Sunday, July 15, 2012

पिकनिक स्पॉट ते एज्युकेशन हब - Picnic spot to education hub Bhivpuri

मुंबई आणि कोकण यांना जोडणारा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जाणारा खोपोली , कर्जतचा परिसर पूर्वीपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे ट्रेकर्सचा आकर्षणचा भाग आहे . कालांतराने यातील काही ठिकाणं पिकनिक स्पॉट म्हणून ओळखली जाऊ लागली . पर्यटकांची गर्दीही उसळू लागली . पण हे सारं पावसाळ्याचे चारच महिने . आता बाराही महिने ही स्टेशन्स गर्दीने फुलू लागलीयेत . याचं मुख्य कारण म्हणजे डोंबिवलीपासून ते खोपोलीपर्यंत जवळजवळ प्रत्येक स्टेशनवर एक तरी इंजिनीअरिंग कॉलेज सुरू झालयं . यात वॉटरफॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या भिवपुरीने बाजी मारली असून या स्टेशनवर तब्बल ११ कॉलेजेस उभारण्यात आली आहेत . यामुळे या गावाचा पूर्णतः कायापालट झाला असून याचे नगर होण्यास सुरूवात झाली आहे .

. ४७ ची इंजिनीअर्स लोकल

मुंबई सीएसटीहून सकाळी ६वाजून ४७ मिनिटांनी सुटणारी कर्जत लोकल ही ' इंजिनीअर्स लोकल ' म्हणून ओळखली जाते . या लोकलमध्ये भायखळापासून ते बदलापूरपर्यंत प्रत्येक स्टेशनावर भिवपुरी आणि कर्जत येथील इंजिनीअरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांची गर्दी उसळते . ठाणे आणि डोंबिवली या दोन स्टेशनांवर विशेष गर्दी होते . काही जण टाइमपास करत असतात तर काही जण अभ्यासाची चर्चा करत असतात . पावसाळ्यात मात्र प्रत्येक स्टेशनागणिक या विद्यार्थ्यांचा मूड बदलत असतो . याची सुरूवात होते ती खडवलीपासूनच . अनेक विद्यार्थ्यांचा बंकिंगचा मूड याच स्टेशनपासून सुरू होतो . तो अगदी नेरळपर्यंत कायम राहतो . मग एक दिवसाची माथेरान ट्रीपही काही विद्यार्थी करून येतात . भिवपुरीला कॉलेजमध्ये पोहोचले तरी कॉलेजलगतचे छोटे धबधबे हे विद्यार्थ्यांना आकर्षित करत असतात . यामुळे चार महिन्यांपुरते मर्यादित असलेले हे पिकनिक स्पॉट आता बारमाही पिकनिक स्पॉट झाले आहेत .

गल्लोगल्ली पेइंग गेस्ट

पश्चिम मुंबई आणि उपनगरांमधला पेइंग गेस्टचा ट्रेण्ड आता भिवपुरी , कर्जत या पट्ट्यातही दिसू लागला . पूर्वी लॉजिंग बोर्डिंग असेलेल्या या भागात काही घरांमध्ये एक खोली विद्यार्थ्यांना भाड्याने देण्यासाठी म्हणून राखीव ठेवण्यात येते . येथील कॉलेजेसला हॉस्टेलची सुविधा आहे , मात्र तेथे सर्वांनाच राहवयास मिळते असे नाही . अशा वेळी हे पेइंग गेस्टवाले विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून येतात . महिनाभर राहणे आणि एकवेळचे जेवण याचा दर साधारणतः १५०० रूपयांपासून सुरू होतो . हा दर कॉलेजच्याजवळच्या रूम्ससाठी वाढत जातो . मुंबई आणि उपनगरांपेक्षा कोकण पट्ट्यातील बहुतांश विद्यार्थी या कॉलेजेसमध्ये येत असल्यामुळे या मुलांसाठी खास मालवणी , कोंकणी जेवणाचीही सोय करण्यात येते . यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये कॉलेज कँटिनपेक्षा बाहेरील मेस अधिक पसंतीचे आहे .

धाबा कल्चर

मुंबईतील कॉलेजलगत असलेले हॉटेल्स हे फेमस स्पॉट मानले जातात . मात्र या भागातील धाबे विद्यार्थ्यांचे खाऊ - प्याऊचे अड्डे बनले आहेत . यामुळे इथं हॉटेल ऐवजी धाबा कल्चर रूढ होऊ लागलं आहे . आसपासच्या काही धाब्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून टिप्स घेऊन काही खास रेसिपीही केल्या जातात , त्यामुळे मुलांना त्यात अधिक आपलेपणा वाटतो .

गजबलेली स्टेशनं

पाच वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मंडळी प्रवास करायची . परंतु , ही कॉलेजेस सुरू झाल्यामुळे इथं सकाळी आणि दुपारी चांगलीच गर्दी होते असे निरिक्षण येथील स्टेशनवरी कर्मचाऱ्यांनी नोंदविले आहे . पूर्वी स्टेशन परिसरात एकही दुकान किंवा स्टॉल नव्हता . आता मात्र इथं स्टॉल्सची चांगलीच गर्दी जमली आहे .

मोबाइलचं कॉलेज पॅक

यात सर्वाधिक पसंती असलेली दुकानं मोबाइलची . विविध कंपन्यांनी कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेणारे रिचार्ज पॅक तयार केले आहेत . हे पॅक्स घेण्यासाठी या स्टॉल्सवर विद्यार्थी गर्दी करताना दिसतात . दुकानांत ' कॉलेज विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ऑफर ' असे बोर्डही लावले आहेत .

मराठमोळं वातावरण

मुंबई तसेच उपनगरातील विद्यार्थ्यांबरोबर रायगड जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी या कॉलेजेसमध्ये आल्याचे दिसते . येथे येणारे दहा पैकी पाच विद्यार्थी हे अलिबाग , मुरूड , महाड या भागातील आहेत . यामुळे परिसरात मराठमोळं वातावरण आहे . मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या वर्षाचे मराठी नोट्सही सिनिअर्स उपलब्ध करून देतात . यामुळे या विद्यार्थ्यांना खूप मदत होते .

रिअल इस्टेटचा विस्तार

काही कौलारू घरे , बैठ्या चाळी शेतं अशी काहीशी स्थिती असलेल्या भिवपुरी , कर्जत येथे रिअल इस्टेटमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे . मुंबईपासून लांब म्हणून यापूर्वी इथं गुंतवणूक करण्यास कोणी धजत नव्हते . परंतु , गेल्या चार वर्षांमध्ये येथे उभारण्यात आलेल्या शैक्षणिक संस्था आणि त्यामुळे या गावांचा होत असलेला विकास लक्षात घेता भिवपुरी स्टेशनजवळ उंच - उंच टॉवर्स दिसू लागले आहेत . रिअल इस्टेटमध्ये स्थानिकांनीही मोठी गुंतवणूक केली असून मुंबईतील काही बिल्डर्सही आता या डेस्टिनेशनकडे वळू लागले आहेत .

शैक्षणिक दर्जा

इथल्या शैक्षणिक संस्था अद्याप बाल्यावस्थेत आहेत . संस्थांमधील प्रवेश दरवर्षी होत असतात . मात्र इमारती , सोयी - सुविधा अद्याप बाल्यावस्थेत असून विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय . चांगला दर्जा मिळवण्यासाठी काही वर्षे जावी लागतात . विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कॉलेजस्तरावर विविध प्रयत्न सुरू असले तरी आजही तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक मर्यादांना सामोरे जावे लागत आहे .

अशीही होती ओळख

मुंबईला गावठी दारू पुरविणारे महत्त्वाचे ठिकाण म्हणून भिवपुरीची विशेष ओळख होती . येथे पूर्ण कुटुंब या व्यवसायात काम करत असे . या कुटुंबातील महिला वर्ग लोकल ट्रेनमधून दारू विक्रीसाठी बाहेर पडत असे . अनेकदा मुंबईहूनही गाड्या करून दारू खरेदीसाठी लोक या ठिकाणी येत असतं . याच गावाची ओळख आता एज्युकेशन हब म्हणून होऊ लागली आहे .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive