Sunday, December 19, 2010

किल्ले खांदेरी






किल्ले खांदेरी




रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग आहे. अलिबागला पर्यटकांचा फार मोठा राबता असतो. अलिबाग परिसरातील निसर्गरम्य सागरकिनारे पुणे - मुंबईच्या पर्यटकांनी नेहेमीच गजबजलेले असतात. अलिबाग परिसरातील किल्ले पहाण्यासाठीही अनेक किल्लेप्रमी या परिसराला भेट देतात.

अलिबागच्या उत्तरेला पाच - सहा कि.मी. अंतरावर सागरकिनारी थळ हे लहानसे गाव आहे. हा परिसर थळ-वायशेत प्रकल्पामुळे बराच प्रसिद्धीस आलेला आहे. थळच्या सागरात दोन बलदंड सागरीदुर्ग उभे आहेत. खांदेरी आणि उंदेरी अशी त्यांची नावे आहेत. या जलदुर्गांना भेट देण्यासाठी आवर्जुन वेळ काढावा लागतो.

अलिबाग हे गाव मुंबई - पणजी या महामार्गाला उत्तमप्रकारे जोडलेले असल्यामुळे गाडीमार्गाने पुण्या-मुंबई जाण्यासाठी खाजगी वाहनांचीही सोय होते.

थळ पासून खांदेरी किल्ल्याला जाण्यासाठी होडीची सोय होवू शकते. येथिल मच्छीमारी करणार्‍या होडी या साठी मिळतात. त्यांच्याशी अगोदर संपर्क केल्यास आपली गैरसोय टळू शकते. अन्यथा अव्वाच्या सव्वा आर्थिक भार आपल्यावर पडू शकतो.

थळच्या किनार्‍यावर पुर्वी थळचा लहानसा किल्ला होता. हा किल्ला खांदेरी व उंदेरी या जलदुर्गावर लक्ष ठेवून असे. आजमात्र या किल्ल्याचे काही अवशेषच शिल्लक राहीले आहेत.

खांदेरी उंदेरीची बेटे ही मुंबई आणि मुरुडचा जंजिरा यांच्या मधे असल्यामुळे अतिशय महत्त्वाची होती. ही बेटे ताब्यात घेवून त्यावर जलदुर्ग बांधल्यास मुंबईकर इंग्रज आणि जंजिरेकर सिद्यी यांच्यामधे चांगलीच पाचर मारता येईल हे हेरुन शिवाजीराजांनी खांदेरीचा किल्ला बांधायला घेतला महाराजांच्या या बेताचा सुगावा लागताच इंग्रजांनी खांदेरी बेटावर आमचा हक्क असल्याचे कारण पुढे करुन येथे किल्ला बांधण्याला विरोध केला. इंग्रजांना पोर्तृगिजांकडून मुंबई मिळाली होती. त्याच बरोबर खांदेरी आणि उंदेरी म्हणजे हेन्री आणि केनरी ही बेटेही मिळाल्याचा त्यांचा दावा होता.

महाराजांनी खांदेरी बांधण्याची महत्त्वाची जोखीम मराठी आरमाराचा अधिकारी असलेल्या मायनाक भंडारीवर सोपवली. मायनाक यांनी आपल्या कडव्या साथीदारांच्या सहाय्याने ती जबाबदारी स्वीकारली. एकशे पन्नास सहकारी आणि चार तोफांसहीत मायनाक खांदेरी बेटावर दाखल झाले. इ.स. १६७९ च्या जुलै मधे ऐन पावसाळ्यात खांदेरीचे बांधकाम सुरु झाले. इंग्रजांनी आपल्या आरमारासहीत येवून त्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. मायनाय यांनी इंग्रजांना न जुमानता काम चालू ठेवले. खांदेरीचे बांधकाम करणारे कामकरी इंग्रजांचा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रसंगी धारकरी होत. इंग्रजांचा विरोध मोडून काढत मायनाक यांनी खांदेरीचा जलदुर्ग उभा करुन स्वराज्यातील जलदुर्गांची मजबूती फळी उभी केली.

खांदेरीला जाण्यासाठी होडीतून निघाल्यावर डावीकडे उंदेरीचा जलदुर्ग दिसतो. साधारण तासाभरात आपण खांदेरीला पोहोचतो. खांदेरी बेटावर दोन उंचवटे आहेत. या दोन उंचवटय़ांच्या बेचक्यामधेच धक्का आहे. या धक्क्यावरच आपल्याला उतरावे लागते.

खांदेरीच्या या दोन टेकडय़ा मधली सपाटीची जागा आत घेऊन सभोवताली संपुर्ण तटबंदी बांधण्यात आली आहे. किल्ल्याचा दरवाजा मात्र नष्ट झाला आहे. मधल्या दोन टेकडय़ांमुळे गडाचे दोन भागात विभाजन झाले आहे. आपण डावीकडील वाट चालू लागल्यावर आपल्याला एक खडक लागतो. या खडकावर दगड आपटल्यास यातून धातूसारखा नाद करणारा आवाज येतो. येथून जवळच पीराचे ठाणे आहे. याच मार्गाने पुढे गेल्यावर लहान व मोठा मनोरा लागतो. या भागात आग्या वेताहाचे ठाणे आणि पाण्याचे हौद आहेत. खांदेरीच्या तटबंदीवर गाडय़ावर ठेवलेल्या तोफा आहेत. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. तटबंदीचे काम रचीव पद्धतीने केलेले असल्याने दोन चिर्‍याच्या मधे दर्जा भरलेला नाही. तसेच तटबंदीच्या बाहेरील अंगाला मोकळे चिरे टाकून दिले आहेत. त्यामुळे सागराच्या लाटांचा जोर कमी होतो. त्यामुळे मुख्य तटबंदीला कसलीही इजा पोहोचत नाही. भिंतीबाहेरच्या मोकळ्या चिर्‍यावर नेहेमीच सागराचा मारा चालू असतो त्यामुळे या चिर्‍यावर नेहेमीच सागराचा मारा चालू असतो त्यामुळे या चिर्‍यावर कोरल मोठय़ाप्रमाणावर वाढलेले आहे. पायाला सागराचे खारेपाणी लागताच आग होते. त्यामुळे पोहोचू शकत नाही. हे वेगळे तंत्र येथिल बांधकामामधे पहायला मिळते.

खांदेरीच्या गडफेरीमधे वेताळ मंदिर, हनुमान मंदिर बुद्ध मंदिर, क्रॉस, पीर अशी अनेक श्रद्धास्थाने पहायला मिळतात.

शिवरायांचे अजोड तंत्र आणि मायनाक भंडारीचे अजोड साहस आपल्याला चकीत करते. मायनाकाला सलाम करुनच आपण परतीच्या वाटेला लागतो.

  • प्रमोद मांडे

    'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल


  • No comments:

    Post a Comment


    Popular Posts

    Total Pageviews

    Categories

    Blog Archive