Friday, December 24, 2010

समजा दिली सोडुन नोकरी तुम्ही....

तु दारु वैगेरे पितोस का ?

सदरचं वाक्य हे मला कोणिही दिलेलं आमंत्रण नसुन आमच्या साहेबांनी त्यांच्या भल्या पहाटे आणि माझ्या भर दुपारी साडेबारा वाजता विचारलेला प्रश्न होता. खरं सांगायच तर... (अशी सुरुवात कोणी केली की तो हमखास खोटं बोलतो असं वाटतं ना? पण खंब्याची, सोड्याची आणि चकण्याची शप्पथ घेऊन सांगतो की मी खरंच बोलतोय.) तर खरं सांगायच तर मी आजपर्यंत दारुच्या ग्लासलाही हात लावलेला नाही. याचा अर्थ मी डायरेक्ट बाटलीच तोंडाला लावतो असा नसुन मी दारु पीत नाही असा आहे.

पण ‘मी दारु पितो का नाही’ हे दुपारी साडेबारा वाजता साहेब नक्कीच विचारणार नाही. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही देणं शक्यच नव्हतं आणि उत्तर न देऊनही चालणार नव्हतं. मी माझ्या नेहमीच्याच बावळट चेह-यानी अजुनच गोंधळुन जाऊन भंजाळल्यासारखा काहिही न बोलता उभा राहिलो. मला असं मठ्ठासारखं उभं पाहुन ते पिसाळलेच. कोणत्याही क्षणी टेबलवरुन माझ्या अंगावर उडी मारुन... आपल्या तीक्ष्ण नखांनी माझी पँट फाडुन... माझ्या पायाचा लचकाच तोडेल, असं त्यांच्याकडे बघुन वाटत होतं. मी बोलत नाहीये हे पाहुन त्यांची चावण्याआधिची गुरगुर चालु झाली.

महाराज, तुमचं मौनव्रत सोडुन जरा तोंड उचकटता का...? मी काहीतरी विचारलय तुम्हाला. का माझा जीव गेल्यावर बोलणार आहेस ?- साहेब.
(‘मी दारु पितो का नाही’ ह्याचं उत्तर दिलं नाही तर त्यांचा जीव का जाणार आहे हे मला कळेनाच. पण मी फारसा विचार केला नाही. तसही बॉस नामक प्राण्याच्या, मेंदु आणि डोक्यात काही कनेक्शन नसल्याने त्याचं असं अधुनमधुन असंबंध बोलणं मला सवयीचं होतं.)
अरे काय विचारतोय मी ? माझा जीव गेल्यावर तरी बोलणार आहेस का बोलणारच नाहीयेस?
नाही. - मी उत्तर दिलं.
काय नाही ? माझा जीव गेल्याशिवाय बोलणार नाहीस का बोलणारच नाहीस? - साहेब.
नाही. नाही. मी दारु घेत नाही ? - मी.
दारु???? दारुचा काय संबंध इथे? आपण ऑफिस मध्ये आहोत, बारमध्ये नाही. शुद्धीवर आहेस का? मी काय विचारतोय आणि तुला दारु प्यायचीये? काम करायचय का नाही? - साहेब.
नाही. - मी.
नाही? - साहेब.
म्हणजे काम करायचय, दारु प्यायची नाहीये. - मी.
पुन्हा दारु ? तु खरच दारु पिऊन आला आहेस किंवा तुला दारुची हुक्की आलीये... माणसात ये... घे ही फाईल आणि जो घोळ घातलायेस तो निस्तरुन आण परत. - साहेब.

असं म्हणुन त्यांनी ती फाईल मला फेकुन मारली. अर्थात त्यांनी मला चावण्यापेक्षा हे बरंच बरं होतं. मी गुपचुप माझ्या जागेवर येऊन बसलो. मला तर त्या फाईलमध्ये काहीच घोळ सापडेना. म्हणुन अर्धा तास नुसताच बसुन तशीच फाईल परत घेऊन गेलो तर म्हणाले, "हेच आधि करुन आला असतास तर माझा आणि तुझा, दोघांचा वेळ वाचला असता. हे असं काम व्हायला हवं."

तुम्हाला सांगतो, साहेबांचा विक्षिप्तपणा हल्ली इतकाच वाढत चाललाय की रोज त्याच्या तोंडावर राजीनामा मारुन घरी यावंसं वाटतं. निदान मनासारखं तरी जगेन. मनासारखं? म्हणजे कसं??? सांगतो.... एक गंमत सांगतो तुम्हाला....

आनंद आणि उत्साह ओसांडुन जगणारे कोणी आजी-आजोबा पाहिले की खुप बरं वाटतं मला.... अशाच एका स्वच्छंदी आजोबांना ओळखतो मी... आमच्या चौकात त्यांचं रद्दीचं दुकान आहे आणि दिवसभर ते गल्ल्यावर बसुन असतात.... कधीतरीच त्यांच्याकडे गि-हाईक आलेलं पाहिलय मी... बाकीचे वेळ ते बसुनच..... पण आनंदी आणि उत्साही ! गि-हाईकाशिवाय असं असणं कसं परवडतं त्यांना कोणास ठाउक ?

एकदा न राहवुन मी विचारलं तर म्हणाले....
"गरजेसाठी म्हणुन का असेना पण पैसे कमावण्यासाठी आयुष्यभर धावलो. सुरवातीला गरजा कमी होत्या तेंव्हा चालत होतो आणि ते चालतही होतं.... पण हळुहळु गरजा वाढल्या आणि धावायला लागलो... नोकरीमुळे कधी थांबताच आलं नाही. स्वतःच एक दुकान टाकुन गल्ल्यावर बसायची माझी खुप इच्छा होती हो.. नाही जमलं नोकरीच्या नादात म्हणुन आता रिटायर झालोय तर केलं हवं तसं....
सकाळपासुन इथं गल्ल्यावर बसुन काय छान जग अनुभवतो मी..... दिवसभर आकाशवाणी ऐकतो आणि हॅलो फर्माईशला फोन करुन कुठल्यातरी बंडल गाण्याची फर्माईश करतो.... गल्ल्यात सुट्टे पैसे असुन गि-हाईकाशी सुट्ट्या पैशावरुन भांडण करतो.... रस्त्यावरची गंमत बघत बसतो... भिका-यांशी गप्पा मारतो.... दुकानावरुन जाणा-या प्रत्येक मुलीकडे बघतो.... दुपारी झोपा काढतो..... हवं तेंव्हा दांडी मारतो.... आणि असं बरच काही.....!
नोकरी करताना रद्दीत घालवलेलं आयुष्य मी इथे रद्दीच्याच दुकानात शोधलय..... आता मनासारखं जगतोय !"

आजोबांशी बोलुन खुप छान वाटलं आणि अस्वस्थही झालो.... मनात म्हणालो की मी पण धावतोच आहे की माझ्या गरजेप्रमाणे..... वाटलं, मला मिळालाच तेवढा पैसा ज्यासाठी इतका धावतोय तर काय करेन मी त्या वेळेचं....
समजा सोडता आली मला नोकरी, तर काय करेन ?

मला हसणार नसाल तर सांगतो....
मी रस्त्यावर डोंबा-याचे आणि जादुचे खेळ करत फिरेन..... हातातला तो मोठ्ठा चेंडु "गिलीगिलीफट" करुन गायब करायचा आणि कुठल्या तरी शेंबड्या पोराच्या चड्डीतून काढुन दाखवायचा... मग त्यानंतर पडणा-या टाळ्या आणि पोरासोरांच्या चिमुकल्या डोळ्यातून विस्फारलेलं आश्चर्य गोळ करुन आपल्या पोथडीत भरुन घ्यायचं.....
आयुष्यानी कधी सरळ चालुच दिलं नाही मला... उडू तर नाहीच नाही.... त्यामुळे मला डोंबा-यासारखं दोरीवरुन तोल सांभाळात चालायचय आणि आकाशात उडणा-या पक्षांना सांगायचय की मी उडतोय... सरळ सरळ उडतोय....! शब्द आहे माझा तुम्हाला, नक्की येईन एक दिवस तुमच्याही गल्लीत माझा खेळ घेऊन.... !

"तुम्ही काय कराल?" असं चाळीतल्या ढमढेरे बाईंना विचारलं तर म्हणाल्या की "नोकरी सोडता आली तर .......सर्कसमध्ये जाईन! "

(असतील ढमढेरे बाई गोलमटोल पण म्हणुन काय सर्कस म्हंटल्या-म्हंटल्या तुम्हाला हत्ती किंवा गेंडा आठवायची गरज नाहीये....) त्या म्हणाल्या..... "काय मस्त सडपात्तळ असतात हो त्या सर्कसमधल्या बायका... आणि किती सुटसुटीत, चटपटीत आणि खुटखुटीत! उंच बांधलेल्या झुल्यावरुन त्या बायका ह्या दांडीवरुन त्या दांडीवर.... न पडता.... कसं फुलपाखरासारखं जातात ना? किती मजा येत असेल असं करायला..... मला तर बाई बसमधेसुद्धा उभं असताना दांडीवरच्या ह्या पट्ट्यावरुन त्या पटट्यावर जाताना सर्कस करावी लागते. त्यात परत ३-४ लोकांना पाडायचं... बरं नाही वाटत हो....."


मित्र-मैत्रिणींनो.... ढमढेरे बाईंचं ठरलय...... माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच....
पण तुमचं काय ?
समजा दिली सोडुन नोकरी तुम्ही.....
पुढे आयुष्यात काय कराल?? तंगड्या पसरुन दिवसरात्र टिव्हीपुढे पडाल?
का जिद्दीनं एव्हरेस्ट चढाल?
का कराल सगळी हौस पूर्ण जी लहानपणापासुन जपलेली? का शोधुन काढाल शिल्पं नवी... दूर लेण्यांमध्ये लपलेली ?

काय कराल ? काय काय कराल ?
कळवा..... अगदी बिनधास्त कळवा.... तुमच्या उत्तराची वाट बघतोय....

धुंद रवी.

1 comment:

  1. येकदम छान गोष्ठ आहे मला खूप आवडली विचार करीन आणि कळवीन

    ReplyDelete


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive