 ट्राऊझर
किंवा स्कर्टसारखा सुटसुटीत पेहराव वापरणारी आजची पिढी जुन्या पारंपरिक
पोषाखात, अलंकारात देखील तितकीच रमते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाजारात
दिसणारे, किंबहुना आज नव्याने उजाळा मिळालेले जुन्या प्रकारचे नवीन रूप
घेऊन आलेले दागिने. जुनी फॅशन फिरून परत येत असते हे काही नव्याने सांगायला
नको, पण जुनी फॅशन परत येताना त्यात काही तरी नवे बदल घेऊन येत असते.
या जुन्या फॅशनच्या अलंकारांची सुरुवात केली ती
‘देवदास’ किंवा ‘जोधा-अकबर’ सारख्या चित्रपटांनी. या चित्रपटांनंतर जुन्या
घसघशीत अलंकारांची लाटच आली. कुंदन आणि खडे जडवलेले गळाभर हार, मोठ्ठाले
कानातले, हातभर बांगडय़ा, िबदी, कंबरपट्टा, तोडय़ांसारखे सगळ्या प्रकारचे
अलंकार आज हाय फॅशन आहेत. आजची मराठी वधूसुद्धा अशाच प्रकारच्या अलंकारांना
पहिली पसंती देते. असे दागिने प्रत्येकालाच सोन्यात करणं परवडेल असं नाही.
परवडत असले तरी त्यांचं वापरण्याचं प्रमाण इतकं कमी असतं की, ते सोन्यात
घडवून घेणं तितकंसं गरजेचंही नाही.
घसघशीत दागिने इमिटेशनमधले घेणं अधिक पसंत केलं जातं.
दागिने जसे पत्र्याचे घडविले जातात तसेच चांदीतही घडवले जातात. एकाच
डिझाइनचे दागिने जर अस्सल कुंदन जडवलेले सोन्यातले घ्यायला जाल तर त्याची
किंमत लाखभर रुपयात जाईल, हेच जर पत्र्याचे असतील तर हजार-पाचशे रुपयाला
मिळतील. आमच्याकडे चांदीत घडणारे दागिने पाच-दहा हजाराला मिळतील.
आमच्याकडचे दागिने आयुष्यभर वापरता येतील, मात्र याला रिसेल व्हॅल्यू नसते
हेही तितकंच खरं.
याच जुन्या दागिन्यांचं आजचं वाढतं आकर्षण लक्षात
घेऊनच नुकतंच सुप्रसिद्ध पेठे ज्वेलर्सने जुन्या मराठी पद्धतीच्या
दागिन्यांना आधुनिक रूप देऊन घडवलं आहे. फॅशनच्या भाषेत बोलायचं तर याला
फ्युजन कलेक्शन म्हटलं पाहिजे. ‘बाजीराव-मस्तानी’ आणि त्यापाठोपाठ आलेल्या
शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील मालिकेने परत जुन्या मराठी पद्धतीच्या
अलंकारांना उजाळा दिला. त्यातही पेशवाई अलंकार वेगळे आणि शिवाजी
महाराजांच्या काळातले अलंकार वेगळे. लफ्फा, बाजूबंद, बोरमाळ, भोकरं, तन्मणी
यासारखी नावंदेखील आजच्या पिढीला माहिती नव्हती. ते अलंकार आज आवर्जून
वापरले जाऊ लागले आहेत.
आपले जुन्या मराठी पद्धतीचे अलंकार अस्सल सोन्यात
घडवले आहेत तसेच एक ग्रॅम सोन्यामधले किंवा चांदीवर सोन्याचं पाणी चढवूनही
बनविले जाऊ लागले आहेत. यात सध्या सगळ्यात लोकप्रिय असणारा प्रकार म्हणजे
कोल्हापुरी साज आणि कापडाच्या पट्टीवर लाखेचे मणी बांधून तयार होणारी ठुशी.
यावर साजेशा बांगडय़ा आणि कानातलेदेखील मिळतात. साडी असो वा सलवार-कमिज
दोन्ही पेहरावांवर हे दागिने तितकेच खुलून दिसतात हेही तितकंच महत्त्वाचं.
कोल्हापुरात देवळाच्या आसपासच्या दुकानांतून हे प्रकार शंभर-दीडशे रुपयांत
मिळतात, तर चांगल्या पेढीवर चांदीतले वा सोन्यात घडवले जाणारे हे दागिने
दोन हजारांपासून वीस हजाराच्या किमतीपर्यंत मिळतात. सोन्याची झळाळी,
सौंदर्य काही औरच असलं तरी चांदीवर सोन्याचं
पाणी चढवलेला साज किंवा ठुशी पॉलिश केलं की पुन्हा नव्यासारखी चमकायला
लागते. म्हणूनच चांदीत घडविल्या जाणाऱ्या या दागिन्यांना जास्त मागणी आहे.
एकूणच आज अस्सल सोन्यातल्या दागिन्यांपेक्षा
सोन्याच्या दागिन्यांचा आनंद देणाऱ्या त्याच बरोबर काही तरी वेगळा नवा
अनुभव देणाऱ्या दागिन्यांना अधिक मागणी आहे. त्यातूनच फिलिग्री अलंकारांना
परत उजाळा मिळू लागला आहे. फिलिग्री हा आंध्रच्या काही भागात, तर
प्रामुख्याने ओरिसात केला जाणारा कलाकुसरीचा प्रकार. फिलिग्री म्हणजे
सोन्याचा पातळ पत्रा ठोकून त्यावर जाळीदार नक्षीकाम करून त्या पत्र्यातून
अलंकार घडवले जातात. हे अलंकार मुळातच कमी वजनाचे असतात. कमी वजनाचे पण
घसघशीत दिसणारे हे अलंकार खूपच वेगळे असतात. म्हणूनच फिलिग्रीमधले अलंकार
परत फॅशनमध्ये येऊ लागले आहेत.
फिलिग्रीचं
जसं वेगळा प्रकार म्हणून आकर्षण वाटतं, तेच नेमकं थेवा ज्वेलरीबद्दल
म्हणता येईल. साधारण पंधरा एक वर्षांपूर्वी राजस्थानच्या या पारंपरिक
कलाप्रकारातील दागिन्यांची खूपच क्रेझ होती. पुढे चार-पाच वर्षांत थेवा
अलंकारांची चर्चा आपोआप कमी होऊ लागली. थेवा प्रकारात रंगीत काचेवर
सोन्याचा कलाकुसर केलेला पातळ पत्रा मढवून कलाकुसर केली जाते. लाल, निळ्या,
जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या, गुलाबी यासारख्या गडद रंगातले हे दागिने खूपच
देखणे दिसतात. त्यामानाने त्याच्या किमतीही अवाढव्य नसतात. मध्यंतरी
काहीसे मागे पडेलेले हे दागिने आता परत फॅशनमध्ये येऊ लागले आहेत. यावरून
लक्षात येतं की, पारंपरिक कलाप्रकार कालातीत असतात. ज्या साच्यात घडवू तसे
घडतात हे या पारंपरिक अलंकारांना दिल्या गेलेल्या आधुनिक रूपाकडे बघून आणि
या अलंकारांची असणारी वाढती क्रेझ बघून लक्षात येतं. |
|
No comments:
Post a Comment