Monday, December 27, 2010

खगोलशास्त्रज्ञाचे प्रेमगीत



खगोलशास्त्रज्ञाचे प्रेमगीत

काळ्याकुट्ट कृष्णविवरासारखे तुझे डोळे
बंदिस्त करतात माझ्या मीत्वाला
नष्ट करून टाकतात माझे अस्तित्व
आणि सामावून घेतात मला
जणू काही मी त्यांचाच एक भाग आहे.
वाटतात युगे लोटली आहेत अनेक
पण काटे चालतात मुंगीची चाल
जसे काही तुझे डोळे गोठवतात काळ
एखाद्या ख-याखु-या कृष्णविवरासारखे

तू तारा आहेस माझ्यासारख्या य:कश्चित ग्रहासाठी
जो पुरवतो आखंड ऊर्जा जीवनासाठी
रोजच्या उदयास्ताचे काही वाटत नाही
पण ग्रहणाचा काळ कासावीस करतो
झाकोळते चराचर दाटतो अवेळी अंधार
तुझ्या दर्शनासाठी मग आक्रोशते मन
दान देतो ग्रहणाचे अनेक अनाथांना
आणि घेतो दुवा, आशिर्वाद त्यांच्याकडून
हे ग्रहण सुटण्यासाठी, आस्तिक होऊन

अपशकूनी धूमकेतूसारखे तुझे वडील (माफ कर)
देतात दर्शन मला नाक्यावर अनपेक्षितपणे
चुकवतो त्यांची क्रुद्ध नजर फक्त तुझ्याचसाठी
कारण तुझीच वाट पाहत असतो तेथे
ग्लासवर ग्लास रिचवत......चहाचे
आणि धूमकेतूच्या शेपटासारखे तुझे भाऊ
भिती घालतात अटळ अशा उल्कावर्षावाची
असे वाटते व्हावे शक्तिमान गुरूसारखे
या वाटेतील अशनींची शकले करण्यासठी.

तू माझ्यासाठी सर्वात जवळची तारका आहेस
तुझ्या भोवती अनेक ग्रहांची माला आहे
पण भेदेन मी पयोनियरसारखी सारी आकाशगंगा
घेउन या विश्वाशी पंगा
आणि रोवेन निशाण एका यशस्वी मोहिमेचे
भिन्न संस्कृती एकत्र नांदतील एकाच भूतलावर
तुला देतो मी हमी, हे लवकरच घडेल
कृष्णमेघ आवळत आहे वेगाने गुरूत्वाकर्षणाने
एका नवीन ता-याचा जन्म लवकरच घडेल.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive