प्रत्येक शहरात एक कडिया नाका असतो . रिकामा रंगाचा डबा , त्यात ब्रश , स्पंज रोल , थापी , लेव्हल बाटली , ओळंबा , अॅल्युमिन िअमचा मोठा ठोकळा , चिनी , हातोडा अशी मोजकी साधनसामग्री घेऊन या नाक्यावर अनेक कामगार रोजगाराच्या आशाने उभे असतात . त्यांच्या डोळ्यात एक आतुरता असते . नाक्यावर येणाऱ्या प्रत्येकाकडे ते आशाळभूत नजरेने पाहत असतात . तुमच्या घराचे रंगरूप बदलून देण्यासाठी ते उत्सुक असतात ...
कडिया नाका हा प्रत्येक नगर - उपनगराचाच नव्हे तर शहराचा आणि आता खेड्यांचाही एक अविभाज्य घटक बनला आहे . वय वर्षं सोळापासूनच्या तरूणांचा भरणा या नाक्यावर मोठ्या प्रमाणात दिसतो . मुलीही असतात . मराठवाडा , जळगावप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्राकडचे तरूणही इथे दिसतात . कोकणाकडचेही काही प्रमाणात दिसतात . पण उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेशाकडील तरूणांचा मोठा ग्रुप इथे दिसतो . शिक्षणाच्या नावाने बोंब असलेले तरूणच या नाक्याचे मेंबर असतात असे नाही . तर कॉलजच्या पाय - या चढलेले काहीजणही या नाक्यावर असतात . सुरूवातीला बिगारी म्हणून काम करताकरता टाइल्स मेस्त्री किंवा पेंटर ची कामं करायला इथली तरूणाई नेहमीच तयार असते .
सकाळी आठ ते अकरावाजेपर्यंत पिशवीत बदलायचे कपडे , जेवण , कडिया कामाची हत्यारं घेऊन नाक्यावर उभे राहतात . त्यातही अनुभवाच्या जोरावर अनेक जणांना वेगवेगळी रोजंदारी मिळते . मावशी ( बिगारी ), सलिया , बांधकाम प्लास्टर , टाइल्स फिटर , पेंटर , किचन एक्सपर्ट , यावर कॉन्ट्रॅक्टर आणि सर्वात वर घरमालक अशी चढती कमान असते . बिगारी २५० ते ३०० , टाइल्स मेस्त्री ७०० ते ८०० रुपये , किचन एक्सपर्ट १००० ते १२०० रुपये , पेंटर ५ 00 ते ७०० रुपये दिवसाचा रोज घेतात . तेही सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या सरकारी वेळेत काम करून , दुपारी एक तासाचा लंच टाइम घेऊन . मुंबईच्या उपनगरात कडियानाक्याचे रेट यापेक्षा जास्त असू शकतात . या नाक्यावर सुतार , वायरमन आणि प्लंबर ही माणसं तुम्हाला मिळणार नाही . त्यासाठी कडिया नाक्यावर निरोप ठेवावा लागतो . मग तो स्वतःहून तुम्हाला संपर्क करतो .
वांगणीसारख्या गावात भाड्याच्या रूममध्ये राहणारा फौजदार चौहान यापैकी एक . वय २५ वर्षं . टाइल्स मेस्त्री , रुपये ७०० रोज . गाव युपीमधील महू जिल्हा , कलामपूर गाव . हा सांगतो . बारा वर्षांपूर्वी बिगारीचं काम करताना अनेकांच्या हाताखाली कामं केली . काही जणांनी चांगलं समजावून सांगितलं , तर काहींनी फक्त दमबाजीच केली . आजच्या घडीला बांधकाम प्लास्टर किंवा टाइल्स मेस्त्री म्हणून आमच्या गावातील अनेक जण मुंबई किंवा इतर ठिकाणी काम करतात .
कोणाची कशी मक्तेदारी
कडिया नाक्यावर सर्व जाती - धर्माचे कारागीर असतात . पण वैशिष्ट्य म्हणजे काही प्रांतांची अलग अलग कामांची मक्तेदारी दिसून येते . उदा . मार्बल , संगमरवराचं काम करावं ते राजस्थानी किंवा मारवाडी समाजानेच . खुदाईपासून टाइल्स फिनिशिंग , फ्लोरिंगचं काम युपीच्या चौहानांनीच करावं , असं म्हणतात . बांधकाम - प्लास्टरिंगमध्ये कर्नाटकी लोकांचा हात कुणीही धरणार नाही . आकर्षक सिलिंग पीओपीची कामाची फिनिशिंग युपीच्या गोंडा जिल्ह्यातील मुस्लिमांशिवाय कोणालाही जमणार नाही . आता राहिलेलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे रंगकाम . या कामाची मक्तेदारी मराठी माणसानेच करावी , असं मानलं जातं . पण अभावानेच एकाद दुसरा अपवाद तुम्हाला दिसू शकतो .
एकत्र कसे येतात ?
बदलापूरच्या कारंज गावात राहणारा अरूण . वयाच्या अठराव्या वर्षी पेंटरच्या हाताखाली हेल्परचं काम करता करता एक चांगला पेंटर म्हणून नाव मिळवलं अरूणने गेल्या अठरा वर्षांत . वॉल पेंटिंगमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना मजा येते . नवीन काही शिकायला मिळतं . रद्दीच्या दुकानातून इंटिरीयरची पुस्तकं मिळवून त्यांचा अभ्यास करतो , असं अरूण सांगतो . कॉन्ट्रक्ट घेताना मी काही स ूचना घर मालकांना करतो . घराच्या कामाचं कॉन्ट्रक्ट मिळाल्यावर कोणती माणसं आपल्याला हवीत याचा अभ्यास कॉन्ट्रक्टर अरूण घागस यांनी केला . पटापट संपर्क साधला गेला . ज्यांचा संपर्क झाला नाही त्यांना कडिया नाक्यावर उद्या भेटायचं अरूणने ठरवलं . कारण काम दीड ते दोन महिन्यांचं होतं . आता घराचं संपूर्ण रिनोव्हेशनचं कॉण्ट्रक्ट घेऊन त्याप्रमाणे माणसं जमवून काम करतो . रंगाचा रिकामा डबा , स्पंज रोल , अनेक साईजची ब्रशेस या सामानाच्या भांडवलावर लहान मोठी कामं पेंटर सहजपणे पार पाडू शकतात .
आपल्या मुलानेही आपल्यासारखे कडिया कामानेच सुरूवात करावी , अशी माझी इच्छा नाही . असे गेली तीस वर्षं टाइल्स मेस्त्रीचं काम करणारे लल्लन सिंग सांगतात . तसेच विनोद चौहान हा तरूण सांगतो की या फिल्डमध्ये वरच्या लेव्हलवर इण्ट्री घेण्यास काहीच हरकत नाही . आजची तरूण पिढी तर डायरेक्ट टाइल्स मेस्त्रीच्याच कामाला पसंती देतात . कारण जबाबदारीचं काम घ्यायला तरूणांना आवडतंच . शिवाय रोजदारीचा रेटही आकर्षक आहेच .
No comments:
Post a Comment