तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा...
सजना है मुझे, सजना के लिए.. या गाण्याची नायिका
जरी तिच्या सजणासाठी सजत असली तरी नटणे, सजणे किंवा साजशृंगार करणे ही
स्त्रीसुलभ भावना सर्वत्र सारखीच आढळून येते. इंग्लंड, अमेरिकेसारख्या
प्रगत देशातील स्त्री असो किंवा मुंबई-पुणे यांसारख्या शहरातील असो वा
एखाद्या खेडेगावातील असो, इतकेच कशाला आदिवासी पाडय़ातील स्त्रीसुद्धा
साजशृंगार करण्यात काही कमी नसते. अर्थात शृंगार करण्याच्या पद्धतीत मात्र
फरक पडत जातो. बहुतांशी प्रगत देशांत मोती, हिरे, माणके यांपासून
बनविलेल्या दागिन्यांना जास्त मागणी असते तर आपल्या भारतामध्ये
सोन्या-चांदीच्या दागिन्यांना पहिली पसंती असते.
पूर्वी आपल्याकडे सोन्याचे भरीव दागिने करण्याची
पद्धत होती. कालांतराने सोने महागल्याने कमीतकमी सोन्यात दागिने बनविण्याची
प्रथा पडू लागली. त्यानंतर एक ग्रॅम सोन्यामध्ये दागिने बनविले जाऊ लागले.
सध्या चोरीच्या भीतीमुळे तसेच मॅचिंगच्या फॅशनमुळे इमिटेशन ज्वेलरीने बाजी
मारली आहे.
गेल्या आठ-दहा वर्षांत इमिटेशन ज्वेलरीच्या
उद्योगाने चांगलाच जोम धरला आहे. या उद्योगामध्ये अर्थातच स्त्रियांचे
प्रमाण फारच जास्त आहे. आधुनिक स्त्री ही केवळ शोभेची बाहुली न राहता
आपल्या घरसंसाराचा आधार ठरत आहे. बऱ्याचशा स्त्रिया नोकरी करण्याकरिता
घराबाहेर पडतात. परंतु ज्या स्त्रियांना दिवसभर घराबाहेर राहणे शक्य नसते
त्या आपल्याला झेपेल किंवा आपल्या आवडीचा असा उद्योग स्वीकारतात. अशाच
उद्योगांपैकी इमिटेशन ज्वेलरीच्या उद्योगात मनापासून रमलेल्या काही
स्त्रियांशी मारलेल्या गप्पा..
मुलुंड येथे राहणाऱ्या संध्या दाते या गेली सतरा
वर्षे या उद्योगात कार्यरत आहेत. सुरुवातीला नोकरी नसल्यामुळे व
दागिन्यांची पहिल्यापासूनच खूप आवड असल्यामुळे या उद्योगाला त्यांनी
सुरुवात केली. साडय़ा व दागिने हे स्त्रियांचे वीकपॉइंट असल्यामुळे
त्यांच्या बहिणीचा असलेला साडी विक्रीचा व्यवसाय व संध्याताईंचा
दागिन्यांचा व्यवसाय हा एकमेकींना पूरक ठरला. त्यांच्याकडे असलेले दागिने
चांदीवर सोन्याचे पॉलिश असलेले असतात. ते चांगल्या प्रतीचे असल्यामुळे
त्वचेला रॅश उठणे
किंवा हानिकारक असे काहीही होत नाही. हे दागिने त्या कोलकात्याहून
मागवितात. स्टॉलचे भाडे वाढल्यामुळे हा व्यवसाय त्या घरोघरी जाऊन करतात.
माऊथ पब्लिसिटी करण्यात स्त्रियांचा हात कोणीही धरू शकत नाही याचा
संध्याताईंना मात्र चांगलाच फायदा झाला. त्यामुळे त्यांचा व्यवसाय
डोंबिवली, कल्याण, अंबरनाथपासून पुणे-हुबळीपर्यंत पसरत गेला.
पुणे येथे राहणाऱ्या सोमणवहिनींकडे गेले असता त्या
आपल्या मैत्रिणींना तसेच नातेवाईक स्त्रियांना आवर्जून बोलावितात. त्यामुळे
पंचवीस ते तीस हजारांचा माल जातोच जातो. हा माझा नेहमीचा अनुभव आहे, असे
संध्याताई म्हणाल्या. पुण्याला गेल्यावर मला आपल्या नातेवाईकांकडे
गेल्यासारखे वाटते. कारण चहा-नाश्त्यापासून ते अगदी जेवणापर्यंत माझी
सरबराई करतात. इतकेच नव्हे, तर पुण्याहून मुंबईला येताना त्या खाऊची पुडी व
पाण्याची बाटली द्यायला विसरत नाहीत.
तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे दागिने असतात, असे
विचारले असता त्या म्हणाल्या, माझ्याकडे गुजराती, मारवाडी गिऱ्हाईके
नसल्यामुळे मोठमोठे हेवी सेट नसतात, तर महाराष्ट्रीय पद्धतीचे दागिने
असतात.
लग्नाचा सीझन सोडला तर तुमच्या व्यवसायाची परिस्थिती
कशी असते? संध्याताई हसून म्हणाल्या की, माझ्याकडे ऑफ सीझन असा कधी नसतो.
पण आजकाल माझ्या व्यवसायात बरीच स्पर्धा निर्माण झाली आहे. कमीतकमी किमतीचा
माल विकण्याकडे तसेच खरेदी करण्याकडे लोकांचा कल असल्याची खंत त्यांनी
व्यक्त केली.
अशा प्रकारे हौसेतून सुरू केलेला हा व्यवसाय त्यांच्या यजमानांची नोकरी गेल्यावर संसाराला आधार ठरला.
संध्याताईंप्रमाणे गिरगावात राहणाऱ्या वेदश्री रेगे
यांचा हौसेपोटी सुरू केलेला इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय दहा वर्षांनंतर
चांगलाच फोफावला आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच दागिन्यांची आवड होतीच,
त्यात एकदा दागिन्यांचे प्रदर्शन बघायला गेल्यावर ते खूपच आवडले व त्यातून
स्फूर्ती घेऊन त्यांनी स्वत: ज्वेलरी मेकिंगचा कोर्स पूर्ण केला व अशा
प्रकारे त्यांच्या इमिटेशन ज्वेलरीच्या व्यवसायाला सुरुवात झाली.
सुरुवातीला हा व्यवसाय घरगुती स्वरूपात होता. जसजशी
मागणी वाढत गेली तसतसे त्यांनी प्रदर्शने भरवायला सुरुवात केली. स्वत:
दागिने बनवीत असल्यामुळे किंमत कमी होती व दर्जा उत्तम होता. त्यामुळे
मागणीचा आलेख सतत उंचावत गेला. यातूनच आपल्यासारखी आवड असलेल्या व गरजू
स्त्रियांसाठी एखाद्या दागिने बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले तर? असा
विचार त्यांच्या मनात डोकावला व त्यातूनच त्यांच्या पहिल्या कार्यशाळेला
सुरुवात झाली. बघताबघता आतापर्यंत सुमारे आठशे
मुली व स्त्रियांना त्यांनी कार्यशाळेमार्फत प्रशिक्षित केले आहे.
मुंबईतील कोणत्याही उपनगरांमध्ये जर दहाजणींचा ग्रुप बनविला तर वेदश्रीताई
त्यांच्याकडे जाऊन दागिने बनविण्याचे प्रशिक्षण देतात.
दागिने बनविण्यासाठी लागणारे सामान त्या जयपूर व
सुरत येथून आणतात. मोती व कुंदन यांपासून बनविलेल्या दागिन्यांना
त्यांच्याकडे जास्त मागणी आहे. महाराष्ट्रीय गिऱ्हाईके जास्त असल्यामुळे
मोत्यांच्या दागिन्यांना जास्त पसंती असते. असे त्या म्हणाल्या.
मोती व कुंदन यांपासून तर त्या दागिने बनवतातच, पण
मशीनवर बनविण्याचे दागिन्यांचे डिझाइनसुद्धा त्या काढून देतात व
त्याप्रमाणे दागिने बनवून घेतात. लग्नाच्या सीझनमध्ये काम खूप असते. अशा
वेळी त्यांनी प्रशिक्षित केलेल्या मुलींची खूपच मदत होते, असे त्या
म्हणाल्या.
डोंबिवली येथे राहणाऱ्या रोहिणी शिधये २००३ पासून या
व्यवसायात आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सांगितले की, त्यांना
पहिल्यापासूनच विणकाम तसेच मोत्यांच्या महिरपी बनविणे याची आवड होती.
त्यांची मैत्रीण दागिने बनविण्याचा क्लास घेत असे. रोहिणीताईंना आवडही होती
व सवडही होती. त्यामुळे आपणही हा क्लास करावा असे मनात आले. प्रशिक्षण
पूर्ण झाल्यावर त्या थांबल्या नाहीत. त्यांनी त्याचा उपयोग आपली आवड जपत
व्यवसायासाठी केला व आता तर त्यांच्या व्यवसायाचा वेलू सातासमुद्रापार
अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे.
दागिने बनविण्यासाठी लागणारे मोती, कुंदन, घुगरी
यांचे बरेच प्रकार भुलेश्वर येथे चांगले मिळतात. त्यामुळे रोहिणीताई तेथूनच
आपले सामान आणतात.
सुरुवातीला त्या स्टॉल लावत असत; परंतु हल्ली त्या
घरातूनच आपला व्यवसाय करतात. कारण त्यांच्या मालाच्या दर्जामुळे तसेच
गिऱ्हाईकांच्या घरगुती संबंधांमुळे त्यांची ठरलेली गिऱ्हाईके इतर ठिकाणी न
जाता त्यांच्याशीच बांधलेली आहेत.
रोहिणीताईंच्या मते स्त्रिया या फारच चिकित्सक
असतात. त्यातच दागिने हा स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे नवीन
आलेल्या गिऱ्हाईकांच्या अनेक शंकांचे निरसन त्यांचे समाधान होईपर्यंत करावे
लागते. अशा वेळी घडय़ाळाचे काटे किती पुढे जातात हे लक्षातही येत नाही.
पण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मात्र सकाळी
घडय़ाळाच्या काटय़ानुसार आवरून आपली ठरलेली लोकल मिळेल की नाही अशा विचारात
घराबाहेर पडावयाचे, संध्याकाळी थकूनभागून गर्दीतून वाट काढत स्टेशन
गाठावयाचे आणि पुन्हा चौथ्या सीटसाठी आटापिटा करत गर्दीतूनच लोकल पकडून घरी
यावयाचे, आल्यावर पुन्हा पदर खोचून स्वैंपाकाला जुंपायचे. यामध्ये त्यांना
आपली आवड जपायला कोणता वेळ मिळणार. कदाचित आपली आवड कोणती याचा विचार
करण्याची सवडही त्यांना मिळत नाही. अशा परिस्थितीत संध्याताई, रोहिणीताई,
वेदश्रीताईंसारख्या स्त्रिया इमिटेशन ज्वेलरीच्या उद्योगात काम करताना आपली
आवड जपत संसारालादेखील हातभार लावत आहेत. यावरून त्यांच्या बाबतीत असे
म्हणावेसे वाटते..
सांभाळुनी संसार,
केले वेगवेगळे हार,
त्यातून जाहले अर्थार्जन,
आनंदले माझे मन,
लाभले मज समाधान! |
|
I would like to add more information with reference to above post on wide array of jewelry including antique jewelry, victorian jewelry, imitation jewelry, pearls, gemstones and many more. imitation jewellery
ReplyDelete