Saturday, December 4, 2010

Re: मराठी युवा // वेडात मराठे वीर दौडले सात

कुसुमाग्रजांच्या या अप्रतिम पंक्तींनी मराठी मानसात आणि मराठी साहित्यात प्रतापराव गुजर आणि त्यांच्या साथीदारांना मानाचे पान दिलेले आहे. इतिहासात मात्र पावनखिंडीला जे स्थान आहे ते नेसरीच्या खिंडीला नाही असे दिसते. महाराजांचा शब्द पाळण्यात सरसेनापती चुकले. त्यांनी भावनेच्या भरात आपले प्राण खर्ची घातले. राज्याभिषेकाआधी काही थोडक्या दिवसांत राज्याला सेनापती नाही अशी स्थिती राज्यात निर्माण झाली. असे नेमके काय झाले होते प्रतापरावांकडून, याविषयी सर्वश्रुत असणारी कहाणी पुढीलप्रमाणे -

सन १६७३ साली शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली की "खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. "

महाराजांची आज्ञा घेऊन प्रतापराव आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने खानाला पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली. पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्याने प्रतापरावांकडे आपला वकील पाठवला. वकिलाच्या रदबदलीने आणि गोड शब्दांनी प्रतापरावांचे मन द्रवले. खानाला असा हिसका दाखवल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी खात्री त्यांना वाटली आणि त्यांनी वकिलाच्या प्रार्थनेचा स्वीकार करून खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, मुक्काम हलवण्यास वाट करून दिली.

या लढाईची बातमी महाराजांना कळल्यावर ते साहजिकच चिडले. महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून "सला काय निमित्य केला? " असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले.

महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यांत होणारे बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, "हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे. " महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागली आणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले. खानाच्या अफाट सैन्यासमोर या सात वीरांचा निभाव लागणे केवळ अशक्य होते आणि परिणामी धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठणारे हे वीर धारातीर्थी पडले. महाराजांना ही वार्ता कळल्यावर ते अतिशय दु:खी झाले. राज्याच्या सरसेनापतीला दूरदृष्टी हवी ही अपेक्षा महाराजांनी करणे स्वाभाविक होते परंतु भावनेच्या भरात प्रतापरावांसारखा निधड्या छातीचा वीर दुसरी चूक करून बसला.

प्रतापरावांच्या मृत्यूचे मराठाशाहीवर नेमके परिणाम कसे झाले याबाबत मला फारसे वाचायला मिळाले नाही परंतु सर्वसामान्य अंदाज लावायचा झाला तर राज्याचा सरसेनापती अशा रितीने मृत्यूला कवटाळतो तेव्हा सैन्यात बेबंदशाही माजण्याची शक्यता असते. राजा, प्रजा, राज्य आणि सैन्य यांचे खच्चीकरण होण्याची शक्यताही असते. २४ फेब्रुवारी १६७४ ला प्रतापरावांना वीरमरण आले आणि १६ जूनला राजांना राज्याभिषेक झाला. शिवराज्याभिषेक जवळ आला असता सरसेनापतीचा मृत्यू होणे ही घटना राज्यस्थापनेसाठी नक्कीच पूरक नसावी. निश्चलपुरी महाराजांनी अपशकुन म्हणून प्रतापरावांच्या मृत्यूचे कारण दाखवल्याची घटनाही वाचनात येते.

उतावळा, भावनाप्रधान स्वभाव आणि दूरदृष्टीचा अभाव ही कारणे राज्याचा सरसेनापती हिरावून घेण्यास कारणीभूत ठरली. इतके सर्व असूनही, प्रतापरावांच्या अतुलनीय धाडसाचे कोठेतरी कौतुक करावेसे वाटते. गैरजबाबदार कृत्य हातातून घडले तरी त्यांची स्वामीनिष्ठा वाखाणण्याजोगी होती. खुद्द महाराजांना त्याविषयी शंका असावी असे वाटत नाही. आपल्या जिवाचा, घरादाराचा, कुटुंबाचा विचार न करता केवळ स्वाभिमानाला ठेच लागली म्हणून स्वामीनिष्ठेपायी आपला जीव ओतून टाकणाऱ्या या वीरांच्या धमन्यांतील रक्तात असा कोणता गुण असावा की कोणताही इतर विचार न करता त्यांनी बहलोलखानाच्या सैन्यावर चालून जाण्याचा निर्णय घेतला; यामागील नेमकी मानसिकता समजून घेणे कठिण वाटते.

तरीही, नेसरीच्या खिंडीला पावनखिंडीचे महत्त्व नाही याचे कारण प्राणार्पण कोणी, कधी आणि नेमके कशासाठी केले याला इतिहासात महत्त्व आहे. बाजीप्रभूंचे प्राणार्पण आणि प्रतापरावांचे प्राणार्पण यांत फरक दिसून येतो. युद्धात बरेचदा हार-जीत यांच्यापेक्षाही मागाहून होणारे परिणाम महत्त्वाचे ठरतात. बाजीप्रभूंचे बलिदान महाराजांना सुखरूप ठेवण्याकामी आले. बहुधा, मूठभर सैनिकांसह बाजीप्रभू मागे राहिले तेव्हाच त्यांचा मृत्यू अटळ आहे हे सर्वांना माहित असावे. प्रतापरावांच्या बाबत तसे होत नाही. कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितेने मात्र प्रतापरावांच्या प्राणार्पणाचे उदात्तीकरण झाले. या कथेसारखी भासणारी पाश्चात्य इतिहासातील एक प्रचलित कथा पुढे देता येईल. ती म्हणजे थर्मापलैयच्या लढाईची.

प्राचीन ग्रीकमधील अथेन्स आणि स्पार्टा ही दोन प्रसिद्ध शहर-राज्ये गणली जातात. अथेन्स आणि स्पार्टा एकमेकांपासून फार लांब नाहीत परंतु या दोन्ही राज्यांचे नीतिनियम, कायदे भिन्न होते. अथेन्स हे समुद्राजवळ असल्याने समुद्र व्यापारात हे राज्य अग्रेसर होते. व्यापाराच्या निमित्ताने अनेकविध संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अथेन्सवासीयांचा सामाजिक, राजकीय दृष्टीकोण पुरोगामी होता. या उलट, स्पार्टा हे ग्रीक प्रदेशात आतवर वसलेले शहर-राज्य. सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले. शत्रूराज्यांमुळे सतत सावध असलेले आणि त्यामुळे सांस्कृतिक बाबींमध्ये संकुचित राहिलेले. स्पार्टाचे कायदे आणि नीतिनियम हे अथेन्सपेक्षा क्रूर होते. केवळ सुदृढ मुलांना येथे वाचवले जाई. अशक्त आणि अपंग बालकांना मारले जाई. लष्करी प्रशिक्षण सक्तीचे होते. दोन्ही शहरांत गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. यापैकी, स्पार्टातील गुलामांना हेलॉट असे संबोधले जाई. इतर राज्यांतील गुलामांपेक्षा हेलॉटांना थोड्या अधिक सवलती होत्या. त्यांना जमीन कसता येई पण इतर नागरिकांपेक्षा अधिक शेतसारा भरावा लागे. स्पार्टाच्या नागरिकांकडून हेलॉटचा मृत्यू हा दखलपात्र गुन्हा नसे. प्रामुख्याने हेलॉट हे कामगार किंवा कलाकार असत. सैन्यातही त्यांची भरणा होई. आपले स्वातंत्र्य त्यांना विकत घेण्याची मुभा होती.

अथेन्स आणि स्पार्टाप्रमाणेच ग्रीसमध्ये इतर अनेक लहान-मोठी राज्ये होती. ग्रीसच्या जवळचे प्रबळ राष्ट्र पर्शियाचे. पर्शियाचा सम्राट झेरेक्सिस याने इ.स.पूर्व ४८३ पासून सैन्याची मोठी जमवाजमव केली आणि इ.स.पूर्व. ४८० मध्ये ग्रीसवर भूमार्गे आणि समुद्रमार्गे लाखोंच्या सैन्यानिशी हल्ला चढवला. झेरेक्सिसने हल्ल्याची वेळ ऑलिंपिक्सचे खेळ आणि कार्निया या ग्रीक सणाच्या सुमारास ठरवली होती. याचे कारण या काळात ग्रीक शस्त्रे उचलत नसत. कार्नियाच्या दिवसांत शस्त्र उचलणे दैवी कोपास कारण होऊ शकते अशी प्रचलित श्रद्धाही होती. ग्रीकांना झेरेक्सिसच्या स्वारीचा सुगावा लागताच त्यांनी आपापसांतील वैर बाजूला ठेवून एकत्रित होऊन लढायचे ठरवले. त्यानुसार समुद्रमार्गे येणारा पर्शियन सैन्याचा ताफा रोखण्यास ग्रीक सेना आर्टेमिसिअमच्या सामुद्रधुनीत एकत्रित झाल्या. स्पार्टावर या काळात लिओनायडस या राजाचे राज्य होते. त्याची सेनाही मित्र ग्रीक सेनेत सहभागी होती. असे म्हणतात की स्वारीपूर्वी लिओनायडस डेल्फायच्या पुजारीणीचा सल्ला घेण्यास गेला असता तिने त्याला भविष्य सांगितले होते की "पर्शियन युद्धात एकतर स्पार्टाचा विनाश होईल आणि तसे न होता राज्य वाचले तर राजाचा विनाश नक्की होईल. "


झेरेक्सिसचे खरे शत्रू होते अथेन्स आणि स्पार्टा. अथेन्सवर स्वारी करायची झाली तर त्याच्या भूमार्गावरील सैन्याला दक्षिणेकडे अथेन्स गाठण्यासाठी थर्मापलैची अरुंद वाट पार करून येणे क्रमप्राप्त होते. डोंगरातून जाणाऱ्या या अरुंद वाटेच्या एका बाजूस समुद्र होता तर दुसऱ्या बाजूस कपारी. ही वाट इतकी अरुंद होती की एकावेळेस एक रथ कसाबसा जाऊ शके. पर्शियन सैन्याला खिंडीत गाठण्यास यापेक्षा बरी जागा मिळाली नसती. सुमारे २ लाखांचे सैन्य घेऊन झेरेक्सिस येत होता. स्पार्टाचा राजा लिओनायडसच्या नेतृत्वाखाली पर्शियन सेनेवर हल्ला करण्याचे मित्र ग्रीक सेनेने ठरवले. परंतु स्पार्टाचे मुख्य सैन्य आर्टेमिसियमच्या सामुद्रधुनीत गुंतले होते. लिओनायडसने त्याचे ३०० शूर अंगरक्षक आणि स्पार्टातील दुय्यम सेना, ज्यांत हेलॉटसही सामील होते यांच्यासह थर्मापलैकडे कूच केले. वाटेत त्यांना इतर सैन्येही मिळत गेली परंतु त्यांची एकूण संख्या ५-७ हजारांच्या घरात होती.

पर्शियाच्या प्रचंड सेनेसमोर लिओनायडसच्या लहानशा सैन्याचा टिकाव लागणे अशक्य होते. तरीही तीन दिवस प्राणांची बाजी लढवत ग्रीक सैन्य लढले आणि त्यांनी पर्शियन सेनेला सळो की पळो करून सोडले. तिसऱ्या दिवशी फितुरी होऊन पर्शियन सैन्याला डोंगरातून ग्रीक सेनेला गाठण्याचा दुसरा मार्ग दाखवला गेला आणि ग्रीक सेना पुढून आणि मागून पर्शियन सेनेच्या तावडीत सापडली. लिओनायडसला आपला पराभव दिसू लागल्यावर त्याने इतर ग्रीक राज्यांच्या सेनेला परतायचा हुकूम दिला. त्याच्या हुकुमानुसार इतर ग्रीक सेना माघारी फिरली. लिओनायडस स्वत: मात्र त्याच्या तीनशे अंगरक्षकांसह पर्शियन सैन्याला तोंड देण्यास मागे राहिला. यानंतरची कहाणी लिओनायडसच्या आणि त्याच्या तीनशे वीरांच्या अतुलनीय कामगिरीची आहे.

पहाटे देवतांना अर्ध्य वाहून लिओनायडस आणि त्याचे तीनशे वीर लाखोंच्या पर्शियन सैन्याला सरळ सामोरे गेले. वाटेत येणाऱ्या एकेकाला कापून काढत, प्रत्येक वीर त्याच्या हातातील भाल्याचे तुकडे होईपर्यंत लढला. भाल्यांचे झालेले तुकडे घेऊनही ते पर्शियन सैन्यावर वार करत राहिले. लढाईत लिओनायडसचा मृत्यू झाला हे कळून आले तरी ते ३०० वीर मागे फिरले नाहीत. त्याच्या मृत शरीराला तुडवत लढाई सुरूच राहीली. शेवटी पर्शियन सैन्याने बाणांचा वर्षाव करून सर्वांना कंठस्नान घातले. एकही वीर मागे उरला नाही. संतप्त झेरेक्सिसने लिओनायडसच्या मृत शरीराचे मुंडके कापून धड क्रूसावर चढवले आणि विजय साजरा केला. या लढाईनंतर आर्टेमिसियमलाही ग्रीकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आणि त्यांनी माघार घेतली.

येथून पर्शियन सेना अथेन्सवर चालून गेली परंतु लिओनायडसच्या तीनशे वीरांनी पर्शियन सेनेचा मार्ग आठवड्याभरापेक्षा जास्त रोखून धरल्याने अथेन्सवासियांना शहर रिकामे करण्याची संधी मिळाली. झेरेक्सिसने अथेन्सला आग लावून बेचिराख केले पण नगरवासीयांचे प्राण लिओनायडसच्या पराक्रमाने वाचले. लिओनायडसच्या पराक्रमामुळे नंतर झालेल्या सलामिस येथील युद्धात मित्र-ग्रीक सैन्य निकराने लढले आणि त्यांनी पर्शियन सेनेवर विजय मिळवला.

पाश्चात्य इतिहासात या कथेला फार मोठे महत्त्व आहे. या कथेवरून साहित्यात काव्य, चित्रपट यांची निर्मिती झाली आहे. "तीनशेंची लढाई" (battle of 300) या नावाने हे युद्ध अनेक वर्षे सर्वांना प्रेरणा देत आले आहे. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातही या लढाईवर एक पाठ अवश्य दिसतो. प्रत्यक्षात २ लाखांच्या सेनेसमोर स्पार्टाच्या राजाने आपले प्राणार्पण करण्यात फार मोठे डावपेच दिसत नाहीत. या तीनशेंसह मागे राहिलेल्या सुमारे १००० हेलॉटांचा आणि थेस्पियन सैन्याचा उल्लेखही सहसा दिसत नाही. या लढाईत पर्शियन सैन्याचा मार्ग रोखून धरल्याने सलामिस येथे सैन्याची जमवाजमव करण्याची संधी मिळाली असाही गैरसमज अनेकांचा दिसतो. त्यात फारसे तथ्य नाही. स्पार्टाच्या राजाने अशाप्रकारे मागचा-पुढचा विचार न करता किंवा दुसरी युद्धनीती न आखता शत्रूवर सरळ चाल करणे कितपत शहाणपणाचे होते हे सांगता येत नाही. येथे या वीरांचे स्पार्टात मिळालेले खडतर प्रशिक्षण आड आले किंवा डेल्फायच्या भविष्यकर्तीवर असलेला अवास्तव विश्वास लिओनायडला असा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरला असे सांगितले जाते. परंतु, लिओनायडसचे प्राणार्पण शत्रूसमोर माघार न घेता त्वेषाने लढण्यास अनेकांना पुढे प्रेरणादायी ठरले हे खरेच.

पावनखिंडीची लढाई, नेसरीची लढाई आणि थर्मापलैच्या लढाईत मला साम्य दिसल्याने आमचा त्यांचा इतिहास या सदरात या लेखाची भरती केली आहे.

पूरक माहिती: तीनशेंच्या लढाईवर ३०० नावाचा एक सुप्रसिद्ध परंतु बंडल चित्रपट मध्यंतरी येऊन गेला. चित्रपटातील पात्रांचे, विशेषतः झेरेक्सिसचे विपर्यस्त चित्रण उबगवाणे आहे. तरीही पूरक माहिती म्हणून चित्रपट पाहण्यासारखा आहे.



2010/12/4 अमोल कुटे <amolkutey@gmail.com>

वेडात मराठे वीर दौडले सात 


ती धन्य जाहल्या श्रवुनी आपली वार्ता,

रण सोडून सेनासागर अमुचे पळता |

अबला ही घरोघर खऱ्या लाजतील आता ,

भर दिवसा आम्हा दिसू लागली रात ||

 

ते कठोर अक्षर एक एक त्यातील

जाळीत चालले कणखर ताठर दिल |

माघारी फिरणे नाही मराठी शील

विसरला राव मग काय लावता जात ||

 

जरी काल दाविली प्रभू गनिमाला पाठ

जरी काल विसरलो जरा मराठी जात |

हा असा धावतो पुन्हा अरी शिबिरात

म्यानातून उसळे तलवारीची पात,

वेडात मराठे वीर दौडले सात ||

 

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले

सरदार सहा सरसावुनि उठले शेले |

रिकिबीत घातले पाय झेलले भाले

उसळले धुळीचे मेघ सात गीरीजात,

वेडात मराठे वीर दौडले सात ||

 

आश्चर्य मुग्ध टाकुनी मागुती सेना

अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना |

छावणीत शिरले थेट भेट गनिमाला

कोसळल्या उल्का जळत सात दर्यात,

वेडात मराठे वीर दौसले सात ||

 

खालून आग वर आग, आग बाजूनी

समशेर उसळली सहस्त्रभ्रूर ती मानी |

गर्दीत लोपले सात जीव अभिमानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात,

वेडात मराठे वीर दौडले सात ||

 

दगडांवर दिसतील अजुनी तेथल्या टापा

ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा |

क्षितिजावर दिसतो अजुनी मेघ मातीचा

अद्याप विराणी कुणी वार्यावर गात,

वेडात मराठे वीर दौडले सात ||

 



1 comment:

  1. माझा मते ३०० ची कथा छत्रपती संभाजी राजांशी साम्य आहे. ज्य पद्धतीने राजांनी आठ वर्ष औरंगझेब च्य १ लाख सेना सागराला रोखला. आणि स्वतः च्य प्राणाची आहुती दिली. ( छत्रपती संभाजी राजांचा या लढ्यमूळे स्वराज टिकलं )

    ReplyDelete


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive