Sunday, September 9, 2012

मनात राम, कृतीत श्याम..

आपल्या देशातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महागाई प्रचंड वेगाने वाढते आहे. त्यातच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ संभवते. आपले उत्पन्न त्या प्रमाणात वाढत नाही. अशावेळेस आपले अंदाजपत्रक साफ कोलमडून जाते; परंतु आर्थिक नियोजन केल्यास परिस्थिती आटोक्यात राहते. पुढील उदाहरणावरून हे अधिक स्पष्ट होईल.
राम आणि श्याम दोघे भाऊ. वय ३६ आणि ३३. दोघेही नागपूरमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झाले. श्याम इंजिनीअर होऊन सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला लागला. त्याला दोन मुले आहेत. वय वर्षे ६ आणि ३. श्याम ज्या कंपनीत नोकरीला लागला त्या कंपनीने त्याला अमेरिकेला पाठविले. ज्या कंपनीसाठी अमेरिकेत गेला त्या कंपनीने त्याला नोकरीत सामावून घेतले. लग्नानंतर पत्नी अमेरिकेत गेली व दोघांनी तेथील राहणीमान स्वीकारले. २००८ साली अमेरिकेत आलेल्या ‘सबप्राइम’ मंदीमुळे श्यामची नोकरी गेली. दोन-तीन महिन्यांत नवीन नोकरी न मिळाल्याने तो भारतात परतला. पुण्यामध्ये सॉफ्टवेअर कंपनीत दुसरी नोकरी स्वीकारली. मुले लहान असल्याने पत्नी नोकरी करीत नाही. सध्या त्याचे वार्षिक उत्पन्न १० लाख आहे. भारतात परतल्यावर त्यांनी आपल्या राहणीमानात काहीही बदल केलेला नाही. सध्या पुण्यात प्रभात रोडवर भाडय़ाच्या घरात राहतात. घरभाडे दरमहा २५ हजार. दोन्ही मुलांना केम्ब्रिज शाळेत घातले आहे. मासिक हप्त्यावर गाडी घेतली आहे. अमेरिकेतून येताना आणलेले सर्व पैसे बिल्डरला देऊन अधिक २० लाखांचे कर्ज घेतले आहे. ज्याचा हप्ता जवळपास २५ हजार असेल. हप्ता जागेचा ताबा मिळाल्यापासून सुरू होणार आहे. म्हणजे घरभाडे बंद होऊन मासिक हप्ता सुरू होईल. अमेरिकन राहणीमानाप्रमाणे दर रविवारी मॉलमध्ये जाऊन ते खरेदी करतात. येताना एखादा सिनेमा आणि चांगल्या हॉटेलमध्ये जेवण होते. दर तीन-चार महिन्यांनी ते जवळपास लहान ट्रीपला जातात व वर्षांतून एकदा १५ दिवसांसाठी मोठय़ा ट्रीपला जातात.
सर्व काही सुरळीत असताना चार महिन्यांपूर्वी कंपनीने श्यामला अर्धा पगार देण्यास सुरुवात केली आणि दोन महिन्यांपूर्वी कंपनीने नोकरीवरून काढून टाकले.
श्यामला दरमहा आकर कापून हातात ६८ हजार रुपये येत होते. त्यापैकी २५ हजार रुपये घरभाडे, मुलांच्या शाळेचा खर्च दरमहा १२ ते १३ हजार रुपये, उरलेले सर्व घरखर्चासाठी जात होते. शिल्लक रक्कम सर्व बिल्डरला दिल्याने जवळ रोकडसुलभ गुंतवणूक (इमर्जन्सी फंड) काहीही नाही. दोन महिने मित्रांच्या मदतीने काढल्यावर श्याम मनाने फार खचून गेला व त्याने बिल्डरला सांगून सदनिकेची नोंदणी रद्द करण्याची विनंती केली. बिल्डरने नवीन गिऱ्हाईक मिळाल्यावर मगच भरलेली रक्कम परत मिळेल, असे सांगितले. नाईलाजाने त्याने आपल्या वडिलांकडे नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला.
याउलट मोठा भाऊ राम. वय ३६. हा एमबीए मार्केटिंग विषयात झाला. त्यालाही दोन मुले. वय ८ व ५ वर्षे. मुले लहान असल्याने रामची पत्नी नोकरी करीत नाही. रामचे उत्पन्न दरमहा सर्व वजावट जाऊन ७५ हजार रुपये आहे. त्याने पाच वर्षांपूर्वी एक कोटी रकमेची टर्म पॉलिसी घेतली. त्याचा हप्ता २४ हजार रुपये दरवर्षी तो भरतो. १० वर्षांपूर्वी त्याने मुंबई उपनगरात दोन बीएचके सदनिका खरेदी केली. त्यासाठी त्याने १५ वर्षांकरिता कर्ज घेतले. दरवर्षी थोडी रक्कम जास्त भरून कर्जाची परतफेड केली. त्यामुळे कर्जाचे हप्ते कमी झाले व अजून एक वर्ष हप्ते भरणे बाकी आहे. दोन्ही मुलांच्या जन्मापासून दरमहा एक हजार रुपये प्रत्येकी एसआयपी १७ वर्षांसाठी चालू केले. ज्यायोगे त्यांच्या उच्च शिक्षणाची तरतूद काही प्रमाणात पूर्ण होऊ शकेल. धाकटय़ा मुलीच्या लग्नाची तरतूद म्हणून २५ वर्षांसाठी एक एसआयपी एक हजार रुपये जास्त चालू केले. राम आपल्या कुटुंबीयांसोबत वर्षांतून एकदा भारतातील एका राज्याची सहल करतो. दोन्ही मुले ‘मराठी संचालक मंडळ’च्या ७० वर्षे जुन्या शाळेत आहेत. त्यामुळे मुलांसाठी भपकेबाज शिक्षणाचा खर्च नाही. रामचा दरमहा खर्च साधारणत: २५ हजार रुपये. घरासाठी कर्जाचा हप्ता दरमहा ११ हजार रुपये व वाहन कर्ज हप्ता ५ हजार रुपये. त्याने म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात तीन लाख रुपये व बँकेत तीन लाख रुपये ठेवींसमोर कर्जसुविधा २.४० लाख रुपये घेऊन ठेवली आहे (वापरलेली नाही). या सहा लाख रुपये रोकड सुलभ गुंतवणुकांव्यतिरिक्त त्याच्या इतर गुंतवणुका शेअर्स, पीपीएफ, म्युच्युअल फंड सर्व मिळून २० लाख रुपये आहेत.
रामचा कंपनीत वरिष्ठांशी झालेल्या वैचारिक मतभेदांमुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घेतो. राजीनामा देण्यापूर्वी आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा म्हणून तो आर्थिक नियोजनकाराचा सल्ला घेतो. त्याच्याजवळ एक वर्ष खर्च भागेल इतक्या रोकड सुलभ गुंतवणुका आहेत. पीपीएफ किंवा म्युच्युअल फंडातील काही रक्कम गरज वाटल्यास काढून अजून एक वर्षांची सोय करता येईल. हे लक्षात आल्यावर राम आत्मविश्वासाने राजीनामा देतो व दुसरी नोकरी न शोधता छोटय़ा उद्योगांना मार्केटिंग सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतो. मोठय़ा कंपनीतील अनुभव आणि एमबीएची पदवी यामुळे त्याच सुमारास सुरू झालेल्या एका कॉलेजमध्ये अर्धवेळ प्राध्यापक म्हणून बोलावणे येते. उरलेला सर्व वेळ राम आपल्या व्यवसायवृद्धीसाठी देऊ शकतो. बाबा घरी सापडू लागल्याने दोन्ही मुले खूश झाली.
आपल्या मनात एक राम आणि एक श्याम दडलेला असतो. आपल्याला राम व्हावेसे वाटते, पण खूपदा कृती श्यामसारखी होऊन जाते. जगाला मंदीच्या ज्वाळांनी वेढल्यावर त्याची धग थोडीतरी आपल्यापर्यंत येणारच. याची पूर्वतयारी आधीपासूनच केलेली असेल तर त्रास कमी होतो. या परिस्थितीत टिकाव धरून ठेवण्यासाठी राहणीमान ‘खोटे’ वाढवून ठेवू नये. खूपदा आपण मुलांना आपल्या खोटय़ा स्टेटससाठी महागडय़ा शाळांत प्रवेश घेतो. मुलांना लहानपणी याचे सुख-दु:ख नसते. आपल्या भ्रामक कल्पना आपण मुलांवर लादत असतो. आपल्या उत्पन्नाच्या कमीत कमी ३० टक्के बचत होईल, ही काळजी घ्यावी. उत्पन्न जास्त असेल तर ही बचत अजूनही वाढू शकते. कारण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांचा खर्च त्या प्रमाणात वाढत नाही. गुंतवणूक पीपीएफ, म्युच्युअल फंड, बँक ठेवी इत्यादी वेगवेगळ्या स्वरूपांत विभागून ठेवावी. मॉलमध्ये जाताना क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड बरोबर नेऊ नये. खूपदा गरज नसताना वस्तू छान दिसते, आकर्षक वेष्टनात गुंडाळलेली असते म्हणून क्रेडिट कार्डवर घेण्याचा मोह होतो. शेवटी आनंद मॉलमध्ये विकत मिळत नाही. तो आपल्या आत असतो. आपली स्वत:ची आर्थिक बाजू भक्कम असेल तर त्याला धक्का लागत नाही.  
- जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive