Saturday, January 28, 2012

पानिपत - ऐतिहासिक कादंबरी Panipat - Historical Novel

पानिपत - ऐतिहासिक कादंबरी Panipat - Historical Novel

कीर्तिकुमार शिंदे
‘‘शी! शी! पानिपत हा किती अभद्र शब्द आहे. हे शीर्षक तुमच्या कादंबरीला अजिबात देऊ नका,’’ असा सल्ला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांनी २२ वर्षांपूर्वी एका पंचविशीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला दिला होता. त्या तरुण अधिकाऱ्याने भरपूर पायपीट करून, संशोधन करून, रात्रीचा दिवस करून एक कादंबरी लिहिली होती.
पण भविष्याच्या उदरात या कादंबरीविषयी काही तरी भव्यदिव्य दडलेलं असावं. पानिपतच्या लढाईने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं. काहीसा तसाच त्या लेखकाच्या कादंबरीने मराठी साहित्यसृष्टीला व ‘पानिपत’ या शब्दालाही एक वेगळा अर्थ दिला. ती कादंबरी महाप्रचंड लोकप्रिय ठरली. तिने अनेक उच्चांक रचले. गेल्या २२ वर्षांत या कादंबरीच्या मराठीत २९ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. अनेक भाषांत तिचे अनुवाद झाले. लेखकावर पुरस्कारांचा वर्षांव झाला..
येत्या मकरसंक्रांतीला पानिपतच्या लढाईला २५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि विश्वास पाटील यांच्या ‘पानिपत’ची ३० वी आवृत्तीही प्रकाशित होत आहे. या दुग्धशर्करा योगाचं निमित्त साधून या कादंबरीच्या जन्माची प्रत्यक्ष लेखकानेच सांगितलेली ही कहाणी..
पानिपतची लढाई म्हणजे मराठी माणसाच्या मनातली भळभळती जखमच. अशा विषयावर ऐतिहासिक कादंबरी लिहायचं तुम्हाला कसं सुचलं?
रियासतकार सरदेसाई यांच्या ‘द न्यू हिस्टरी ऑफ मराठाज्’ या ग्रंथाचा तिसरा खंड वाचत असताना त्यातल्या पानिपतची लढाई या प्रकरणाने माझं लक्ष वेधून घेतलं. चांगलं ७०-८० पानांचं भलंमोठं असं ते प्रकरण होतं. ते वाचत असतानाच मी या विषयाकडे आकर्षित झालो. इतकंच नव्हे तर नजीबखानची, ज्याचं तोपर्यंत काळकूट, सर्प, जहरी नाग, उलटय़ा काळजाचा अशा नानाविध पद्धतीने वर्णन केलं जात होतं, त्याची प्रतिमाच माझ्या डोळ्यासमोर साकार व्हायला लागली. मी या विषयावर अधिक अभ्यास करायला सुरुवात केली.
तुमच्या आधीही पानिपतच्या लढाईवर बरंच लिहिलं गेलं होतं..
हो. माझ्या आधीही पानिपत या विषयावर अनेकांनी लिहिलं होतं. पानिपतच्या लढाईवर १२ कादंबऱ्या, १७-१८ नाटकं, काही प्रवासवर्णनं पूर्वीच प्रकाशित झाली होती. १९३० च्या सुमारास प्रकाशित झालेली चिंतामण वैद्यांची ‘दुर्दैवी रंगू’ ही कादंबरीसुद्धा गाजली होती. पण त्यात नजीबखानचा साधा उल्लेखही नव्हता. हा नजीब कुणाला सापडलाच नव्हता. खरं तर त्यानेच अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दालीला मराठय़ांपासून दिल्लीला वाचवण्यासाठी हिंदुस्तानात येण्याची विनंती पत्राद्वारे केली होती. हिटलरसाठी गोबेल्सने जसं प्रचाराचं भयंकर तंत्र वापरलं तसं नजीबखानने त्याच्या काळात वापरलं. हिंदू विरूद्ध मुस्लिम, शिया विरूद्ध सुन्नी, उत्तर हिंदुस्तानी विरूद्ध दख्खनी अशा त्याने काडय़ा लावल्या. भांडणं काढली.
या नजीबखानसारख्या अनेक व्यक्तिरेखा तुमच्या ‘पानिपत’ कादंबरीत आहेत. त्या उभ्या करताना तुम्हाला काही विशेष मेहनत घ्यावी लागली का?
मेहनत तर खूपच घेतली. चार-पाच र्वष माझं संशोधन-वाचन-पानिपतला प्रत्यक्ष भेट असं चालू होतं. व्यक्तिरेखांविषयी म्हणायचं झालं तर सदाशिवराव भाऊ म्हणजे वेडा, लेचापेचा सेनापती असं म्हटलं जायचं. पानिपतच्या लढाईला राघोबांना सेनापती म्हणून पाठवलं असतं तर मराठय़ांनी पानिपतची लढाई जिंकली असती, असंही म्हटलं जायचं. पण माझ्या संशोधनातून माझ्यासमोर वेगळंच चित्र निर्माण होत होतं.
वि. गो. खोबरेकर यांनी ‘मराठय़ांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम’ या पुस्तकात बाजीरावापासून भाऊसाहेब पेशव्यांपर्यंतच्या सर्व पेशव्यांच्या उत्तरेतील लढायांचे मुक्काम, त्यासाठी झालेला खर्च यांचा अत्यंत सविस्तर अभ्यास केला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर सदाशिवराव भाऊंच्या ऐवजी कोणीही दुसरा सेनापती म्हणून लढला असता तरी काही फरक पडला नसता हे सत्य अधोरखित झालं.
पाटलांचं ‘पानिपत’ हिंदीतही टॉपलाच!
मराठीप्रमाणे ‘पानिपत’ची हिंदी आवृत्तीही गेली अनेक वर्षे विक्रीचा उच्चांक गाठत आहे. या हिंदी ‘पानिपत’च्या जन्माची कहाणी विश्वास पाटील यांनी आवर्जून सांगितली.
पी. व्ही. नरसिंहराव जेव्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते (देशाचे पंतप्रधान बनण्यापूर्वी) तेव्हा एकदा मुंबई भेटीवर आले असता त्यांना ‘पानिपत’ कादंबरीविषयी कळालं. त्यांनी ताबडतोब कादंबरी मागवून घेतली. नरसिंहराव यांना स्वत:ला मराठी भाषा उत्तम येत होती. काही मराठी पुस्तकांचा त्यांनी तेलुगूमध्ये अनुवादही केला होता. त्यावेळी ते ज्ञानपीठ अकादमीचे अध्यक्षसुद्धा होते आणि लगेचच त्यांनी या कादंबरीचा हिंदी अनुवाद करून घेतला.
आज इतक्या वर्षांनंतरही ही कादंबरी हिंदीत टॉपला असून हिंदीत ज्या पुस्तकांची सर्वाधिक विक्री होते त्यातून सर्वाधिक रॉयल्टी मिळणाऱ्या पहिल्या पाच लेखकांमध्ये विश्वास पाटील यांचा समावेश होतो.

मुळात भाऊसाहेब कधीच ‘फडावरचा कारकून’ नव्हता. मराठय़ांचं तोफदळ प्रबळ व्हावं म्हणून फ्रेंचांकडून तोफा घेणं, फ्रेंचांचा सेनापती फोडून मराठा सैन्यात आणणं तसंच अनेक लढायांचा अनुभव त्याच्याकडे होता.
१९४०च्या सुमारास मध्यप्रदेशात एक ‘हितचिंतक’ नावाचा विशेषांक निघाला होता. मी मोठय़ा प्रयत्नांनी तो मिळवला. या अंकात रियासतकार सरदेसाई यांचा ‘भाऊसाहेबांच्या जीवनाचे धागेदोरे’ हा अप्रतिम लेख वाचायला मिळाला. त्यामुळे सदाशिवराव भाऊची धूसर प्रतिमा हळूहळू स्पष्ट व्हायला लागली.
नानासाहेब, विश्वासराव, सदाशिवरावभाऊ, राघोबा, समशेरबहाद्दर, शिंदे, होळकर .. दुसऱ्या बाजूला अब्दाली, शहावलीखान, नजीबखान .. अशा असंख्य व्यक्तिरेखा प्रत्यक्ष कागदावर उतरवणं महाकठिणच. तुम्ही हे कसं काय जमवलं?
‘पानिपत’ हा विषय जेव्हा मला सुचला तेव्हा मला मौर्य काळातल्या ‘त्या’ अज्ञात शिल्पकारांच्या जमातीची याद आली. त्यांच्या कल्पनेत असलेली शिल्पं साकारण्यासाठी जेव्हा त्यांना अजंठा-वेरूळच्या डोंगरातला एकसंध दगड दिसला असेल तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल? पानिपतचा विषयही त्या अवाढव्य डोंगराइतकाच प्रचंड आहे. त्या इतिहासाच्या डोंगरातून जर चांगलं शिल्प कोरायचं असेल तर आपण आपली छिन्नी- लेखणी जबाबदारीने वापरायला हवी याचं मला पूर्ण भान होतं.
मी आधी पूर्ण अभ्यास केला. त्यासाठी चार-पाच र्वष थांबलो. हा विषय मनात पूर्ण मुरू दिला. त्यानंतर पाचशे-पाचशे पानांच्या दोन वह्याच केल्या. या वह्यांमध्ये मी एकेका व्यक्तिरेखेचं सविस्तर वर्णन लिहून काढलं. तो दिसतो कसा, त्याचं वय काय, त्याची कौटुंबिक-सामाजिक पाश्र्वभूमी काय अशा सगळ्या नोंदी करून ठेवल्या. माझ्या या नोट्सचा मला प्रत्यक्ष लेखनाच्या वेळी खूपच फायदा झाला.
त्या काळातली भाषा कशी उभी केलीत?
पानिपतच्या लढाईच्या काळाचा फील यावा यासाठी मी तत्कालीन अस्सल कागदपत्रं अभ्यासली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या दरम्यान पानिपतमधून महाराष्ट्राला व महाराष्ट्राकडून पानिपतला अशी हजारो पत्रं लिहिली गेली होती. सुदैवाने आजही ती उपलब्ध आहेत. या पत्रांमध्ये लढाईच्या वर्णनापासून ‘चिंगी गरोदर आहे’ इथपर्यंतची वर्णनं मिळाली. या पत्रांमुळे त्यावेळच्या चालीरीती, भाषा समजून घ्यायला खूपच मदत झाली. तोफेसाठी वापरला जाणारा ‘सुतरनाळ’ हा सुंदर मराठी शब्दही असाच समजला.
याशिवाय अरबी-फारसी भाषेतील बखरी- ‘तवारीका’ यांच्यावरही खूप भर दिला. तेव्हाच्या मध्यपूर्वेतल्या राजांची एक गोष्ट खूप चांगली होती. ती म्हणजे राजासोबत तिथले उत्तमोत्तम कवी, इतिहासकार, भूगोलतज्ज्ञ असायचे. त्यांनी केलेल्या वर्णनातून पानिपतची प्रत्यक्ष स्थिती, तिथलं वातावरण समजून घेता आलं. अशी चौफेर तयारी केली.
असाही एक प्रकाशक..
प्रकाशक हा मुळात व्यापारी असतो. त्यामुळे व्यापाऱ्याकडचा बिलंदरपणा प्रकाशकाकडे येतोच. तसं पाहिलं तर जगातले बहुतेक प्रकाशक सारखेच असतात! पण यालाही काही अपवाद आहेत. बंगलोरच्या सपना बुक हाऊसने माझी सगळी पुस्तकं कन्नडमध्ये अनुवादित करून प्रकाशित केली आहेत. वीरेंद्र शहा या प्रकाशनाचे मालक. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे लेखकाला पुस्तकाची पहिली छापील प्रत ते जेव्हा पाठवतात तेव्हाच त्या आवृत्तीसाठी लेखकाला मिळणाऱ्या संपूर्ण रॉयल्टीच्या रकमेचा चेकही पाठवतात. मला वाटतं, प्रत्यक्ष पुस्तक विक्री होण्यापूर्वीच लेखकाला संपूर्ण मानधनाचा आगाऊ चेक पाठवणारा हा जगातला एकमेव प्रकाशक असावा. मी जेव्हा त्यांना विचारलं की, ‘‘इतर प्रकाशक असं कधी करत नाहीत. मग तुम्हाला कसं काय हे जमतं?’’ यावर वीरेंद्र शहा यांचं उत्तर होतं: ‘‘प्रकाशक प्रिंटरला किंवा कागद पुरवणाऱ्याला पैसे देण्याचं कधी टाळतो का? मग त्याने लेखकाला त्याचे पैसे देण्याचं का टाळावं? लेखकाने जर त्याचं काम केलेलं आहे, तर त्याला त्याचे पैसे ताबडतोब मिळायलाच हवेत!’’
वीरेंद्र शहा यांनी असा पारदर्शक व्यवसाय केला, कन्नड साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिलं म्हणूनच त्यांना कर्नाटक सरकारचा ‘कर्नाटक राज्योत्सव प्रशस्ती’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- विश्वास पाटील

..आणि प्रत्यक्ष लेखन? कितीवेळा पुनर्लेखन करावं लागलं?
सगळी तयारी झाल्यावर एकदा लिहायला बसलो. ६०-७० पानं लिहून काढली. पण मनासारखं उतरत नव्हतं. जे लिहिलं त्याबाबत मी स्वत:च समाधानी नव्हतो. ब्रेक घेतला. पुन्हा वर्षभर अभ्यास- वाचन, मनन, चिंतन केलं.
अखेर नोव्हेंबर १९८७मध्ये लिहायला बसलो. एक मे १९८८ पर्यंत संपूर्ण कादंबरी लिहून काढली. अगदी एकटाकी. पुनर्लेखन वगैरे करण्याची गरजच पडली नाही.
माझ्या सुदैवाने तेव्हा सरकारी नोकरीत पाच दिवसांचा आठवडा होता. शनिवार-रविवार तर पूर्ण मिळायचेच. पण दररोज रात्रभर जागूनसुद्धा लेखन केलं.
लेखकाने कादंबरी लिहून पूर्ण केल्यानंतर ती एखाद्या प्रकाशकाने प्रकाशित करेपर्यंतच्या काळातही खूप काही घडत असतं. तुमचा या बाबतीतला अनुभव कसा होता?
मूळात ही कादंबरी श्रीविद्या प्रकाशनचे मधुकाका कुलकर्णी काढणार होते. तशी आमची चर्चाही झाली होती. ‘पानिपत’ लिहिण्याआधी मी लिहिलेल्या ‘क्रांतीसूर्य’ या लघुकादंबरीचा ड्राफ्ट त्यांनी वाचला होता. मी चांगलं लिहू शकेन याबाबत त्यांना खात्री होती. ठरल्याप्रमाणे मी त्यांना ‘पानिपत’चा ड्राफ्ट दिला. त्यांनी मुंबई-पुणे रेल्वे प्रवासातच त्यातलं एक प्रकरण वाचलं आणि ‘‘कादंबरी सुंदर झालीए, ती आपण प्रकाशित करणारच’’ असं कळवलं. ‘‘पण कादंबरीची पृष्ठसंख्या जास्त आहे. ती निम्मी करून द्या’’ असं त्यांचं म्हणणं होतं.
आता ५५० पृष्ठांची कादंबरी थोडीफार कमी करता आली असती, पण निम्मी करून देणं मला अशक्यच होतं. तेव्हा माझ्यासोबत शंकर सारडा होते. ते म्हणाले, ‘‘तुम्ही जे लिहिलंय ते महाकाव्याच्या तोडीचं आहे. कादंबरीची पृष्ठसंख्या अजिबात कमी करू नका.’’
‘राजहंस प्रकाशन’च्या दिलीप माजगावकरांशी माझी ओळख होती. तेव्हा माजगावकरांनी साप्ताहिक ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या काही चांगल्या लेखमालांची पुस्तके प्रकाशित केली होती. मी अनुवादित केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणांचा संग्रह ‘चलो दिल्ली’ त्यांनीच प्रकाशित केला होता. मी त्यांना कादंबरीचा पाच फाईल्सचा ड्राफ्ट दिला तेव्हा त्यातील उपशीर्षकं- दिल्लीवर हमला, तख्त की तीर्थ, संगरतांडव, पांढरं आभाळ वाचूनच ते खूष झाले. त्यांनी एका झपाटय़ात ती कादंबरी वाचून काढली आणि मुख्य म्हणजे चार-पाच महिन्यांतच नोव्हेंबर १९८८ मध्ये प्रकाशित केली देखील. कादंबरीची जाहिरातही उत्तम केली. पुढे थोडय़ाच दिवसांत ‘पानिपत’ या कादंबरीमुळे लेखक म्हणून विश्वास पाटील आणि प्रकाशक म्हणून दिलीप माजगावकर या दोघांना महाराष्ट्रात ठसठशीत ओळख निर्माण झाली.
शत्रूच्या व्यक्तिरेखेलाही तुम्ही तुमच्या कादंबरीत पूर्ण न्याय दिलाय..
माझं असं स्पष्ट मत आहे की किमान अभ्यास करताना तरी आपण आपल्या शत्रूकडेही मित्रासारखं पहायला हवं. त्याच्या दोषांचा अभ्यास करताना त्याच्यातील गुणांचाही अभ्यास करायला हवा. आपल्याकडे मात्र परंपरागत पद्धतीने शत्रूंना-मुस्लिमांना राक्षसाचे अवतार म्हणूनच रंगवण्यात आलंय. पण मी जेव्हा अब्दालीचा अभ्यास केला तेव्हा मला त्याच्यात नायकाचे अनेक गुण आढळले. आपण महात्मा गांधींना जसं भारताचे राष्ट्रपिता मानतो अगदी तसंच अब्दालीला आधुनिक अफगाणिस्तानचा राष्ट्रपिता मानलं जातं हे फारसं कुणाला माहीतच नव्हतं. तत्कालीन जगातल्या पहिल्या पाच प्रबळ बादशहांपैकी तो एक होता. त्यामुळे एवढय़ा प्रबळ शत्रूशी दोन हात करायला जेव्हा उत्तर भारतातले हिंदू-मुस्लिम राजे, राजपूत सरदार कुणीही तयार होत नव्हतं तेव्हा सह्याद्री पर्वताची सावली सोडून मराठेच दिल्लीच्या पातशाहीच्या संरक्षणासाठी लढायला गेले ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब नव्हे का? आपला ज्याने पराभव केला तो कुणी लेचापेचा सरदार नव्हता तर जगातला अत्यंत प्रबळ असा एक बादशहा होता हेसुद्धा आपण विसरून चालणार नाही. आपण लढाईत पराभूत होऊनही अजिंक्यच ठरलो असं माझं स्पष्ट मत आहे.
पण या लढाईमुळे मराठय़ांच्या स्वाभिमानाचा चक्काचूर झाला.. दिल्लीच्या राजकारणात त्यांचे नाक कापले गेले.. असं बरंच काही म्हटलं जातं. तुम्हाला हे मान्य आहे का?
मला हे अजिबात मान्य नाही.
पानिपतच्या लढाईत मराठय़ांचं कपाळ फुटलं म्हणून गंगा-यमुनेच्या काठावर वावरायला पुढच्या काळात मराठी घोडी कचरली नाहीत. देशाच्या राजकारणात त्यानंतरही मराठय़ांची भूमिका कायम महत्त्वाचीच राहिली. पानिपतच्या लढाईमध्ये शिंदे, होळकर, गायकवाड हे मराठे सरदार आघाडीवर होते. पानिपतच्या लढाईमुळेच या सर्वाना दिल्लीच्या अर्थात उत्तरेतल्या राजकारणाचा अनुभव मिळाला. या अखिल भारतीय पातळीवरच्या अनुभवाच्या जोरावरच शिंद्यांनी ग्वाल्हेरमध्ये, होळकरांनी इंदूरमध्ये तर गायकवाडांनी बडौद्यात आपापली राज्यं स्थापन केली. पानिपतच्या पराभवाची राख कपाळाला लावूनच ते फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उत्तर हिंदुस्तानात दिग्विजयी ठरले.
पानिपतच्या लढाईत महादजी शिंदे यांचा एक पाय निकामी झाला. पण याच मराठा सरदाराने पुढच्या वीस वर्षांत सहा बादशहांना दिल्लीच्या गादीवर बसवलं. इतिहासाने त्यांची दखल ‘किंगमेकर’ म्हणून घेतली आहे हे विशेष.
मी हे जे म्हणतोय त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे पानिपतनंतर अहमदशहा अब्दालीच उलट मराठय़ांना एवढा घाबरला की पुढच्या त्याच्या ३०-४० वर्षांच्या कारकिर्दीत त्याने पंजाब ओलांडून हिंदुस्तानात येण्याचं धाडस एकदाही केलं नाही!
म्हणूनच माझ्या मते ‘पानिपत’ची लढाई म्हणजे मराठय़ांचं ‘पानिपत’ नव्हे, खरं तर तो ‘पुण्यपथ’ आहे.

You can purchase this Marathi novel Panipat here

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive