Monday, February 18, 2013

मायक्रोसॉफ्‍टचा एक डाव रडीचा...

मायक्रोसॉफ्‍टचा एक डाव रडीचा...
 सध्‍याचे युग स्‍पर्धेचे आहे. त्‍यामुळे बाजारात आपल्‍या उत्‍पादनाची निकड निर्माण करण्‍यासाठी आणि मागणी वाढविण्‍यासाठी सर्वच प्रयत्‍नशील असतात. मात्र , त्‍यासाठी अन्य उत्‍पादनांवर कुरघोडी करणे योग्य असले , तरी संबंधित उत्‍पादनाची ' निगेटिव्ह पब्‍लिसिटी ' करणे अयोग्यच आहे. असाच काहीसा प्रकार इंटरनेट जगतात आघाडीचे स्‍थान मिळविण्‍यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ही कंपनी ' गुगल ' च्या बाबतीत करीत आहे.

जगभरातील अनेक देशांनी खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर आर्थिक उदारीकरणाची गती वाढली. या उदारीकरणाचा फायदा सर्वच क्षेत्रांना झाल्यामुळे बाजारपेठाही ओसंडून वाहू लागल्या. त्यानंतरच्या काळात ' इंटरनेट ' हे संभाव्य ग्राहकांवर परिणाम करणारे प्रभावी माध्यम अल्पावधीतच समोर आले आणि बघताबघता फोफावले. सुरुवातीच्या काळात वेगाने वाढणारी ' डॉट कॉम ' कंपन्यांची सद्दी संपल्यानंतर ' गुगल ' नामक मायाजालाने ' इंटरनेट ' चा ताबा घेतला. आणि हळूहळू या क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राटाचे सिंहासनच कंपनीने पटकावले.

याचा परिणाम व्हायचा तोच झाला. कंपनीचे यश , प्रसिद्धी आणि कीर्ती लक्षात घेता अन्य कंपन्यांनीही ' गुगल ' च्या विरोधात बाजारात उडी मारली. पण , ' गुगल ' च्या अवाढव्य पसाऱ्यापुढे आणि सेवेच्या दर्जापुढे त्यांची डाळ शिजली नाही. त्यांना सपशेल शरणागती पत्करावी लागली. या कंपन्यांमध्ये ' मायक्रोसॉफ्ट ', ' याहू ', ' रेडिफमेल ' आणि ' सिफी ' आदींचा समावेश होतो. ' इंटरनेट ' संबंधी सेवांमध्ये ' गुगल ' चे आव्हान मोडून काढणे , अन्य कोणालाही शक्य झाले नाही. अपवाद मात्र , ' फेसबुक ' चा. या सोशल नेटवर्किंग साइटने ' गुगल ' च्या ' ऑर्कुट ' नामक सेवेला अक्षरशः लोळवले.

सध्या ' इंटरनेट ' संबंधी सेवांमध्ये ' मेल सर्व्हिस ' चा मोठ्या प्रमाणात वापर होतो. ही सेवा देणाऱ्यांमध्ये ' गुगल ' ची ' जी मेल ' सेवा आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ ' याहू ', ' रेडिफ ', ' सिफी ' आणि ' मायक्रोसॉफ्ट ' च्या ' आउटलूक डॉट कॉम ' चा (पूर्वाश्रमीची हॉटमेल) क्रमांक लागतो. जगभरात पसरलेल्या कोट्यवधी नेटिझन्सद्वारा वापरण्यात येणाऱ्या मेल सेवांमध्ये सध्या ' जी मेल ' ने अक्षरशः धूमाकूळ घातला आहे. केवळ मेल सर्व्हिसच नव्हे , तर संबंधित अनेक सेवा दिल्याने ' जी मेल ' ची सध्या घोडदौड सुरू आहे. मात्र , ' जी मेल ' ची घोडदौड वाटते तेवढी सोपी राहिली नसल्याचे ६ फेब्रुवारीला दिसून आले. या क्षेत्रात अग्रगण्य स्थान पटकाविण्याच्या महत्त्वाकांक्षेने बाजारात ' कमबॅक ' करणाऱ्या ' मायक्रोसॉफ्ट ' ने ' गुगल ' च्या ' जी मेल ' वर प्रायव्हसी भंगाचा खळबळजनक आरोप केला. आजपावेतो एकाही प्रतिस्पर्ध्याकडून अशा प्रकारचे आरोप न झालेल्या ' गुगल ' चे व्यवस्थापन या प्रकारामुळे चक्रावून गेले.

प्रायव्हसी भंगाचा आरोप

जगभर पसरलेल्या विस्तृत यूजर नेटवर्कचा वापर ' जी मेल ' च्या माध्यमातून ' गुगल ' जाहिराती विकण्यासाठी करीत असल्याचा खळबळजनक आणि तितकाच गंभीर आरोप ' मायक्रोसॉफ्ट ' ने केला. अशा पद्धतीचे आरोप ' मायक्रोसॉफ्ट ' तर्फे या पूर्वीही करण्यात आले आहेत. मात्र , यंदा आरोप करताना ' गुगल ' च्या विरोधात प्रबळ पुरावे देण्याचा दावा बिल गेट्स यांच्या मालकीच्या ' मायक्रोसॉफ्ट ' ने केला. हे आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वनिर्मित ' स्क्रूगल्ड डॉट कॉम ' (Scroogled.com) या वेबसाइटचा आधार घेतला. विविध अहवाल आणि आकडेवारीच्या माध्यमातून ' गुगल ' ची तथाकथित चोरी आपण पकडली असल्याचेही ' मायक्रोसॉफ्ट ' ने स्पष्ट केले. या पूर्वीही २०११मध्ये कंपनीने ' जी मेल मॅन ' आणि २०१२ मध्ये ' गुगल लायटिंग ' या पॅरोडी अर्थात विडंबनात्मक व्हिडीओंद्वारे ' गुगल ' वर आरोपांची झोड उठवली होती.

मेलचे स्कॅनिंग

' गुगल ' च्या तथाकथित कृष्णकृत्यांचा भांडाफोड केल्याचा दावा करताना ' मायक्रोसॉफ्ट ' ने एक उदाहरण पेश केले. एक महिला ' जी मेल ' यूजरने आपल्या मैत्रिणीला नवऱ्याच्या वागणुकीविषयी माहिती कळवली. त्यात आपण लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी संबंधित महिलेला आलेल्या मेलमध्ये घटस्फोट मिळवून देण्यात वाकबगार असलेल्या वकिलाची जाहिरात असलेली ' मेल अॅटॅचमेंट ' आली. मुंबईतील एका ' जी मेल ' यूजरने मित्राला आपल्याला मुंबई दर्शन करायचे असल्याची मेल पाठवली. त्यानंतर संबंधिताला आलेल्या ' मेल अॅटॅचमेंट ' मध्ये ट्रॅव्हल कंपनीच्या विविध ऑफर आल्याचे ' मायक्रोसॉफ्ट ' ने म्हटले आहे.

' मोड्स ऑपरेंडी ' काय ?

' जी मेल ' च्या माध्यमातून पाठविण्यात येणारे अथवा स्वीकारण्यात येणारे मेल ' स्कॅन ' करण्यात येतात. या ' स्कॅन ' मेलमधून ' की-वर्ड ' शोधण्यात येतात. उदा. घटस्फोट (डिव्होर्स) , प्रवास (ट्रॅव्हल) आदी ... त्यां प्रमाणे जाहिरातदारांकडे पैसे घेऊन त्या पुढील मेलला जोडल्या जातात , असा ' मायक्रोसॉफ्ट ' चा दावा आहे. ' मेल सर्व्हिसेस ' च्या बाबतीत ' गुगल ' चे जाहिरातदारांना प्रथम आणि नंतर ग्राहकांना दु्य्यम प्राधान्य असल्याचे ' मायक्रोसॉफ्ट ' चे म्हणणे आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली प्रायव्हसी अबाधित राखण्यासाठी ' आउटलूक डॉट कॉम ' ची निवड करण्याची शिफारस ' मायक्रोसॉफ्ट ' तर्फे करण्यात येत आहे. पूर्वाश्रमीची ' हॉटमेल ' सेवा लयाला गेल्यानंतर तीत सुधारणा करून ' मायक्रोसॉफ्ट ' ने गेल्या वर्षी उन्हाळ्यात ' आउटलूक डॉट कॉम ' ही सेवा सादर केली.

तज्ज्ञांची पसंती ' गुगल ' लाच

' मायक्रोसॉफ्ट ' तर्फे करण्यात आलेला हा प्रकार म्हणजे तद्दन व्यावसायिकतेचाच एक भाग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा प्रकारे ' निगेटिव्ह पब्लिसिटी ' करून ' मायक्रोसॉफ्ट ' आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहे. ' गुगल ' च्या सेवेतील कमतरता दाखवून देण्यापेक्षा कंपनीने आपली सेवा सुधारावी आणि ती लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करावा , असा सल्ला तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य वेबसाइट असणाऱ्या ' पीसी वर्ल्ड ' च्या जॉन पी. मेल्लो यांनी ' मायक्रोसॉफ्ट ' ला दिला आहे.

' लढाई ' मागील खरे कारण काय ?

' इंटरनेट ' आणि ' तंत्रज्ञान ' क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार ' मायक्रोसॉफ्ट ' हळूहळू पुन्हा मोबाइल , मॅप्स आणि वेब ब्र्राउजर यांमध्ये रस घेत आहे. या पार्श्वभूमीवर ' गुगल ' ने ' मायक्रोसॉफ्ट ' ची निर्मिती असलेल्या विंडोज फोन , इंटरनेट एक्स्प्लोरर आणि अॅक्टिव्ह सिंक या सेवांना सपोर्ट न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ' इंटरनेट ' क्षेत्रात वरचढ होऊ पाहणाऱ्या या दोन्ही कंपन्यांमधून सध्या विस्तवही जात नाही. एकंदरीत पाहता , ' गुगल ' च्या व्पाप्तीमुळे त्यांच्याकडील जाहिरातींचा ओघ वाढला आहे. जाहिरातीच्या उत्पन्नात बरोबरी करणे अथवा त्यांना मागे टाकणे , हे ' मायक्रोसॉफ्ट ' साठी दिवास्वप्न ठरावे , अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही लढाई आणखी तीव्र होईल असा तज्ज्ञांचा होरा आहे.

जगभरातील एकूण मेल यूजर्स (जून २०१२ पर्यंत)
कंपनी संख्या
गुगल (जी मेल) ४२ कोटी ५० लाख (४२५ मिलियन)
मायक्रोसॉफ्ट (हॉटमेल + आउटलूक) ३२ कोटी ५० लाख (३२५ मिलियन)
याहू २९ कोटी ८० लाख (२९८ मिलियन)
( स्त्रोत : कॉमस्कोअर ग्रुप)
टीप : आपण वापरत असलेली मेल सर्व्हिस , तिचा दर्जा , उपयोगिता , सुरक्षितता या विषयीची अधिक माहिती या
http://free-email-services-review.toptenreviews.com लिंकवर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive