Monday, July 16, 2012

Konkani Titanik Story - S S Ramdas Ship

 

कोकणी टायटॅनिकला जलसमाधी

तब्बल ६५ वर्षांपूर्वीची घटना. प्रवाशांना घेऊन निघलेली एस.एस. रामदास बोट रेवसजवळ बुडाली आणि साडेतीनशे प्रवाशांना जलसमाधी मिळाली. आपल्याकडे टायटॅनिकला मिळालेल्या जलसमाधीच्या आठवणी पुनःपुन्हा काढल्या जातात. परंतु रामदासच्या उत्खननाचा मात्र आजवर कधीच प्रयत्न झालेला नाही...


१६ जुलै १९४६ , आषाढ अमावास्या.

आमचे एक शेजारी श्री. दामले त्यांच्या बहिणीकडे अलिबागला निघाले होते. बॅग घेऊन लगबगीने जिना उतरलेसुद्धा ! इतक्यात खालून हाळी देत , जुनेरे नेसलेली , कमरेला एक अर्भक लोंबकळत असलेली भिकारीण जोरजोरात ओरडत आली - ' आवस् वाढा... आव SSS स माई... लेकराला काही शिळपाळं , एखादं चिरगुट द्या हो SS, ईडापिडा टळंल... आवस् वाढा आव SS स. ' वास्तविक दर अमावास्येला थोड्याफार फरकाने हे चित्र आमच्या वसाहतीत असायचंच. त्याकडे फारसं कोणी लक्षही देत नसत.

पण ही हाळी ऐकून शेजारच्या दामले आजी लगबगीने बाहेर आल्या आणि त्यांनी हात हलवून निरोप देणाऱ्या आपल्या लेकाला हाक दिली. ' अरे SS वर ये रे SS.'

दामल्यांना वाटले बरोबर देण्याचे काहीतरी राहिले असावे. माऊलीने त्यांच्या हातातील बॅग घेऊन फर्मान सोडले. ' आज अमावास्या आहे. कधी नव्हे तो अलिबागेस निघाला आहेस. आज नको जाऊस. अपशकुनी दिवस , शिवाय दोन दिवसांपासून पाऊस मुंबईला झोडपतोय , तो अलिबागेतही असणारच. ' आज्ञाधारक लेकाने जाणे रद्द केले. ओलाचिंब दिवस हिरमुसल्या दामल्यांनी घरात काढला.

मात्र संध्याकाळी आम्ही मुले शाळा संपवून घरी परत आलो , तेव्हा दामल्यांच्या घरात आनंदी वातावरण होते. त्यात दोन्हीकडचे शेजारीही सहभागी झाले होते. आमच्या बालमनाला उमजेना , काय झालंय ? काही वेळातच रेडिओवरून घोषित करण्यात आलेल्या बातमीची चर्चा सुरू झाली. अलिबागकडे जाणारी बोट बुडाली. रामदास बोटीला जलसमाधी. प्रवासी वाचले असल्याची शक्यता कमी. दामल्यांच्या घरात आनंद का साजरा होत आहे , ते तेव्हा कळले.

दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांत पहिल्या पानावर ठळक बातमी- ' रामदास ही अलिशान बोट वादळात सापडून मुंबईपासून वीस सागरी मैलावर बुडाली. अलिबागकडील गावाकडे निघालेल्या साडेतीनशे प्रवाशांचा शोध जारी. ' पुढील चार-आठ दिवसांत कोण बुडाले , कोण वाचले त्यांची नावे झळकू लागली.
' एस् एस् रामदास ' ही खरेतर कोकण किनाऱ्यावर प्रवासी आणि सामान वाहतूक करणारी आरामदायी मोठ्ठी बोट. तीन मजल्यावरच्या चार वर्गांमधून साडेसहाशे प्रवासी घेऊन जाणारी. सिंदीया स्टीमशिप कंपनीची उपकंपनी बॉम्बे स्टीम नेवीगेशन (बीएसएन)-ला मुंबईपासून गोव्यापर्यंत कोकणच्या डझनभर बंदरांकडे प्रवाशांची वाहतूक करण्याची मक्तेदारी असलेली कंपनी. या सेवेसाठी त्यांच्याकडे आठ-दहा बोटींचा ताफा होता. त्यातील काही बोटी दुसऱ्या महायुद्धाची इतिश्री झाल्यानंतर नाविक दलाकडून घेतलेल्या. त्यामुळे कोठल्याही आपत्कालीन परिस्थितीला सहज तोंड देणाऱ्या. यांना सप्टेंबर ते मे अखेर या वाहतुकीचा परवाना होता. त्यानंतर जून ते ऑगस्ट या पावसाळी मोसमात त्यांना नांगर टाकून बसावे लागे. मात्र त्या काळातही त्यातील एखादी बोट मुंबईपासून बावीस सागरी मैलावर असलेल्या रेवस बंदराकडील वाहतूक मार्गावर सोडली जात असे. कारण तेथे नेहमी जाणारी काहीशी लहान असलेली ' शोभना ' बोट त्या रफ हवामानात वाहतुकीला धोक्याची होती.

आठ महिने कोकणी बंदरांकडे प्रवास करून थकलेली ' रामदास ' त्यावर्षी मुंबई-रेवस हा प्रवास दिवसातून एकदा करीत असे. आणि मॉन्सूनमधील वादळ असो , धुम्मेदार पाऊस असो , प्रवासी निर्धास्तपणे यातून प्रवास करीत असत , कारण तिचा अवाढव्य आकार. त्या दिवशी होती आषाढी अमावास्या. गेले दोन दिवस मुंबईकर कोसळणाऱ्या पावसाला उसंत नव्हती. तशीच त्या दिवशीही सकाळपासून धुम्मेदार पर्जन्यवृष्टी चालू होती. जोरदार वाराही वाहत होता. भाऊच्या धक्क्यावर ' रामदास ' प्रवासाला सज्ज झाली होती. एव्हान तुफान वादळाचीही चाहूल लागली होती. बीएसएन कंपनीचे एक अधिकारी श्री. थत्ते हे आपल्या मुलीला अलिबागच्या वाटेवर सोडण्यासाठी आले होते. त्यांनाही समुद्रावरील वादळ भयकारी वाटले. शिडीवर चढता-चढता त्यांनी आपल्या लेकीला परत बोलावले आणि आजचा प्रवास रद्द करण्यास सांगितले. हिरमुसली लोक परतली. श्री. थत्तेंना बोट सोडणे न सोडणेचा अधिकार बहुधा नसावा. एव्हाना दोनअडीचशे प्रवासी बोटीवर चढले होते. नेहमीच्या सवयीचे प्रवासी सोडले , तर इतरांच्या मनात धाकधूक होती. बोटीचा कॅप्टन मुल्ला , आभाळाकडे पाहत धक्क्यावर उभा होता. बोटीवरचे सगळे फ्लॅगस् जोराजोरात फडफडत होते. आज न्यावी का बोट , रेवसकडे ? या विचारात कॅप्टन द्विधा मनःस्थितीत होता. सराईत प्रवासी घरी जाण्यास अधीर झाले होते. त्यांनी कॅप्टनला समजावले , ' अहो या बोटीने कोकणातील प्रवाससुद्धा आम्ही शंभर वेळा केला आहे. कोणत्याही वादळाला तोंड देणारी ही रामदास. चला हाका. ' अखेर सकाळी साडेदहाला बोटीने नांगर उचलला आणि ती रेवसकडे दीड तासांच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली. पण काही वेळातच डोलू लागली. तासाभरात बोट काशाच्या खडकाजवळ आली. डाव्या बाजूने तो ओलांडला की दहा मिनिटांत रेवस. अमावास्येची उधाणाची भरती सुरू झाली होती. सहा-सात फुट उंचीच्या लाटांचे तडाखे बोटीवर आदळू लागले. प्रवासी आता मात्र भयभीत झाले. एका अजस्र लाटेच्या धडकेने बोट डाव्या अंगावर कलंडली. खालच्या डेकवरील वर आलेले आणि इतर प्रवासीही एका बाजूला धावले. कॅप्टन आणि खलाशी त्यांना ओरडून एका बाजूला जाऊ नका असे फर्मावत होते. कॅप्टनने बोट मुंबईला परत नेण्यासाठी उलटी फिरविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळेस आदळलेल्या एका महाकाय लाटेने बोट उलटीपालटी केली. बोटीवर हाहाःकार उडाला. प्रवाशांना लाईफ जाकीटही घेण्याचीही सवड न देता ती प्रचंड आकाराची रामदास उसळलेल्या सागराने गिळंकृत केली. काही प्रवासी फेकले गेले , तर काहींना बोटीसह समुद्राला कवटाळावे लागले.

बोटीवरील संपर्क यंत्रणा आधीच बंद पडली होती. त्यामुळे दिवसभरात अशी दुर्घटना जवळच घडली आहे , हे मुंबईत समजलेही नव्हते. सायंकाळी रामदासचा कॅप्टन पोहत-पोहत कुलाब्याच्या किनाऱ्याला लागला , तेव्हा रामदासला समुद्राने पोटात घेतल्याची वार्ता रेडिओवरून प्रसारित झाली. प्रवासाला निघालेल्यांच्या नातेवाईकांनी बीएसएनच्या कार्यालयाकडे धाव घेतली. पट्टीचे पोहणारे आणि फळकुटांचा आधार घेऊन काही अर्धमेल्या अवस्थेत अलिबाग परिसरातील किनाऱ्याला लागले. दुसऱ्या दिवशी कुलाबा , सासवणे , आवास , किहिम गावांच्या चौपाटींवर मृत शरीरे वाहत येऊ लागली. काही ओळखण्यापलीकडील तर काही अंगावरील खाणाखुणांवरून ओळख पटलेली. सासवण्यातील बाबा कर्वे या पोहून आलेल्या सुदैवी प्रवाशाकडून काही वर्षांपूर्वी चक्षुर्वैसत्यं माहिती काढून स्मृतीत जपून ठेवली.

या घटनेनंतर पावसाळ्यातील जून ते ऑगस्ट या वादळी मोसमात तेथील जलवाहतूक संपूर्ण बंद करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरच नाही , तर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर इतका दारुण अपघात कधीही झाला नाही. रामदास बोटीचे अवशेषही शोधून काढण्याचा प्रयत्न झाला नाही.
ती कोठे होती साम्राज्यवाद्यांची टायटॅनिक ? भारतीय चित्रपटसृष्टीला तरी या घटनेवर चित्रपट काढण्याची कल्पना सुचावे. पण तेही झाले नाही. आणि एस.एस. रामदास विस्मृतीत गेली.

1 comment:

  1. विस्तृत माहीतीबद्दल धन्यवाद !

    ReplyDelete


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive