Saturday, January 7, 2012

काहीतरी नविन ! Something New

काहीतरी नविन ! Something New!
बीईएसटीच्या बसमध्ये गर्दीत उभा होतो. ऑफिस मधून घरी चाललो होतो.
पावसामुळे रस्त्यावरच्या ट्राफिकचा चोथा झालेला.
गाड्यांच्या मागून बाहेर पडणारे वायू अश्रुधुराचं काम करत होते.
आपण का राहतोय या शहरात ?
सो कॉल्ड 'यशस्वी' होण्यासाठी जर हा विषारी धूर खाऊनच मरायचं असेल तर कशाला हा सगळा आटापिटा?
मग हे सगळं सोडून गावाला जायचं? पण गावाला जाऊन नक्की करायचं? शेती करायची?
आपण नक्की जगतोय कशासाठी ? कोणासाठी ?......
डोक्यात विचारांचा ट्राफिक जाम !
काहीतरी वाचुया तरीम्हणून खांद्यावरच्या बॅगमध्ये कसाबसा हात घालून एक पुस्तक बाहेर काढलं.
पुस्तक चाळता चाळता एका पानावर नजर थबकली.
आत्महत्या करण्यासाठी एक माणूस कड्यावरून खाली उडी मारणार तेवढ्यात एक साधू त्याला अडवतो.
साधू म्हणतो, 'आयुष्याला इतका वैतागला आहेस तर एक काम कर. माझ्याबरोबर इथल्या राजाकडे चल. तो आपल्या दोघांना 'मालामाल' करेल.'
दोघेजण राजासमोर उभे राहतात. साधू राजाला सगळी हकीगत सांगतो.
राजा त्या माणसाला म्हणतो, ' तू तुझे डोळे काढून दे, मी तुला पन्नास हजार रुपये देईन. तुझे दोन हात तोडून दे, मी तुला पंचवीस हजार रुपये देईन. पाय, मूत्रपिंड, हृदय, आतडी, किडनी, जठर या सगळ्याचे मिळून एक लाख रुपये !
माणूस चिडून म्हणतो, 'माझ्या अमुल्य अवयवांची किंमत करताना तुम्हाला लाज नाही वाटत ? मी माझा एकही अवयव विकणार नाही.'
राजा हसून म्हणतो, 'इतक्या 'अमुल्य' गोष्टी जवळ आहेत हे माहित असून तुला तुझ्या आयुष्याचा कंटाळा आला?'
माणसाला त्याची चूक समजते आणि तो रडू लागतो.
साधू म्हणतो, 'तू कुठल्या कारणासाठी आत्महत्या करणार होतास ते मला माहित नाही. पण तुझ्याजवळ ज्या अमुल्य गोष्टी आहेत त्यांचा योग्य वापर करून एक नवं आयुष्य सुरु कर.'
ही कथा संपल्यावर पुस्तकात ओळी होत्या -

When wealth is lost, something is lost.
When health is lost, everything is lost.
When everything is lost….. Future still remains !

क्षणभर वाटलं की माझ्या आजूबाजूचं सगळं जग थांबलंय. मनातला कोलाहल शांत शांत होत गेला.
कान बंद झाले. शून्यात नजर गेली. कितीतरी वेळ मी तसाच लोंबकळत उभा राहिलो.
मला वाटतं 'साक्षात्काराचा क्षण' याहून वेगळा नसेल !
यापूर्वीही असे 'साक्षात्कारी क्षण' येऊन गेले, पण आजच्यासारखं त्यांना चिमटीत पकडू शकलो नव्हतो !
सायकल शिकताना एकशे चौतीसवेळा पडून जेव्हा पहिल्यांदा 'बॅलंस' साधता आला तो 'साक्षात्कार' नव्हता ?
पोहता पोहता पाण्यावर पहिल्यांदा तरंगलो तो 'साक्षात्कार' नव्हता ?
ओठांनी शिट्टी वाजवता-वाजवता जेव्हा पहिली 'फ्लॉव-लेस' शिट्टी वाजली तो 'साक्षात्कार' नव्हता?

मनात उसळलेला विचारांचा पूर शांत झाला होता. आता विचारांचे तरंग उमटू लागले.



आपण झोपतो म्हणजे तसं पाहिलं तर काही काळासाठी 'मरतोच'. सकाळी जिवंत झाल्यासारखे जागे होतो.
घड्याळाचा गजर जरी उठवत असला तरी मुळात 'जागे होऊ शकतो' म्हणून उठतो.
आज सकाळी मी जागा झालो. याबद्दल 'त्याचे' आभार !

तालिबान राजवटीत जन्माला आलो नाही आणि जिथे जन्माला आलो तिथे तालिबान राजवट नाही.
याबद्दल 'त्याचे' आभार !

जगात काही दुर्दैवी लोकांना सूर्यप्रकाशाची अलर्जी असते. ही माणसे दिवसा घराबाहेर पडू शकत नाहीत. या लोकांना वर्षानुवर्षे घरामधेच बसून राहावं लागतं. मला सूर्यप्रकाशाची अलर्जी नाही. याबद्दल 'त्याचे' आभार !

शेणातलं अन्न वेचून खाणारी गरिबी अजूनही या पृथ्वीवर आहे. पानात गुळगुळीत भेंडीची भाजी वाढली म्हणून मी बायकोवर रागावू शकतो. याबद्दल 'त्याचे' आभार !

आज घातलेला शर्ट धुवून उद्या वापरावा लागत नाही. बोवारणीला कपडे देऊन भांडी घेण्याइतपत कपडे आहेत.
आज हा शर्ट घालू की तो शर्ट घालूही निवड करण्यात वेळ फुकट जातो याबद्दल 'त्याचे' आभार !

दोन्ही पाय लांब पसरून झोपण्यासाठी घरात पुरेशी जागा आहे. थंडीच्या दिवसात अंगावर पांघरूण आहे.
उकाड्यात पंख्याचा वारा आहे. साखरझोपेत असताना अंगावर पाऊस पडून झोपमोड होत नाही. याबद्दल 'त्याचे आभार' !

माझं उतरायचं ठिकाण आलं तरी 'ब्लेसिंग्स'ची ही यादी संपत नव्हती. एका वेगळ्याच तंद्रीत बसमधून उतरलो.
किती गोष्टी गृहीत धरून जगत होतो आपण ! तक्रार करायला जागाच नाही अशी खरं तर परिस्थिती.
इतकं असून तक्रारींचा पाढा वाचल्याशिवाय आपला दिवस सरत नाही.
परंतु अशा तक्रारी करणाऱ्या आणि निराशावादी लोकांना इतिहासात स्थान नसतं.
कारण इतिहास त्याच माणसांचा लिहिला जातो, जी माणसं स्वाभाविक मानवी मर्यादांच्या पलीकडे जातात.
इतिहास त्याच माणसांचा लिहिला जातो, जे आपल्या समृद्ध विचारांनी आणि कृतीने संकटांचे रुपांतर एका नव्या संधीत करतात.
या बाबतीत डॉ. चिंतामणराव देशमुखांची एक गोष्ट आठवली.
चिंतामणरावांनी ते रहात असलेल्या सरकारी बंगल्यासमोर मोठ्या कष्टाने बाग फुलवली होती. रोज सकाळी चार वाजता उठून ते झाडांना पाणी-बिणी घालून त्यांची निगा राखत असत. काही वर्षांनी त्यांना तो बंगला काही कारणास्तव सोडावा लागला. त्या बागेकडे बघून त्यांचे एक स्नेही हळहळून म्हणाले, 'तुमचे कष्ट वाया गेले. एवढ्या प्रेमाने वाढवलेली बाग तुम्हाला इथेच सोडून जावी लागणार.'
चिंतामणराव म्हणाले, 'असं कसं म्हणता तुम्ही? झाडं वाढवायची किमया 'माझ्या' हातात आहे. मी जिथे जाईन तिथे एक नवीन बाग निर्माण करू शकेन !

डोक्यात हे सगळे विचार घोळवतच घरी पोहोचलो. जेवायला बसलो. पानात भेंडीची भाजी !
काहीही न बोलता पानात वाढलेली भेंडीची भाजी संपवली.
'आज आवडली वाटतं - माझ्या हातची 'भेंडीची भाज्जी !' बायकोने टोमणा मारला.
'अं..हो.. हो..छान करतेस तू ही भाजी !' मी तंद्रीत म्हणून गेलो.
' मी छान स्वयंपाक करते याचा आज झाला का - 'साक्षात्कार' ?' बायकोने थट्टेच्या स्वरात विचारलं.
मी हसलो. तीही हसली.
काही गोष्टी न बोलूनही एकमेकांना बरोब्बर समजतात अशा घरात मी राहतो - याबद्दल 'त्याचे' आभार !

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive