देशाच्या इभ्रतीवरच घाला पडल्यानंतर त्याला इस्रायलसारखे राष्ट्र कशा पद्धतीने सामोरे जाते त्याचे हे कथानक तितकेच रोमांचकारी असणे स्वाभाविकच आहे. लेखकाची अकृत्रिम शैली किंवा त्या कथानकातील नाटय़ आपल्याला जितके भावते तितकेच या खऱ्या इतिहासातील पात्रांचा राष्ट्राभिमान अधिक ठसतो. अशावेळी आपल्याकडच्या यासारख्याच घटनांना आपण कसा प्रतिसाद देत असतो त्याची बोच लागल्यावाचून राहत नाही.
देशविरोधी कारवायांना धडा कसा शिकवाव याबरोबरच कसा गिरवाव याचे भान व्हेजन्ससारखे पुस्तक आणून देते. मुद्दा हाच उरतो की आपल्याला असा धडा शिकवायचा आहे की नाही..
आपल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातला एक मुख्य आरोपी अबू जुंदाल एकदाचा हाती आला. २००६ सालात मुंबईत चोरटा शस्त्रास्त्र साठा आणला गेला होता, त्यातही त्याचा हात होता, असं म्हणतात. तेव्हा तो पळाला बांगलादेशात. नंतर पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयच्या हातात त्याची सूत्रं होती. भारताविरोधी कारवाया हेच मुख्य कार्यक्षेत्र असलेल्या आयएसआयनं मग बनावट नावानं त्याचे पासपोर्ट तयार केले आणि त्याचं यशस्वी पुनरुज्जीवन केलं सौदी अरेबियात. तिथं हा टॅक्सी काँट्रॅक्टर वगैरे होता, असं म्हणतात. गाडय़ा चालवता चालवता तो आयएसआयच्या आत्मघातकी पथकांसाठी, अन्य दहशतवादी कारवायांसाठी स्वयंसेवक भरतीचं कामही करायचा.
ही सगळी गोष्ट आपल्याला कळली ती अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा, सीआयए हिनं आपल्याला मदत करायचं मान्य केलं म्हणून. अमेरिकेनं मान्य केलं म्हणून सौदीनं मान्य केलं. म्हणून तो आपल्या हाती आला. सध्या आपल्याला अमेरिकेची आणि अमेरिकेला आपली गरज आहे, म्हणून हे चाललंय. पण समजा अमेरिकेनं हे मान्य केलंच नसतं तर अबू जुंदाल आपल्या हाती लागला असता का? अबू जुंदालचं जाऊ द्या, दाऊद इब्राहिमसारख्या गुंडालाही पकडणं आपल्याला शक्य झालेलं नाही. आंतरराष्ट्रीय करार वगैरे असं काय काय मध्ये येतं आपण दाऊदला किंवा अन्य कोणाला पकडायला गेलो की. आणि मग आपलं सरकार ते प्रयत्न अर्धवट सोडून देतं.
पण जगात दहशतवादाचा फटका बसलेले सर्वच देश आपल्या इतके संतसज्जन नसतात. गुन्हा घडून गेलाय, मरायचे ते मेलेत तेव्हा त्याबद्दल दोषी असणाऱ्यांना शिक्षा करून मेलेले जीव थोडेच परत येणार हा आपला आध्यात्मिक दृष्टिकोन अनेकांना मान्य नसतो. ते देश. मग यात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, चीन, ब्रिटन, इस्रायल असे सर्वच आले. अरेला कारे म्हणणं हा राष्ट्रीय धर्म मानतात. त्याचमुळे अमेरिकी नागरिकाला जगाच्या पाठीवर कुठेही इजा झाली तरी अमेरिकी सरकार त्यांच्या फौजा पाठवतं आणि इस्रायलींच्या बाबतीत असं झालं तर तो देश जवळपास युद्धच पुकारतो तसं करणाऱ्याच्या विरोधात.
ते कसं? हे समजून घ्यायचं असेल तर जॉर्ज जोनास यांचं व्हेंजन्स हे पुस्तक वाचणं अति अत्यावश्यक. योगायोग म्हणजे ते हाती लागलं ते जेरुसलेममधेच. १९९९ साली आपल्याकडे विमान अपहरण प्रकरण घडलं होतं. इंडियन एअरलाइन्सचं काठमांडूला जाणारं विमान पळवून नेलं गेलं ते थेट काबूलला. त्यातल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना इस्लामी दहशतवाद्यांना शासकीय इतमामात त्यांच्या माहेरी, म्हणजे अफगाणिस्तानात सोडायला जावं लागलं होतं. ते सगळंच लाजिरवाणं. त्या प्रकरणाचं कवित्व पुढे बराच काळ सुरू होतं. त्याच काळात इस्रायलला भेट द्यायची संधी मिळाली. सुरक्षा यंत्रणा पुरविणाऱ्या कंपन्यांचे पदाधिकारी, सरकारी अधिकारी, अनेक पत्रकार यांच्या गाठीभेटी होत होत्या. प्रत्येक ठिकाणी विषय निघायचा तो भारताच्या विमान अपहरणाचा. त्यात एकदा एका अधिकाऱ्यानं आम्ही अशी प्रकरणं कशी हाताळतो ते सांगितलं. अर्थातच एंटेबेचा विषय निघाला आणि त्या संध्याकाळी त्यानं माझ्या रूमवर पुस्तक पाठवून दिलं व्हेंजन्स. त्या दिवशी फारशा काही गाठीभेटी नव्हत्या. चाळू या म्हटलं सहज.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेपर्यंत ते वाचूनच संपवलं. मुळात युद्धस्य कथा तशा रम्यच असतात. पण त्या अतिरम्य होतात त्या लिहिणाऱ्याला काही शैली असेल तर. तशी ती अर्थातच जॉर्ज जोनास यांना आहे. एखादी कादंबरी वाचावी इतक्या सहजपणे जोनास यांचा तपशील आपल्याला पुढे पुढे ओढत नेतो. तो वाचून संपल्यावर आपल्यालाच हुश्श वाटतं. आणि आनंद होतो अत्यंत वाचनीय पुस्तक गवसल्याचा.
हे पुस्तक सुरू होतं १९७२ साली. त्या वर्षी जर्मनीतल्या म्युनिक इथं ऑलिम्पिक भरलं होतं. तो काळ इस्लामी दहशतवादाच्या जन्माचा. ब्लॅक सप्टेंबर, पॅलेस्टनी संघटना, अबू निदाल वगैर नावं अनेक देशांना घाम फोडायची. तर याच ऑलिम्पिकमध्ये इस्रायलच्या ११ खेळाडूंची निर्घृण हत्या होते. त्यांचा गुन्हा एकच. इस्रायली असणं. सगळेच्या सगळे अकारण मारले जातात. एकच खळबळ उडते. जगातून निषेध वगैरे होतो. पण इस्रायलचं समाधान केवळ निषेधानं होत नाही. आपल्या देशाविरोधात उद्योग करणाऱ्यांना संपवणं.मिळेल त्या मार्गानं.हे एकच लक्ष्य त्या देशाचं असतं. तेव्हा ज्यांनी ज्यांनी आपल्या खेळाडूंचे प्राण घेतले, त्यांचे प्राण घेणं हे राष्ट्रीय कर्तव्य बनतं. त्याची साद्यंत, रोमांचकारी कहाणी म्हणजे व्हेंजन्स. त्या सूडनाटय़ाला नाव दिलं जातं ‘ऑपरेशन राथ ऑफ गॉड’- परमेश्वराचा क्रोध.
या सूडनाटय़ाचा श्रीगणेशा लिहिला जातो थेट इस्रायली पंतप्रधान गोल्डा मायर यांच्याकडून. एके दिवशी सकाळी सकाळी एका अधिकाऱ्याला निरोप येतो, तुला न्यायला येतोय. कोण?. काय?. काहीही माहिती नाही. हा तयार राहतो. सरकारी गाडी येते. हा बसतो. गाडी थांबते थेट पंतप्रधानांच्या घरी. एखाद्या प्रेमळ आजीसारख्या भासणाऱ्या मायर स्वत: जातीनं त्याचं स्वागत करतात. स्वत: चहा बनवून देतात त्याला. तोपर्यंत हा अंधारात. चहा पिता पिता त्या विषय काढतात. एकच काम असतं. आपल्या खेळाडूला ठार करणाऱ्या प्रत्येकाला तो जिथे असेल तिथे जाऊन मारायचं. कसं? काय? ते काहीही माहीत नाही. ते मार्ग यानं शोधायचे. त्यासाठी लागेल ती मदत सरकार करणार. स्वत: पंतप्रधान हे सगळं सांगतात. देशाच्या इभ्रतीलाच हात घालतात. अर्थातच हा नाही म्हणणं शक्य नसतं. मग आणखी पाच जण त्याच्या मदतीला दिले जातात. स्वित्र्झलडला बँकेत खातं उघडलं जातं. वेगवेगळय़ा नावांनी या पाचही जणांचे पासपोर्ट तयार केले जातात. त्यांची नवी ओळख तयार केली जाते. ओळखपत्रं केली जातात. पूर्ण संहिता तयार झाल्यावर अखेर ही मंडळी वेगवेगळय़ा मार्गानी कामगिरीवर निघतात.
पुढचं सगळं वाचणं म्हणजे अवर्णनीय आनंद आहे. पुस्तकाचं प्रत्येक प्रकरण म्हणजे एक स्वतंत्र सूडहत्या प्रकरण आहे. सूडनाटय़ासाठी मोसाद.म्हणजे इस्रायली गुप्तहेर संघटना. ज्या नवनव्या क्लृप्त्या, शस्त्रास्त्र वापरते ते सगळं मुळातूनच वाचायला हवं. काही जणांना घरातल्या फोनमध्ये बॉम्ब दडवून उडवलं जातं. रिसिव्हर उचलला की स्फोट. तो हव्या त्या माणसानंच उचलायला हवा, त्यासाठी योग्य वेळेची निवड. काहींच्या मोटारीत बॉम्ब दडवला जातो. एकाला सरळ घरात जाऊन टिपलं जातं. इस्रायलींच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यातली एक नेदरलँडमध्ये भटकी होऊन एका बोटीवर राहत असते. संपूर्ण नवीन ओळख घेऊन ती जगत असते. वेळ लागतो ते तिलाच शोधून काढण्यात. अखेर तिचाही पत्ता या मंडळींना लागतो आणि त्यातले दोघेजण सायकलवरून ती राहत असते त्या बोटीच्या बंदरापर्यंत जातात. सायकल साधी. कोणालाच कसलाही संशय येत नाही. हे सायकलसह त्या नावेवर जातात. आत गेल्यावर मात्र त्या सायकलच्या हँडलचे वेगवेगळे भाग सहज ओढून काढतात. हवे तसे जोडतात. त्यातून तयार होतं एक पिस्तुल. त्यातूनच तिला गोळी घालून हे शांतपणे परत येतातदेखील. एक-दोन दिवस पुढे तिची हत्या झाल्याचं कोणाला कळतंही नाही.
या सूडनाटय़ाचा सूत्रधार होता युआल अविव नावाचा मोसादचा अधिकारी. अॅवनेर नावानं तो पुस्तकभर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं नाटय़ पुढे त्यानं स्वत:च उलगडलं. त्या अर्थानं हे पुस्तक ऐतिहासिक ठरतं. कारण मोसादचा कोणताही अधिकारी आपण आपल्या हेरगिरीच्या आयुष्यात काय उद्योग केले, ते कधी सांगत नाही. हा युआल तसं करणारा पहिला. त्याच्याकडनं आणि अन्य सरकारी कागदपत्रांतून जोनास यांनी सगळा तपशील उभा केला आहे. त्यातून एक सलग कथानक उभं केलं आणि सोप्या, रसाळ भाषेत आपल्यासमोर ते मांडलं. त्यांची शैली अकृत्रिम आहे. त्यामुळे आपण काही तरी वेगळं वाचतोय, असं वाटतच नाही. अकृत्रिम शैलीस अतिसाधेपणाचा धोका असतो. जोनास यांनी तो टाळला आहे. व्हेंजन्स वाचताना मध्ये थांबताच येत नाही. पुढे काय घडलंय याची उत्कंठा आपल्याला खेचत राहते.
याचं कारण जोनास यांच्या व्यवसायात असावं. ते अर्थातच पत्रकार होते. मूळचे हंगेरीचे. जन्मानं ज्यू. त्यामुळेही त्यांना या सगळय़ाची पोटतिडीक वाटली असणार. लहान असतानाच जोनास यांच्या कुटुंबीयांना नाझींच्या अमानुष होलोकॉस्टला सामोरं जावं लागलं. त्या काळात लहानगा जोनास शाळा सोडून दडून बसला होता. वाङ्मयाची आवड. पण शिकता येईना. पुढे मग हे सगळे कॅनडाला गेले. तिथे याचं व्यवस्थित शिक्षण सुरू झालं. तिथल्या रेडिओत हा निर्माता म्हणून लागला आणि पुढे वर्तमानपत्रातही स्तंभ चालवू लागला. त्यामुळे प्रतिभेची वगैरे प्रतीक्षा न करता मोजक्या शब्दांत ठरलेल्या वेळी जास्तीत जास्त वाचनीय. आणि रेडियोवरील नोकरीमुळे श्रवणीयही. मजकूर कसा बेतावा याची हातोटी त्याला लागली असावी. त्याची प्रचीती पुस्तकभर येते. जवळपास ४०० पानांचा ऐवज आहे हा. पण एक क्षणही कंटाळा येत नाही वा उगाच पाल्हाळ लावलंय असंही वाटत नाही.
काही काही गोष्टींमुळे आपल्याला आपण उगाचंच बरोबर आहोत, असं वाटतं. आपली आवड आणि अन्य कोणा थोरामोठय़ाची आवड जुळली की एक असं वाटतं. या पुस्तकानं तसं झालं. स्टीवन स्पिलबर्गला एक महत्त्वाचा सिनेमा बनवण्यासाठी या पुस्तकानं प्रेरित केलं. सिनेमाचं नाव ‘म्युनिक’. जागतिक सिनेमाच्या शौकिनांनी हा सिनेमा हमखास पाहिलेला असतो. तेव्हा त्या अर्थानंही हे पुस्तक महत्त्वाचं. ‘म्युनिक’ या झकास सिनेमाचा पायाच हे पुस्तक आहे. पण सिनेमा समजा पाहिलेला नसेल तर आधी पुस्तक वाचावं. तसं ते वाचलेलं असेल तर तपशील आणि नाटय़ात सिनेमा तोळाभर कमीच भासतो, असं लक्षात येऊ शकेल. असो. ते माध्यम वेगळं. त्याची चर्चा इथे करण्याचं काहीच कारण नाही.
इथे चर्चा व्हायला हवी ती आपल्या देशाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे काय काय मार्ग असतात याची. अर्थात हा मुद्दा येतो आपल्याला तसा धडा शिकवायचा आहे की नाही, हे एकदा ठरलं की. अन्यथा देशादेशातले प्रत्यार्पण करार, चर्चा, परिसंवाद वगैरे आहेतच. एरवी परमेश्वराच्या दरबारात न्याय होतोच वगैरेवर आपला तसा विश्वास असतोच, म्हणा.
१९७२ साली जर्मनीतल्या म्युनिक ऑलिंपिकमधे इस्त्रायलच्या ११ खेळाडूंची निर्घृण हत्या झाली या घटनेने देशाच्या इभ्रतीवर घाला असल्याचे मानून इस्त्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर मोसादला सूड घेण्याचे सांगतात आणि युआल अविव हा अधिकारी त्याबरहुकूम कामगिरी पार पाडतो.
No comments:
Post a Comment