प्रत्येकाच्या
आयुष्यात दहावी पास हा एक टर्निग पॉइंट असतो. मीही दहावी पास झालो.
सिव्हिल डिप्लोमा करण्यासाठी प्रवेश घेतला. दहावी पासनंतर काहीतरी गिफ्ट
प्रत्येकाला मिळत असते. मला कॅमेरा हवा होता. घरी हट्ट केला. माझी मावशी
प्रा. शिल्पकला रंधवे हिने तो पूर्ण केला. कॅमेऱ्याशी खेळणे सुरू झाले.
कोणत्याही प्रकारच्या कोर्सला प्रवेश घेतला नाही. आमचे एक स्नेही प्रेस
फोटोग्राफर मोहन पाटील यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी मला ‘कॅमेऱ्याशी तू
जेवढा खेळशील तेवढा डेव्हलप होत जाशील’ असा सल्ला दिला. ट्रेकिंगला,
सहलीला जात होतो. मित्र, निसर्ग, किल्ले, निरनिराळ्या ठिकाणचे फोटो काढत
होतो. घरी पूर्ण सोशल वर्कचे वातावरण. त्यामुळे शिवस्पर्श परिवाराच्या
माध्यमातून होणाऱ्या विविध उपक्रमांचे फोटो काढत होतो. ‘आळंदी’ माझ्या
मामाचे गाव. पालखी प्रस्थान बघायला लहानपणापासून जाणे व ज्ञानेश्वरांच्या
पालखीबरोबर विश्रांतवाडीपर्यंत चालत येणे हा दरवर्षीचा उपक्रम असे. शाळेतील
मित्रही माझ्याबरोबर दरवर्षी आळंदीला मुक्कामी येत असत व आम्ही साधारण
साडेतीन ते चार तासांत आळंदी ते विश्रांतवाडीपर्यंत पोहोचत असू. माझे मामा व
आजोबा हे पालखीचे मानकरी. त्यामुळे पालखी प्रस्थान सोहळा ज्ञानेश्वर
मंदिरात जाऊन बघायला, अनुभवायला मिळत असे. एक-दोन वर्षे पालखी प्रस्थान
सोहळ्याचे फोटो काढले.
गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेला ‘गजर’ हा सिनेमा
सहकुटुंब पाहिला. त्यात माझे मामा राजाभाऊ चोपदार व आजोबा बाबुराव चोपदार
(गुरुजी) यांच्या मुलाखती पाहिल्या व त्याच वेळी ठरवले. या वर्षी ‘आळंदी ते
पंढरपूर’ पूर्ण वारी पायी करायची. फोटोग्राफीच्या छंदामुळे व ‘गजर’ सिनेमा
पाहिल्यामुळे क्षणात हा निर्णय झाला. आई-बाबांनी परवानगी दिली. त्यांना
खात्री होती की ‘हा कसला वारी करतोय. कंटाळला की येईल परत.’
पण लाखो वारकरी झपाटल्याप्रमाणे न बोलावता ठरलेल्या
दिवशी आळंदीत येतात. दिंडीत सामील होतात. ऊन, वारा, पाऊस कशाचीही भीती न
बाळगता पूर्ण २४० कि.मी.चे अंतर अवघ्या १८ दिवसांत केवळ विठ्ठलभेटीच्या
ओढीने पार करतात. निदान फोटोग्राफीसाठी आपण एकदा तरी वारी अनुभवावी असे
ठरवले व वारीला गेलो. माझ्यासोबत माझा एक मित्र आकाश जगताप हादेखील वारीला
आला. आम्ही १८ दिवस वारीत रमलो. आई-बाबांना वारीचे अनुभव व ल्लि'३ ६११८ चे
रटर देत राहिलो.
फोटोग्राफी करताना वारीचा प्रवास समजून घेताना मला
माझे मामा राजाभाऊ चोपदार, ज्यांच्याकडे वंशपरंपरागत ज्ञानेश्वरांचे चोपदार
म्हणून मान आहे, यांची खूप मदत झाली. वारीतील प्रत्येक क्षण अनुभवताना
एकंदर वारीची परंपरा मला थोडीफार अभ्यासता आली. फोटो टिपताना मला, तरुण
पिढीला, ज्यांनी वारी अनुभवली नाही त्यांना वारीतील परंपरा, समाजआरती, रिंगण,
उडी, धावा, वारकऱ्यांचे खेळ, धुपारती अशा पारंपरिक सोहळ्याबरोबरच वारक
ऱ्यांचे दैनंदिन जीवन, उपक्रम, नित्यनेम, वारकऱ्यांचे भाव, एकूणच वारीचा
प्रत्यक्ष अनुभव फोटो पाहणाऱ्याला मिळावा असे वाटत होते. त्या दृष्टीने
फोटो काढत गेलो.
वारीचा अनुभव तर हृदयस्पर्शी होताच. पण वारीत सहभागी
होऊन, प्रसंगी गर्दीत घुसून, गाडीच्या टपावर, ट्रक, टँकर, झाडावर चढून फोटो
काढणे तसे अवघड काम होते. एक आव्हान होते. इथे ‘रिटेक’ ही भानगड नव्हती.
रिंगणातील धावणारे अश्व, वारक ऱ्यांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे खेळ,
माऊलींच्या पादुकांचे नीरास्नान, समाजआरती, सोपानकाका-ज्ञानेश्वर भेटीचा
क्षण, अश्वाकडून ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दर्शन घेतानाचा क्षण, १०-११
वर्षांचा पखवाज वाजवणारा मुलगा, १०५ वर्षांच्या वृद्ध आईला गेली ५-६ वर्षे
खांद्यावर घेऊन वारी करणारा आधुनिक श्रावणबाळ, पालखी रस्त्यावरून जात
असताना अश्व रस्त्यावर दिसताच शेतात काम करणारा एखादा शेतकरी, महिला शेतकरी
हातातील काम टाकून त्याचे दर्शन घेण्यासाठी ज्या ओढीने पळत येतात व
अश्वाला हात लावून दर्शन घेताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे असे कितीतरी
एकदाच ‘क्लिक’ होणारे क्षण वारीत आहेत.
वारीचा अनुभव शब्दात मांडता येणे कठीणच! पण वारीमुळे
शिस्तीचा अनुभव, नियोजन, व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन, आíथक नियोजन, कमी
गरजांमध्ये कसे राहता येते हे समजले. लाखोंचा शिस्तबद्ध पद्धतीने चालणारा
समाज, जात-पात धर्म विसरून फक्त विठ्ठल भेटीच्या ओढीने पूर्ण भारतातून लोक
एकत्र येतात. गर्दीतून वाट काढतानाही माऊली.. माऊली म्हणणारा, लहान-थोर,
गरीब-श्रीमंत, उच्च-नीच कोणताही भेद न मानता परस्परांच्या पाया पडणारा
वारकरी हे सारे अद्भुत होते. वारकरी संप्रदाय लीनता, नम्रता शिकवणारा आहे
हे मला तेथे पटले. जय हरी, रामकृष्णहरी, माऊली हे शब्द नकळतपणे माझ्या
अंगवळणी पडले.
पालखी सोहळ्यात विसावा, मनोरंजन म्हणून चालणारी
प्रबोधनपर भारुडे, रिंगण व त्यानंतरचा उडीचा खेळ, समाजआरतीचा अचंबित करणारा
क्षण अवर्णनीय आहे. तो प्रत्येकाने एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवायला हवा.
दररोज मुक्कामाच्या जागी असलेल्या पालखीतळावर माऊलींची
पालखी ठेवली तो तंबू ठोकल्याशिवाय इतर दिंडी-मानक ऱ्यांचे तंबू ठोकले जात
नाहीत. दररोज पालखीसमोर होणारी मानाची कीर्तने, जागर हे सारे परंपरेने
ठरलेले आहे. त्यात कोणताही बदल होत नाही. पालखीतळावर प्रत्येक दिंडीच्या
जागा माऊलींच्या तंबूला केंद्रस्थानी मानून ठरलेल्या असतात. त्याची
प्रत्येक वर्षी निश्चिती करावी लागत नाही. वर्षांतून एकदाच त्या प्रत्येक
गावातून पालखी जात असूनही पुन्हा त्याच विषयावर चर्चा किंवा शिक्कामोर्तब
करावे लागत नाही हे व्यवस्थापन-नियोजन एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना
शिकण्यासारखे आहे.
पालखीतळावर पालखी पोहोचल्यावर होणाऱ्या समाजआरतीचा
अनुभव अचंबित करणारा होता. पालखी विशिष्ट जागी ठेवल्यावर पालखीजवळ कोणी उभे
राहायचे हे ठरलेले असते. पालखीजवळ मध्यभागी चोपदार उभे राहतात. सर्व
दिंडय़ा तळावर गोलाकार पद्धतीने भजन करतच त्यांच्या त्यांच्या जागा घेतात.
चोपदारांनी चोप उंचावल्यावर सर्व दिंडय़ा शांत होतात. पण एखादी दिंडी टाळ
वाजवत राहते. ही त्या दिंडीची काही तरी तक्रार असल्याची खूण असते. या
दिंडीपर्यंत दुसरे चोपदार व मालक जातात. त्यांची तक्रार समजून घेतात व
त्यांना पालखी सोहळा कार्यालयात मीटिंगमध्ये आपला प्रश्न सोडवला जाईल असे
आश्वासन देऊन पुन्हा चोप उंचावलेल्या चोपदारांना त्यांची तक्रार सांगितली
जाते व त्यांच्या आश्वासनानंतर त्यांचे टाळ थांबतात. यानंतर लाखोंच्या
समुदायात एक नीरव शांतता पसरते. हरवलेल्या वस्तू, सापडलेल्या वस्तू इ. ची
माहिती, उद्या पालखी
किती वाजता निघेल, विसावा, दुपारचे जेवण, पुन्हा विसावा, रात्रीचा मुक्काम
इ. माहिती चोपदारांमार्फत दिली जाते व आरतीला सुरुवात होते. प्रथम
ज्ञानेश्वरांची व नंतर संत निळोबारायांनी रचलेली तुकारामांची आरती
टाळांच्या गजरात म्हटली जाते. असा हा समाजआरतीचा क्षण विलक्षण असतो.
वारीत सर्व जाती-धर्माचेच नव्हे तर परदेशी लोकांनाही
भेटायला-बोलायला मिळाले. ‘युरिको इकेनोया’ अशीच एक जपानी महिला. ३१ वर्षे
पायी वारी केलेली. देह जपानी व जगणे हिंदुस्थानी’ असेच तिला मी म्हणतो.
आळंदीत तिला मी नेहमी पाहिलेले. आईकडून तिच्याबद्दल बरेच ऐकलेले. आईची व
तिची ३० वर्षांपासूनची ओळख व पुन्हा मैत्रीसुद्धा! वारीत ती दिसली. तिला
धावत जाऊन ओळख दिली. मी शैलजाचा मुलगा. ‘अरे, तुम भी वारी में हो.’ आणि
आमचा संवाद सुरू झाला. पाऊस सुरू झाला होता. आम्ही एका ट्रकखाली बसून १।।
ते २ तास गप्पा मारल्या. ‘ज्ञानोबा-तुकोबा-विठोबा व विनोबा हेच माझे जीवन’
असे म्हणणारी युरिको आता ६२ वर्षांची आहे. तब्येतीने आता जमत नाही. सकाळी
चालायचे व दुपारनंतर पुढे जाऊन झाडाखाली बसून ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे
हा तिचा सध्या नेम आहे. तिच्या भेटल्यामुळे ज्ञानात भर तर पडलीच पण तिची
अतिशय प्रसन्न, आनंदी अशी भावमुद्राही मला टिपता आली.
प्रत्येक गावात पालखी पोहोचल्यावर कदाचित त्या
गावाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक त्या गावात सामावून जातात. त्या गावाचे
आर्थिक उत्पन्न सायं. ६.०० ते सकाळी ६.०० या १२ तासांत वार्षिक
उत्पन्नाइतके वाढते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येक जिल्ह्य़ातील
प्रांत, जिल्हाधिकारी, सरकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा अतिशय सक्रिय असते.
वारकरी भक्तांना कोणताही त्रास होऊ नये. याची काळजी सर्व यंत्रणेमार्फत
घेतली जाते. गॅस, रॉकेलवाटप, पाणी इ. सर्व बाबी अतिशय सुलभपणे मिळतात.
वारीबरोबर चालणारा कोणताही माणूस उपाशी राहात नाही. तंबूजवळ भीक मागणारा
एखादा गरीब भिकारीही ‘माउली..’ म्हणताच त्याला जेवण दिले जाते. जे पदार्थ
आपण घरीसुद्धा सहजपणे करीत नाही ते सर्व पदार्थ वारीत भरपूर खायला मिळतात.
मग ती पुरणपोळी असो वा गुलाबजाम, जिलेबी. गावातील प्रत्येक जण माउलींची
सेवा करण्यासाठी सरसावलेला असतो. वारक ऱ्यांची सेवा हीच माउलींची सेवा असे
प्रत्येक जण समजतो.
वारीसोबत पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना
दिंडी, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान दिंडी, व्यसनमुक्ती दिंडी, पर्यावरण
दिंडी, आय.टी. दिंडी अशा विविध प्रबोधनाचे विषय घेऊन अनेक िदडय़ा उत्साहाने,
औत्सुक्याने अलीकडे सहभागी होत आहेत.
माउली.. ही एक अनामिक ओढ वारीत सामील झाल्यावर
सर्वाच्याच मनामनात निर्माण होते. कधी कधी एखाद्याचे नाव-गाव माहीत नसते,
लक्षात नसते. पण ‘अमुक दिंडीतील तमुक दिसत नाही यंदा’ अशी चौकशी आस्थेने
केली जाते. परस्परांमध्ये प्रेम, आपुलकी निर्माण करते ही वारी!
वारीत मला पत्रकार, फोटोग्राफर असे अनेक जण भेटले.
माझे वय लहान असतानाही मी त्यांच्यात कधी सामावून गेलो कळलेच नाही. कितीतरी
चांगली माणसे वयाचे बंध गळून माझे मित्र झाले.
वारी शिकवे लीनता, नम्रता, आपुलकी, प्रेमभावना,
समानता, बंधुभाव. वर्षांतून एकदाच भेटणारी, कडकडून मिठी मारणारी,
परस्परांच्या पाया पडणारी, पंढरपुरात पोहोचल्यावर वाळवंटात निरोप घेताना
डोळ्यांतून अश्रू गाळणारी माणसे पाहिली आणि धन्य झालो. असे अनेक क्षण
कॅमेऱ्यात टिपताना नकळतपणे काही क्षणी मलाही दिसेनासे झाले.
वारीमुळे सर्वात मोठा झालेला माझ्यातील बदल म्हणजे मी
सर्वकाही खायला शिकलो, अॅडजेस्टमेंट शिकलो असे आई-बाबा म्हणतात. वारीहून
घरी परतलो तरीही काही महिने मी त्या वातावरणातून बाहेर आलो नव्हतो. सकाळी
उठल्याबरोबर कॉम्प्युटर, टेपवर अभंगाच्या सीडी लावायचो. गायचो, नाचायचो,
घरातील वातावरण बदलून गेले होते.
सुमारे तीन ते साडेतीन हजार फोटो क्लिक झाले होते.
त्या सर्वाचा पुन्हा पुन्हा अभ्यास करून वारीत चालण्याचा प्रत्यक्ष अनुभव व
आनंद सर्वाना मिळावा यासाठी निम्मे परंपरागत व निम्मे क्रिएटिव्ह फोटो
एकत्रित करून असे ८० फोटोंचे प्रदर्शन या वर्षी पालखी सोहळ्याच्या
निमित्ताने ‘आनंदवारी.. एक सुखद अनुभव’ या नावाने आयोजित करण्याचे ठरवले.
दोन-तीन महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्रीण झालेली
‘अभिनव’ची समृद्धी कडोलकर वारीवरील भित्तिचित्र रेखाटण्यासाठी, प्रदर्शनाची
मांडणी करण्यासाठी दोन-तीन दिवस मदतीला आली. फेसबुक दिंडी चालवणारा
स्वप्निल मोरे केवळ ‘वारी’ विषयामुळे चांगला मित्र झाला. आयटी दिंडीतील
सुरेश तळेकर दोन दिवसांपूर्वीच ओळख झाली असताना प्रदर्शनाची मांडणी करताना
‘काही मदत हवी का?’ म्हणून मदतीला आला. हे फक्त वारीमुळेच होऊ शकते असे मला
वाटते.
अवघ्या १८ वर्षांचा मी ही ‘आनंदवारी’ एवढय़ा समृद्धपणे
मांडतोय म्हटल्यावर पुण्यातील सर्व वृत्तपत्रांनी, चॅनेल्सने दखल घेऊन
भरपूर प्रसिद्धी देऊन माझा उत्साह वाढवला. याच वर्षी www.warisantanchi.com
या वेबसाइटची निर्मिती झाली. यात वारीचा इतिहास, परंपरा, दिंडय़ा अशी
वारीविषयीची सर्व माहिती व प्रत्यक्षवारी हा अनुभव नेटिझन्सना देता यावा
म्हणून प्रयत्न केले. या वेबसाइटसाठी सर्व फोटोग्राफ्स माझ्याकडून घेण्यात
आले. याचाही आनंद अवर्णनीय आहे.
ही वेबसाइट निर्माण करणारी सर्व टीम स्वप्निल कापसेकर, अजय, अभय टिळक व मी
सर्वानी केवळ माऊलींची सेवा म्हणून हे काम केले. ही संधी मला वारकरी सेवा
संघामुळे मिळाली.
‘वारी’ ने दिलेला अनुभव अविस्मरणीय आहे. यापुढे प्रत्येकवर्षी वारी करायचीच
हे तर ठरवले, पण वारीच्या सर्व अंगांनी विचार करून वेगवेगळी थीम घेऊन
फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ‘आनंदवारी’ने मला खूप मोठे
केल्याची भावना आज माझ्या मनात आहे.
शब्दांकन - अॅड. शैलजा ज्ञानेश्वर मोळक
|
|
No comments:
Post a Comment