Saturday, January 28, 2012

लोकप्रिय रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ३८ कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद Agatha christie in Marathi

लोकप्रिय रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ३८ कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद

Agatha christie all books in Marathi

लोकप्रिय रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ३८ कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद प्रकल्प ‘पद्मगंधा प्रकाशन’तर्फे हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या १० कादंबऱ्यांचा संच २५ फेब्रुवारी रोजी प्रकाशित होत आहे. नाटककार प्रा. मधुकर तोरडमल यांनी या कादंबऱ्यांचा अनुवाद केलेला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत..
रहस्यकथा या साहित्यप्रकाराला आपल्याकडे भरपूर वाचकवर्ग आहे. इंग्रजी किंवा अन्य परदेशी भाषांमधून ‘शेरलॉक होम्स’ तसंच अन्य रहस्यकथा- कादंबऱ्या मराठीत अनुवादित झालेल्या आहेत. इंग्रजीतील लोकप्रिय रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ३८ कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद प्रकल्प ‘पद्मगंधा प्रकाशन’तर्फे हाती घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या दहा कादंबऱ्यांचा संच २५ फेब्रुवारी रोजी प्रकाशित होत आहे. ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल यांनी या कादंबऱ्यांचा अनुवाद केलेला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत..
अगाथा ख्रिस्तीच्या तब्बल ३८ कादंबऱ्यांचा अनुवाद करावा, ही कल्पना कशी सुचली?
ही कल्पना माझी नाही. पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांची ही मूळ कल्पना. त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले. अगाथा ख्रिस्तीच्या सर्व कादंबऱ्यांचे हक्क जाखडे यांनी घेतले. अनुवाद करण्यापूर्वी मी अगाथा ख्रिस्ती यांची एकही कादंबरी वाचली नव्हती. मात्र, त्यांच्या लेखनाशी परिचय होता. कै. विद्याधर गोखले यांनी अगाथा ख्रिस्ती यांच्या ‘विटनेस फ्रॉम प्रॉसिक्युशन’चे ‘साक्षीदार’ या नावाने एक नाटक लिहिले होते. या नाटकात मी भूमिका केली होती. ‘शेरलॉक होम्स’ वाचला होता. एक दिवस अरुण जाखडे अगाथाच्या पुस्तकांचा गठ्ठा घेऊन माझ्या घरी आले. तिच्या
कादंबऱ्यांचा एकहाती अनुवाद त्यांना हवा होता. हे अनुवाद मी करावेत, अशी विनंती त्यांनी केली. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मी तसा नाटक-चित्रपटांच्या व्यापातून मोकळा झालेलो होतो. घरीच असल्यामुळे मला वेळही होता. सतत कार्यमग्न असलेल्या माणसाला असा रिकामा वेळ मिळाला की अस्वस्थ व्हायला होते. अनुवादाचे हे मोठे काम मिळाल्याने मी कामात व्यग्र राहणार होतो. त्यामुळे मी ‘हो’ म्हटले.
आत्तापर्यंत किती कादंबऱ्यांचा अनुवाद पूर्ण झाला आहे? तुमची अनुवादाची पद्धत कशी आहे?
गेली दोन वर्षे मी अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्यांवर काम करतोय. ३८ पैकी आत्तापर्यंत २० कादंबऱ्या भाषांतरित करून प्रकाशकांकडे सुपूर्द केल्या आहेत. सध्या २२ व्या कादंबरीच्या अनुवादाचे काम सुरू आहे. संपूर्ण कादंबरीचे वाचन करायचे आणि मग त्याचे भाषांतर करायचे, अशी माझी पद्धत नाही. कादंबरी वाचायला सुरुवात केली की एक-दोन पाने वाचून झाली की त्याचे लगेचच भाषांतर करायचे, अशी पद्धत मी ठेवली आहे.
भाषांतर करताना काय काळजी घेतली?
खरे तर मला या सर्व कादंबऱ्यांचे रूपांतर करायला जास्त आवडले असते. परंतु रूपांतर नको, भाषांतरच हवे, अशी प्रकाशकांची अट असल्याने अगाथाच्या लेखनातील मूळ गाभा कायम ठेवून शब्दश: भाषांतर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कथानकातील गावांची आणि पात्रांची नावे तशीच ठेवली आहेत. काही कादंबऱ्यांमध्ये तेथील समाजजीवन, त्यांची जीवनशैली, खाद्यपदार्थ, मद्याचे विविध प्रकार, सामाजिक, ऐतिहासिक वर्णने आली आहेत. म्हटले तर त्याचा आपल्या येथील वाचकांशी संबंध नाही. त्यामुळे काही ठिकाणी अनुवादक म्हणून स्वातंत्र्य घेऊन ते वर्णन मी कमी केले किंवा भाषांतरासाठी ते वगळले आहे. तसेच भाषांतर बोजड न होता मराठी वाचकांना ते आपलेसे वाटेल आणि सामान्यातील सामान्य वाचकाला ते कळेल, याची काळजी घेतली आहे.
अनुवाद करताना अगाथा ख्रिस्तीच्या लेखनाची कोणती वैशिष्टय़े जाणवली?
सर्वात प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे या कादंबऱ्यांमध्ये कुठेही एकसुरीपणा नाही. प्रत्येक कादंबरी वेगळी वाटते. वाचकाला आपण रुळलेल्या वाटेवरून जात आहोत, असे अजिबात वाटत नाही. कोणातरी एका व्यक्तीचा खून होणे आणि त्याच्या खुनासाठी काही जणांवर संशय असणे व शेवटी खरा खुनी कोण, याचा उलगडा होणे, असे साधे कथासूत्र असले तरी संपूर्ण कादंबरी वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवते. वाचक त्यात गुंतत जातो. प्रत्येक कादंबरीचा शेवटही धक्कादायक आहे. यातील प्रत्येक पात्राला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे ती खोटी न वाटता वास्तवातील वाटतात. ख्रिस्ती यांची ‘हक्र्युल पायरो’ ही प्रमुख व्यक्तिरेखा ‘शेरलॉक होम्स’पेक्षा वेगळी आहे. त्यांची तपासाची दिशाही वेगळ्या प्रकारची आहे. लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी असल्याने वाचकांना कुठेही कंटाळा येत नाही.
कादंबरी किंवा कोणत्याही कलाकृतीचे रूपांतर किंवा अनुवाद/ भाषांतर यापैकी जास्त आव्हानात्मक काय वाटते?
अन्य भाषेतील साहित्याचे मराठीत रूपांतर करण्याचे काम जास्त आव्हानात्मक आहे असे मला वाटते. अनुवाद/ भाषांतरामध्येही सर्जनशीलता किंवा कौशल्य असले तरी रूपांतर करताना आपली संस्कृती, भाषा, विचार, सामाजिक वातावरण यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. समांतर घटना घेऊन हे रूपांतर आपल्या संस्कृतीशी जुळेल आणि आपल्या वाचकांना रुचेल, अशा प्रकारे करावे लागते. भाषांतरात तसे स्वातंत्र्य नसते. तुम्हाला मूळ गाभा तसाच ठेवून केवळ अनुवाद करायचा असतो.
या प्रकल्पाला वाचकांकडून कसा प्रतिसाद मिळेल असे वाटते?
मराठी वाचकांना रहस्यकथा हा वाङ्मयप्रकार आवडतो. रहस्यकथालेखक बाबुराव अर्नाळकर हे याचे मोठे उदाहरण आहे. आज महाराष्ट्रात अगदी खेडोपाडी ते त्यांच्या पुस्तकांमुळे पोहोचले आहेत. त्यामुळे याचेही मराठी वाचकांकडून चांगले स्वागत होईल असा विश्वास वाटतो.

Purchase books here

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive