राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्स स्कीमबद्दल...
शेअर बाजाराविषयी अज्ञान आणि अनामिक भीती यामुळे अनेकदा लहान गुंतवणूकदार या गुंतवणूक प्रकारापासून लांब राहणे पसंत करतात. परंतु , त्यांनीही शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत , त्यातून लाभ मिळवावेत आणि शेअर बाजारात पैसा खेळता राहावा म्हणून सरकारने ही नवी योजना सुरू केली आहे. त्याची थोडक्यात माहिती.
......................
लहान गुंतवणूकदारांना देशातल्या भांडवल बाजारात पैसे गुंतवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्स स्कीम सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत , नव्या रिटेल गुंतवणूकदारांना इन्कम टॅक्समधून एकदा सवलत मिळेल. या योजनेसाठी पात्र असलेल्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवलेल्या रकमेवर पहिल्या आर्थिक वर्षात कलम ८०-सीसीजीनुसार ५० टक्क्यांपर्यंत वजावट मिळेल आणि ही सवलत ५० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर मिळेल.
योजनेचे स्वरूप
सर्वप्रथम , डिमॅट खाते उघडल्यानंतर त्याचा वापर राजीव गांधी योजनेसाठी करायचा असल्याचे गुंतवणूकदाराने डिपॉझिटरीला कळवणे गरजेचे आहे. त्यानंतर , गुंतवणूकदाराला विकत घ्यायचे असलेले शेअर्स डिपॉझिटरी वर्षभरासाठी निश्चित करते. दुसऱ्या वर्षी , गुंतवणूकदाराला २० हजार रुपयांच्या शेअर्सची विक्री करता येईल , पण त्याच वेळी त्याने तितक्याच रकमेचे अन्य शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे. तिसऱ्या वर्षापर्यंत , ५० हजार रुपयांपर्यंतच्या शेअर्समध्ये गुंतवणूक असावी लागेल. करसवलतीच्या दृष्टीने , डिपॉझिटरीकडून व्यवहारांची खातरजमा केली जाते आणि करसवलत मिळण्यासाठी गुंतवणूकदाराने आपल्या गुंतवणुकीच्या नोंदी ठेवायला हव्यात. २०१२-१३ आर्थिक वर्षासाठी राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्स स्कीममध्ये गुंतवणूक करता येईल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय बघत असलेल्या गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक करून या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला हवा.
प्रादेशिक भाषांतल्या जाहिरातींमार्फत या योजनेचा प्रसार केला जाणार आहे. तसेच , विविध सेमिनार आयोजित करूनही या योजनेविषयी जाणीवजागृती केली जाईल. यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची मदतही घेतली जाईल.
पात्रतेचे निकष
या योजनेअंतर्गत कर सवलत केवळ ' नव्या रिटेल गुंतवणूकदारां ' ना मिळणार आहे. हे गुंतवणूकदार म्हणजे ज्यांचे आर्थिक वर्षातील उत्पन्न १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. या योजनेची अधिसूचना मिळेपर्यंत डिमॅट खाते उघडलेले नसलेल्या किंवा डेरिव्हेटिव्ह विभागात कोणतेही व्यवहार केले नसलेल्या कोणत्याही निवासी व्यक्तीचा समावेश ' नव्या रिटेल गुंतवणूकदारां ' मध्ये होतो. तसेच , योजनेची अधिसूचना मिळण्यापूर्वी डिमॅट खाते उघडलेल्या , परंतु अधिसूचना मिळेपर्यंत इक्विटी वा डेरिव्हेटिव्ह विभागात कोणतेही व्यवहार न केलेल्या व्यक्तीलाही ' नव्या रिटेल गुंतवणूकदारां ' मध्ये समाविष्ट केले जाईल.
गुंतवणूक कालावधी
पात्र शेअर्समध्ये गुंतवणूक करून ठेवण्याचा कालावधी तीन वर्षे आहे. पहिल्या वर्षी निश्चित लॉक-इन कालावधी आहे , तर दुसऱ्या वर्षी लवचिक लॉक-इन कालावधी असेल. लवचिक लॉक-इन कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना विशिष्ट अटींचे पालन करून शेअर्सचे व्यवहार करता येतील. याबद्दलच्या सविस्तर अटी इन्कम टॅक्स विभाग आणि सेबीच्या परिपत्रकात नमूद केल्या आहेत.
गुंतवणुकीस पात्र सिक्युरिटीज
एनएसईने ठरवलेल्या ' सीएनएक्स-१०० ' मध्ये किंवा बीएसईने ठरवलेल्या ' बीएसई-१०० ' मध्ये समाविष्ट होणारे इक्विटी शेअर्स
केंद्र सरकारने महारत्न , नवरत्न वा मिनिरत्न अशा श्रेणींत विभाजन केलेल्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स
' आरजीईएसएस ' मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) किंवा म्युच्युअल फंड योजना
' सीएनएक्स-१०० ' किंवा ' बीएसई-१०० ', तसेच विशिष्ट सरकारी कंपन्याच्या फॉलो-ऑन ऑफर.
पात्र असलेल्या ईटीएफ व म्युच्युअल फंडांच्या न्यू फंड ऑफर
No comments:
Post a Comment