Sunday, April 25, 2010

शरीरपोषक धान्यवर्ग

शरीरपोषक धान्यवर्ग


रोजच्या वापरात असणाऱ्या अन्नधान्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांची, गुणदोषांची माहिती आपण घेतो आहोत. आज आपण अजुन काही धान्यांची माहिती घेऊ या.

च्या अंकात आपण तांदळाचे गुणधर्म पाहिले. त्यात तांबडा तांदूळ, साठेसाळीचा तांदूळ गुणांनी उत्तम असतो हेही पाहिले. अजून एक सांगायचे म्हणजे तो ज्या जमिनीत तयार होतो त्यानुसारही त्याचे गुण बदलतात.

दग्धायामवनौ जाताः शालयो लघुपाकिनः

कषाया बद्धविण्मूत्रा रुक्षाः श्लेष्मापकर्षणाः ।।

सुश्रुत सूत्रस्थान

भाजलेल्या जमिनीत होणारा तांदूळ पचायला हलका, किंचित तुरट, मलमूत्र कमी करणारा, रुक्ष कफदोष कमी करणारा असतो. तर साध्या म्हणजे अगोदर भाजून घेतलेल्या जमिनीत पिकविलेला तांदूळ कफ-पित्तनाशक जाठराग्नीचे वर्धन करणारा असतो.

अगोदर रोपे तयार करून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी रोवून तयार झालेला तांदूळ पचण्यास अतिशय हलका, गुणांनी श्रेष्ठ असतो, लवकर शिजतो, सर्वदोषनाशक, शक्तिवर्धक मूत्रल असतो.

बाजरी

ज्वारीप्रमाणे बाजरीचा चरक-सुश्रुतादि आर्ष ग्रंथात उल्लेख नाही, मात्र निघण्टुरत्नाकर बाजरी संबंधी सांगतात,

साजको वातलो हृद्यो बल्यः कान्तिकरो मतः

अग्निदीप्तिकरश्चोष्णो रुक्षः पित्तप्रकोपणः ।।

निघण्टु रत्नाकर

बाजरी गुणाने रुक्ष त्यामुळे वातुळ असते, मात्र हृदयाला हितकर, पचण्यास वेळ लागणारी असली तरी ताकद वाढवणारी असते. उष्ण वीर्याची असल्याने पित्त दोषाचा प्रकोप करवते. स्त्रीमधे काम उत्पन्न करणारी पण पुरूषाचे पुरुषत्व कमी करणारी असते.

नाचणी

लाल रंगाच्या या धान्यापासुन भाकरी, पापड वगैरे बनवता येतात. याला संस्कृतमधे नर्तक असे म्हणतात.

नर्तकस्तुवरस्तिक्तो मधुरः तर्पणो लघुः

बल्यः शीतः पित्तहरस्त्रिदोषशमनो मतः ।।

रक्तदोषहरश्चैव मुनिभिः पूर्वमीरितः ।।

निघण्टु रत्नाकर

नाचणी अथवा नागली चवीला मधुर तुरट, कडवट असते. पचायला हलकी असते, तर्पण म्हणजे सर्व शरीरधातुंचे समाधान करणारी असते, ताकद वाढवते. तीन्ही दोषांचे शमन करणारी असली तरी विशेषत्वाने पित्ताचे शमन करते, रक्तातील दोष दुर करणारी असते. बऱ्याचदा लाल रंगामुळे का काय पण नाचणी उष्ण असते असा समज आढळतो पण निघण्टुरत्नाकरातल्या या श्लाकावरुन नाचणी शीतल असते हे समजते.

उपवासाच्या दिवशी भगरीचा भात किंवा वरीचा भात करतात तेही एक धान्यच असते.

वरको मधुरो रुक्षस्तुवरो वातपित्तकृत्

निघण्टु रत्नाकर

वरी चवीला मधुर थोडीशी तुरट, रुक्षता वाढविणारी वात-पित्तदोष वाढविणारी असते.

उपवासासाठी राजगिराही वापरला जातो. याचे आयुर्वेदाने दोन प्रकार केलेले आहेत. लघु म्हणजे लहान राजगिरा बृहत्म्हणजे मोठा राजगिरा.

लघु राजगिरः प्रोक्तः कफकृत्सारको गुरुः

निद्रालस्यकरः पथ्यः मलावष्टंभकारकः ।।

निघण्टु रत्नाकर

लहान राजगिरा कफवर्धक पचायला जड असल्याने निद्राकर आळस वाढविणारा असतो. वीर्याने शीतल, रुचकर पित्तशामक असतो, मलावष्टंभ करणारा असतो, मात्र योग्य प्रमाणात सेवन केला असता पथ्यकर असतो.

बृहत्राजगिरः पथ्यः सारकः चातिशीतलः

पित्तनाशकरश्चैव मुनिभिः परिकीर्तितः ।।

निघण्टु रत्नाकर

राजगिरा पथ्यकर, शीतल सारक पित्तनाशक असतो.

धान्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदात सांगितली आहे की सर्व धान्ये वर्षभर जुनी करून वापरावीत.

सर्वं नवीनं धान्यं तु गुरु स्वादु कफप्रदम्

स्तंभकरं तच्च द्विवर्षे लघु पथ्यकृत्।।

वर्षे तृतीयं विरसम्।।

निघण्टु रत्नाकर

एका वर्षाच्या आतले धान्य पचायला जड, कफवर्धक मलावष्टंभ करणारे असते. वर्षानंतरचे धान्य पचायला हलके पथ्यकर बनते, मात्र दोन वर्षांनंतर तिसऱ्या वर्षी विरस म्हणजे निःसत्त्व बनते.

- डॉ. श्री बालाजी तांबे

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive