Monday, July 16, 2012

अंतर्मुख करणारा ललितबंध - Gavzhula - Shyam Pethkar - Vijay Prakashan

मातेच्या उदरातून सुरू झालेला प्रत्येक प्राणिमात्राचा प्रवास स्मशानात थांबतो. एखादाच गौतम बुद्धासारखा योगी साऱ्या संसार-सुखांना लाथाडून ' आत्मशोधना ' च्या वाटेवर आपली पावलं उमटविण्याचा प्रयत्न करतो. असाच एका गावातील दुःखाने व्याकुळ झालेला बैरागी गुरुच्या आदेशावरून घर सोडतो. हाती मातीचं गाडगं नि काठी घेऊन भारावल्यागत फिरस्ती करू लागतो. देहव्यापारांची पर्वा न करता अलिप्तपणे भटकंती करीत रहातो. वाटेत येणाऱ्या गावांमध्ये न गुंतण्याचा निश्चय करूनच घर सोडल्यामुळे कुठल्याच मोहात तो अडकून पडत नाही. बैराग्याच्या या प्रवासात वाचकास त्याच्यासोबत ' चालता ' ठेवण्यात श्याम पेठकर लिखित ' गावझुला ' हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे.

नदीकाठ , नदीचा डोह , मंदिर , गावाचा दिंडी दरवाजा , गावाची वेस , स्मशान , देणाऱ्यांचा गाव... अशा अनेक वळणांवर मनुष्यस्वभावाचे कंगोरे बैराग्यास उमगत जातात. श्रम करणाऱ्या शोषितांची गावं त्याला अस्वस्थ करतात. धर्माच्या नावाखाली चाललेली मुक्या प्राण्यांची कत्तल त्याच्या मनाला जाळत जाते. दगडांवर दुधाचा अभिषेक करणारी माणसं दुधासाठी बालकांचे ओठ कोरडे ठेवताना पाहून बैराग्याचं मन उद्विग्न होतं. सत्ता , धर्म नि सुंदरींसाठी होणारी युद्धं , वाटेत येणाऱ्या गावांमध्ये त्याला बघावी लागतात. जमेल तिथं हे सर्व थांबविण्याचा तो प्रयत्नही करतो. पण त्यात गुंतून पडत नाही. अळवावरल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे अलिप्त राहून मार्गदर्शकाची भूमिका बजावत रहातो. ही ' गावझुला ' ची साधारण कथावस्तू.

बैराग्याच्या पावलांच्या ठशांसोबत एखाद्या झऱ्याप्रमाणे सहज वहात येणारी सुभाषितवजा वाक्यांची पेरणी वाचकास गुंग करून सोडते. वर-वर पाहता काहीशी दुर्बोध वाटणारी शब्दयोजना पाच-सहा पृष्ठांनंतर सुबोध वाटू लागते ; नि मग भावू लागते. त्यातील मर्म समजू लागते.

' गावझुला ' तील सर्व लेख आधी सदरस्वरूपात प्रकाशित झाल्यामुळे प्रत्येक प्रकरणाला वेगळा क्रमांक आहे. तरीही पुस्तकात व्यक्त झालाय तो एक सलग ललितबंधानुभवच. चिंतनात्मक अनुबंध हे याचं ठळक वैशिष्ट्य. बैराग्याचा प्रत्येक वळणावरचा प्रवास वाचकाला अंतर्मुख तर करतोच पण नव्या जाणिवांचा स्पर्शही करून जातो. ' आपल्या अवती-भवती चालणारी कर्मकांडं , दांभिकता , हक्क नि अधिकार मिळविण्यासाठी शोषितांची होणारी परवड , सत्ताधाऱ्यांचे नि व्यापाऱ्यांचे दुटप्पी राजकारण , निरक्षरांची होरपळ नि स्वतःला सिद्ध करण्यासाठी अतिसामान्यांना करावा लागणारा संघर्ष... ' हे सगळं काळजाला भिडणाऱ्या शैलीत मांडण्याची लेखकाची हातोटी स्पृहणीय.

निराकार जगात एकटा जगणारा मंदिरातील अंध म्हातारा , झाडलोट करून परिसर स्वच्छ ठेवणारी म्हातारी , गावदिंडीपाशी राखण करणारा राखणदार , आपली फाटकी झोळी जीवापाड जपणारा भिकारी , सिंहासनावर नि सत्तेवर अधिकार सांगण्यास उत्सुक असलेले मालक , पुजारी नि पायदंड , मनुष्यबळी देणारा मनुष्यरूपी राक्षसांचा जत्था , पैलतीरावर प्रवाशांना सोडणारा नावाडी , स्वतःच्या पोरासाठी तिळतिळ तुटणारी बैराग्याची माय नि त्याला मार्गदर्शन करणारे पण न दिसणारे त्याचे गुरू... अशा अनेक व्यक्तिरेखांची योजना या आत्मशोधनाच्या प्रवासात लेखकाने अत्यंत खुबीने केली आहे. या व्यक्तींमध्ये बैरागी गुंतत नाही , पण वाचक मात्र गुंतून जातो. गावझुलाची ही जमेची बाजू.

कथा-कादंबऱ्यांमध्ये रमणाऱ्या वाचकांनी हे पुस्तक वाचताना थोडसं गंभीर होणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक प्रकरणातील एखादं वाक्य जरी उडत-उडत वाचलं गेलं तरी पुढचे संदर्भ उलगडणं कठीण होऊन जाईल. पण एकदा वाचलेलाच परिच्छेद पाठी फिरून पुनःश्च वाचण्याचा मोह वाचकाला आवरता येणार नाही. इतकंच नव्हेतर भावलेल्या शब्दरचना व जीवनातील सत्य परखडपणे मांडणारी वाक्यं अधोरेखित करण्यास वाचक उद्युक्त होईल. उदा. ' आपल्याला उमगले तेच सत्य या भासात गुरफटणं म्हणजेच माया. ', ' माणूस दैवतांच्या मागे वेडा झाला की त्याच्यातलं सत्व संपतं. ', ' जे कधीच हाती लागत नाही त्याची ओढ वाटणं म्हणजे प्रेम अन् जी आपली असूनही कळत नाही ती ममता. '... अशा वाक्यांमध्ये नि आकृतीबंधात एकदा का तुम्ही स्वतःला सामावून घेतलंत की मग पुढील प्रवास सुगम होईल.

बैराग्याला उमगत चाललेलं आत्मशोधन मांडताना लेखकाने बैराग्याचा तोल कुठेही जाऊ दिलेला नाही. समोर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात बैरागी विचारपूर्वक सामोरा जातो. लौकिकार्थाने तो फाटका असला तरी तो दुबळा नाही. तो कुठेही भरकटत नाही. साधक व शोधकांकडून असाच समतोल अपेक्षित असतो असं लेखक अधोरेखित करतो. आपलं आभाळ मोठं आहे याची जाण बैरागी प्रत्यक्ष आपल्या मातेला देतो नि माऊलीच्या मोहापासून दूर जातो. कारण त्याला जाणीव आहे की , वर्षानुवर्षं अंधाराचं घोंगडं पांघरून

निपचित पडलेल्या जीवांना उजेडाची शाल खांद्यावर मिरवून ताठ मानेनं जगण्याचं बळ देणं , हे आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठी मोहमायेचा त्याग करून वाट तुडविणंच आपल्या प्रारब्धात आहे.त्याच्या या प्रवासात येणारा निसर्ग मात्र लेखकाच्याच भिंगातून पहावा. वाचावा. जे निसर्गाचं तेच गावांचं. गावातील वास्तवाचं वर्णन लक्षवेधी. एक संपूर्ण वास्तू म्हणून गावाकडे बघण्याची दृष्टी लेखकाने जागवली आहे. अफाट निरीक्षणशक्ती आणि रूपकांचं भन्नाट उपयोजन ही लेखकाची बलस्थानं.

बैराग्याच्या निष्काम वृत्तीचं प्रतिबिंब त्याच्या हातातील काठी नि मातीच्या वाडग्यात दिसते. त्याच्या प्रवासातील या सच्च्या सोबत्यांची शेण-मातीच्या पार्श्वभूमीवरील मांडणी आणि पठडीबाहेरील पुस्तकाचा आकार वाचकाला ' गावझुला ' कडे वेधून घेतो. मुद्रित शोधनातील काही त्रुटी वगळता ' विजय प्रकाशन ' ने सादर केलेला व श्रीनिवास वैद्य यांनी संपादित केलेला ' गावझुला ' हा दीर्घ ललितबंध वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडेल यात शंका नाही.
.................................................................

गावझुला
श्याम पेठकर
प्रकाशक - विजय प्रकाशन , नागपूर
पृष्ठं - ३२४
किंमत - २५० रु. 


मधुमती जोगळेकर-पवार 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive