Monday, July 16, 2012

Guidance for young minds

मी २१ वर्षांचा आहे. माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी लहान असणारी मुलं जेव्हा मला एखाद्या गोष्टीवरून डिवचतात , चिडवतात तेव्हा फार वाईट वाटतं. मनात येतं की त्यांना शासन करावं. पण त्यांच्यापेक्षा मोठा असल्याने मी लाजेखातर गप्प राहतो. याला माझ्या वयाचा दोष म्हणावं की अजून काही ?

निलेश कदम , नारायणगाव-पुणे

उत्तर - निलेश , आपल्या प्रत्येक कृतीमागे आपली एक belief system असते , म्हणजे ज्या गोष्टींवर आपली गाढ श्रद्धा , विश्वास आहे अशा आपल्या समजुती , आपल्या कृतींना guide करत असतात. दुसऱ्या कोणाला घालूनपाडून वा टोचून बोलू नये अशी एक धारणा तुझ्या belief system ची आहे. दुसऱ्याला टोचून बोलू नये असं तुला वाटत असताना दुसरेही तुझ्या मनाला टोचणारं , तुला डिवचणारं असं काही बोलू नयेत अशी धारणाही या belief system चा भाग आहे. त्यामुळे दुसरं कुणी तुला डिवचलं , चिडवलं तर तुला वाईट वाटतं , तू upset होतोस.

तुला चिडवणाऱ्या मुलांना शासन केल्यानं प्रश्न सुटेल का , निलेश ? नाही , त्याने कदाचित प्रश्न अधिक चिघळू शकतो. पण तुला ती मुलं चिडवतात , डिवचतात म्हणून तू गप्प राहावं का ? तर मुळीच नाही. निलेश , तू तुझ्या भावना दडपून ठेवतोस. मनात साचलेला हा तुंबारा आता ओकून टाक. तुला ज्या गोष्टी आवडत नाही , ज्या गोष्टींचं वाईट वाटतं ते सारं त्या चिडवणाऱ्या , दुखावणाऱ्या मुलांशी तू स्वच्छपणे शेअर कर... बघ तुला किती हलकं वाटेल ते. आपल्या भावना स्पष्टपणं , मोकळेपणानं , अगदी आहे तसं व्यक्त केल्यानं तुझ्या प्रश्नाचं ८० टक्के निवारण होईल. दुसरी गोष्ट तू ध्यानात ठेव की आपल्या भावना व्यक्त करत असताना तुझा ठामपणाही समोरच्यांना जाणवला पाहिजे. तुला जी गोष्ट आवडत नाही , ती यापुढे होऊ नये अशी स्पष्टोक्ती तुझ्या बोलण्याच्या आर्विभावावरून वाटली पाहिजे.

आणखी एक बाब लक्षात ठेव. तुला चिडवणारी , डिवचणारी ती मुलं खरंतर भेकड आहेत. त्यांच्यात न्यूनत्व , न्यूनगंड आहे व त्यांना मदतीची गरज आहे. आपलं म्हणणं ठामपणे मांडून तू त्यांना त्यांच्या कृत्यांविषयी विचार करायला प्रवृत्त करू शकतोस , ही धारणा तू तुझ्या belief system चा भाग बनव. व त्याप्रमाणे वर्तन कर.

माझ्या घरातले सगळेजण माझ्या लग्नाची घाई करताहेत. माझं वय आहे २४ वर्षं. मी लाँड्रीचं दुकान चालवतोय. पण जिथं जिथं मी लग्नाकरता मुली पाहायला जातो , तिथं तिथं मुलीकडच्या लोकांना नोकरी करणारा मुलगाच हवा असतो. पण मला job करायची इच्छा नाही. मात्र , माझ्या कुटुंबियांनादेखील वाटतं की मी जॉब करावा. माझं असं मत आहे की मी समोरच्या व्यक्तीसाठी इच्छेविरुद्ध वागून का बदलावं ? कृपया मार्गदर्शन करावं.

शिवानंद जाधव , धंतोली-नागपूर

उत्तर - शिवानंद , प्रत्येक विवाहेच्छुक मुला-मुलींच्या जोडीदाराविषयी अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात. एखाद्या मुलीला नोकरी करणारा मुलगा जोडीदार म्हणून हवा असं वाटू शकतो , तर दुसऱ्या एखादीला व्यवसाय करणारा मुलगा. आपलं समाजवास्तव जर पाहिलं तर एकदोन गोष्टी तुला चांगल्या ठाऊक असाव्यात. पहिली गोष्ट , लग्नात बाजारुपण बऱ्यापैकी आलं असल्याचं दिसतंय. भावी वर व वधूचं पद्धतशीरपणे branding ( ब्रँडींग) होताना तुला दिसत असेलच. हे branding विवाहेच्छुक मुलं-मुली काही प्रमाणात स्वतः करताना तुला दिसतील , तर बऱ्याचदा त्यांचे पालक ते करताना दिसतं. आपण इतरांपेक्षा किती सरस , अनुरूप आहोत हे ठसवण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. दुसरं , ज्यांची लग्नं व्हायची असतात , ती मुलं-मुली भावी जोडीदारांशी स्वतःबद्दल , स्वतःच्या आशा-आकांक्षा , जोडीदाराविषयीच्या कल्पना या सर्वांबद्दल (विवाहापूर्वी) मोकळेपणाने बोलताना किती दिसतात ? फारच कमी.

तर या दोन गोष्टी जर तुझ्या निरीक्षणात आल्या असतील , तर तू त्यावर तुझी भूमिका विचार करून ठरव. लग्नाच्या बाजारात तुला स्वतःचं branding करावं लागेल. आणि मग यात स्वयंरोजगार केल्याने तुझ्या व्यक्तिमत्वाचा-कौशल्यांचा विकास तू कसा करतोयस वा करू शकतोस , वेळेच्या नियोजनापासून स्वयंरोजगार केल्याने तुला जे स्वातंत्र्य , आत्मविश्वास मिळतोय (जे असुरक्षित जॉब केल्याने मिळेलच असं नाही) याविषयी स्वतःला प्रस्तुत करू शकतोस. लाँड्रीचा व्यवसाय केल्यानेही तुझं मासिक उत्पन्न पुढे कसं वाढू शकतं याचा आधी स्वतः विचार करून , मग तो तू समोरच्यापुढे ठेवू शकतोस. तू मांडलेला प्रश्न अतिशय समर्पक आहे की , समोरच्या व्यक्तीसाठी स्वतःच्या इच्छेविरुद्ध आपण का बदलावं ? देशाच्या घटनेने प्रत्येकाला स्वतःच्या आवडीप्रमाणे नोकरी वा व्यवसाय करण्याचा हक्क दिलेला आहेच.

शिवानंद , वर मांडलेल्या दुसऱ्या निरीक्षणाचा विचार करून लग्नानिमित्त भेटणा-या मुलींशी तू तुझ्या आशा-आकांक्षाविषयी खुलेपणाने बोलत जा. नोकरी करणारा मुलगा हवा अशी अपेक्षा ठेवणाऱ्या जशा मुली समाजात असतात , तशाच व्यवसाय करून स्थिरस्थावर असलेल्या मुलांविषयीही अपेक्षा बाळगणाऱ्या - सामंजस्य दाखवणाऱ्या मुली असतातच , हे समजून घे व अनुरुप जोडीदार शोधण्याचा तुझा प्रयत्न चालू ठेव.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive