा नियमित आहे. महाबळेश्वर एस.टी. स्थानकापासून ऑर्थर सीट साधारण ११ कि.मी. अंतरावर आहे. ऑर्थर सीट कडे जाणार्या गाडी रस्त्यावर दुतर्फा असणार्या घनदाट जंगलामुळे हा प्रवास नेहेमीच आनंददायी असतो. याच वाटेवर क्षेत्र महाबळेश्वर ही आहे.
महाबळेश्वर ते ऑर्थर सीट हा प्रवास खाजगी वाहनाने स्थानिक टॅक्सीने अथवा पायी सददा करता येतो. ऑर्थर सीट चा भाग पुर्वी मढीमहल या नावाने परिचित होता. ऑर्थर सीट च्या टोकावर उभे राहील्यास सह्याद्रीचे रौद्रभिषण कातळकडे नेत्रांना सुखावित असले तरी उरात धडकी भरवतात.
ऑर्थर सीट च्या टोकावरुन विस्तृत प्रदेश न्याहाळायला मिळतो. प्रतापगड, रायगड, तोरणा हे किल्लेही येथून दिसतात. याच बरोबर खालच्या दरीत दबा धरुन बसलेला चंद्रगड उ र्फ ढवळगडाचा किल्लाही आपले लक्षवेधून घेतो. ढवळीनदीच्या खोर्यात हा चंद्रगड पुर्वी जावळीच्या मोर्यांच्या अखत्यारीत होता.
जावळीच्या मोर्यांना चंद्रराव हा किताब होता. हा चंद्रराव वारल्यावर या गादीसाठी मोर्यांमधे तंटा उभा राहीला. शिवाजीराजांनी मध्यस्ती करुन तो मिटवला आणि येथील यशवंतराव मोरे हा चंद्रराव झाला. शिवाजीराजांनी केलेली मदत विसरुन या चंद्ररावाने त्यांच्याच विरुद्ध जावून आदिलशाहीशी सलोखा वाढवला. महाराजांच्या लोकांनाच त्रास देवू लागला. शिवाजीराजांनी चंद्ररावाला सामोपचाराने समजावून सांगितले पण मोरे शत्रुत्वानेच वागू लागले. महाराजांच्या राज्यात गुन्हे करुन शिक्षेच्या भितीने काही गुन्हेगार पळून या मोर्यांच्या आश्रयाला गेले त्यांना उघडपणे मोर्यांनी पाठीशी घातले. हे गुन्हेगार महाराजांच्या ताब्यात न देता उलटच निरोप महाराजांना पाठविला. उद्या येणार असाल तर आजच या. जावळीस येणार असाल तर दारु गोळा मौजूद आहे.
जावळी प्रांत वाईच्या सुभ्यात मोडत होता. वाईची सुभेदारी अफझलखानाकडे होती. त्यामुळे जावळीवर हल्ला केला तर अफझलखान नक्की येणार हे महाराजांना माहीत होते. त्यामुळे महाराज संधीची वाट पहात होते. इ.स.१६५५ -५६ मधे अफझलखान दक्षिण भारतात युद्धात गुंतलेला होता ती वेळ साधून महाराजांनी जावळीवर हल्ला चढवला. मोर्यांना नेस्तनाबूत केले आणि जावळी स्वराज्यात दाखल झाली. त्या बरोबर ढवळगड ही स्वराज्यात दाखल झाला. त्याचे नाव बदलून महाराजांनी चंद्रगड ठेवले.
ऑर्थर सीट जवळून एक पायवाट खाली चंद्रगडाकडे जाते. ही वाट ढवळ्याघाट या नावाने ओळखली जाते. जंगल घसारा, ओढेनाले यामधून जाणारी ही धाटवाट अनेकांना गुंगारा देते. त्यामुळे गरजेची साधन सामुग्री म्हणजे अन्न, पाणी आणि सोबत माहीतगार वाटाडय़ा घेवूनच या मार्गावर चालू लागावे. चंद्रगडापर्यंत पोहचण्यात साडेतीन ते चार तास लागतात. वाटेत बिबटय़ा तसेच वन्यप्राण्यांचेही दर्शन होवू शकते हे लक्षात ठेवावे. नवख्यानी मात्र हा मार्ग चोखाळू नये.
चंद्रगडाचे दर्शन जरी महाबळेश्वरच्या ऑर्थरसीट कडून होत असले तरी चंद्रगड हा रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यामधे आहे.
मुंबई-पणजी महामार्गावर पोलादपूर गाव आहे. येथून चंद्रगडाच्या पायथ्याच्या ढवळे गावात जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. ठरावीक वेळेवर एस.टी.बसेसचीही सोय आहे. या गाडीमार्गावर ढवळे गावाच्या अलिकडे सहा कि.मी. वर उमरठ या गावी नरवीर तानाजी मालूसरे आणि शेलार मामा यांची स्मारके आहेत. ती पाहून पुढे जाता येईल.
उमरठ अथवा ढवळे येथे मुक्कामी राहून सकाळी चंद्रगडाला गेल्यास सोयीचे ठरते. ढवळे गावातून सोबतीला वाटाडय़ा अवश्य घ्यावा. पाणी व खाद्यपदार्थ घेवून सकाळी लवकर निघावे. ढवळेगावापुढे पाच मिनिटांच्या चालीवर लहानशी वस्ती आहे. येथून वाट जंगलात घुसते. तासाभराच्या वाटचालीत आपण खिंडीत पोहोचतो या खिंडीला म्हसोबाची खिंड म्हणतात. येथून पुढे चंद्रगडाची वाट काहीशी अवघड होते. लहान कातळ कडे तसेच खेबणीच्या आधाराने माथा गाठता येतो.
गडाचा माथा लहानसा आहे. घराचे चौथरे आणि पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. येथे आकाशाखाली उघडय़ावर शंकराची पिंड आहे. त्याला ढवळेश्वर महादेव महादेव म्हणतात. उंचवटय़ावर वाडय़ाचे भग्नावशेष दिसतात. उत्तर अंगाला पाण्याची टाकी आहेत.
चंद्रगडावरुन रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारे समोर दिसतात. याचे उत्तुंग कातळ कडे पहाण्याची मैज काही न्यारीच आहे. चंद्रगडावरुन ढवळ्याघाटाची वाट दिसते. घाटाच्या माथ्यावरची खिंड आणि त्याच्या वर महाबळेश्वरचे ऑर्थर सीट नुसते पाहूनच थरार वाटतो. निसर्गाची लयलूट आणि सह्यद्री रौद्रभिषण दर्शनाने चंद्रगडाची सफर सार्थर झाल्याचे समाधान मिळते.
हे समाधान मनात घेवूनच आपण चंद्रगडाला निरोप देवून खाली उतरु लागतो. परतीच्या प्रवासात ऑर्थर सीटला जाण्याचे ठरविल्यास किमान सहा तासांचा पुरेसा अवधी असणे आवश्यक आहे.
=======================================================================================
किल्ले मंगळगड
रायगड जिल्ह्यामधील काही किल्ले हे सर्वसामान्य आणि डोंगर भटक्यांना चिरपरिचित आहेत तर काहींची ओळखही अनेकांना नाही. अशाच किल्ल्यापैकी असलेला किल्ला म्हणजे कांगोरीगड. कांगोरीगडाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी मंगळगड असे केले.
शिवकालीन इतिहासामधे जावळीचा उल्लेख येतो. जावळीचे चंद्रराव मोरे इतिहास प्रसिद्ध झाले आहेत. जावळी गाव हे महाबळेश्वर च्या पश्चिम पायथ्याला आहे. घनदाट जंगलाने व्यापलेली होती. उत्तुंग डोंगर आणि पाताळवेरी दर्याखोरी असलेला हा परिसर निसिड जंगलामुळे अधिकच दुर्गम झालेला आहे. त्यामधील अनगड घाटवाटा आणि फसव्या पायवाटांमुळे कोणीही जावळीच्या वाटेला जात नसे. त्यामुळे चंद्रराव मोरे हे अदिलशहाच्या कृपाछत्राखाली जावळीच्या सहाय्याने स्वत:ला अनभिषीक्त राजे म्हणवून घेत असत.
शिवाजी महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण मोरे दाद लागू देत नव्हते. महाराजांनी सामेपचाराने मोर्यांना समजावले पण मोर्यांनी स्वराज्यात दाखल होण्याऐवजी महाराजांनाच खरमरीत पत्र लिहले तुम्ही काल राजे जाहला, तुम्हास राज्य कोणी दिधले ? आपल्या घरी आपणच फुकटचे राजे म्हणवून घेतले तर कोण मानील ? जावळीला याल तर तुमचा एक माणूसही परत जाणार नाही. तुमच्यात पुरुषर्थ असेल तर उद्या येणार ते आजच यावे. पातशहाने आम्हास राजे किताब दिला आहे. मोरचेल आणि सिंहासनही आम्हास त्याने दिले आहेत. आमच्याशी कटकट कराल तर विचार करुन करा. येथे उपाय कराल तर अपाय होईल. यश न घेता अपयशाला पात्र होवून जाल या मोर्यांच्या पत्राने महाराजांच्या लक्षात आले की, चंद्रराव मोर्यास मारल्याविरहीत राज्य साधत नाही महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोर्यांचा खातमा करुन जावळी स्वराज्यात दाखल केली. रायगडापासून कोयने पर्यंतचा मुलुख स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले.
मंगळगडाला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुर्ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर आपण मंगळगडाला पोहोचू शकतो. या पायी मार्गावर आपल्याला दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो. भोर महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावर माझेरी गाव आहे. या माझेरीतूनही डोंगरदर्या, ओढे नाले ओलांडीत सहासात तासांच्या जंगलातील पायपिटी नंतर आपण मंगळगड गाठू शकतो. महाडकडून भोर कडे जाताना भिरवाडीच्या पायथ्याच्या पिंपळवाडी कडे जाणारा फाटा आहे. या गाडीरस्त्यानेही आपण पिंपळवाडीला तासाभरात पोहोचू शकतो. महाडहूनही एस.टी. बसेस ठरावीक वेळेत पिंपळवाडीसाठी आहेत.
पिंपळवाडीतून गडावर जाणारी वाट म्हणजे छातीवरचा चढच आहे. त्यामुळे सोबत पाणी घेवून चढणे आवश्यक आहे. चांगल्या चालीने दीड तासात आपण गडावर पोहोचतो. एका उध्वस्त झालेल्या दरवाजांच्या अवशेषामधून आपण शिरतो. गडाचा विस्तार बर्यापैकी मोठा आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर वाडय़ाचे अवशेष आहेत. उत्तर अंगाला पाण्याची कातळकोरीव टाकी आहेत. गडाला एक माची आहे. माची तटबंदीने बांधून काढलेली आहे. कातळमाथ्याच्या खाली दोन लहान सुळके आहेत. त्यांना स्थानिक लोक नवरानवरीचे सुळके म्हणतात.
माचीवर कांगोरी देवीचे मंदिर आहे. या उंचीवर येवून कांगोरीदेवीचे दर्शन घेणे अतिशय कष्टप्रद असल्याने भक्तांनी खाली दुधाणेवाडीत या मुर्तीचे प्रतिरुप स्थापन करुन आपली सोय करुन घेतली आहे. गडावर वर्षातून एका देवीचा उत्सवही साजरा करतात.
गडाच्या फेरीमधे तटबंदी, ध्वस्त दरवाजा, माची, शिवलिंगाची पिंड, देवीचे मंदिर, दिपमाळ, घरांची जोती इत्यादी पहायला मिळतात. गडावरुन मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, असे किल्ले दिसतात. तसेच रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारे ही आपल्याला पहायला मिळतात.
मंगळगडावरुन अस्वलखिंड मार्गे रायरेश्वरालाही जाता येते. मात्र सोबत अनुभवी वाटाडय़ा हवा. मंगळगडाची मंगलदायी डोंगर भ्रमंती करुन उतरताना दुधानेवाडीकडील सोप्या वाटेने उतरणे सोयीचे पडते.
=======================================================================================
किल्ले हर्षगड
नाशिक जिल्हा गिरीदुर्गासाठी अतिशय समृद्ध आहे. सिलबारी, डोलबारी, सातमाळा आणि त्रंबकरांग या जिल्ह्यात आहे. हर्षगड उर्फ हरिषगड अशा नावानी ओळखला जाणारा हा दुर्गम किल्ला त्रंबक रांगेत आहे. नाशिक पुर्वेला असलेल्या त्रंबकेश्वराच्या प्रसिद्ध मंदिरामुळे आणि गोदावरी या नदीच्या उगमस्थानामुळे हा परिसर धार्मिक दृष्टीनेही प्रसिद्ध पावलेला आहे.
पुर्वपश्चिम पसरलेली त्रंबकरांग भास्करगडापासून सुरु होवून हर्षगड, त्रंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी असे किल्ले आपल्या कवेत घेवून धावते.
भास्करगडाच्या पुर्वेला आणि त्रंबकगडाच्या पश्चिमेला हर्षगड आपला कातळमाथा उंचावून उभा आहे. हर्षगडाला जाण्यासाठी दोन चार मार्ग हे ट्रेकिंगच्या दृष्टीने उत्तम आहेत. पण किल्ला चढायचा असेल तर पायथ्याचे गाव गाठणेच सोयीचे आहे. हर्षगडाच्या दक्षिण पायथ्याला टाकेहर्ष म्हणून लहानसे गाव आहे. येथून तासाभरात आपण हर्षगडाचा पायथा गाठू शकतो. तसेच उत्तर बाजुला असलेल्या जांभुळपाडा या गावाकडूनही भास्करगडाच्या खिंडीत येवून भुंडी, फणी, असे डोंगर ओलांडून आपण हर्षगड गाठू शकतो. मात्र जांभुळपाडा गाठण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागतो हे लक्षात असू द्यावे.
हर्षगडाचा उभा असलेला कातळमाथा लक्षवेधी असला तरी त्याच्या चहुअंगाचे सरळसोट कडे मात्र आपल्याला धडकी भरवतात. गडावर चढण्यासाठी उत्तरबाजु कडून वाट आहे ही एकमेव वाट पायर्यांची आहे. उभ्या कातळात या पायर्या कोरुन काढलेल्या असल्याने दमछाक करणार्या आहेत. टाकेहर्षकडून तासादीडतासातआपण येथ पर्यंत पोहचू शकतो.
टाकेहर्ष हे गाव नाशिक ते खोडाळा या गाडीरस्त्यावर आहे. नाशिक कडून येताना अंजनेरीचा किल्ला ओलांडल्यावर डावीकडे इगतपुरीकडे जाणारा फाटा आहे. या फाटय़ावरुन पुढे निघाल्यावर इगतपुरीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे वळाल्यावर आपण खोडाळाच्या दिशेने जावू लागतो. या वाटेवर आखलीहर्ष, टाकेहर्ष अशी गावे लागतात. ठाण्याकडून येताना कसारा घाटाच्या सुरवातीलाच खोडाळा तसेच जव्हारकडे जाणारा गाडीमार्ग आहे. येथून खोडाळा कडूनही आपण टाकेहर्ष गाठू शकतो.
टाकेहर्ष कडून साधारण चारपाच तासांचा अवधी हाताशी ठेवून सोबत पाणी आणि खाण्याचे साहित्य घेवून हर्षगडाकडे प्रयाण करावे.
हर्षगडाच्या नावात जरी हर्ष असला तरी पायर्या चढताना मात्र तो हर्ष मावळतो. जसजश्या पायर्यांनी आपण वर चढतो तस तसा विस्तृत प्रदेश दिसासला लागतो. पायर्यांच्या माथ्यावर प्रवेशद्वार आहे. एवढे प्रवेशद्वार अडवले की हा किल्ला शत्रुला जिंकणे कठीणच आहे.
गडाचा माथा लहान व लांबोळका आहे. चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची आवश्यकता नव्हती. पाण्याची टाकी, घरांची जोती, दारु कोठार अशा गडपणाचा खुणा किल्ल्यावर पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरुन भास्कर, उतवड, भुंडी, फणी, वाघेरा, त्रंबकगड, अंजनेरी तसेच स्वच्छ वातावरण असल्यास सिद्धगड आणि माहूलीची रांगही दिसते.
या किल्ल्याचे नाव हर्षगड का पडले ? याची एक कथा या भागात प्रसिद्ध आहे. हर्षगड उर्फ हरिहरगड हा मराठय़ांच्या ताब्यात होता तेव्हाचीही कथा एकदा मोघलांच्या एका सरदाराने किल्ल्याला वेढा घातला. किल्ला दुर्गम असल्यामुळे तो मोघलांना जिंकता येईना. गडावर फक्त पन्नास-साठ लोकांचीच शिबंदी होती. ती शिबंदी बाहेरुन होणार्या मदतीच्या प्रतिक्षेत होती. तर मोगल सरदार किल्ल्याची रसद रोखण्यावर भर देत होता. किल्ल्याची कोंडी केली तर मराठय़ांना अन्नपाण्याचा तुटवडा जाणवेल आणि त्यांना गड सोडावा लागेल अशी योजना आखून गडाचा वेढा आवळला होता.
महिन्या दोन महिन्यात बाहेरुन मदत आली नाही. येण्याची काही आशाही दिसत नव्हती. रसदीशिवाय परिस्थिती बिकट होत आली होती. गडावर एक म्हातारी होती. तिने वेढा उठवण्यासाठी एक युक्ती केली. गडावरील शिबंदीची जेवण उरकल्यावर खरकाटय़ा पत्रवळ्या गोळा केल्या. त्याबरोबर शेकडो पत्रावळ्या मिसळून त्याही खरकाटय़ा केल्या. गडावर तोफांचे बार काढण्यात आले. नगारे कर्णे वाजवण्यात आले. गडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गडाखाली गोळा झालेले मोघल चकीत झाले. ते वर पाहू लागले. म्हातारीने कडय़ावरुन नेहमीप्रमाणे पत्रावळ्या खाली टाकण्यास सुरवात केली. मोघलांनी विचार केला की रोज पन्नाससाठ पत्रावळ्या खाली पडतात म्हणजे गडावर पन्नास एक लोक असावेत पण आज दोन अडीचशे पत्रावळ्या खाली पडल्या म्हणजे मराठय़ांना गडावर रसद आणि सैन्याची जादा कुमक मिळाली असावी म्हणूनच गडावर आनंदोत्सव साजरा होतोय. म्हणजे आता गड जिंकणे अवघडच की? मोघल सरदार वेढा उठवून चालता झाला. म्हातारीच्या युक्तीने वेढा उठल्याचा सर्वांना हर्ष झाला म्हणून गडाचे नाव हर्षगड असे झाले. म्हतारीच्या युक्तीची गंमत आपल्यालाही हर्षेउल्हासीत करते आणि त्याच आनंदात आपण परतीच्या मार्गावर चालू लागतो.
=======================================================================================
खारेपाटणचा किल्ला
खारेपाटण हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे. वाघोटन नदीच्या दक्षिणतीरावर खारेपाटण वसलेले आहे. इतिहासकाळात महत्त्वाचे स्थान मिळवलेले खारेपाटण हे पुर्वी देवगड तालुक्याचे मुख्यालय होते. इ.स. १८१८ ते इ.स. १८७५ पर्यंत मुख्य ठिकाण असलेल्या खारेपाटणाला एक किल्ला होता याची माहिती खुद्द खारेपाटणवासीयांनाही नाही याचे मात्र आश्चर्य वाटते.
खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे आहे. मुंबई-पणजी हा महामार्ग खारेपाटण जवळून जातो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा वाघोटन नदीच्या तीरावर येवून मिळतात. मुंबईकडून निघाल्यावर वाघोटन नदी ओलांडताच पहीले गाव खारेपाटण आहे. महामार्गाच्या पश्चिमेकडे वसलेल्या खारेपाटणास कोल्हापूर गगनबावडा मार्गही येता येते.
महामार्गापासून दोन कि.मी. अंतरावर नदीच्या तीरावर असलेल्या लहानशा टेकडीवर किल्ल्याचे अवशेष आज आढळून येतात. कालौघात दुर्लक्षीत झाल्यामुळे या किल्ल्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. साधारण १८५० च्या सुमारास किल्ल्याचे तट व बुरुज पाडून त्याची दगडी काढण्यात आली. ही घडवलेली दगडी वापरुन नदीच्या काठावर एक धक्का बांधण्यात आल्याची नोंद आहे. हा धक्का उतारु लोकांना तीरावर उतरण्यासाठी बांधला होता. सध्या तो ही निरुपयोगी ठरलेला आहे.
खारेपाटण ही चांगली बाजारपेठ आहे. बाजारपेठेतूनच किल्ल्याकडे रस्ता जातो. किल्ला म्हणून विचारल्यास अनेकांना तो माहित नाही. दुर्गामातेचे मंदिर म्हणून विचारल्यास लोक सांगू शकतात, हे मंदिर किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात आहे. किल्ल्याच्या खालच्या भागातील उतारावर सध्या शासकिय विश्रामधाम आहे. या विश्रामधामधून किल्ल्यावर जाता येते हाच मार्ग सोयीचा आहे. येथपर्यंत गाडीमार्गही आहे. स्वत:चे वाहन नसल्यास महामार्गापासून अर्ध्यातासात चालत इथपर्यंत पोहोचतो येते.
शासकीय विश्रामधामाच्या पायर्या चढायला लागल्यावर डावीकडे लगेच फाटा फुटतो. या फाटय़ालाही काही पायर्या आहेत. त्या चढून आपण एका घराच्या अंगणातून पुढे चढून गेल्यावर एक शाळा लागते. येथे गावातून येणारा रस्ता मिळतो. इथेच उजवीकडे बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसायला लागतात.
बालेकिल्ल्याच्या मार्गावर डावीकडे पाच एक फुट उंचीची तटबंदी शिल्लक राहिली आहे. या आयताक.ती माथ्याच्या चारही बाजुंना असलेल्या तटबंदीची अवस्था सध्या मातीच्या ढिगार्यात झालेली दिसते. तीन कोपर्यावरचे तीन बुरुज कसेबसे उभे आहेत. मध्यभागी मोठय़ा झाडाखाली दुर्गामातेचे नव्याने जिर्णाध्धारीत मंदिर बांधलेले आहे. शासकीय विश्रामगृहामधून पाण्याची सोय केल्यास येथे मुक्काम करता येवू शकतो.
मंदिराच्या बाजुच्या तटबंदीमधे दिंडी दरवाजा आहे. दरवाजा लहान असला तरी तो वळणदार मार्गावर बांधलेला आहे. या दरवाजातून बाहेरच्या खंदकात जाता येते. खंदक झाडी आणि गवताने पुर्ण भरलेला आहे. त्यामुळे या परिसरामधे जपूनच फिरावे लागते. खरेतर कोकणातील हे झाडीभरलेले किल्ले मार्च ते मे महिन्यात पाहिल्यास गवताचा फारसा त्रास जाणवत नाही. बालेकिल्ल्याच्या पश्चिम बाजूला मोठी घळ आहे. घळीच्या पलीकडे एका स्मारकाचा चौथरा पहायला मिळतो.
मुस्लीम आमदनीच्या काळात हा किल्ला बराच काळ त्यांच्या ताब्यात होता. पुढे १७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजी आंग्रे यांनी तो जिंकुन घेतला. इ.स.१७१३ मधे कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये झालेल्या सलोख्यात इतर १६ किल्ल्यांबरोबर खारेपाटणचा ताबाही आंग्रेकडे राहीला.
पुढे आंग्रे आणि पेशवे यांच्यात मोठा तंटा निर्माण झाला. पेशव्यानी इंग्रजांची मदत घेऊन आंग्य्रांचा मुलुख मारला. त्यात खारेपाटण पेशव्यांकडे आले. १८१८ मधे इंग्रजांनी खारेपाटणचा ताबा मिळवला. असा मोठा इतिहास असताना खारेपाटणचा किल्ला इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच दखल नाही घेतली तर किल्ला कालौघात नष्ट झाल्याशिवाय रहाणार नाही हे मात्र खरे.
खारेपाटणमधे कपिलेश्वर मंदिर आहे. नव्या बांधणीच्या या मंदिरात मात्र सूर्यनारायणाची सुबक मुर्ती आवर्जुन पहावी अशीच आहे.
=======================================================================================
किल्ले जयगड
रत्नागिरी जिल्ह्यातील दंतूर असलेला सागरकिनारा पर्यटकांना नेहमीच आर्षीत करीत असतो रत्नागिरी बरोबर पावस आणि गणपतीपुळे ही धार्मिक स्थळेही नेहेमीच भावीकांसाठी श्रद्धास्थाने ठरली आहेत. गणपतीपुळे च्या उत्तरेला जयगडाचा किल्ला हा उत्तम असूनही मोजकेच पर्यटक इकडे फिरकतात.
मुंबई-पणजी महामार्गावरील संगमेश्वर हे गाव ओलांडल्यावर घाटाच्या माथ्यावर निवळी फाटा लागतो. येथून जयगडाला अथवा गणपतीपुळे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. तसेच रत्नागिरी कडून गणपतीपुळे मालगुंड मार्गेही जयगड गाठता येतो.
जयगडाचा किल्ला पठारावर आहे. हे पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजुंना सागराने घेरलेले आहे. येथेच शाल्मीही नदी सागराला येवून मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षीत असे बंदर म्हणून जयगड पुर्वीपासून प्रसिद्ध आहे.
जयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. जयगड गावात जाणार्या फाटय़ापासून आपण पाच मिनिटांमधे जयगडाचा बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ येवून पोहोचतो.
सध्या बालेकिल्ल्याचा संपूर्ण परिसर तारेची जाळी लावून संरक्षीत केलेला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर सात-आठ फूट खोलीचा खंदक आहे. हा कातळकोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनविलेला नाही. त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. शत्रू तटाला येवून भिडू नये म्हणून हा खंदक बालेकिल्ल्या भोवती खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळला घालून गेलेला खंदक पार खालपर्यंत नेलेले आहे. उजवीकडील बाजुला खंदकाला एक प्रवेशद्वारही केलेले आहे. खंदकाला प्रवेशद्वार असलेली ही रचना वेगळ्या प्रकारची आहे.
दोन बुरुजांमधे लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पुर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षापुर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक उत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे.
दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामधे पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग असे मार्ग केलेले आहेत तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काहीजण याला कान्होजी आंग्रेयांचा वाडा असेही म्हणतात.
या वाडय़ा शेजारीच पाण्याचा मोठी विहीर आहे. मात्र तो झाडी झुडुपांनी पुर्णपणे झाकला गेला आहे. बाजुलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळे जवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलीदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती तटबंदी साठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमधे जीवंत चिणून तटाचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्यागपुर्ण बलीदानामुळे तटबंदी उभी राहीली. म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिध्द आहे.
तटबंदीवरुन पुर्ण गडफेटी करता येते. गडावरुन समुद्राकडील देखवा उत्तम दिसतो. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामधे जागोजाग मार्याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते मात्र तोफां आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास दीडतासाचा अवधी पुरेसा आहे. दरवाजाच्या बाहेरील खंदकामधील दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायर्या आहेत. येथून खालच्या भागात जाता येते. खली जांभ्या दगडा कोरलेली गुहा आहे. यात मोहमाया देवीचे मंदिर असून ही ग्रामस्थ असलेल्या घाटगे यांची कुलदेवता आहे. समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरुज ही पहायला मिळतात. समुद्राकाठचा पडकोटाचा भाग पाहून आपण डांबरी सडकेने धक्क्याकडे येवू शकतो व येथून आपण करहाटेश्वर मंदिराकडेही जावू शकतो.
=======================================================================================
किल्ले रत्नदुर्ग
रत्नागिरी म्हणजे कोकणामधील महत्त्वाचे शहर आहे. या शहराची ओळख धार्मिक, सांस्कृतीक तसेच ऐतिहासीक वारसा असलेली आहे. या शहराजवळच असलेला रत्नदुर्ग हा किल्ला याची साक्षच आहे. या रत्नदुर्ग किल्ल्याला काहीजण भगवतीचा किल्ला असेही संबोधतात. रत्नागिरी शहराच्या पश्चिम अंगाला असलेल्या सागर किनार्यावर हा दुर्ग आहे.
मुंबई पणजी महामार्गावर हातरवांबा फाटा आहे. या फाटय़ापासून रत्नागिरी कडे जाता येते. तसेच रत्नागिरी रेल्वेमार्गानेही जोडले गेलेले असल्यामुळे रत्नागिरीपर्यंत पोहोचणे अतिशय सोयीचे झालेले आहे.
रत्नागिरी बस स्थानकापासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी रिक्षांची सोय आहे. स्थानकापासून किल्ल्यापर्यंत चालत २० मिनिटांमधे पोहचता येते. किल्ल्याचा तट फोडून गाडीरस्ता आत गेलेला आहे हा गाडीरस्ता थेट बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारा पर्यंत जातो.
रत्नदुर्ग किल्ल्याची रचना काहीशी वेगळ्या घाटणीची आहे. शहराच्या पश्चिम अंगाला असलेल्या सागरामध्ये एक भूशीर शिरलेले आहे. या भूशीरावर तीन टेकडय़ा आहेत. या भूशीराच्या तिन्ही बाजुला सागराचे पाणी पसरलेले आहे. भुशीरावरील तीन टेकडय़ा पैकी दोन टेकडय़ा पुर्वेकडे असून एक पश्चिमेकडे आहे. पश्चिमेकडील टेकडी सागरालगत असून ती बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते.
रत्नदुर्गाच्या पुर्वबाजुच्या दोन्ही टेकडय़ांच्या माथ्यावर तटबंदी बांधलेली असून ती बुरुजांनी युक्त आहे. या दोन टेकडय़ांच्या मधील खिंडीसारख्या भागातील तटबंदी फोडून रस्ता आत गेला आहे. त्यामुळे या रस्त्यानेच जाण्याची वहीवाट पडून गेली आहे. त्यामुळे गडाच्या मुख्य दरवाजाची वाट मोडली गेली ती वाट वापरात नसल्याने या वाटेने प्रवेशद्वारा पर्यंत जाता येत नाही.
गाडीरस्त्याने ही लहानशी खिंड ओलांडली की उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता टेकडीवर चढतो. या कच्च्या रस्त्याने पाचदहा मिनिटांमधे चढून माथ्यावरच्या निमुळत्या भागात पोहोचता येते. येथे मुख्यप्रवेशद्वाराची आतली बाजू आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरील भागही उत्तमपैकी बंदिस्त केलेला असून तेथे लहान दरवाजाही ठेवलेला आहे. मात्र हा सर्व भाग झाडीझाडोर्यामुळे गच्च भरलेला असल्यामुळे मनसोक्त फिरता येत नाही.
या प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे लहानशे मंदिर आहे. मंदिराचा दरवाजा दक्षिणेकडे असून मुर्ती मात्र पश्चिमेकडे तोंड करुन आहे. किल्ल्यामधे असणार्या वस्तीमधील अनेक भाविक शनिवारी मारुतीच्या दर्शनाला येत असतात. मंदिराच्या मागील बाजूने दरवाजाच्यावर जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग आहे. दरवाजाच्या वर गेल्यावर मोठा आणि लहान असे दोन्ही दरवाजे तसेच त्याच्या भोवतालची तटबंदी पहायला मिळते.
या तटबंदीवरुन उत्तरेकडे चालत जाता येते. ही पायवाट रुंद असून ती दुरुस्त केलेली असल्यामुळे फिरण्यास सोयीची आहे. या भागातून पुर्वेकडील रत्नागिरी शहराचे तसेच सागराचेही दर्शन होते. येथून बालेकिल्लाही उत्तम दिसतो. भगवती बंदराचे दर्शन मोहवून टाकते. या तटबंदीवर फिरुन आपण पुन्हा प्रवेशव्दाराजवळून खाली खिंडीतील गाडीमार्गावर यायचे.
थोड पुढे गेल्यावर लगेचच एक गाडीमार्ग डावीकडे वर चढतो. या मार्गाने वर चढल्यावर लगेच आपल्या लक्षात येते की हा मार्ग तटबंदीच्या फांजीवरुन जाणारा गाडीमार्ग डांबरी केलेला आहे. या रस्त्याने तटबंदीच्या कडे कडेने दीपगृहापर्यंत जाता येते. दीपगृह हे सायंकाळी ४ ते ५ या वेळेत पहाण्यासाठी खुले असते. येथे ५ तोफा असून येथिल बुरुजाला सिद्ध बुरुज म्हणतात. हा परिसर पाहून आपण पुन्हा मुळ रस्त्यावर येतो. या रस्त्याने वस्तीतून किलोमिटरभर पुढे गेल्यावर डावीकडील भागात सुशोभीकरणाचे काम चाललेले दिसते. समोरच असलेल्या बालेकिल्ल्याकडे डांबरी तडकेनेच चालत जावे लागते.
बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार सकाळी ८ वाजता उघडते. सायंकाळी ६ वाजे पर्यंत ते खुले असते. प्रवेशव्दाराजवळच उपहारगृह असून तेथे चहापानाची व्यवस्था होऊ शकते. काही पायर्या चढून आपण दारामधून आत शिरतो. दोन्ही बाजुंना दोन मंदिरांचया घुमटी आहेत. येथेच किल्ल्याचा नकाशाही लावलेला आहे. तो पाहून आपण बालेकिल्ल्यामधे प्रवेश करतो.
समोर भगवतीचे देखणे मंदिर आहे. शिवकालीन असलेल्या या मंदिराचा आतापर्यंत तीन वेळा जिर्णाद्धार केलेला आहे. मंदिराच्या दारात सररवेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे. भगवतीचे मंदिर पाहून गडदर्शनाला निघावे. बालेकिल्ला आटोपशिर आकाराचा असून फारसे वास्तुविशेष नसल्यामुळे अर्ध्यातासात गडफेरी पुर्ण होऊ शकते. तटबंदीवरुन पुर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाला असलेल्या खंडकावर आदळणार्या सागरलाटा आणि त्यातुन उंच उडणारे तुषार पहाताना मौज वाटते. गडावर दोन मंदिरे, विहीर, भुयार इत्यादी पहायला मिळतात. गडावरुन अथांग पसरलेल्या सागरात विहरत असलेल्या बोटी आपले लक्ष वेधून घेतात.
बहामनी राजवटीत बांधणी करण्यात आलेला हा किल्ला पुढे आदिलशहीच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो शिवशाहीमधे आणला. त्याची डागडुजी उत्तम करुन तो लष्करीदृष्टय़ा भक्कम केला. छत्रपती संभाजीराजांनी रत्नदुर्गास भेट दिली होती. करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात असलेल्या रत्नदुर्ग पुढे आंग्रे घराण्याच्या ताब्यात होता. पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने रत्नदुर्गावर ताबा मिळवला. पुढे पंतप्रतिनिधी कडून १८१८ मधे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
रत्नदुर्गाचा देखणा बालेकिल्ला आणि दूरपर्यंत दिसणारा सागर किनारा आपल्या स्मरणात रहाण्यासारखाच आहे.
=======================================================================================
No comments:
Post a Comment