Thursday, July 5, 2012

roosevelt and second world war

 लोकशाहीचा दारूगोळा!

‘सरकारचा पैसा असलाच तर तो ठिणगी आहे. ती महत्त्वाचीच. पण प्रकाश आणि उष्णता निर्माण झाली ती नंतरच्या आगीमुळे आणि ती सतत धगधगत ठेवणाऱ्या माणसांमुळे..’ असं अमेरिकेच्या ‘महासत्ता’पणाबद्दल आर्थर हर्मन म्हणतो.  दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शस्त्रनिर्मितीमध्ये अव्वल ठरण्याचं आव्हान पेलणारी ही महासत्ता आणि ‘बुद्ध पुन्हा हसला’ म्हणून खूश होणारे आपण, यांची तुलना टाळून किती टाळणार?
१९९८ सालच्या मे महिन्यात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनं मोठे अणुस्फोट घडवून आणले.
त्या वेळी त्याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा चवीनं पसरवल्या गेल्या. म्हणजे अमेरिकेच्या उपग्रहास पोखरणच्या वाळवंटात काय चाललं आहे ते दिसू नये म्हणून आपल्या शास्त्रज्ञांनी सगळ्या हालचाली रात्रीच कशा केल्या.. वगैरे. हा अणुस्फोट झाला आणि ‘जितं मया’च्या थाटात अनेक भारतीयांच्या अंगातून राष्ट्रवादाची लहर सळसळत गेली. झालं.. ‘आपण आता महासत्ता झालोच’ असं बहुतांश भारतीयांना वाटून गेलं. आपल्या महासत्तेची द्वाही जगानं फिरवावी, असं आपले राजकारणी म्हणू लागले आणि जगानं ती न फिरवल्यामुळे ते काम ते स्वत:च करू लागले. त्या मे महिन्यात मी लंडनला ‘द गार्डियन’मध्ये पत्रकारितेतले पुढचे धडे गिरवत होतो. भारतीय शौर्यकथा लंडनमधून तेव्हाही वेगळी दिसत होती. इतिहासाचा वेगळ्या वाटेने धांडोळा घेण्यासाठी विख्यात असलेल्या आर्थर हर्मन याचं ‘फ्रीडम्स फोर्ज’ हे ताजं पुस्तक हाती आलं आणि भारतीय महासत्तापणाची ती न संपलेली कथा पुन्हा डोळ्यासमोर आली.  


दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलेलं. अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनी युरोपातील अनेक देशांचा घास घेत चालला होता. त्याला पुढे मुसोलिनीचा इटली येऊन मिळाल्यानं परिस्थिती अधिकच बिकट झालेली. त्यात इकडे आशियात जपानचेही भलतेच उद्योग सुरू झाले होते. तिकडे अटलांटिकच्या पलीकडे असलेल्या अमेरिकेला याची थेट झळ बसत नव्हती. पण आज ना उद्या आपल्याला युद्धात उतरावं लागेल, याची जाणीव अमेरिकेच्या नेतृत्वाला होऊ लागली होती. परंतु अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्या आर्थिक धोरणांना सारी अमेरिकाच वैतागलेली. त्या आधीची दहा र्वष प्रचंड मंदीची. त्यात रुझवेल्ट यांची थेट लोकांहाती पैसा न वाढवणारी धोरणं. या आर्थिक दुष्काळात युद्धाचा अधिक महिना उजाडला तर आपले हाल कुत्राही खाणार नाही, याची भीतिदायक जाणीव अमेरिकनांना अधिकच अस्वस्थ करीत होती. त्यामुळे युद्धात सहभागी होण्याविरोधात जनमत मोठय़ा प्रमाणावर तयार झालेलं.
त्या काळात रुझवेल्ट यांनी एका सकाळी बर्नाल्ड बारूख याला फोन केला. युद्धकाळात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी मला मदत करशील का? बारूख पहिल्या महायुद्धाच्या काळात अध्यक्ष व्रुडो विल्सन यांचा वित्त सल्लागार होता. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये बऱ्याच कंपन्यांत गुंतवणूक असलेला धनाढय़ ब्रोकर. अनेक वित्त कंपन्यांचा संचालक वगैरे. त्यामुळे रुझवेल्ट यांना त्याच्याविषयी बरीच आशा होती. पण तो म्हणाला, पहिल्या महायुद्धाच्या काळात मला ते जमून गेलं. आता काही हे काम झेपणार नाही. रुझवेल्ट यांना जरा वाईट वाटलं. पण ते त्याला म्हणाले, तू नाही तर नाही.. पण हे काम करू शकेल अशी तिघांची नावं तर सांग. त्यावर बारूख म्हणाला : पहिल्याचं नाव बिल नडसन, दुसऱ्याचं बिल नडसन आणि त्यासाठी योग्य तिसरा म्हणजे बिल नडसन!
रुझवेल्ट यांनी त्याला फोन केला. एव्हाना बिल जनरल मोटर्समध्ये उच्च पदावर होता. इतर अनेकांप्रमाणे हाही निर्वासित. डेन्मार्कचा. सोळाव्या वर्षी अमेरिकेत आला. अभियंता झाला आणि काम करायची संधी मिळाली ती थेट हेन्री फोर्ड यांच्याबरोबरच. अभियंता म्हणून बिल अद्वितीयच असावा. फोर्ड यांच्यासाठी त्यानं मोटारींची नवनवी मॉडेल्स विकसित केली. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणावर कंपनीचा व्याप वाढविता येईल अशी उत्पादनांची घडी त्यानं बसवून दिली. याच्या व्यक्तिमत्त्वाचा आकार इतका वाढला की खुद्द हेन्री फोर्ड यांनाच त्याचा दुस्वास वाटू लागला. त्यांच्यातले मतभेद वाढू लागले. अखेर पहिल्या महायुद्धानंतरच्या आर्थिक तंगीच्या काळात बिलने फोर्ड सोडली.
समोर आल्फ्रेड सोलन उभा. हा जनरल मोटर्स चालवायचा. पण फोर्डच्या रेटय़ापुढे जीएम खिळखिळी झालेली. तेव्हा बिलला जीएमकडनं विचारणा झाली, आमच्यासाठी काम करणार का? बिलला ते हवंच होतं. त्यानं जीएमची सूत्रं हाती घेतली. जीएमची शेवर्ले मोटार त्या काळी विख्यात होती. पण आता तिचं उत्पादन करणं आतबट्टय़ाचं ठरू लागलं होतं. बिलनं त्यातील त्रुटी दूर केल्या. जीएमची उत्पादनशैली नव्यानं विकसित केली. फुटकळ गोष्टींना फाटा दिला. आणखी एक गोष्ट सुरू केली. दरवर्षी एक तरी नवीन मोटार आलीच पाहिजे. जीएमचा गाडा नुसताच रुळांवर आला असं नाही तर रुळांवर येऊन वेगात धावायला लागला. बिलच्या हाती जीएमची सूत्रं येईपर्यंत बाजारात दर १३ फोर्ड मोटारींमागे एक जीएमची असायची. इतकी मागे होती ती कंपनी. पुढच्या तीन वर्षांत जीएमनं जुन्या स्पर्धक असलेल्या फोर्डला सहज मागे टाकलं.
बिल नंतर जीएमचा अध्यक्षच बनला. अमेरिकी उद्यमशीलतेत जीएमच्या रूपानं तो अधिक उंची गाठणार असं चित्र असतानाच त्याला रुझवेल्ट यांचा फोन आला. सरकारी सेवेत येणार का? प्रश्न नाजूक होता. त्यानं विचार करून विचारलं, काम काय करायचं? रुझवेल्ट म्हणाले.. संपूर्ण अमेरिकी उद्योगजगत एकाच कामासाठी जुंपायचं.
शस्त्रास्त्रनिर्मिती. दुसरं काहीही नाही. ही निर्मिती इतकी वाढली पाहिजे की अमेरिका शस्त्रास्त्रनिर्मितीत जगात अग्रेसर बनली पाहिजे. हवी तेवढी माणसं मदतीला घे. बिलनं त्यासाठी वेळ मागून घेतली. १८ महिने. दीड वर्षांत अमेरिकी उद्योगाचा चेहरा तो पूर्णपणे बदलणार होता.
त्याला आणखी एक सहकारी मिळाला. हेन्री कैसर. हाही बिलप्रमाणेच निर्वासित. न्यूयॉर्कला एका दुकानात साधा विक्रेता होता. पुढे महामार्ग उभारणी करणाऱ्या कंपनीच्या सेवेत तो लागला. अत्यंत बोलका. अशी कामं करून घेण्यासाठी माणसांचं जाळं लागतं. या जाळ्यात राजकारण्यांपासून कंत्राटदारांपर्यंत सगळे लागतात. त्यासाठी वाणी मिठ्ठास लागते. व्यक्तिमत्त्वात मित्रता असावी लागते. हे सगळे गुण त्याच्याकडे होते. त्यातून असं काम करता करता या प्रकारची कंपनीच त्यानं स्थापन केली. कॅनडापासून अनेक ठिकाणची मोठमोठी कंत्राटं त्याला मिळत गेली आणि बघता बघता कैसर मोठा होत गेला. इतका मोठा की प्रसिद्ध अशा हुव्हर धरणाचं कामही त्यालाच मिळालं. याचा धोरणीपणा इतका की तिकडे युरोपात दुसऱ्या महायुद्धाचा बिगूल फुंकल्याबरोबर त्यानं अमेरिकेत विमान आणि जहाजनिर्मिती व्यवसायात शिरण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात महत्त्वाची बाब ही की त्याला या व्यवसायातलं ओ की ठो कळत नव्हतं.
या दोघांनी मिळून अमेरिकेतले सर्व बडे कारखानदार, व्यावसायिक, उत्पादक यांना एकत्र आणलं आणि त्यातून तयार झालं एक महाप्रचंड यंत्र. ज्याच्यात विमानं, विमानवाहू नौका, दारूगोळा, बंदुका वगैरे सगळी सामग्री युद्धपातळीवर तयार व्हायला लागली. ही सगळी उत्पादनं एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तयार होणं अत्यावश्यक आहेत, असं तो म्हणायचा आणि या सगळ्याला त्यानं नाव दिलं लोकशाहीचा दारूगोळा. डेमॉक्रसी’ज अर्सेनल.
कल्पनाही येणार नाही इतका अजस्र होता हा लोकशाहीचा दारूगोळा निर्मिती कारखाना. त्याची सगळी घडी बिलनं बसवली. लॉकहिड मार्टिन, बेकटेल, क्रायस्लर, बोइंग, जनरल इलेक्ट्रिक आदी कंपन्यांतले शेकडो अभियंते, वरिष्ठ अधिकारी त्याला येऊन मिळाले. ही सगळी मंडळी अगडबंब पगारावर काम करणारी. युद्धकाळात यांची सेवा घेणं सरकारला परवडायचं कसं? यांचा पगार आपल्याला झेपणार का? रुझवेल्ट यांनाही हीच चिंता होती. त्यांनी बिलला विचारलं : ही कामं तुम्ही तुमचा रोजचा नोकरीधंदा सोडून करणार.. पगार घेणार का सरकारकडून?
‘‘म्हणजे काय..? पगाराशिवाय कसं काम करणार..?’’ बिलनं मोठय़ा गुर्मीत उत्तर दिलं. रुझवेल्ट यांनी घाबरत घाबरतच विचारलं. किती? त्यावर बिल म्हणाला : वर्षांला एक डॉलर.
अमेरिकेच्या युद्धेतिहासात ही वार्षिक एक डॉलरी पगार घेणाऱ्यांची फौज विख्यात आहे. या सगळ्यांच्या कामाचा आवाका किती होता? अमेरिका दर पाच मिनिटाला एक इतक्या प्रचंड वेगानं विमानं तयार करीत होती. अमेरिकेच्या गोदीत दिवसात ५० युद्धनौका तयार होत होत्या. पूर्वी २२० दिवस लागायचे एक विमानवाहू नौका तयार करायला. कैसरनं हा काळ आणून ठेवला १० दिवसांवर. पुढे त्याची गती इतकी वाढली की दर महिन्याला आठ इतक्या प्रचंड गतीनं अमेरिका युद्धनौका तयार करू लागली. अजस्र अशा बोइंग बी-ट्वेंटीनाइन विमानांची निर्मिती याच काळातली. या एका विमानात ४० हजार ५४० वेगवेगळे सुटे भाग होते. १४०० छोटय़ा कंपन्या त्या बनवायच्या. या सगळ्या कामाला बिलनं विलक्षण गती दिली. ती इतकी होती की अमेरिकेचं एकटय़ाचं युद्ध-उत्पादन जर्मनी, इटली आणि जपान या तिन्ही देशांच्या एकत्रित उत्पादनापेक्षा जास्त होतं. सर्व दोस्त राष्ट्रे मिळून जेवढं उत्पादन करत होती त्यातलं दोनतृतीयांश उत्पादन अमेरिका एकटी करीत होती. सर्वसाधारण समज असा की पर्ल हार्बरवर हल्ला झाला आणि अमेरिका खडबडून जागी झाली. ते साफ चूक आहे. पर्ल हार्बरवर हल्ला व्हायच्या दीड वर्ष आधीच रुझवेल्ट यांना जाग आली होती आणि त्या तयारीला ते लागले होते.

तर बिल. त्याला बिग बिल नडसन म्हणायचे. आणि हेन्री कैसर आणि त्या वेळचं अमेरिकेचं युद्धनेतृत्व याची ही विलक्षण कहाणी. अगदी ताजी. जगाच्या बाजारात तीनच आठवडय़ांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं. लगेचच ते मिळवलं. वाचताना अनेक गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे अभ्यासक इतिहासाकडे किती वेगवेगळ्या अंगांनी बघू शकतात. लेखक आर्थर हडसन हा त्याच्या आधीच्या ‘गांधी अँड चर्चिल’ या पुस्तकामुळे माहीत होता. पण ‘फ्रीडम्स फोर्ज’मध्ये जे काम त्यानं केलंय ते विलक्षण आहे. त्याची मांडणी हीच आहे की मुक्त बाजारपेठेतील उद्यमशीलता काय करू शकते. अमेरिकेनं अखेर युद्ध जिंकलं. पण नडसन आणि कैसर यांना सगळेच विसरले. त्यांची दुर्लक्षित गौरवगाथा मला मांडायची होती, असं हर्मन म्हणतो आणि ती मांडताना जी आकडेवारी देतो ती आपल्याला सुन्न करून टाकते.
बिल आणि हेन्रीच्या सांगण्यानुसार अनेक मोठमोठय़ा कंपन्यांचे मोठमोठे अधिकारी शस्त्रास्त्रनिर्मितीच्या कामाला लागले. त्यातल्या अनेकांनी प्राण गमावले. एकटय़ा जनरल मोटर्समधलेच १८९ उच्चपदस्थ या प्रयत्नांत कामी आले आणि युद्धऐवज निर्मितीत प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या प्रत्यक्ष युद्धात मरण पावलेल्या अमेरिकी सैनिकांपेक्षाही अधिक आहे, हे वाचलं की आपण थिजतो. ज्या वेळी दुसरं महायुद्ध सुरू झालं त्या वेळी अमेरिकेचं सैन्य नेदरलँडपेक्षाही आकारानं लहान होतं. तिथून या मंडळींनी अमेरिकेला कुठच्या कुठे उंचीवर नेऊन ठेवलं.
हा सगळा इतिहास वाचणं अत्यावश्यक आहे. तो लिहिल्यानंतर हर्मन म्हणतो : पारंपरिक इतिहासकारांचा समज आहे, अमेरिका प्रचंड पैसा ओतत गेली म्हणून जिंकली आणि महासत्ता झाली. पण ती जिंकली ती नागरिकांच्या उद्यमशीलतेला मुक्त वाव दिल्यामुळे. सरकारचा पैसा असलाच तर तो ठिणगी आहे. ती महत्त्वाचीच. पण प्रकाश आणि उष्णता निर्माण झाली ती नंतरच्या आगीमुळे आणि ती सतत धगधगत ठेवणाऱ्या माणसांमुळे.

महासत्ता व्हायचं तर मुख्य दारूगोळा लागतो तो हा. तो असला की अणुस्फोटाचे शड्ड ठोकावे लागत नाहीत.
फ्रीडम्स फोर्ज-
हाऊ अमेरिकन बिझनेस प्रोडय़ूस्ड व्हिक्टरी इन वर्ल्ड वॉर टू
आर्थर हर्मन.
रँडम हाऊस, न्यूयॉर्क. पानं :  ४३२ , किंमत : २८ डॉलर.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive