Sunday, July 15, 2012

डॉ. विजय जोशी - Dr. Vijay Joshi - Order of Australia

लोखंडापासून निघणाऱ्या मळीचे रिसायकलिंग करून टिकाऊ रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान विकसीत करणाऱ्या डॉ. विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियन सरकारने ' ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ' हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. भारतातील पद्मश्री पुरस्काराच्या दर्जाचा हा सन्मान आहे.

डॉ. विजय जोशी हे मूळचे ठाणेकर. मो. ह. विद्यालयाचे माजी विद्यार्थी. त्यांनी व्हीजेटीआयमधून सिव्हिल इंजिनीअरींगची पदवी घेतली. त्यानंतर मास्टर्सही पदवी मिळवली. पुढे टाटा , हमफ्रीज् अॅण्ड ग्लेक्सो (आताची जेकब इंजिनीअरिंग) या उद्योग समूहांमध्ये त्यांनी काम केले. तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्स येथे कार्यरत असताना २५० फूट उंच प्रिलिंग टॉवरच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. मस्कत येथे काही काळ अनुभव घेतल्यानंतर न्यूझीलंड येथील वास्तव्यात त्यांनी रस्तेबांधणीच्या कामात विशेष प्राविण्य मिळविले. गेल्या २० वर्षांपासून जोशी सिडनी येथे स्थायिक आहेत. तेथे स्टील उत्पादनात वाया जाणारे घटक रस्त्यांसाठी कसे वापरता येतील या विषयावरचा प्रबंध पूर्ण करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. लोखंडापासून निघणाऱ्या मळीचा (स्लॅग) उपयोग करून रस्ते बांधणीचे नवे तंत्र त्यांनी विकसीत केले. ऑस्ट्रेलियातील प्रमुख रस्त्यांसह सिडनी एअरपोर्टच्या तिसऱ्या रनवेसाठी हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. उत्तम दर्जाचे आणि टिकाऊ रस्ते त्यातून बांधले गेले. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ऑस्ट्रेलियात रस्ते बांधणीतील रेती , खडी आणि अन्य सामग्री अशी मिळून २ कोटी टन (मुंब्रा पारसीक डोंगराएवढे पाच डोंगर भरतील एवठी खडी व माती) एवढ्या प्रचंड नैसर्गिक साधन संपत्तीची बचत झाली. याच कार्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने डॉ. विजय जोशी यांना ' ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ' हा पुरस्कार प्रदान केला आहे.

इंजिनीअरींग बरोबरच संगीत , साहित्य , कला यातही जोशी यांना विशेष रुची आहे. सिडनीत येणा-या तमाम भारतीय कलाकारांचे आदरातिथ्य आपुलकीने करतात. सिडनीतले आकाशवाणी केंद्र सुरू करण्यातही आणि त्यावर विविध कार्यक्रमांच्या आयोजनातही जोशी यांचा पुढाकार असतो. नैसर्गिक साधन्ा संपत्ती वाचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे डॉ. विजय जोशी नेहमी सांगत असतात. शहराची निर्मिती आणि विकासाच्या प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर होत असतो. अलिकडच्या काळात या वापरावर कुठलेही निर्बंध राहिलेले नाहीत. बेसुमार जंगलतोड , खाडी व नद्यामतील वाळू तसेच छोट्या टेकड्या व मोठे डोंगर पोखरून दगड आणि मातीचा उपसा केला जातोय. त्यामुळे भविष्यात मानवी समाजासमोर अनेक संकटे उभी ठाकणार आहेत. याची जाणिव राज्यकर्ते आणि समाजानेही ठेवायला हवी असेही जोशी आवर्जुन सांगतात.

1 comment:

  1. विजय जोशी यांचा आम्हाला अभिमान वाटतो श्रीकांत जोशी Pune /Solapur

    ReplyDelete


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive