Sunday, December 19, 2010

सामराजगड





सामराजगड




मुरुड हा रायगड जिल्ह्यामधील एक तालुका आहे. मुरुड हे गाव जंजिरा या जलदुर्गामुळे अनेकांना परिचित आहे. मुरुडच्या सागरात जसा जंजिरा हा जलदुर्ग आहे तसा या सागरात कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्गही आहे. जंजिरा किल्ला हा हबश्यांच्या ताब्यात होता. या हबश्यांचा किनार्‍या वरील रयतेला खूपच उपद्रव पोहोचत असे. लुटालुटीबरोबरच किनार्‍यावरील गावांमधून बायकांना मुलांनाही पळवून नेवून त्यांना धर्मांतरीत करणे अथवा गुलाम म्हणून अरब देशात विकणे असे ही उद्योग सिद्यीचे चाललेले असत. या सिद्यीच्या जाचाला आळा घालण्यासाठी त्याच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किनार्‍यावर सामराजगडाची बांधणी केली.

सामराजगडाला जाण्यासाठी आपल्याला प्रथम मुरुडला पोहोचावे लागते. मुरुड हे गाव पुणे, मुंबई, महाडशी गाडीमार्गाने जोडलेले आहे. कोकण रेल्वेवर रोहे हे स्टेशन आहे. तेथूनही मुरुडला जाणे सोयीचे आहे. रोहे येथून एस.टी.बसेसची सोय आहे.

जंजिर्‍याच्या सिद्यीच्या बाबत शिवकालीन कागदपत्रामधे एक उल्लेख केलेला आहे. तो म्हणजे जंजिर्‍याचा सिद्यी हा स्वराज्यांच्या उदरातील व्याधी हा होय. या उदरातील व्याधीचा समुळ नायनाट करण्याचा महाराजांनी अनेकदा प्रयत्न केले पण त्यात यशाने नेहेमीच हुलकावणी दिली. म्हणून या सिद्यीला प्रतिबंध करण्यासाठी सागरात पद्मदुर्गाची तर किनार्‍यावर सामराजगडाची उभारणी महाराजांनी केली. हा किल्ला त्याकाळी दंडाराजपुरीचा किल्ला म्हणून ओळखला जात असे.

मुरुडकडून दंडाराजपुरीकडे निघाल्यावर खाडी लागते. ही खाडी ओलांडल्यावर चढ सुरु होतो. हा चढ संपल्यावर उजवीकडे सागरात घुसलेली एक टेकडी आहे. याच टेकडीवर सामराजगड उर्फ दंडाराजपुरीचा किल्ला अवशेषरुपात शिल्लक आहे. सामराजगडाची रचीव दगडांची तटबंदी होती. त्या तटबंदीचे काही अवशेष सद्या शिल्लक आहेत. बाकीच्या खाणाखुणा कालौघात नष्ट झाल्या आहेत. सामराजगडावरुन जंजिर्‍यावर करडी नजर ठेवता येत होती.

सामराजगडासंबंधीची एक महत्त्वपूर्ण घटना इतिहासामधे नोंदली गेली आहे. सामराजगड शिवाजीराजांनी बांधायला घेतल्याचे पाहून जंजिरेकर सिद्यी अतिशय अस्वस्थ झाला. सामराजगडामुळे त्याच्या उचापतीला चांगलाच लगाम बसणार होता. किंबहुना किनार्‍यावर पाय ठेवणे त्याला मुश्कील होणार होते. त्यामुळे सामराजगडावर हल्ला करुन तो ताब्यात घेण्याचा सिद्यीने विचार केला. ११ फेब्रुवारी १६७१ रोजी सिद्यीने हल्ला केला. त्यासाठी त्याने किनार्‍यावरील उंच झाडांवर तोफा चढवल्या आणि बांधल्या. या तोफांमधून किल्ल्यावर गोळाबारी करण्याचा त्याचा बेत होता. पण गोळाबारीत तोफांच झाडावरुन पडल्याने हा डाव फसला.

त्याने पुन्हा नव्याने दुसरा डाव टाकला. होळीचा दिवस असल्याने सर्व मराठे होळीमधे मश्गुल असणार हे त्याने ताडले. सिद्यी खैर्यतखानाने किनार्‍याकडून सामराजगडावर हल्ला चढवला. होळीमुळे गडावर शिवंदीही कमी होती. त्यांनी खैर्यतखानाला अटकाव करण्यासाठी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला. त्यामुळे किल्ला मोकळा झाल्याचे बघताच सिद्यी कासीम खान याने आपले सैन्य सागरमार्गे आणले होते. त्याने मागून हल्ला चढवला. किल्ल्यामधे लढण्यासाठी सैन्य नव्हतेच त्यामुळे सामराजगड सिद्यी कासीमच्या हाती विनासायास पडला. दरम्यान किल्ल्यावरील दारुगोळा पेटला. त्याचा मोठा स्फोट झाला. कासीमखान जवळ असूनही या स्फोटातून बचावला. सिद्यीने चिकाटीने आणि युक्तीने मराठय़ांकडून सामराजगड हिसकावून घेतला. सिद्यीला पायबंद घालण्याचे महाराजांचे स्वप्न मात्र यामुळे अपुरे राहिले.

सामराजगडावरुन जंजिरा तसेच पद्मदुर्ग या जलदुर्गांबरोबर मुरुड परिसराचे दृष्य उत्तम दिसते.

  • प्रमोद मांडे


  • No comments:

    Post a Comment


    Popular Posts

    Total Pageviews

    Categories

    Blog Archive