Sunday, July 15, 2012

सत्याचे (सापेक्ष) प्रयोग! - Experiment of truth

महात्मा गांधी यांनी आत्मकथेला ' माझे सत्याचे प्रयोग ' (My Experiment of truth)असे नाव दिले. सत्य सापडले असा त्यांचा दावा नव्हता. ' आपुलाचि वाद आपणाशी ' या न्यायाने ते सत्य शोधत राहिले. त्या शोधाची ती कहाणी. गांधींचे सत्य नवी दिल्लीतल्या घटनांमध्ये किंवा कुणाची उंची जोखण्यात अडकलेले नव्हते. ते ' सत्य ' व त्याचे प्रयोग निराळेच होते. ते आतला प्रवास टिपणारे होते. आज मात्र स्वतःचा बाहेरचा प्रवास सांगणारी तीन आत्मचरित्रे गाजत आहेत. पुस्तके वादग्रस्त करून त्यांचा गाजावाजा कसा करायचा , याचे शास्त्र गेल्या दोन दशकांत जगभर विकसित झाले आहे! त्याला मिडियाच्या अनेकांगी विस्ताराने आणखी बळ मिळाले आहे. मात्र , ही तीनही आत्मकथने राष्ट्रीय जीवनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या व्यक्तींची आहेत. पहिले ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नयर यांचे ' बियाँड द लाइन्स. ' दुसरे , माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे ' टर्निंग पॉइंट्स अँड जर्नी थ्रू चॅलेंजेस. ' ( कलामांचे हे दुसरे आत्मकथन. पहिले ' विंग्ज ऑफ फायर ' आजही विक्रमी विक्री करते आहे.) तिसरे , दिवंगत काँग्रेस नेते अर्जुनसिंग यांचे ' ए ग्रेन ऑफ सँड इन द अवरग्लास ऑफ टाइम ' अशा कमालीच्या विनम्र शीर्षकाचे. या तीनही पुस्तकांनी वाद निर्माण केले.

आत्मचरित्र म्हणजे इतिहास नव्याने घडविण्याची संधी , असे वचनच आहे! ' आत्मकथा ' या शब्दातच पुरेपूर सापेक्षता असल्याने तिच्या प्रत्येक पानावर लेखकाची अदृश्य स्वाक्षरी असतेच. प्रश्न येतो तो कोट्यवधी आयुष्यांना स्पर्श करणाऱ्या इतिहासाची पाने या कथनांमधून नव्याने उलगडू लागतात तेव्हा. अर्जुनसिंग यांच्या आयुष्यातल्या भोपाळकांड , पंजाबप्रश्न आणि बाबरीकांड या तीन सर्वांत महत्त्वाच्या घटना. त्यातल्या बाबरीकांडाची सर्व जबाबदारी नरसिंहरावांच्या उपरण्यात बांधून अर्जुनसिंग मोकळे झाले आहेत. ' तरी मी सांगत होतो.. ' हे पालुपद लावून त्यांनी आपले द्रष्टेपण रावांच्या अडेलतट्टू वागणुकीने कसे वाया गेले , हे दाखवून दिले आहे. अयोध्येच्या महापापातून ते स्वतःला वाचवत असले तरी त्यांना उत्तर द्यायला नरसिंहराव आज आहेत कुठे ? तीच गोष्ट कुलदीप नयर यांची. लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू हा नयर यांच्या खास जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी तो आजवर अनेकदा लिहिला आहे. आता पुन्हा त्यांनी विषप्रयोगाची शक्यता अलगद सूचित करून समूहमन चाळविले आहे. पंजाबात अकालींना शह देण्यासाठी आक्रमक ' दल खालसा ' स्थापन झाले होते. त्याला ग्यानी झैलसिंग यांचा आशीर्वाद होता , हा नयर यांचा दावा खरा की खोटा ? कारण त्याला कागदोपत्री पुरावे नाहीत. शिवाय झैलसिंगही हयात नाहीत. या तुलनेत अब्दुल कलाम यांनी सोनिया गांधी यांना सरकारस्थापनेचे निमंत्रण देण्याबाबत जी विधाने केली आहेत , त्यांचा खुलासा सोनिया आज ना उद्या करू शकतात. तरीही त्यावर वाद झडू लागले आहेतच. इसवीसनाच्या चौथ्या शतकात पहिली आत्मकथा लिहिली गेली तेव्हा तिचे नाव ' अपोलोजिया ' होते. म्हणजे , भावना क्षमायाचनेची होती. पुढे अनेक शतके ' कन्फेशन्स ' या संकल्पनेभोवती आत्मकथा फिरत राहिल्या.

औद्योगिक क्रांतीनंतर इहवादाचा जसजसा पगडा वाढला , तसतसे आत्मकथेचे रूप पालटत गेले. ते स्वकेंद्री , आत्मसमर्थन करणारे झाले. पुढचा टप्पा अर्थातच इतरांचे इतिहासातील स्थान ' सापेक्ष सत्य ' सांगत सांगत खच्ची करायचे. अर्जुनसिंग यांनी ते नेमके साधलेले दिसते. ज्यांना अशा सत्याच्या कचाट्यातून सुटका हवी असते ते सरळ कादंबरीच लिहितात. नरसिंहराव यांनी ' द इनसायडर ' लिहून तो सोपा मार्ग स्वीकारला. सॅलिंजरने ' कॅचर इन द राय ' लिहून ती वाट पूर्वीच दाखवली होती. मात्र , आपल्याकडे कादंबरीलाही लाजवेल , अशा आत्मकथा लिहवून घेणाऱ्यांची कमी नाही. कित्येक कलावंत तसेच साहित्यिकांच्या आत्मकथा एकत्र ठेवून त्यांचे ऊर्ध्वपातन केले तर निरभ्र सत्याचे अत्तरासारखे चार-चारच थेंब हाती लागतील! अर्थात , विचक्षण इतिहासकारांचे हेच तर काम असते. त्यांना ' बिटविन द लाइन्स ' तर वाचावे लागतेच पण अनेकदा ' बिहाइंड द लाइन्स ' ही वाचून त्याचा अर्थ लावावा लागतो. कलाम , अर्जुनसिंग आणि नयर या तिघांनी इतिहासकारांना समृद्ध कच्चा माल पुरवल्याबद्दल त्यांचे ऋणीच राहायला हवे. मात्र , काळजी घ्यायची ती ही की , त्यांनी सांगितलेले सारे सत्यच मानून चालायचे नाही. हे त्यांच्या सापेक्ष सत्याचे प्रयोग आहेत , हे लक्षात ठेवायचे!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive